सावित्रीची लेक भाग १

Savitri Gives Birth To Twins
सावित्रीची लेक भाग १

सकाळपासून काळ्याभोर ढगांनी आकाश भरुन आलेले होते. प्रचंड उकडत होते. जून महिन्याची सुरुवात होती. दुपारचे दोन वाजले असतील पण सर्वत्र अंधार झाला होता. रामभाऊ आपल्या दुकानातील सामानाची आवराआवर करत होते, त्यांना दुकान बंद करण्याची घाई झाली होती. रामभाऊ एवढ्या लवकर दुकान बंद करण्याची तयारी करत असलेले बघून त्यांच्या शेजारील सुरेश न्हावी म्हणाला,

"रामभाऊ हे काय, आज दुपारीच दुकान बंद करुन घरी जात आहात का? पाऊस पडण्याच्या आत घरी जाण्याचा विचार आहे का?"

"अरे बाबा, घरी दोन जिवाशी पोरं आहे, तिचे दिवस भरत आले आहे. वातावरण हे असं झालं आहे, थोडीशी हवा सुद्धा नाहीये. आपल्या सारख्याला या वातावरणात तग धरवत नाहीये, तर सावित्रीला कसा तग धरवेल? आपण आपलं घरी जाऊन थांबावं, कधी वेळ येईल, सांगता येणार नाही." रामभाऊने उत्तर दिले.

सुरेश न्हावी म्हणाला,
"सावित्रीची ही चौथी वेळ म्हणावी लागेल ना? यंदा तरी मुलगा झाला म्हणजे बरं."

रामभाऊ हताश होऊन म्हणाला,
"हो ना रे बाबा. दिवसरात्र देवासमोर तेच गाऱ्हाणे मांडत आहे. जावईबापू सांगून गेले की, मुलगा झाला तरच सावित्रीला घरी घेऊन जातील. डोक्याला ताप झाला आहे. त्यात आज हा निसर्ग काय संदेश देत आहे? तेच कळत नाहीये. सावित्रीची शहरातील डॉक्टरकडे सोनोग्राफी केली, तर त्यांचं म्हणणं आहे की,सावित्रीला जुळं राहिलं आहे. आता एक तरी मुलगा झाला पाहिजे."

रामभाऊच्या चेहऱ्यावरील काळजी बघून त्याला धीर देण्यासाठी सुरेश न्हावी म्हणाला,
"रामभाऊ जरा धीर धर, सगळं काही ठीक होईल. देवाच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं, असं आपण मानायचं. जास्त विचार करत बसायचा नाही."

रामभाऊ म्हणाला,
"बरं चल बाबा, मी घरी जाऊन परिस्थिती काय आहे? त्याचा अंदाज घेतो."

रामभाऊ आपल्या इसवी सन पूर्वीच्या सायकलवर बसून घराच्या दिशेने निघाला. रामभाऊ आणि त्याच्या सायकलचे वय जवळपास सारखेच असेल. रामभाऊच्या वडिलांची सायकल होती. सायकलकडे बघितल्यावर त्याला आपले वडील सोबत असल्याची जाणीव व्हायची, म्हणून त्याने सायकल कधीच विकली नाही. रामभाऊला त्याची सायकल स्वतःच्या प्राणापेक्षा प्रिय होती. रामभाऊ आपल्या सायकलला कोणालाच हात लावू देत नव्हता.

पुढील पंधरा मिनिटांनी रामभाऊ आपल्या घरी पोहोचला. रामभाऊ घराबाहेरील ओट्यावर बसला, त्याची बायको रखमा त्याच्यासाठी पाणी घेऊन आली.

"सावित्रीला बरं आहे ना, तिला काही त्रास तर होत नाहीये ना?" रामभाऊने विचारले.

यावर रखमा म्हणाली,
" सकाळपासून हवेत गारवा नसल्याने पोरीचा जीव कासावीस होऊ राहिला. दोन पोरांचं ओझं घेऊन अश्या उकाड्यात ती कितीवेळ तग धरेल काय माहीत?"

रामभाऊ म्हणाला,
"दवाखान्यात घेऊन जायचं का?"

"अजून वेळ आली नाहीये. ती मागच्या दारी बसली आहे. तुम्ही सदाभाऊंची बैलगाडी बोलावून ठेवा, म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही." रखमाने सांगितले.

रामभाऊ म्हणाला,
"मी लागलीच सदाकडे जाऊन त्याची बैलगाडी घेऊन येतो."

रामभाऊ आपली सायकल घरी ठेऊन पायीपायी सदाच्या घराकडे गेला. रामभाऊला चार मुली आणि एक मुलगा होता. सावित्री ही रामभाऊची चार नंबरची मुलगी. रामभाऊकडे पाच एकर जमीन होती, दोन बैल होते. मुलींची लग्न, बाळंतपण आणि प्रकाशचे शिक्षण करता करता त्याला आपली तीन एकर जमीन आणि बैलं विकावी लागली. रामभाऊचं गावात एक छोटंसं किराणा दुकान होतं. रामभाऊचं गाव दुष्काळी पट्ट्यात येत असल्याने तिथे कधीतरीच पाऊस पडायचा. शेतीत काहीच पिकतं नव्हतं. रामभाऊचा मुलगा प्रकाश लग्न झाल्यावर तालुक्याच्या ठिकाणी रहायला निघून गेला. प्रकाश एका दुकानात मॅनेजर म्हणून कामाला होता. प्रकाश आई वडिलांना आर्थिक मदत करत नव्हता. रामभाऊ व रखमाला त्याच्या कडून फारशी अपेक्षाही नव्हती. 

रामभाऊच्या इतर मुलींना मुलं मुली दोन्ही होते, तेवढं सावित्रीलाच तीन मुली होत्या. सावित्रीची सासूबाई उठता बसता तिला टोमणे मारत असायची. सावित्रीचा नवरा सुद्धा तिचा रागाराग करायचा. सावित्रीची सासूबाई तिच्या तिन्ही मुलींचा रागराग करायची. सावित्रीची एवढीच इच्छा होती की, मुलगा झाला की तिची सासूबाई मुलींचा रागाराग करणार नाही. सावित्री तिच्या मुलींकडे बघून जिवंत होती, तिला या सगळ्याचा कंटाळा आला होता. आई वडिलांच्या आर्थिक परिस्थितीची जाण सावित्रीला होती, पण तिला प्रत्येकवेळी बाळंतपणासाठी माहेरीच पाठवले जायचे, तिच्या सासरच्यांचं म्हणणं होतं की, मुलीचे बाळंतपण ही माहेरीच व्हायला पाहिजे.

रामभाऊ सदाच्या घरी जाऊन बैलगाडी घेऊन आला. सरकारी दवाखाना रामभाऊच्या घरापासून दहा किलोमीटर अंतरावर होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. एक तास झाला तरी पावसाचा जोर ओसरायला तयार नव्हता. अशातच सावित्रीच्या पोटात दुखायला सुरुवात झाली होती. सावित्री वेदनेने विव्हळत होती. एकतर पाऊस कमी व्हायचं नाव घेत नव्हता, सर्वत्र अंधारचं अंधार होता. अश्या परिस्थितीत सावित्रीला दवाखान्यात घेऊन जायचं तर कसं? हा विचार रामभाऊ व रखमाला पडला होता.

रामभाऊ हिंमत करुन बैलं गाडीला जुंपून सावित्रीला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी तयार झाला. सावित्री रखमा आणि रामभाऊ भर पावसात दवाखान्यात जाण्यासाठी बैलगाडीतून निघाले. रामभाऊ अंधारातून रस्ता शोधत शोधत, रस्त्यातील दगडं चुकवत चुकवत चालला होता. रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले होते. देवाचे नाव घेत रामभाऊ बैलगाडी हाकत होता.

मजल दरमजल करत रामभाऊ सावित्रीला घेऊन सरकारी दवाखान्या पर्यंत पोहोचला. दवाखाना पूर्ण अंधारात होता. सावित्रीचं विव्हळणे ऐकून नर्स तिला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेल्या. सावित्री पूर्ण भिजलेली होती. सावित्री थंडीने कुडकुडत होती, तिला खूप ताप चढला होता. दवाखान्यातील मुख्य डॉक्टर तिथे आल्या, त्यांनी सावित्रीची परिस्थिती बघितली.

रामभाऊ हात जोडून डॉक्टर मॅडम समोर उभा राहून म्हणाला,
"मॅडम माझ्या सावित्रीचा जीव मोकळा करा."

डॉक्टर मॅडम म्हणाल्या,
"काका बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे, त्यामुळे लाईट नाहीये. सावित्रीची डिलिव्हरी अंधारात कशी करु?"

रखमा म्हणाली,
"मॅडम तिला तीन मुली आहेत, त्या आईच्या मायेला पोरक्या होतील. माझ्या लेकीचा जीव तुमच्या ताब्यात आहे. देव तुमचं भलं करेल. आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही माझ्या पोरीला काहीच होऊ देणार नाही."

रखमाच्या डोळ्यातील आपल्याप्रती विश्वास बघून डॉक्टर मॅडम सवित्रीच्या डिलिव्हरीच्या तयारीला लागल्या. ऑपरेशन थिएटरमध्ये मेणबत्त्या लावण्यात आल्या. मेणबत्तीच्या प्रकाशात डिलिव्हरी करण्याची डॉक्टर मॅडमची पहिलीच वेळ होती. पुढील दहा मिनिटांनंतर सावित्रीने एका मुलाला जन्म दिला, त्यानंतर पुढील पंधरा मिनिटाने सावित्रीने मुलीला जन्म दिला. मुलीला सावित्रीच्या पोटातून बाहेर काढल्याक्षणी आकाशात वीज जोरात कडाडली आणि पुढील काही सेकंदांसाठी ऑपरेशन थिएटर मध्ये सर्वत्र उजेडच उजेड झाला.

डॉक्टर मॅडम ऑपरेशन थिएटर बाहेर येऊन म्हणाल्या,
"अभिनंदन आजी आजोबा, तुम्हाला एक नातू व एक नात झाली."

रखमा म्हणाली,
"मॅडम तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. तुम्ही माझ्या लेकीला सुखरुप या संकटातून बाहेर काढलं."

डॉक्टर मॅडम म्हणाल्या,
"मावशी तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे हे शक्य झालं. आम्ही इथे तुमच्यासाठीच बसलेलो आहोत, आमचं हे कर्तव्यचं आहे, पण तुमचा आमच्याप्रती विश्वास असला की आम्हाला काम करण्याची उभारी मिळते. आजवर मी अनेक रुग्णांचे नातेवाईक बघितले, ते आमच्यावर ओरडतात, आम्हाला चार शिव्या घालतात, वाईट साईट बोलतात. आम्ही त्यांचे नोकर आहोत, अश्या पद्धतीने आम्हाला वागणूक देतात. तुम्ही मात्र माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला तोच विश्वास सार्थ करुन दाखवायचा होता. असो सावित्रीला अशक्तपणा असल्याने तिला घरी घेऊन जायची घाई करु नका. पुढील दोन दिवस तिला दवाखान्यातच राहुद्यात."

सावित्रीला मुलगा झाल्याने रामभाऊ व रखमाने सुटकेचा श्वास सोडला, त्यांनी देवाचे मनोमन आभार मानले. रखमा आपल्या लेकीजवळ दवाखान्यातच थांबली. पावसाचा जोर ओसरल्याने रामभाऊ बैलगाडी घेऊन आपल्या घराकडे गेला. 
©® Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all