Login

सावल्यांच्या कुशीत. भाग - ३२

सावल्यांच्या कुशीत
सावल्यांच्या कुशीत. भाग - ३२

नीरव उठून खिडकीजवळ गेला आणि त्याने पाहिलं तर सुधाकर मागच्या बाजूला चालले होते, त्यांचं वागणं नीरवला संशयास्पद वाटत होतं. अंधार पडायला सुरुवात झाली होती, पण अजूनही बाहेरचं दिसू शकेल असा उजेड होता.

नीरव काही वेळ तसाच उभा राहिला. मग त्याने वही बंद केली, पेन टेबलावर ठेवलं आणि हळूच दरवाज्याजवळ आला.

त्याला मनात शंकेची पाल चुकचुकली. "बाबा असं चोरपावलांनी घराबाहेर का जाताय? ते काहीतरी लपवण्याचा प्रयत्न तर नाही ना?" असा विचार नीरवच्या मनात आला आणि थोडा वेळ थांबून नीरवने पायात चप्पल सरकवली आणि तोही हळूच घराबाहेर पडला. मागे कोणाला कळू नये म्हणून तो ही चोरपावलांनीच सुधाकर जिकडे गेले तिकडेच त्यांच्या मागे अंतर ठेऊन जाऊ लागला.

सुधाकर वाड्याच्या मागे आले आणि मागच्या खोलीच्याही मागच्या दाराला गेले. नीरवने लांबूनच ते पाहिलं आणि तो ही तिकडे जाऊ लागला.

त्या खोलीच्या मागच्या दाराने सुधाकर आत गेल्यावर नीरव भिंतीच्या आड उभा राहिला.

सुधाकर आत कोणाशी तरी बोलत होते, पण ते काय बोलत होते हे नीरवला ऐकूच येत नव्हते त्याच्या कानावर फक्त आवाज पडत होता.

नीरवचा श्वास जड झाला होता. तो भिंतीला कान लावून आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होता, पण शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हते... फक्त काही तरी कुजबुज… आणि मध्येच चिडल्यासारखा आवाज ऐकू येत होता.

"अजून किती दिवस इथे लपवून ठेवायचं हिला?" हे वाक्य अचानक स्पष्टपणे नीरवच्या कानावर पडलं. मग तो सावध झाला. पण तो आवाज त्याला सुधाकरचा आवाज वाटला नाही. तो आवाज कोणाचा आहे आणि आत अजून कोण कोण आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने परत भिंतीला कान लावले. पण आता आवाजही येत नव्हता आणि कुजबुज सुद्धा ऐकू येत नव्हती. आतून एक शांतता जाणवली आणि लगेच दाराच्या दिशेने पावलांचा आवाज येऊ लागला. त्या आवाजाने नीरव पटकन भिंतीच्या कोपऱ्यात सरकला.

"जर आता आपल्याला कोणी इथे पाहिलं असतं, तर काय झालं असतं?" असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली.

दार उघडलं गेलं आणि आतून सुधाकर बाहेर आले आणि त्यांनी आजूबाजूला नजर फिरवून पाहिलं आणि पुढे जाऊ लागले. त्यांना बघून नीरव हळूच आवाज न करता मागे सरकला आणि झुडपांच्या आड लपला.

त्याचं मन विचारांनी गोंधळून गेलं होतं. सुधाकर नेमकं कोणाशी बोलत होते? आणि काय बोलत होते? हे काही केलं तरी त्याच्या डोक्यातून जात नव्हते. त्याची आत जाऊन बघायची खूप इच्छा होत होती पण असं डायरेक्ट आत गेलं तर आपल्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर...? असाही विचार त्याच्या मनात आला.

तो तिथून निघून परत घराच्या दिशेने जाऊ लागला, पण  त्या खोलीच्या आत नेमकं काय आहे? याचा विचार काही केल्या त्याच्या मनातून जात नव्हता.

नीरव घरात आला तेव्हा सुधाकर मस्तपैकी टिव्ही बघत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर असे भाव होते की ते खूप मन लावून कधीपासून इथेच बसून टिव्ही बघताय. नीरव आत येताच त्यांनी त्याला पाहिलं आणि थोडे गोंधळले पण तरीही त्यांनी चेहऱ्यावरचा गोंधळ लपवला.

"नीरव, तू आता कुठे गेला होता? तू तर तुझ्या खोलीत बसून होता ना?" सुधाकरने थोडं घाबरतच विचारले. नीरवने आपल्याला पाहिलं तर नसेल ना अशी शंका त्यांना आली.

"बाबा, मी जरा इथेच पाय मोकळे करायला गेलो होतो पण मी बाहेर गेलो तेव्हा तर तुम्ही इथे नव्हता, मग आता तुम्ही कुठून आलात?" नीरवने पण मुद्दामच त्यांना शंका येऊ नये म्हणून विचारले.

"मी जरा माझ्या खोलीत गेलो होतो पण लगेच आलो." सुधाकर म्हणाले, मग नीरवनेही पुढे काही प्रश्न विचारले नाही. तो पण आत त्याच्या खोलीत गेला आणि काहीतरी विचार करून मग त्याने त्या वाड्याच्या मागच्या खोलीची चावी जी त्याला आजोबांनी दिली होती ती त्याने घेतली आणि त्याच्या खिशात ठेवली.

रात्रीचा स्वयंपाक झाल्यावर वेदिका नीरवला बोलवायला आली आणि तिने त्याला आवाज दिला पण त्याचं आजिबात तिच्याकडे लक्ष नव्हतं, तो अजूनही सुधाकर त्या खोलीत कशाला गेले असतील याचाच विचार करत होता. तो एवढा विचारात हरवलेला दिसल्यावर वेदिकाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा कुठे तिच्या स्पर्शाने तो विचारातून बाहेर आला.

"काय हे नीरव? किती वेळा आवाज दिला मी तुम्हाला, एवढा कसला विचार करताय तुम्ही?" वेदिकाने विचारलं पण नीरवने तिला काही टेन्शन नको म्हणून काहीच नाही सांगितले.

"काही नाही गं सध्या शाळेचं थोडं टेन्शन आहे, त्याचाच विचार करत होतो, तू बोल ना काय म्हणतेस?" नीरव.

"काही नाही तुम्हाला जेवायला बोलवायला आली होती, चला आता सगळेच बसलेत." वेदिका म्हणाली तेव्हा नीरव उठला आणि जेवायला बाहेर आला.

जेवणं झाल्यावर वेदिका सगळी कामं आवरून बाहेर हाॅलमध्ये आली तर नीरव अजूनही तिथे आरवच्या बाजूला बसून होता. त्याला अजून तिथे बसलेला बघून ती आश्चर्य चकित झाली.

"हे काय तुम्ही अजून झोपायला नाही गेलात?" वेदिका.

"नाही आरवला अभ्यासात थोडी मदत हवी आहे माझी म्हणून बसलोय, तू जा झोपायला त्याचा अभ्यास झाला की मी येतो." नीरव म्हणाला तसं वेदिका खोलीत गेली पण आरव मात्र त्याच्याकडे गोंधळून बघू लागला.

"दादा, मी कधी सांगितलं तुला की मला मदत हवी आहे, माझा अभ्यास मी करतोय!" आरव.

"हो ते माहीतीये मला पण मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून मी वेदिकाला तसं सांगितलं." नीरव.

"असं काही आहे का.... मग बोल ना..." आरव.

"आरव, आपल्या वाड्याच्या मागच्या बाजूला ती खोली आहे तिथे काहीतरी गडबड आहे, संध्याकाळी बाबा तिथे कोणाशी तरी बोलत होते. मला वाटतं की आपण दोघांनी तिथे जाऊन बघायला हवं! तसं मी एकटाही गेलो असतो पण काही गरज लागली तर सोबत बरी म्हणून विचारतोय तुला!" नीरव.

"हो पण मला काय वाटतं दादा, आपण थोडं सावधगिरीने जायला हवं." आरव.

"हो ना पण आता लगेच वेदिकाला काही समजायला नको, नाही तर ती आपल्या मागे येईल." नीरव.

"दादा, वहिनी आत गेली आहे ना मग आपण बाहेर जाताना हा दरवाजा बाहेरून बंद करून घेऊ म्हणजे कोणालाही बाहेर येता येणार नाही." आरव म्हणाला तसं नीरव पण हो म्हणाला मग दोघेही घराबाहेर पडले पण घराबाहेर जाताना सेफ्टीसाठी हातात काठ्या ठेवल्या.