सावित्रीची लेक भाग ३

Savitri is feeling helpless

सावित्रीची लेक भाग ३

मागील भागाचा सारांश: रामभाऊ मुलगा झाल्याची बातमी स्वतः सावित्रीच्या सासरी जाऊन देतो. सावित्रीला दवाखान्यातून सोडण्याच्या वेळी रमेश ( सावित्रीचा नवरा) व त्याची आई गाडी घेऊन आले. ते सावित्रीला व त्यांच्या मुलाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आले होते. रमेशने मुलीला आपल्या सोबत घेऊन जाण्यास नकार दिला. एवढ्याशा बाळाला रखमा व रामभाऊच्या हातात टेकवून रमेश सावित्री व मुलाला घेऊन गेला.

आता बघूया पुढे....

सदा रामभाऊ,रखमा व सावित्रीच्या मुलीला आपल्या बैलगाडीतून रामभाऊच्या घरी घेऊन जातो. सुमन तिथे सगळ्यांची वाट बघत असते, तिला सावित्री बैलगाडीत न दिसल्याने तिने शंकेने विचारले,

"सावित्री कुठे आहे? तिला तुम्ही घेऊन का नाही आलात?"

सदाने तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली. सर्व ऐकल्यानंतर ती म्हणाली,

"असं कुठं असतंय व्हयं? एवढ्या गोड लेकराला कोणी असं टाकून जाईल व्हयं. जावई बापूंचं सोडा पण आपल्या विहिणबाईंना पण समजलं नाही व्हयं. घरंदाज लोक असं वागतात का?"

सदा म्हणाला,

"सुमन तुझं तोंड गप कर. रामभाऊ आणि वहिनीच्या डोक्याला आधीच ताण झाला आहे, तुझा नॉनस्टॉप रेडिओ ऐकून त्यांचं डोकं फुटलं. घरात जाऊन भाकरीचा तुकडा आणि पाण्याचा तांब्या घेऊन ये. ह्या गोंडस लेकरावरुन उतरव म्हणजे वहिनीला घरात जाता येईल."

सुमन घरात भाकरीचा तुकडा व पाण्याचा तांब्या घेऊन आली. बाळावरुन भाकरीचा तुकडा आणि पाणी सुमनने ओवाळून टाकले. रखमा व रामभाऊ बाळाला घेऊन घरात गेले. सुमनने आधीच एका पलंगाला झोळी बांधून ठेवली होती. बाळ रडायला लागल्यावर रखमाने पावडरचे दूध करुन बाळाला पाजले आणि झोळीत झोपवले.

सदाने बैलगाडीचे बैलं सोडले आणि तो घरात गेला तर रामभाऊ डोक्याला हात लावून बसला होता. 

सदा रामभाऊच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला,

"रामभाऊ अरे याच्यावर जास्त विचार करु नकोस. सवित्रीच्या घरच्या लोकांना आपण आज ओळखतो का? सावित्रीला मुलगा होत नाही, म्हणून त्यांचा किती त्रास होता? आपण कितीही डोकं आपटलं तरी ते लोकं त्यांचं म्हणणं सोडणार नाही. तेव्हा जास्त विचार करु नको. त्या एवढयाशा जीवाला लहानचं मोठं कसं करता येईल, यावर विचार कर."

रामभाऊ म्हणाला,

"अरे पण तुला गावातील लोकांचं माहीत नाही का? उगाच काहीतरी चर्चा करत बसतील. लोकांच्या प्रश्नांना कशी उत्तरे द्यायची?"

सदा म्हणाला,

"अरे बाबा, पण जे झालं त्यात तुझी काही चूक आहे का? आणि लोकांचं काय घेऊन बसलास? ते पायी चालू देत नाही आणि घोड्यावर सुद्धा चालू देत नाही. लोकांचा विचार करत बसलो तर आपल्याला आयुष्य जगणं मुश्किल होईल."

रखमा म्हणाली,

"सदा भाऊजी मी ह्यांना हेच समजावून सांगत आहे, पण हे काही ऐकायला तयार नाहीत. आल्या त्या परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावचं लागेल. असं हतबल होऊन कसं चालेल?"

सदा म्हणाला,

"रामभाऊ रखमा वहिनी म्हणते, ते एकदम बरोबर आहे. नशीबवान लोकांच्याच घरात मुली जन्माला येतात, पण हे कळण्यासाठी तेवढी बुद्धी आवश्यक असते. आता आमचंच बघ ना, आमच्या पदरात एकही मुलं नाहीये, पण आम्ही या गोष्टीचं फारसं वाईट वाटून घेत नाही. प्रत्येकाचं नशीब त्या वरच्याने वेगवेगळं लिहिलेलं आहे. मी आणि सुमन तुमच्या दोघांची कायम मदत करु. सावित्रीने त्या मुलीला फक्त जन्म दिला. आपण चौघेजण मिळून तिला लहानचं मोठं करुयात. तेवढंच आमच्याही घरात लहान बाळाचा आवाज घुमेल. कोणास ठाऊक? आपल्या चौघांचा एकटेपणा दूर करण्यासाठीच ही गोंडस मुलगी जन्माला आली असेल. 

(सदा सुमनकडे बघून म्हणाला) सुमन बाळाला सांभाळण्यात रखमा वहिनीला मदत करशील ना?"

सुमन म्हणाली,

"हे काय विचारणं झालं व्हयं, मी ह्या बाळाचं सगळं काम करेल आणि तेही आवडीने."

सदा म्हणाला,

"ये हुई ना बात. सुमन पटकन सगळ्यांसाठी चहा कर तेवढाच शरीराचा आणि मनाचा थकवा दूर होईल."

लगेच सुमनने किचनमध्ये जाऊन चहा तयार केला. चहा पिऊन झाल्यावर सदा म्हणाला,

"आम्ही आता घराकडे जाऊन येतो. रामभाऊ, रखमा वहिनी काही लागलं तर आवाज द्या."

सदा व सुमन बैलगाडी घेऊन आपल्या घराकडे निघून गेले. सदा हा रामभाऊचा मित्र होता. कधीही आवाज द्या, सदा रामभाऊच्या मदतीला हजर असायचा. सदा रामभाऊला आपल्या मोठ्या भावाप्रमाणे मानायचा.सुमन तोंडाला येईल ते बोलायची, पण ती मनाने निर्मळ होती. सदा व सुमनच्या लग्नाला बरीच वर्षे झाली होती, पण त्यांना मूलबाळ झालं नव्हतं.

सदा व सुमन आपल्या घरी निघून गेल्यावर रखमा आपल्या जागेवरुन उठली आणि तिने घरातील पसारा आवरायला सुरुवात केली. बाळ झोपलेलं असतानाच तिला घरातील काम करता येणार होती. स्वयंपाक घरातील पसारा आवरत असताना खारीक खोबरं रखमाच्या नजरेस पडलं आणि रखमाचे डोळे भरुन आले, कारण बाळंतपण झाल्यावर सावित्रीसाठी रखमा खारीक खोबऱ्याचे लाडू तयार करणार होती. सावित्रीच्या काळजीने रखमाचे डोळे भरुन आले.

बाळाचा रडण्याचा आवाज आल्यावर रखमाने पटकन डोळे पुसले आणि बाळाच्या दिशेने ती पटकन निघून गेली. बाळाला कुशीत घेतल्यावर रखमाचे डोळे पुन्हा भरुन आले. रखमा मनातल्या मनात म्हणाली,

"देवा तू इतका निष्ठूर कसा काय? ह्या लेकराचा या सगळ्यात काय दोष आहे? ह्या लेकराला आईचं दूध सुद्धा मिळू शकत नाही. मी हिच्यावर कितीही माया केली तरी तिच्या आई एवढी माया मला करणं जमेल का?"

रामभाऊने आवाज दिल्यावर रखमाच्या विचारांची तंद्री तुटली.

"रखमा मी दुकानावर जाऊन येतो. काही आणायचं आहे का?" रामभाऊने विचारले.

रखमा म्हणाली,

"काही आणू नका. जाताना तेवढं खारीक खोबरं दुकानात घेऊन जा."

रखमाचा भरलेला आवाज ऐकून तिच्या मनात काय चालू आहे? याचा अंदाज रामभाऊला आला होता, म्हणून रामभाऊ म्हणाला,

"रखमा ते खारीक खोबरं आपण सावित्रीसाठी आणलं होतं. दोन चार दिवसांनी लाडू तयार कर. मी सावित्रीच्या घरी जाऊन तिला देऊन येतो. जे झालं त्यात त्या बिचारीचा काय दोष? आपण आपलं कर्तव्य करुयात, बाकी त्यांची मर्जी. रखमा झाल्या गोष्टीचा आपल्याला एवढा त्रास होतो आहे, तर आपल्या लेकीला याचा किती मनस्ताप होत असेल? ती तर कोणाजवळ आपलं मन मोकळं सुद्धा करु शकत नसेल."

रखमा म्हणाली,

"लाडू देण्याच्या निमित्ताने सावित्रीची ख्याली खुशाली तरी आपल्याला कळेल. मी दोन तीन दिवसांनी लाडू तयार करुन देईल."

आता ही झाली रखमा व रामभाऊच्या घरची परिस्थिती. दवाखान्यातून गेल्यावर सावित्रीच्या घरी काय घडलं ते बघूयात…..

सावित्रीचं व तिच्या मुलाचं सासरी जंगी स्वागत करण्यात आलं. सावित्रीच्या सासऱ्याने गावात नातू झाला, म्हणून सर्वत्र पेढे वाटले. सावित्रीच्या घरातील सर्वच जण खूप आनंदात होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता, मात्र सावित्री मनातून खूप दुःखी होती. बाळाला झोपी लावण्यासाठी सावित्री आपल्या खोलीत जाऊन बसली होती. आपल्या मुलाला दूध पाजताना तिला आपल्या मुलीची आठवण येत होती, तिच्या आठवणीने तिचे डोळे भरुन आले होते. 

सावित्रीची मोठी मुलगी रेखा आपल्या आई जवळ जाऊन म्हणाली,

"आई बाबांनी तर सांगितलं होतं की, आम्हाला एक भाऊ आणि बहीण झाली म्हणून, मग आमची बहीण कुठे आहे?"

"ती आजी बाबांकडे आहे. तुझ्या वडिलांनी तिला सोबत आणण्यास मनाई केली." सावित्रीने भरल्या आवाजात उत्तर दिले.

रेखा म्हणाली,

"आई बरं झालं, ती तिकडेच राहिली. तिला इकडच्या आजीची बडबड तर ऐकावी लागणार नाही. तिचं आयुष्य तरी तिकडं सुखात जाईल. आमच्या सारखा मार तर तिला खावा लागणार नाही."

रेखाच्या या बोलण्यावर सावित्री तिच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाली,

"रेखा तू किती पटकन हे मान्य केलंस. मलाही तुझं म्हणणं पटतंय, पण माझं आईचं काळीज आहे ना, नऊ महिने पोटात तिला वाढवलं आणि बाहेर आल्याबरोबर माझी आणि तिची ताटातूट झाली. बिचारी माझी गोंडस लेक माझ्या मायेला पारखी झाली. रेखा बाळा तुम्हाला आजी मारते, पण मी तुम्हाला वाचवू सुद्धा शकत नाही. मी चांगली आई नाहीये ग. मला माझ्या मुलींची इच्छा सुद्धा पूर्ण करता येत नाहीये."

सावित्रीच्या डोळ्यातून टपटप अश्रू येत होते, तेवढ्यात रमेश खोलीत येऊन म्हणाला,

"सावित्री, आजचा दिवस आपल्यासाठी किती भाग्याचा आहे आणि तू अश्रू गाळत बसली आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही रडलीस तरी ती मुलगी या घरात येणार नाही. मला अजून एक ओझं नकोय."

सावित्री खाली मान घालून रमेशचं बोलणं गुपचूप ऐकत राहिली, तिला रमेश समोर बोलण्याची कधीच मुभा नव्हती.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all