सावित्रीची लेक भाग १७(अंतिम)

Story Of Pragati's Life

सावित्रीची लेक भाग १७( अंतिम)


मागील भागाचा सारांश: सावित्री व रखमाची भेट प्रगतीच्या केबिनमध्ये झाली. सावित्री ही रखमाची मुलगी आहे, हे प्रगतीला रखमा कडून कळालं. प्रगती ही आपलीच लेक आहे, हेही सावित्रीला समजलं, पण सावित्री ही आपली जन्मदात्री आहे, हे तिला कळालं नाही.


आता बघूया पुढे….


रखमाकडून पुनमला सर्व समजल्यावर तिने संदीपला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले.


"पुनम काय झालं?मला एवढ्या घाईघाईने इकडे का बोलावून घेतले?" संदीपने विचारले.


"काल प्रगतीला ज्या बाईसोबत बोलताना तुम्ही बघितलं होतं, ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून सावित्री होती." पुनमने सांगितले.


संदीप आश्चर्याने म्हणाला,

"सावित्री म्हणजे रखमा काकूंची मुलगी?"


"हो." पुनमने उत्तर दिले.


संदीप म्हणाला,

"प्रगतीला काही कळलंय का?"


रखमा म्हणाली,

"अजून तरी नाही, पण आता तिला सगळं काही सांगण्याची वेळ आली आहे."


"प्रगतीला सावित्री ही रखमा काकूंची मुलगी आहे, हे कळलंय. ती काकूंना बरेच प्रश्न पण विचारत होती. काकू तिला टाळून माझ्याकडे निघून आल्या." पुनमने सांगितले.


संदीप थोडा विचार करुन म्हणाला,

"ठीक आहे. आपण प्रगतीला सत्य परिस्थितीची कल्पना देऊयात. डोन्ट वरी पुनम तू तिला व्यवस्थित समजावून सांगशील. आपली प्रगती तशी समजदार आहे, ती आपल्याला समजून घेईल."


संदीपचं बोलणं चालू असतानाच प्रगती तिथे येते. ते तिघेजण प्रगतीकडे आश्चर्याने बघून शांत होतात.


"मी आल्यावर तुम्ही शांत का झालात? आणि तुम्ही तिघे इथे काय करत आहात? डॅड तुम्हाला आज पेशंट नाहीयेत का? एरवी तुम्ही दोघेजण एकमेकांच्या केबिनमध्ये जात सुद्धा नाहीत. आज आजी आली आहे, तर तिच्यासमोर असं का दाखवत आहात? एनिवेज तुम्ही काही सिरीयस टॉपिकवर चर्चा करत होतात का? माझ्यामुळे तुम्ही डिस्टर्ब झाला असाल, तर मी जाते." एवढं बोलून प्रगती दरवाजाच्या दिशेने जात होती.


तोच पुनम म्हणाली,

"थांब बाळा. इकडे येऊन बस. आम्हाला सगळ्यांना तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे."


प्रगती पुनमच्या जवळ जाऊन बसली आणि म्हणाली,

"हं बोल." 


"प्रगती तुला तर ठाऊकचं आहे की, कृष्णाला दोन आया होत्या, एक जन्म देणारी देवकी आणि दुसरी त्याला लहानाचं मोठं करणारी यशोदा. तुझ्यामते कृष्णाची खरी आई कोण?" पुनमने विचारले.


प्रगती मिश्किल हसून म्हणाली,

"मम्मा तू मला आत्ता हे सगळं का विचारत आहेस? हे खरंच कळत नाहीये. पण ठीक आहे, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. कसं आहे ना आई, जर कंस मामापासून कृष्णाच्या जीवाला धोका नसता तर, देवकीने आपलं बाळ यशोदेच्या ताब्यात कधीचं दिलं नसतं. देवकीची ती मजबूरी होती. आपल्या बाळाचा जीव जाऊ नये, म्हणून तिने त्याला आपल्यापासून दूर केलं. यशोदाने कृष्णाच्या बाललीला अनुभवत त्याला लहानाचं मोठं केलं. आता या दोघीही त्याच्या आया आहेत. आपण असं एकीलाचं त्याची आई म्हटलं तर दुसरीवर हा अन्याय होईल."


"मला एक सांग बाळा. तुझ्या आयुष्यात जर असं काही घडलं, तर तू कोणाला आपली आई मानशील?" रखमाने विचारले.


प्रगती आता थोडी चिडून म्हणाली,

"डॅड या आजी आणि मम्माचं काय चालू आहे? आजीची मुलगी तिला खूप वर्षांनी भेटली, म्हणून तिला हे असं काहीतरी सुचलं असेल, पण मम्मा मध्येच हे का बोलत आहे? मला समजेल असं तुम्ही सरळसरळ बोलल्या तर बरं होईल. एकतर आधीच त्या कालच्या पेशंटने डोकं खाल्लं आहे, त्यात तुम्ही काहीतरी बोलत आहात."


"प्रगती काय झालं? पेशंटचं काय म्हणणं आहे?" संदीपने विचारले.


प्रगती म्हणाली,

"काल जे इमर्जन्सी पेशंट ऍडमिट झालंय ना, तो पेशंट आपल्या आजीचा नातेवाईक असल्याने मी जास्त काही बोलले नाही. त्या पेशंटला ब्लड कॅन्सर झाला आहे, त्याला ब्लड द्यावे लागणार आहे. त्यांच्या तिन्ही मुलींचे रक्तगट आणि त्या पेशंटचे रक्तगट सारखे आहेत, म्हणून मी त्या मुलींना बोलावून घ्यायला सांगितले होते, पण पेशंटचे म्हणणे आहे की, 

"मी मेलो तरी चालेल, पण मला माझ्या मुलींचे रक्त देऊ नका." 

डॅड ही कुठली पद्धत आहे. असं कोणी वागतं का?"


संदीप म्हणाला,

"मरणाच्या दारात आहे, तरी त्याचे विचार काही बदलले नाहीत. हे बघ बाळा, आता मी जे काही तुला सांगणार आहे, ते शांतपणे ऐक. आम्ही तुझ्यापासून एक गोष्ट लपवली आहे, ही आम्ही तुला सांगणार होतोच, पण आज तुला हे कळलंच पाहिजे.

ज्या पेशंटबद्दल तू बोलत आहेस, तो पेशंट म्हणजे तुझे जन्मदाते वडील आहेत आणि ती बाई तुझी जन्मदात्री आई आहे. मी व पुनमने तुला दत्तक घेतलेले आहे."


संदीपने प्रगतीला सविस्तर कथा सांगितली. सगळं ऐकून प्रगतीच्या डोळयात पाणी आले. प्रगतीच्या डोळ्यातील पाणी बघून पुनम, संदीप व रखमाच्या डोळयात सुद्धा पाणी आले. आपले डोळे पुसून प्रगती जागेवरुन उठली.


"प्रगती कुठे चालली आहेस?" पुनमने विचारले.


"माझ्यासोबत चला." प्रगतीने सांगितले.


पुनम, संदीप व रखमा प्रगतीच्या पाठोपाठ निघाले. प्रगती त्या तिघांना घेऊन रमेशच्या वॉर्डजवळ गेली. बाहेर सावित्री, तिचा मुलगा व तिन्ही मुली उभ्या होत्या. या सगळ्यांना सोबत बघून सावित्रीला भीती वाटली.


प्रगती सावित्रीकडे बघून म्हणाली,

"तुम्ही सगळे आत या."


वॉर्डमध्ये गेल्यावर प्रगतीने तेथील नर्सला बाहेर जायला सांगितले. प्रगतीने वॉर्डचा दरवाजा बंद केला. रमेश शुद्धीत असल्याने तो म्हणाला,


"डॉक्टर मॅडम, तुम्ही हे काय करत आहात?"


प्रगती म्हणाली,

"तुम्हाला गावातील तुमची प्रतिष्ठा जशी महत्त्वाची आहे ना? तशीच माझी ह्या हॉस्पिटलमध्ये प्रतिष्ठा आहे. नर्स, वॉर्डबॉय समोर असताना मला तुमच्यासोबत चुकीच्या भाषेत बोलता आलं नसतं."


"मी काय केलंय? तुम्ही माझ्यासोबत चुकीचं का बोलणार आहात?" रमेशने विचारले.


"सर्वप्रथम मला एक सांगा की, तुम्ही तुमच्याच मुलीचं रक्त घ्यायला का तयार नाहीत?" प्रगतीने विचारले.


रमेश म्हणाला,

"मॅडम माझं रक्त माझ्या मुलामध्येचं आहे, त्यांच्यात फक्त त्यांच्या आईचं रक्त आहे."


प्रगती मिश्कीलपणे हसून म्हणाली,

"तुमच्या या बोलण्यावर हसावं की रडावं हेच कळत नाहीये. तुमच्या मानसिकतेची कीव येते आहे. असो मी काही मेडिकल टर्म्स सांगून तुम्हाला तुमच्या मुलींचं रक्त घ्यायला भाग पाडणार नाही. काल तुम्हाला जे रक्त दिलं होतं, ते तुमच्याचं मुलीचं होतं, त्या रक्ताचं काय करायचं? तुम्ही तिला तुमची मुलगी मानत नसाल, पण ती तुमचाच अंश आहे."


रमेश चिडून म्हणाला,

"मॅडम तुम्ही कोणाबद्दल आणि काय बोलत आहात? मला तर काहीचं समजत नाहीये. मॅडम तुम्ही डॉक्टर असून एका पेशंटसोबत असं बोलू शकत नाही, हेही तुम्हाला माहीत नाहीये का?"


प्रगती म्हणाली,

"बरं ते जाऊद्यात. मी तुमची खूप खूप आभारी आहे. माझा जन्म झाल्याबरोबर तुम्ही मला नाकारलं नसतं, तर आज मी डॉक्टर झाले नसते. तुमच्या दहशतीखाली तुमच्या घरात गुराढोरांप्रमाणे राहिले असते. आता तुम्ही म्हणाल की, तुमच्या बोलण्याचा अर्थ मला कळला नाही.

मी तुम्हाला थोडं स्पष्टपणेच सांगते. मला जन्म देणाऱ्या आईचे नाव सावित्री आहे आणि योगायोगाने ती तुमची बायको आहे. तुम्ही त्यावेळी मला नाकारलं होतं, पण तुमचा जीव केवळ माझ्यामुळे वाचला आहे. तुमचा आणि माझा एकच रक्तगट असल्याने मी तुम्हाला रक्त दिले. तुम्ही ज्या मुलींना तुमचं मानत नाही, त्या मुलींचा आणि तुमचा रक्तगट एक आहे. इथून पुढे तुम्हाला जगण्याची इच्छा असेल, तर त्याचं मुलींच्या रक्तामुळे तुम्ही वाचाल.


(सवित्रीकडे बघून) आजी तू मला मघाशी विचारलं होतंस ना की, तू जर कृष्णाच्या जागेवर असतीस, तर काय केले असते? आजी मी एक सर्वसामान्य मुलगी आहे, देव नाही. तुमच्या मुलीने मला जन्म दिला, पण ती मला सांभाळू शकली नाही, तिला माझ्या हक्कासाठी लढता आलं नाही. मी ह्या बाईंना आई मानूचं शकणार नाही. जी बाई स्वतः अत्याचार सहन करते व आपल्या मुलींना सुद्धा तसंच घडवते, हे मला मान्यचं होऊ शकत नाहीये. काल या अश्या नवऱ्याला वाचवण्यासाठी त्या माझ्यापुढे हात पसरत होत्या, ज्या नवऱ्याने ह्यांना ह्यांच्या आई वडिलांपासून आणि एका मुलीपासून तोडलं होतं. 


मम्मा मला एकच आई आहे आणि ती फक्त तुचं आहेस, बाकी कोणी नाही. माझं बोलणं ऐकून तुम्हाला सगळ्यांना वाईट वाटलं असेल, पण हे सत्य आहे. 


(सावित्रीच्या तीन मुलींकडे बघून म्हणाली) तुम्हाला मी एवढंच सांगेल की, जशी तुमची आई राहिली तसं राहू नका. स्वतःच्या हक्कासाठी लढा. नाहीतर हे पुरुष लोकं तुमचं जीवन नरका सारखं करुन टाकतील."


पुनम मध्येच म्हणाली,

"प्रगती पण तुच तर म्हणाली होतीस की, देवकीची मजबूरी नसती, तर तिने कृष्णाला तिच्यापासून दूर जाऊ दिलं नसतं. मग तू सावित्रीला का समजून घेऊ शकत नाहीये?"


प्रगती म्हणाली,

"आई मी पहिलेचं सांगितलं की, मी देव नाहीये. मम्मा जेव्हा स्त्री एका मर्यादेनंतर स्वतः दुबळेपणा घेऊन बसते ना, ते मला पटत नाहीये. 

आता समज मी ह्यांना आई मानलं आणि मी त्यांना सांगितलं की, तुमच्या ह्या अश्या नवऱ्याला तुम्ही सोडून द्या. हे त्या कधी करु शकतील का? नाही ना. मम्मा मी तुझ्यासारखी थोडी इमोशनल आहे, पण डॅडसारखी प्रॅक्टिकल पण आहे. मम्मा आपण ह्या लोकांमध्ये अडकलो तर आपला बॉण्ड खराब होईल. आपलं सगळ्यांचं व्यवस्थित सुरु आहे आणि यापुढे तसंच असावं ही मनापासून माझी इच्छा आहे.


डॅड मी ह्या पेशंटवर इथून पुढे उपचार करु शकणार नाही. एखाद्या दुसऱ्या डॉक्टरला ही केस देऊन टाका. मी इतकी पण महान नाही की, ह्या अश्या विचारांच्या व्यक्तीवर उपचार करु शकेल."


तर अशी होती सावित्रीच्या लेकीची कथा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रगतीने घेतलेला निर्णय पटणार नाही, पण ती थोडी प्रॅक्टिकल असल्याने तिने तो निर्णय घेतला. प्रगतीला रखमा व रामभाऊने सांभाळले नसते तर ती एखाद्या अनाथ आश्रमात वाढली असती. 

रामभाऊ व रखमाने एका आजी आजोबांचं कर्तव्य व्यवस्थित रित्या निभावले. पुनम व संदीपने प्रगतीला दत्तक घेतल्याने तिचं भविष्य सुरक्षित झालं. 


तुम्हाला ही कथा कशी वाटली? हे कमेंट करुन कळवा.


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all