Feb 26, 2024
नारीवादी

सावित्रीची लेक भाग १४

Read Later
सावित्रीची लेक भाग १४
सावित्रीची लेक भाग १४

मागील भागाचा सारांश: संजय, त्याची बायको रंजना आणि त्याचा मुलगा अमोल खूप वर्षांनी रामभाऊ व रखमाला भेटण्यासाठी घरी जातात. रामभाऊला संजयचे अचानक येणे खटकले होते. संजयला आपल्या आईवडिलांची किती काळजी आहे, हे तो बोलण्यातून जाणवून देत होता. रंजनाची ट्रीटमेंट पुनमकडे चालू होती, पुनमने रंजनाला ऑपरेशन करण्यास सांगितले होते. रंजनाला वाटले की, रखमा व रामभाऊने पुनमला आपली ओळख सांगितली,तर ऑपरेशनच्या फी मध्ये काही सवलत मिळू शकते. रामभाऊने पुनमकडे शब्द टाकण्यास स्पष्ट नकार दिला.

आता बघूया पुढे……

संजय पंधरा दिवसांतून एकदा रामभाऊ व रखमाला भेटण्यासाठी घरी येऊ लागला. दोन तीन दिवसांतून फोन करुन रामभाऊ व रखमाची चौकशी करु लागला. संजयला त्याची चूक लक्षात आली होती. प्रगती पण हळूहळू मोठी होत चालली होती. प्रगतीला आता आजी बाबांची आठवण येण्याचे प्रमाण कमी होऊ लागले होते. शाळेत जाऊ लागल्याने प्रगती फक्त सुट्टीतच आपल्या आजी बाबांच्या घरी जाऊ लागली होती. रामभाऊ व रखमा पुनमच्या घरी कधीतरी जायचे.

सावित्री सोडून बाकीच्या मुली व संजय दिवाळीत एकत्र भेटायचे. प्रगती आता पुनमच्याच कुटुंबाचा भाग झाली होती. पुनमचे सर्व नातेवाईक प्रगतीचा खूप लाड करायचे. सगळं काही सुरळीत चालू होतं. एका दिवाळीला पहाटे पहाटे रामभाऊच्या छातीत कळ निघाली. संजय तिथेच असल्याने तो रामभाऊला डॉ संदीपच्या हॉस्पिटलला घेऊन गेला. डॉ संदीपने रामभाऊच्या प्राथमिक चाचण्या करुन घेतल्या. इ सी जी रिपोर्ट मध्ये गडबड आढळून आल्याने डॉ संदीपने रामभाऊची अँजिओग्राफी करण्याचे ठरवले.

अँजिओग्राफी मध्ये मेजर ब्लॉकेज आढळून आल्याने पुढील दोन तीन दिवसांतच रामभाऊची अँजिओप्लास्टी करण्यात आली. अँजिओप्लास्टी झाल्यावर रामभाऊचा त्रास कमी झाला होता. संदीप व पुनमने रामभाऊ व रखमा पुढील जवळपास एक महिना आपल्याकडेच ठेऊन घेतले. एका महिन्याने रामभाऊची तब्येत बऱ्यापैकी सुधारली असल्याने त्याने गावी जाण्याची इच्छा वर्तवली. संदीप व पुनम दोघे रामभाऊ व रखमाला गावी जाऊन सोडून आले. पुढील पंधरा दिवसांच्या गोळया संदीप रामभाऊला देऊन आला. पथ्यपाणी, गोळ्या औषधे कशी घ्यायची हे रामभाऊला व्यवस्थित रित्या संदीपने समजावून सांगितले.

संदीप निघताना रामभाऊ हात जोडून म्हणाला,
"डॉक्टर साहेब तुम्ही नसते तर माझं काय झालं असतं? आमचा तुमचा काहीही संबंध नसताना तुम्ही आणि पुनम ताईंनी माझ्यासाठी किती त्रास घेतला. तुमचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही."

संदीप म्हणाला,
"काका एकतर तुम्ही आमचे उपकार मानून आम्हाला परकं करत आहात. जर मुलाने आपल्या आई वडिलांसाठी काही केलं, तर तो उपकार करत असतो का? नाही ना. काका मी माझे कर्तव्य केले. तुमच्यामुळे आमचं कुटुंब पूर्ण झालं आहे. केवळ तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे प्रगती आम्हाला तिचे आईवडील मानत आहे. काका तुम्ही जे आमच्यासाठी केलंय, त्यापुढे मी काहीच मोठं केलं नाहीये. असं पुन्हा कधी मनात सुद्धा आणू नका."

रामभाऊ म्हणाला,
"हल्लीच्या काळात मुलं सुद्धा आपल्या आई वडिलांसाठी एवढं कळत नाहीत. माझ्या आजारपणात तुम्ही थोडीशी सुद्धा चिडचिड केली नाही. मी तुमचे आभार मानणार नाही. तुमच्या दोघांमुळे मला प्रगतीची अजिबात काळजी वाटत नाही. फक्त एकच गोष्ट सांगतो की, मी गेल्यावर रखमाची काळजी घ्या. आमचा मुलगा कसा आहे? हे मला चांगलंच ठाऊक आहे. शेतजमीन त्याला स्वतःच्या नावावर करुन घ्यायची सुप्त इच्छा असल्याने नाटक करत आहे. रखमाला तुमच्याकडे घेऊन जा, तिला एकटीला इथं राहू देऊ नका."

संदीप म्हणाला,
"काका मी काकूंना घेऊन जाईलच, पण तुम्हाला काही होणार नाहीये. तुम्ही ठणठणीत बरे होणार आहात."

अशाप्रकारे संदीप व रामभाऊ मध्ये चर्चा झाली. पुनम व संदीप रामभाऊ व रखमाचा निरोप घेऊन निघाले. गाडीत बसल्यावर संदीप पुनमला म्हणाला,

"पुनम काका वरुन कितीही खंबीर वाटत असतील, तरी ते आतून झिजले आहेत. ते ज्याप्रमाणे माझ्याशी बोलत होते, त्याप्रमाणे त्यांना जगण्याची आशा राहिली नाहीये, असं निदर्शनास येत होतं. संजय त्यांना काही त्रास देत असेल का?"

पुनम म्हणाली,
"काकू एवढं क्लिअर बोलल्या नाहीत, पण संजय शेती आणि घर नावावर करुन मागत आहे. संजयच्या मते काका गेल्यावर सगळे बहीण भाऊ वारसदार लागतील, मग त्याच्या नावावर शेती व घर होण्यास कठीण होईल. शिवाय काका प्रगतीच्या नावावर त्यांची सगळी प्रॉपर्टी करतात की काय? याची भीती त्याला लागून आहे."

संदीप म्हणाला,
"वडिलांच्या जीवापेक्षा त्याला त्याची प्रॉपर्टी महत्त्वाची वाटत आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी मिळवायचं तर वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर डोळा ठेऊन बसतात. संजयच्या वडिलांची प्रॉपर्टी त्याला देण्यात माझं काहीच दुमत नाहीये, पण त्यासाठी त्याने मुलाची सर्व कर्तव्ये निभवायला हवी होती ना. जाऊदेत आपण या विषयात न पडलेलंच बरं."

पुनम म्हणाली,
"हो, म्हणूनच मी काकूंना फार काही विचारलं नाही."

पंधरा दिवसांनी संदीप हॉस्पिटलमध्ये पेशंट तपासत असताना त्याला सदाचा फोन आला. सदाने रामभाऊची तब्येत बिघडल्याचे सांगितले. संदीप व पुनम त्वरित गावाकडे जाण्यास निघाले. संदीप व पुनम गावात पोहोचेपर्यंतच रामभाऊ हे जग सोडून गेला होता. रामभाऊचं अचानक जाणं संदीपला पचत नव्हतं. रामभाऊचा अंत्यविधी पार पडल्यावर संदीपने सदाला बाजूला घेऊन ही घटना कशी घडली? याबद्दल विचारणा केली.

संजय व रामभाऊ मध्ये वाद झाल्याचे सदाकडून संदीपला समजले. संदीपला त्याक्षणी संजयचा प्रचंड राग आला होता, पण त्यावेळी संदीपने शांत राहण्याचे ठरवले. रामभाऊच्या अंत्यविधीला त्याच्या सर्व मुली हजर होत्या. सावित्री व तिचा नवरा सुद्धा अंत्यविधीला आले होते. अंत्यविधी झाल्यावर संदीप व पुनम रखमाची परवानगी घेऊन आपल्या घरी परतले.

रामभाऊच्या एकाही विधीसाठी प्रगतीला पुनम व संदीप घेऊन गेले नाहीत. प्रगतीच्या मनावर वाईट परिणाम व्हायला नको, हा त्यामागील हेतू होता. रामभाऊचा तेराव्याचा विधी उरकल्यावर संदीप रखमाला म्हणाला,

"काकू काकांच्या इच्छेखातर तुम्हाला आपल्या घरी यावं लागेल."

रखमा काही बोलायच्या आतच संजय म्हणाला,
"तिचा मुलगा अजून जिवंत आहे. तुम्हाला तिची काळजी करण्याची आवश्यकता नाही."

संदीप म्हणाला,
"मी तुमच्या बद्दल काहीच बोललो नाहीये. काकांनी मला जे काही सांगितलं होतं, त्याची अंमलबजावणी मी करत आहे."

संजय म्हणाला,
"तुम्हीच माझ्या आईवडिलांना माझ्या विरोधात भडकवलं."

रखमा चिडून जोरात म्हणाली,
"संजय तुझ्या तोंडाला आवर घाल. अरे तुला फक्त आमची प्रॉपर्टी पाहिजे होती. हे दोघेजण चांगले, त्यांना फक्त आम्ही महत्त्वाचे होतो. तुझ्या वडिलांच्या आजारपणात ह्यांनी जेवढं केलंय, त्यातील १० टक्के तरी तू केलंस का? तुझे वडील कोणामुळे हे जग सोडून गेले? गेले तेरा दिवस मी शांत आहे. मला वाटलं होतं की, आतातरी तुला तुझ्या वागण्याचा पश्चाताप होईल, पण नाही. तू तर चोरावर मोर झाला आहेस. संदीप व पुनमला काहीही बोलण्याचा तुला अधिकार नाहीये. मी कुठे जायचं? काय करायचं? हे माझं मला कळतं. तू काही बोलण्याची गरज नाही."

कुसुम म्हणाली,
"आई तू चिडू नकोस."

रखमा अतिशय शांतपणे म्हणाली,
"सदा भाऊजी घराची व जमिनीची कागदपत्रे तयार करुन घ्या. संजयच्या नावावर हे सर्व करुन टाका. मला त्यातील काहीच नको. मुलींना त्यातील काही दिलं तरी त्यांचे नवरे त्यांना चांगली वागणूक देणार नाहीये, त्यामुळे त्यांना काही देण्याची माझी इच्छा नाहीये. माझ्या दोन गायी आणि एक वासरु तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा. सुमन त्यांना सांभाळेल. मी अधूनमधून तुमच्याकडे येत जाईल. पण आता ह्या घरात मला थांबवणार नाही. ज्या घरामुळे आणि शेतीमुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला, ती जमीन पण नको आणि ते घर पण नको. कागदपत्रे तयार झाली की कळवा, मी अंगठा द्यायला येऊन जाईल.
मी माझ्या प्रगती जवळ जाऊन राहील. माझा चांगला शेवट संदीप आणि पुनमचं करतील. मी येते."

रखमाने आपली कपड्यांची पिशवी पुनमच्या हातात दिली. घराकडे डोळे भरुन तिने बघितलं. रामभाऊचा फोटो आपल्या उराशी कवटाळून ती संदीपच्या गाडीत बसली. रखमाला थांबवण्याची उपस्थितांपैकी कोणाचीही हिम्मत झाली नाही.

©®Dr Supriya Dighe

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//