सावित्रीची लेक भाग ८

Dr Punam is invited for lunch at there home by rambhau and rakhma

सावित्रीची लेक भाग ८

मागील भागाचा सारांश: प्रगतीचा पहिला वाढदिवस रामभाऊ व रखमा गीता, सदा व सुमनच्या मदतीने साजरा करतात. गीताचे लग्न झाल्यावर प्रगतीला ताप येतो. एके दिवशी अचानक रामभाऊ चक्कर येऊन पडल्याने सदा त्याला घेऊन शहरातील हॉस्पिटलमध्ये जातो. हॉस्पिटलमध्ये रामभाऊची भेट डॉक्टर मॅडम सोबत होते, ह्या त्याच डॉक्टर मॅडम असतात, ज्यांनी सावित्रीची डिलिव्हरी मेणबत्तीच्या उजेडात केली होती. रामभाऊ ज्या डॉक्टरांकडे आला होता, ते डॉक्टर त्या मॅडमचे मिस्टर होते. रामभाऊच्या सर्व तपासण्या केल्यावर त्याचा बीपी वाढल्याचे निदर्शनास आले. डॉक्टर मॅडमने अतिरिक्त ताणाचे कारण विचारल्यावर रामभाऊने आतापर्यंत घडलेली सर्व हकीकत सविस्तरपणे सांगितली.

आता बघूया पुढे….

घरी गेल्यावर रामभाऊ व सदाने हॉस्पिटलमध्ये झालेली डॉक्टर मॅडमची भेट, तसेच त्यांच्या सोबत झालेली चर्चा रखमाला सांगितली.

"आपण काय पुण्य केलं असेल? म्हणून अश्या डॉक्टर मॅडम आपल्याला भेटल्या." रखमा हात जोडून वर बघत म्हणाली.

सदा म्हणाला,

"हो ना वहिनी. डॉक्टर मॅडम लईच भारी आहेत. मॅडमने रामभाऊची तपासणी फी सुद्धा घेतली नाही, वरुन गोळ्या औषधे सुद्धा मोफत दिली. डॉक्टर मॅडमचे मिस्टर सुद्धा चांगल्या स्वभावाचे आहेत."

"डॉक्टर मॅडम येत्या रविवारी मेडिकल कॅम्पसाठी आपल्या गावी येणार आहेत, तेव्हा त्या आपल्या घरी येणार आहेत." रामभाऊने सांगितले.

रखमा म्हणाली,

"खरंच! डॉक्टर मॅडम आपल्या घरी येणार आहेत. मला तर त्यांना भेटून लई आनंद होईल."

सदा म्हणाला,

"वहिनी डॉक्टर मॅडमला बिना जेवण करता घरुन जाऊ द्यायचं नाही."

रखमा म्हणाली,

"मुळीच नाही. मी त्यांच्यासाठी खास बेत करणार आहे."

रविवारी मेडिकल कॅम्पसाठी डॉक्टर मॅडम गावात येतात. रामभाऊ मॅडमला जेवणाचं आमंत्रण देऊन येतो. मॅडमच्या ड्रायव्हरला रामभाऊ घराचा पत्ता व्यवस्थित समजावून सांगतो. दुपारपर्यंत कॅम्पमधील पेशंटची तपासणी पूर्ण होते. डॉक्टर मॅडम रामभाऊच्या घरी जायला निघतात. 

रामभाऊने ड्रायव्हरला अचूक रस्ता सांगितल्याने ड्रायव्हर गाडी बरोबर रामभाऊच्या घराबाहेर आणून उभा करतो. गाडी दारात आल्याबरोबर रामभाऊ व रखमा मॅडमचं स्वागत करण्यासाठी घराबाहेर येऊन उभे राहतात. रामभाऊ व रखमा मॅडमचं हसून स्वागत करतात. डॉक्टर मॅडम रामभाऊच्या घरात जाऊन बसतात. सुमन मॅडमसाठी पाणी घेऊन येते. रामभाऊ सुमनची ओळख मॅडम सोबत करुन देतो.

"मॅडम आमच्या गरीबाच्या झोपडीला पाय लावून आम्हाला धन्य केलंत." रामभाऊ म्हणाला.

डॉक्टर मॅडम म्हणाल्या,

"काका असं का बोलत आहात? गरीब, श्रीमंत हे भेद माणसाने तयार केले आहेत, पण मी हे मानत नाहीत."

रामभाऊ म्हणाला,

"तसं नाही मॅडम. आमच्या सारख्या गरीबांची मदत तुम्ही करताच, पण आमच्या घरी येऊन तुम्ही तुमच्यातील वेगळेपण सिद्द केलंत."

डॉक्टर मॅडम म्हणाल्या,

"काका माझ्या मते घर हे फक्त विटा सिमेंटने तयार होत नाही, तर त्या घरातील माणसांमुळे तयार होतं. घराची किंमत हे त्या घरातील माणसं किती आनंदी आहे, यावरुन ठरते. घर खूप मोठं, आलिशान आहे, पण त्या घरातील लोक आनंदी नाहीत, त्यांचं आपापसात पटत नाही, त्या घरात सतत भांडणं चालू असतील, तर अश्या घराचा काय उपयोग? पण जे घर छोटं आहे, ज्या घरातील लोकं एकमेकांना धरुन आहेत, ज्या घरातील लोक आनंदी आहेत, त्या घराचं सर्वाधिक मोल असतं."

रामभाऊ म्हणाला,

"मॅडम तुमचे विचार खूप छान आहेत. तुम्ही इतक्या मोठया डॉक्टर आहात, पण तुमचे विचार किती वेगळे आहेत. "

डॉक्टर मॅडम म्हणाल्या,

"काका सर्वप्रथम मी एक माणूस आहे. मी एका सदन घरात जरी जन्म घेतला असला, तरी माझ्या वडिलांनी एकेक रुपया कष्टाने कमावलेला आहे, त्या कष्टांची आम्हाला जाण आहे. माझ्या आई वडिलांनी आम्हाला माणसं जपायला शिकवली आहे. आई वडिलांनी जे शिकवलं, संस्कार केलेत, त्यानुसारच आम्ही चालत आहोत."

रामभाऊ म्हणाला,

"मॅडम तुम्ही तुमच्या आई वडिलांनी दिलेले संस्कार अंगिकारले, यात तुमचा मोठेपणा आहे. आम्ही आमच्या मुलांना सुद्धा शिकवण दिली होती, पण ते आम्हालाही विसरले आणि आमच्या संस्कारांनाही."

डॉक्टर मॅडम म्हणाल्या,

"काका तो विषय बाजूला ठेवुयात. तुमची तब्येत कशी आहे? तुम्ही गोळ्या औषधे वेळेवर घेतली का? मी सांगितलेली सर्व पथ्ये पाळली का?"

स्वयंपाक घरात काम करत असलेली रखमा पुढे येऊन म्हणाली,

"मॅडम मी ह्यांना सांगायचे की, वेळेवर जेवण करत जा, तर त्यांनी माझं म्हणणं कधीच ऐकलं नाही, पण तुम्ही सांगितल्यापासून जेवण वेळेवर आणि पोटभरुन करतात. जेवण झाल्यावर गोळ्या वेळच्या वेळी घेतात."

डॉक्टर मॅडम हसून म्हणाल्या,

"काकू आपल्याकडे जी म्हण आहे ना, सोनाराने कान टोचावे ती काही खोटी नाही. ज्याचं काम त्यालाच करावं लागतं."

रखमा म्हणाली,

"हो खरंय मॅडम."

डॉक्टर मॅडम म्हणाल्या,

"काकू मी आल्यापासून बघत आहे. तुम्ही दोघे मला डॉक्टर मॅडम का म्हणत आहात? एकतर मी तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, तरी तुम्ही मला अहोकाहो करत आहात. माझं नाव पुनम आहे. तुम्ही मला पुनम म्हणू शकतात."

रखमा म्हणाली,

"मॅडम नाहीतर मी तुम्हाला पुनम ताई म्हणेल. असं पुनम म्हणायला नाही जमणार."

तेवढ्यात प्रगती खेळून घरात येते. पुनमला आपल्या घरात बघून ती तिच्याकडे कुतूहलाने बघत असते. प्रगतीला बघून रामभाऊ म्हणाला,

"प्रगती बाळा खेळून आलीस का? आपल्याकडे बघ कोण आलंय? ह्या प्रगती ताई आहेत, ह्या डॉक्टर आहेत."

प्रगती पुनमकडे बघून लांबूनच हसली. 

"प्रगती बाहेरुन आली आहेस ना, आधी आत जाऊन हातपाय धुवून ये बरं." रखमाने सांगितले, तरी प्रगती तिथेच घुटमळत होती, हे बघून पुनमने प्रगतीला आपल्याजवळ बोलावून घेतले व ती म्हणाली,

"प्रगती तू बाहेर मातीत खेळत होतीस ना? तर मातीत वेगवेगळ्या प्रकारचे किडे, जंतू असतात. तू मातीत खेळत असताना ते जंतू तुझ्या हाता पायावर बसतात. तू जर हात धुतले नाहीत आणि तू त्याच हाताने काही खाल्लं तर ते जंतू डायरेक्ट तुझ्या पोटात जातील आणि आमच्या प्रगती बाळाचं पोट दुखायला लागेल. पोट दुखलं तर आपल्याला कडू औषधं घ्यावं लागेल. प्रगतीला कडू औषध प्यायला आवडतं का?"

पुनमचं शेवटचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच प्रगती हातपाय धुण्यासाठी पळत घरात गेली. प्रगतीच्या पळण्याकडे बघून उपस्थित सर्वजण हसायला लागतात.

रखमा म्हणाली,

"पुनम ताई, तुम्ही प्रगतीला बरोबर समजावलं. तुम्हाला लहान मुलांसोबत बोलण्याचा अनुभव असेल, म्हणून तुम्हाला बरोबर प्रगतीच्या भाषेत तिला समजावता आलं. ताई तुम्हाला मुलं किती?"

पुनम म्हणाली,

"काकू मला अजून मूलबाळ नाहीये, पण मुलांसोबत कसं बोलावं लागतं, याची कल्पना मला आहे."

रामभाऊ म्हणाला,

"पुनम ताई रखमाने असंच विचारलं, तिला तुम्हाला दुखावण्याचा हेतू नव्हता."

पुनम म्हणाली,

"काका इट्स ओके. मला समजलं."

"पुनम ताई जेवणाची वेळ टळून जाण्याच्या आधी तुम्हाला जेवायला वाढू का?" रखमाने विचारले.

पुनमने मानेने होकार दर्शवला. सुमनने पुनमसाठी जेवणाचं ताट तयार केलं. पुनम हातपाय धुवून जेवायला बसली. प्रगती पुनम शेजारी येऊन बसली.

"प्रगती तू पण जेवणार आहेस का?" पुनमने विचारले.

प्रगती म्हणाली,

"नाही, माझं जेवण खूप आधीच झालं आहे."

जेवणाचं ताट पुनमसमोर ठेवताना रखमा म्हणाली,

"ताई सगळेजण म्हणतात की, मी वांग्याचं भरीत लई भारी बनवते, म्हणून वरण भात, वांग्याचं भरीत आणि चपाती असा बेत केला. तुम्हाला आवडेल ना?"

पुनम म्हणाली,

"काकू वांग्याचं भरीत माझं फेव्हरेट आहे. तुम्ही केलेला बेत मला नक्की आवडेल."

जेवणाची सुरुवात करण्याआधी पुनम हात जोडून एक श्लोक म्हटली. प्रगती पुनमकडे बघत असल्याने श्लोक संपल्यावर पुनम म्हणाली,

"प्रगती बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जेवण करण्याआधी ज्या अदृश्य शक्तीमुळे आपल्याला जेवण मिळतं, त्याचे आभार मानायचे असतात, त्याची आठवण काढायची असते, म्हणून हा श्लोक म्हणायचा. तुझे आई बाबा हा श्लोक तुला शिकवतील."

रखमाने तयार केलेले जेवण पुनमला आवडेल का? बघूया पुढील भागात…..

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all