सवतीची माया

सवतीची माया

#सवतीची_माया

ए भांडीssये

ए भांडीssवाली..ओ ताई जुने कपडे हायेत का. 

ही पण ना मेली जरा निवांत पडू म्हणलं तर उगवली.

ताई,भांडी तुमाला आवडतील अशी हायेत. भगुनं बी हाये मोठ्ठ वालं. तुमाला हवं तर सांगा नाय तर मी चालले वरती. त्या तळेकर बाईलाबी पायजेल हाय पण म्हणल तुमी जुनं गिराईक. तुमाला डावलून कसं जावं! चला कपडे काडा बीगीबीगी.

अगं थांब. जरा विसावा दे स्वतःला. उन्हाची फिरतेस ती. घेऊन येते गाठोडं. 

ताई दादाचे टिशर्ट,पँटी नि ताईचे पंजाबी डिरेस,तुमच्या साड्या सगळं हाणा. बघते मी.

हं हे घे पाणी पी बाई आधी. उन्हाची आलीस ती.

नलूताई तुमीच ओ पानी इचारता नैतर मागितल्याशिवाय कुनाच्या लक्षात बी येत नाय. निसती भांड्याकडेच टकामका बघत रात्यात.

हिराच्या टोपलीत ताट,चहाचा टोप,मोदकपात्र,चाळणी,टोपांचा सट,डब्यांचा सट,एल्युमिनियमचे मोठाले टोप..असं बरंच काही असतं. शिवाय बाजूलाच बादल्या,टब,जाळीचे कपडे ठेवायचे बासकेट वगैरे. गुडगे छातीला टेकवून बसलेल्या हिराने गटागटा गार पाणी पिलं. उन्हामुळे रापलेलं तिचं गोरं अंग, नववारी लुगडी,खणाची चोळी,गळ्यात काळ्या मण्यांची पोत,त्यात पैसे साठवून केलेल्या सोन्याच्या मण्यांची डवली, हातीत भरलेल्या हिरव्या ठशांच्या बांगड्या,हातावर नि कपाळावर हिरवक़च गोंदण नि कुंकवाची आडवी चिरी. जग इकडून तिकडे झालं पण हिराचा हा पेहराव वयाच्या सतराव्या वर्षी लग्न झाल्यापासनं बदलला नव्हता. 

बाई मोठी हिकमतीची. या जुन्या कपड्यांच्या धंद्यावर मुंबईतल्या चाळीत छोटी का होईना स्वत:ची खोली घेतलेली. दोन मुली झाल्यावर नवऱ्याला,सासूला न जुमानता फेमिली प्लानिंगचं ऑपरेशन करुन घेतलेलं. नवऱ्याने दुसरा घरोबा केला. हिराला बऱ्याचजणांनी सांगितलं त्याच्यावर केस कर पण हिराचं म्हणणं,ज्याला आपुन नुको तेला धरुन ठिवन्यात काय अर्थय.
सहा महिने नवरा वेगळं बिराड मांडून राहिला पण वेळेवर काम मिळेना हाताला. उपाशी रहायची पाळी आली तसा तो त्या वीस  वर्षाच्या पोरीला घेऊन हिराच्या दारात आला.

 हिराच्या सासूने त्याला शिव्यांची लाखोली वाहिली पण हिराने सवतीला आत घेतलं. ती दोघं माळ्यावर राहू लागली. हिराची सवत सगुणा तशी भोळीच होती. एका गादीवाल्याची पोरगी. मुंबईला लहान दुकानांना गाद्या म्हणतात. त्यांत लहान मुलांची चॉकलेट,बिस्कीटांचे पुडे,बल्ब,सिगारेट,विडी,पान,तंबाखू..सगळं काय ते मिळतं. वरती गोल जाळीत अंडी लटकवलेली असतात. दुपारी तिचे वडील झोपले कि ती गादीवर बसायची. उफाड्याची सगुणा,बोलण्यातही हुशार होती. सावळीशी,टपोऱ्या डोळ्यांची,मोत्यांच्या दातांची,गालावर खळी असणारी सगुणा गादीवर बसली की बरीच पावलं तिथे घुटमळायची. सगुणाची आई गोदीत कामाला जायची. 

हीच संधी हेरुन भीमाचा नवरा धोंडी सगुणाशी थट्टामस्करी करायचा. मुद्दामहून बरणीच्या झाकणावर तबला वाजवत रहायचा. सगुणाच्या रुपाचं कौतुक करायचा. नुकतीच यौवनाच्या उंबरठ्यावर असलेली सगुणा त्याच्या मादक गप्पागोष्टींना भाळली. धोंडीचं लग्न झालेलं आहे हेही तिला ठाऊक होतं तरी वयात आलं की गाढवबी चालतय या उक्तीप्रमाणे ती धोंडीला जीव लावून बसली. 

चाळीतल्या तरुणांना सुगावा लागला होताच. त्यांनी ही गोष्ट तिच्या आईच्या कानावर घातली तसं आईने तिचं गादीवर बसणं बंद केलं. तिला घरात कोंडून ठेवू लागली. तरी ऐकेना म्हंटल्यावर चपलाचा मारही दिला पण एक दिवसआईवडिलांच्या हातावर तुरी देऊन सगुणा संडासला जायचं निमित्त करुन भरलेलं टमरेल घेऊन पळाली. तिच्या आईवडिलांनी तिचं नाव कायमचं टाकलं. 

हिराला मात्र ती तिच्या पोरींवानीच वाटायची. हिरा सांगेल ते काम ती निमुटपणे करायची. सासूच्या शंभर शिव्या रोज उठून खायची. काही महिन्यात तिला कळून चुकलं की जवानीच्या जोशात आपण घोडचूक केली आहे. धोंडीजवळ काही कला नाही ज्याने तो तीचं पोट भरु शकेल. आता हिराताईचाच तिला आधार होता. आईवडिलांनी टाकलेली त्यामुळे माहेरही नव्हतं. सगुणा घरातली सगळी कामं करायची. हिराच्या मुलींना सांभाळायची. त्यांचा अभ्यास घ्यायची. सगुणाला दिवस गेले. हिराने तीचे सगळे लाड पुरवले. तिला हवं नको ते आणून देई. कोणाला वाटतच नव्हतं त्या सवती आहेत. अगदी बहिणीबहिणीसारख्या रहायच्या. सगुणाचं बाळंतपणही हिरानेच केलं. सगुणाला मुलगा झाला,सावळासा विठोबा जसा.

हिरा सगुणाला मालीश,बाळाला अंघोळपांगोळ,धुरी देऊनच कामाला निघायची. तिच्या नवऱ्याला टिबी झाला होता त्यामुळे सगुणा नि बाळ खालीच निजायचे. दोन्ही बहिणींचा लाडका होता विठू. 

नलूने कपड्याचं गाठोडं हिरासमोर खोललं. हिरा एकेक कपडा बघू लागली. 

ताई ही भुशशर्ट देव नका. आमच्याकडनं घेत नायत कुनी. 

हे चवकडचं बग. माझ्या लेकाचं ऑफिसला घालायचं आहे. एकदोनच वर्ष वापरलंन नि टाईट होतं म्हणून टाकलं वापरायचं. 

रंग उडायलाय हो ताई याचा नि हे काय कॉलर बगा किती झिरझिरीत झालीय. 

ए बाई, तू अशीच कटकट करत रहाणारेस का? मला तो मोठा स्टीलचा टोप दे. पाणी तापवायला बरा पडेल. 

या बया. एवढ्याशा कपड्यावर इस्टीलचा टोप. ताई आसं करा दोन साड्या आणा.

ह्या काय चार ठेवल्यात त्या तुझ्यासमोर.

ओ ताई, नवीन असल्यावानी काय करायल्या लागल्यात. या सिलिकच्या साड्या नकू. काटनच्या दाखवा की जरा. 

आता हद्द झाली तुझ्यापुढे. रोज नेसायच्या साड्या देऊन टाकू की काय तुला नि हे ड्रेस का बाजूला काढलेस गं.

हं ताई वढणी पायजेल डरेसवर. वढणी देवा मग घेते.

बरं बरं ह्या घे ओढण्या. आता तरी दे मला तो टोप. ताई एक साडी टाका नायतर मी जाते वरती.  एवढ्यावरच पायजेल तर हे भगुणं घेवा.

नको मला टोपच पायजेल. थांब हां बघते साडी. शेवटी नलूने दोन वर्षापुर्वी लग्नात मिळालेली दोनेक वेळा वापरलेली साडी हिराला बहाल केली आणि तो स्टीलचा टोप मिळवला. जुनं गिर्हाईक असल्याने हिराने तिला झाकणी मोफत दिली. हिराने सगळे कपडे आपल्या बोचक्यात घडी करुन भरले. तेवढ्यात नलूने तिला चहा आणून दिला. नलूला हिराच्या घरची सगळी माहिती होती.

काय म्हणतोय सगुणेचा बाळ.

ओ ताई, निसता सगुणेचाच नव्हं त्यो,आमचा सगळ्यांचाच हाये. विठूच आलाय घरात आमच्या,सावळासा. 

हिरा,तुला मानायली हवी गं. कोण करत नाही एवढी माया सवतीवर.

ताई,अवो सवत आसली तरी माझ्या लेकींवानीच हाये ओ सगुणा. आता पाऊल चुकलं तिचं नि माझ्या नवऱ्याच्या जाळ्यात सापडली बिचारी. आईबाप ढुंकूनबी बघित न्हाईत पोरीला. पोर तशी गुनाची हाय ओ. उद्याला माज्या लेकीबी मोठ्या होतील. त्यांचं आसं पाऊल वाकडं पडलं तर..असाबी इचार आला बगा मनात माझ्या. भांडणतंटा करुन लोंकांले गमंत दाखिवन्यापरीस वाट चुकलेलं पाखरु आपलं मानलं मी. 

नि तुझा नवरा गं. 

त्यो भोगतोय त्याच्या कर्माची फळं. खोकून खोकून छातीचा पिंजरा झालाय. शिवडीला मोठं हास्पितल हाये तीकडली ट्रीटमींट घितोय सध्या. आईस जाते तेच्या संगती. तेचं पानी,कपडं समदं येगळं ठिवती मी. उगा माज्या विठूला तरास नुको तेचा. कधीमधी हुंगायला बगतो सगुणीला पण आता माज्या पोरीबी सगुणावर पहारा करत्यात. बापाला जवळ येव देत नैत तिच्या. त्यो कनचा संसारगज रोग हाये आसं लिवलय म्हने तेंच्या बुकामदी. तेचेकरता शेळीचं दूध घिऊन जाते मी. गावठी अंडी घिऊन जाते. लय पथ्यपानी आसतं बगा. सासूतव कुठून ताकद आलिया पोराचं हाल बगून. निमुटपनी मी न्हेते ते समदं त्याले करुन घालिते. आता नातू गावल्यापासना सगुणाला शिव्याबी घालायची कमी आलिया म्हातारी. 

डॉक्टर काय म्हणतात गं? 

डाकदर म्हनत्यात बरा होईल पन मज काय भरौसा वाटत नाय बघा. मला त्या सोन्यासाऱ्या पोरीचं पडलय. सवत आसली म्हून काय जालं. उभा जनम असाच काडनार काय म्हून मिया ठरिवलय.

काय गं काय ठरवलयंस?

माजा भाचा हाये येक. गावी रातो. जास्ती शिकललला न्हाई पर वावर हाये सवताच. बिचाऱ्याची बायको शाक लागून गेली. नोकरी नाय नि बिजवर असल्याकारनान कोनी पोरगीबी दित नाय त्याले. 

मग?

मी सगुणासाठी भावाकडे शबुद टाकलाय. मला खातरी हाये,तेचा होयकार ईल. मंग सगुनाचं लगीन लावून देनार मी भाच्यासंगट. माज्या विठूला घिऊन जाईल ती. नाय न्हेलं तर मी सांबाळीन त्याहिले. कसंबी होऊंदे पर पोरीचं भलं होवंदे येकदाचं. चला बाई,येती मी. दोन गल्ल्या फिरती नी जाती घरला. विठुराया वाट बगीत आसंल माजी.

थांब हं जरा. 

नलू उठली. तिने कपाटातून तिच्या नातवाचे जुने कपडे,दुपटी काढली,त्यात पाचशे रुपयाचं पाकिटही ठेवलं व हिराला देत म्हणाली ,"ही तुझ्या विठुरायासाठी माझ्याकडून भेट घे."

हिराने ती भेट आनंदाने स्वीकारली व डोळ्यांनीच नलूचे आभार मानले.

-----सौ.गीता गजानन गरुड.