Feb 23, 2024
नारीवादी

सावित्रीची लेक भाग ९

Read Later
सावित्रीची लेक भाग ९

सावित्रीची लेक भाग ९


मागील भागाचा सारांश: डॉ पुनम एका मेडीकल कॅम्पसाठी गावात आली होती. रामभाऊने तिला आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले. डॉ पुनम रामभाऊच्या घरी गेली, तिथे प्रगती व तिची भेट झाली. डॉ पुनमच्या बोलण्यावरुन तिचे विचार अत्यंत साधे सरळ असल्याचे समजले.


आता बघूया पुढे….


डॉ पुनम पहिला घास खाल्ल्याबरोबर रखमाकडे बघून म्हणाली,


"काकू वांग्याचं भरीत अप्रतिम झालं आहे. सगळेजण तुमच्या हातच्या भरीताचं कौतुक असंच करत नाही. माझ्या आजीच्या हातच्या भरीताची आठवण झाली."


"तुमच्या आजी कुठे राहतात?" रखमाने विचारले.


पुनम म्हणाली,

"माझी आजी आता या जगात नाहीये. मी लहान असताना वांग्याचं भरीत बघितलं की, नाक मुरडायचे. मी आजीकडे सुट्टीत गेले होते, तेव्हा भावंडासोबत खेळून आल्यावर मला जोराची भूक लागली होती. घरात काहीतरी खाण्यासाठी शोधत होते, तर वांग्याचं भरीत सोडून काहीच नव्हते. आजीने ठणकावून सांगितले की, तुला दुसरं काही बनवून मिळणार नाही. वांग्याचं भरीत खावंच लागेल. भुकेच्या तडाख्यात वांग्याच्या भरीताची चव चाखली आणि तेव्हापासून वांग्याचं भरीत मला आवडायला लागलं."


रखमा म्हणाली,

"कोणतीही भाजी खाल्ल्याशिवाय त्याची चव कळत नाही. सगळ्या भाज्या खायलाच पाहिजे. आम्ही तर प्रगतीला आत्तापासूनच सर्व भाज्या खाण्याची सवय लावत आहे."


पुनम पुढे म्हणाली,

"काकू तुम्ही प्रगतीला खूप चांगल्या सवयी लावत आहात. मुलं मोठे झाल्यावर भाजीचा रंग, आकार बघून भाजी खायला नाही म्हणतात. लहान मुलांवर जे काही संस्कार करायचे असतात, ते याच वयात करता येतात. मुलं मोठी झाली की, त्यांना त्यांची बुद्धी येते, मग ते काही कोणाचं ऐकत नाहीत."


"ताई तुम्हाला लहान मुलं आवडतात का?" सुमनने विचारले.


"हो मला लहान मुलं खूप आवडतात. माझ्या बहीण भावांच्या मुलांना तर मी अतिलाडाने बिघडवून ठेवलंय." पुनमने उत्तर दिले.


रखमा म्हणाली,

"ताई तुम्हाला जर लहान मुलं आवडतात, तर तुम्ही मुलं का होऊ दिले नाहीत?"


पुनम म्हणाली,

"काकू ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, त्या सर्वच गोष्टी आपल्याला मिळतात, असं नाही ना. माझ्याही बाबतीत असंच घडलं आहे. जी लहान मुलं मला खूप आवडतात, ती माझ्या नशिबात नाहीयेत."


रखमा म्हणाली,

"ताई असं का बोलत आहात? तुमच्या नशिबात मुलं नाहीत, म्हणजे? मला तुमच्या बोलण्याचा अर्थ कळाला नाही."


पुनम म्हणाली,

"काकू जेवण झालं की, मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगते."


पुनमचं जेवण झाल्यावर पुनमची कथा ऐकण्यासाठी रखमा व सुमन तिच्या शेजारी येऊन बसल्या. 

पुनम म्हणाली,


"काकू कॉलेजचं शेवटचं वर्ष संपल्यावर माझं संदीप सोबत लग्न झालं. बॉण्ड पूर्ण करण्यासाठी मला दोन वर्षे सरकारी दवाखान्यात नोकरी करावी लागणार होती, त्यामुळे आम्ही मुलांचा लगेच विचार केलाच नाही. तुमच्या गावात मी दोन वर्षे होती. सावित्रीची डिलिव्हरी झाली, तेव्हा माझे त्या दवाखान्यातील शेवटचे दोन तीन दिवस राहिले होते. तुम्हाला आठवत असेल तर, तुमची आणि माझी त्यावेळी भेट झाली होती. दुसऱ्या दिवशी मी गावावरुन माझ्या घरी जात असताना माझ्या गाडीचा मोठा अपघात झाला.

मला खूप लागले होते. अपघातात माझ्या गर्भाशयाला दुखापत झाली. डॉक्टरांनी त्यावेळेसचं सांगितले होते की, मी कधीही आई होऊ शकतं नाही. 

मी विचार केला की, आज रोजी मेडीकल सायन्स एवढं पुढे गेलं आहे की, काहीना काही उपचार होईलच. मी स्वतः स्त्रीरोग तज्ञ असल्याने अनेक शहरातील अनुभवी डॉक्टरांसोबत चर्चा केली, अनेक तपासण्या केल्या, पण काहीच होऊ शकलं नाही. 

मी कितीतरी स्त्रियांच्या डिलिव्हरी करुन त्यांच्या हातात त्यांचं बाळ देते, पण मला माझं बाळ होऊ शकत नाही, याचं खूप वाईट वाटतं. एका अपघाताने माझं मातृत्व हिरावून घेतलं"


पुनमला बोलता बोलता भरुन आलं होतं. यावर रखमा म्हणाली,


"देव चांगल्या लोकांच्याच बाबतीत असा क्रूर का होतो बरं? तुम्ही सर्वांची इतकी मदत करतात. आमच्या गरिबांच्या उपयोगी पडतात."


पुनम म्हणाली,

"काकांनी मला प्रगतीबद्दल जेव्हा सांगितलं, तेव्हा मी देवाला हेच म्हटले की, ज्या वडिलांना मुलीची किंमत नाही, त्यांच्या पदरात तू मुलगी घालतोस आणि दुसरीकडे आमच्या सारखे लोक मुलांसाठी तरसत आहेत, त्यांच्या बाबतीत थोडी सुद्धा दया दाखवत नाहीत."


सुमन म्हणाली,

"पुनम ताई मागे मी एकदा मुलं दत्तक घेण्याबद्दल ऐकलं होतं. तुम्ही असं काही का करत नाहीत?"


पुनम म्हणाली,

"शेवटी आम्हीही आता तोच प्रयत्न करणार आहोत. सुरवातीला माझ्या सासू सासऱ्यांचा मूल दत्तक घ्यायला विरोध होता, पण आता तेही तयार झाले आहेत. आपल्या घरातील व्यक्तींच्या विरोधात जाऊन आम्हाला काहीच करायचे नाहीये. गेल्या काही दिवसांपासून आम्ही त्यांना समजावत होतो, तेव्हा ते आता कुठे स्वतःहून तयार झाले आहेत."


रखमा म्हणाली,

"बरं झालं, काहीतरी मार्ग सापडला. आता आमच्या प्रगतीचंच घ्या ना, तिला जन्म माझ्या मुलीने दिला आणि तिचं जडणघडण मी करत आहे."


पुनम म्हणाली,

"काकू प्रगती व सावित्रीची भेट झालीच नाही का?"


रखमा म्हणाली,

"नाही ना. सावित्रीच्या नवऱ्याने आमच्याशी सर्व संबंधचं तोडून टाकले. माझी आणि सावित्रीची सुद्धा भेट झाली नाहीये. एका मुलीची व आईची ताटातूट केली. मला सावित्रीला भेटण्याची खूप इच्छा होते, पण काय करणार? आपल्या हातात काहीच नाहीये."


"काकू आता प्रगतीचं शिक्षण तुम्हीच करणार का? या वयात तुमच्याकडून प्रगतीचं सर्व काही होईल का?" पुनमने विचारले.


रखमा म्हणाली,

"पुनम ताई सगळेजण आम्हाला हाच प्रश्न विचारतात, पण मला तुम्हीच सांगा. आता हे एवढंस लेकरु कुठे ठेवायचं? तिला आमच्या शिवाय कोणीच नाहीये. आम्ही प्रगतीला सांभाळणार नाही तर कोण सांभाळेल? 

प्रगतीचा आम्ही सांभाळ करत असल्याने आमचा मुलगा सुद्धा आमच्यापासून दुरावला आहे. आमच्या मुलाला आमचा निर्णय पटला नव्हता, त्याचं म्हणणं होतं की, आपण कोर्टात जाऊ आणि सावित्रीच्या नवऱ्याला प्रगतीचा सांभाळ करण्यास भाग पाडू.

आता तुम्हीच सांगा ताई, अशी बळजबरीने सोपवलेली जबाबदारी माणूस पुरेपूर निभावेल का? एकतर सावित्रीच्या सासरचे लोकं खूप विचित्र आहेत. आपली मुलगी ते नांदवत आहेत, तेच आपल्यासाठी खूप मोठं आहे. ताई कोर्टकचेरी करणं आपल्याला परवडणार आहे का?"


पुनम म्हणाली,

"काकू मला तुमचं म्हणणं पटतंय,पण काकू तुम्ही या सर्व परिस्थितीकडे भावनिकरित्या न बघता थोडं प्रॅक्टिकली बघायला पाहिजे. काकांचं आणि तुमचं आता वय होत चाललं आहे. वाढत्या वयामुळे तुमचं शरीर आणि मन दोन्हीही थकत जाईल. प्रगती आत्ता फक्त अडीच वर्षांची आहे. अजून प्रगतीचं पुढचं एवढं मोठं आयुष्य जायचं आहे. तुमचे इतर नातेवाईक तुम्हाला कोणत्या हेतूने सांगत होते? याची मला कल्पना नाही, पण मी मात्र सर्व परिस्थितीचा विचार करुन सांगत आहे.

आता त्या दिवशी काकांची तब्येत अचानक बिघडली, देवाच्या कृपेने त्यांना काही झालं नाही. पुढच्या वेळी देव आपली साथ देईलच, असं नाही ना. तुमच्या दोघांपैकी कोणाला काही झालं तर प्रगतीचं काय होईल? याचा विचार करा.

तुमच्या मुलांच्या वेळेस शाळा वेगळ्या होत्या, आत्ता शाळेत खूप मोठा बदल झाला आहे, हे सगळं तुम्हाला झेपेल का?

मी हे सगळं तुमचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी अजिबात बोलत नाहीये. तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. काकांबरोबर हॉस्पिटलमध्ये बोलणं झाल्यावर हे सर्व प्रश्न आमच्या डोक्यात निर्माण झाले होते."


"ताई तुमचं म्हणणं मला मान्य आहे. मी तुमच्या बोलण्याचा अजिबात चुकीचा अर्थ घेत नाहीये. प्रगतीची पूर्ण जबाबदारी आमच्यावर आहे. आमच्या खेरीज तिची जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नाहीये. अशावेळी आम्ही काय करावे? अशी तुमची इच्छा आहे." रखमाने विचारले.


रखमाच्या प्रश्नाचे पुनम काय उत्तर देईल? हे बघूया पुढील भागात…..


©®Dr Supriya Dighe

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//