सावित्रीची लेक भाग १६

Rakhma Met With Savitri After A Very Long Time

सावित्रीची लेक भाग १६


मागील भागाचा सारांश: प्रगती कॅन्सर स्पेशालिस्ट झालेली होती. प्रगतीकडे इमर्जन्सी पेशंट आल्यावर त्यांच्याकडे पैसे नसताना सुद्धा प्रगतीने त्यांच्यावर उपचार सुरु केले, तसेच तिने त्या पेशंटसाठी आपले रक्त सुद्धा दिले. रखमाची तब्येत बरी नसल्याने संदीप व पुनम तिला आपल्यासोबत हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. पुनम व संदीप पेशंटमध्ये बिजी असल्याने रखमा प्रगतीच्या केबिनकडे जाते. प्रगतीच्या केबिनच्या बाहेर एका स्त्रीला बघून ती आश्चर्यचकित होते.


आता बघूया पुढे…..


रखमा प्रगतीच्या केबिनमध्ये जाते. रखमाला बघून प्रगती म्हणाली,


"आजी तुला बरं वाटतंय का?"


"हो. अग मला फार काही झालं नाही, फक्त थोडं अस्वस्थ वाटतं होतं. संदीप आणि पुनम लगेच माझ्या तपासण्या करण्यासाठी मला हॉस्पिटलला घेऊन आलेत. उगाच माझी काळजी करत असतात." आजीने सांगितले.


यावर प्रगती म्हणाली,

"अग आजी तू ज्या वयात आहेस ना, त्या वयात जर तुला अस्वस्थ वाटत असेल तर, कधीकधी काळजीचं कारण असू शकतं, म्हणून डॅड आणि मम्मा तुला हॉस्पिटलला घेऊन आलेत. काल रात्री मला यायला उशीर झाला होता, तर तू झोपून गेली होतीस."


"ऐक ना प्रगती. बाहेर जी बाई बसलेली आहे, ती कोण आहे?" रखमाने विचारले.


प्रगतीच्या केबिनबाहेर कोण बसलंय? याची कल्पना तिला नसल्याने तिने लगेच नर्सला बोलावून त्याबद्दल विचारणा केली. नर्सने माहिती दिल्यावर प्रगती आजीकडे बघून म्हणाली,


"आजी काल रात्री आमच्याकडे एक इमर्जन्सी पेशंट ऍडमिट झालंय, त्या पेशंटची ती बायको आहे."


"पेशंट सिरीयस आहे का?" आजीने विचारले.


प्रगती म्हणाली,

"काल थोडं क्रिटिकल होतं, पण आता स्टेबल आहे. पेशंटचे अजून सर्व रिपोर्ट्स येणे बाकी आहे, पण लक्षणांवरुन तरी पेशंटला ब्लड कॅन्सर असल्यासारखे वाटते."


"पेशंटच्या जीवाला काही धोका आहे का?" आजीने काळजीच्या सुरात विचारले.


"आजी तू त्या पेशंटची एवढी काळजीने चौकशी का करत आहेस? तू त्यांना ओळखतेस का?" प्रगतीने विचारले.


आजी म्हणाली,

"हो. जी बाहेर बसलेली आहे, ती सावित्री माझी मुलगी आहे. काही वर्षांपूर्वी सावित्रीच्या नवऱ्याने आमच्यासोबत सर्व नातेसंबंध तोडून टाकले होते. सावित्रीला मी शेवटचं तुझ्या बाबांच्या दशक्रिया विधीच्या वेळी बघितलं होतं. जावयाने संबंध तोडले असले तरी ती माझी लेक आहे, तिच्यासाठी जीव तुटतो ग. कसाही असला तरी तो तिचा जोडीदार आहे ना. आपला जोडीदार गेल्यावर काय वाटतं? याची चांगलीच कल्पना मला आहे."


"आजी मग तू तिच्यासोबत बाहेरच का बोलली नाहीस? तिने तुला बघितले नाही का?" प्रगतीने विचारले.


रखमा म्हणाली,

"माझं वय वाढलंय, शिवाय माझं राहणीमान पण बदलल्याने तिने मला ओळखलं नसेल. बाहेर सगळ्या पेशंट समोर मला फार काही बोलताच आलं नसतं."


रखमाच्या डोळ्यातील पाणी बघून प्रगती म्हणाली,

"आजी मला राऊंडला जायचं आहे. मी त्यांना आतमध्ये बोलावून घेते. तुम्ही दोघी इथे निवांत बोलत बसा. फक्त त्यांना ब्लड कॅन्सरबद्दल काही सांगू नकोस."


प्रगतीने नर्सला सांगून सावित्रीला आतमध्ये बोलावून घेतले. सावित्रीने आत येऊन विचारले,


"मॅडम काय झालं? ह्यांचे रिपोर्ट आलेत का? ह्यांना नेमकं काय झालंय? हे कळलं का?"


एकामागून एक सावित्रीचे प्रश्न ऐकून प्रगती म्हणाली,

"तुम्ही थोडं शांत व्हा. अजून पेशंटचे सर्व रिपोर्ट्स यायचे आहेत. (रखमाकडे बोट दाखवून) ही माझी आजी आहे. तुम्ही हिला ओळखलं का?"


सावित्री रखमाकडे बघून आश्चर्याने म्हणाली,

"ही तर माझी आई आहे."


आईला बघून सावित्रीच्या डोळयात पाणी आलं होतं. 

प्रगती म्हणाली,

"तुम्ही दोघी इथे बोलत बसा. मी राऊंडला जाऊन येते."


प्रगती केबिनमधून निघून गेल्यावर सावित्री रखमाजवळ जाऊन तिच्या गळयात पडली. दोघी मायलेकींनी इतक्या वर्ष साचून ठेवलेल्या अश्रूंना मोकळी वाट करुन दिली. सावित्रीला शांत करत रखमा म्हणाली,

"पोरी बरी आहेस का ग? चेहरा तर पार सुकून गेलायं."


यावर सावित्री म्हणाली,

"आई दोन तीन रात्रींपासून डोळ्याला डोळा लागला नाहीये. ह्यांची तब्येत अचानक बिघडली. काल तर त्यांना रक्ताच्या उलट्याचं थांबत नव्हत्या. आमच्या नशिबाने आम्हाला हे हॉस्पिटल आणि ह्या चांगल्या डॉक्टर मॅडमची भेट झाली. आई रात्री आमच्याकडे भरायला पैसे नव्हते, तर एका विनंतीवर मॅडमने ह्यांच्यावर उपचार चालू केले, शिवाय त्यांनी ह्यांना स्वतःचं रक्त सुद्धा दिलं. खरंच त्या खूप चांगल्या डॉक्टर आहेत."


यावर रखमा म्हणाली,

"पुनम व संदीपसारख्या परोपकारी डॉक्टरांच्या हस्ते तिची जडणघडण झाल्यामुळे प्रगती अशी झाली आहे. संदीप व पुनम या दोघांचे गुण तिने अंगिकारले आहेत. जन्माला आल्यावर तिच्या बापाने तिला नाकारलं, तेव्हा तिचं नशीब अश्या रीतीने फळफळेल असं कधीच वाटलं नव्हतं."


"आई म्हणजे ही तिचं प्रगती आहे का? माझी मुलगी." सावित्रीने विचारले.


"हो तिचं मुलगी आहे. सावित्री ही तुझीच लेक आहे, पण तू तिची आई नाहीस, हे कायम लक्षात ठेव. तू जरी तिला नऊ महिने पोटात वाढवलं असेल, पण तिचा सांभाळ पुनमने केला आहे. प्रगतीला आईचं प्रेम पुनमने दिलं आहे. पुनमने तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला नसता तर, आज ही कुठे असती, याची कल्पना सुद्धा मी करु शकत नाही." रखमाने सांगितले.


"आई तिला हे सगळं माहित आहे का?" सावित्रीने विचारले.


रखमा म्हणाली,

"नाही. तिला या सगळ्याची कल्पना नाहीये. प्रगतीला हे सगळं सांगायची माझी इच्छा आहे, मी गेल्यावर जर तिला हे सर्व दुसऱ्या मार्गाने कळलं, तर उगाच तिचा गैरसमज व्हायचा. संदीप व पुनमबद्दल तिच्या मनात शंका निर्माण व्हायला नको. मी माझ्या स्वतःच्या तोंडाने हे सगळं सांगितलं, तर तिचा या सगळ्यावर विश्वास तरी बसेल. पण हे सगळं तिला कसं सांगायचं हेच कळत नाहीये. संदीप व पुनमने माझ्यासाठी सुद्धा खूप केलंय ग. संजयने एवढा जीव कधीच लावला नसता एवढा जीव संदीपने मला लावला. माझं थोडं दुखलं तर लगेच माझी विचारपूस करतात. मला त्या दोघांनी कधीच एका शब्दाने सुद्धा दुखावलं नाही."


यावर सावित्री काही बोलणार इतक्यात प्रगती केबिनमध्ये आली. रखमा व सावित्रीच्या डोळ्यातील पाणी बघून ती म्हणाली,

"मायलेकी दोघी मिळून रडल्या वाटतं. बरं काकू तुमच्या तिन्ही मुलींना बोलावलं का? पेशंटला रक्ताची आवश्यकता कधीही भासू शकते."


यावर सावित्री म्हणाली,

"थोड्या वेळात त्या तिघीही येतीलच. ह्यांचे रिपोर्ट आलेत का?"


प्रगती म्हणाली,

"अजूनतरी नाही. संध्याकाळ पर्यंत सर्व रिपोर्ट्स येतील."


प्रगती केबिनमध्ये आल्यामुळे सावित्रीला केबिनमधून काढता पाय घेणे आवश्यक ठरले. आपल्याच मुलीच्या तोंडून काकू ही हाक ऐकल्यावर तिच्या मनाला बऱ्याच यातना झाल्या, पण ती प्रगतीला सांगूही शकत नव्हती. सावित्री गेल्यावर प्रगती आजीकडे बघून म्हणाली,


"आजी ह्या काकूंच्या नवऱ्याने तुमच्या सर्वांशी नातं का तोडलं होतं? आणि मी बोलत असताना त्या माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होत्या. कालपर्यंत त्यांची नजर वेगळं काहीतरी सांगत होती, पण आज त्यांना मला वेगळंच काहीतरी सांगायचं होतं."


यावर रखमाला काय उत्तर द्यावं? हे न सुचल्याने ती म्हणाली,

"मी जरा पुनमकडे जाऊन येते. मला तिच्यासोबत जरा महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. मी तुला नंतर सावित्रीची पूर्ण कथा सांगते."


प्रगती काही बोलण्याच्या आतचं रखमा तेथून निघून गेली. रखमाने प्रगतीच्या प्रश्नाचं उत्तर देणे टाळल्याने तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. प्रगती विचारात असतानाच नर्स येऊन म्हणाली,


"मॅडम फॉलोअप साठी काही पेशंट आले आहेत, त्यांना आता पाठवू का?"


"एक पाच मिनिटांनी पाठव." प्रगतीने सांगितले.


रखमा पुनमच्या केबिनमध्ये जाऊन बसली. पंधरा मिनिटांनंतर पुनम ऑपरेशन करुन केबिनमध्ये आली. रखमाला आपल्या केबिनमध्ये बघून पुनम म्हणाली,


"आई तू इकडे का बसली आहेस? अग प्रगतीच्या केबिनमध्ये जाऊन बसायचं ना."


रखमा म्हणाली,

"मी इतक्या वेळ तिच्याचं केबिनमध्ये बसलेले होते. काल ज्या पेशंटमुळे प्रगतीला घरी यायला वेळ लागला, तो पेशंट म्हणजे सावित्रीचा नवरा रमेश आहे. माझी आणि सावित्रीची भेट प्रगतीच्या केबिनमध्ये झाली. सावित्री ही माझी मुलगी आहे, हे प्रगतीला कळलंय. प्रगतीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत, पण मी त्या प्रश्नांची उत्तरे तिला देऊ शकले नसते, म्हणून मी इकडे निघून आले."


"सावित्रीला प्रगती तिची मुलगी आहे, हे समजलं का?" पुनमने विचारले.


"हो." रखमाने उत्तर दिले.


प्रगतीला सावित्री ही तिची जन्मदात्री आहे, हे कळेल का? आणि ती या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देईल, हे बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all