Feb 23, 2024
नारीवादी

सावित्रीची लेक भाग १२

Read Later
सावित्रीची लेक भाग १२

सावित्रीची लेक भाग १२


मागील भागाचा सारांश: प्रगतीला दत्तक का दयावे? हे रामभाऊने रखमाला समजावून सांगितले. रामभाऊने ठरवले की, सवित्री सोबत चर्चा केल्याशिवाय प्रगतीला दत्तक द्यायचे नाही. सावित्री पर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून रामभाऊ कुसुमच्या घरी गेला, तर सावित्री तिच्याकडे आलेली होती. सावित्री व रामभाऊची भेट कुसुमकडे झाली.


आता बघूया पुढे….


"बाबा प्रगतीला दत्तक द्यावं असं तुम्हाला का वाटलं?" कुसुमने विचारले.


यावर रामभाऊने डॉ पुनम सोबत झालेली चर्चा सविस्तरपणे सांगितली. सर्व ऐकल्यावर सावित्री म्हणाली,


"बाबा मी जरी प्रगतीला जन्म दिला, पण तुम्ही आणि आईने तिला वाढवलं आहे. प्रगतीचं काय करायचं? हा संपूर्ण हक्क तुम्हाला आहे."


रामभाऊ म्हणाला,

"तसं नाही पोरी. कितीही झालं तरी तू प्रगतीला नऊ महिने पोटात वाढवलं आहे. प्रगती तुझी अमानत आहे. प्रगतीला दत्तक द्यायला तुझी आई नकार देते आहे, पण मी तिला सगळं काही समजावून सांगितलं आहे. प्रगतीला दुसऱ्याच्या ताब्यात देताना माझा जीव सुद्धा तयार होत नाहीये. पण नाईलाजाने मला हा निर्णय घ्यावा लागणार आहे."


सावित्री म्हणाली,

"बाबा मला तुमची होणारी ओढाताण समजते आहे, पण मी तुमची काहीच मदत करु शकत नाहीये. डॉक्टर मॅडम आपल्या प्रगतीला व्यवस्थित सांभाळणार असतील तर तिला त्यांना दत्तक देऊन टाका. मी तिला जन्म दिला असला तरी मी तिला सांभाळू शकत नाहीये."


कुसुम म्हणाली,

"बाबा पण प्रगतीला दत्तक देण्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नाहीये का?"


रामभाऊ म्हणाला,

"आम्ही गेल्यानंतर तू प्रगतीची पूर्णपणे जबाबदारी स्विकारशील का?"


कुसुम म्हणाली,

"बाबा ह्यांना ते चालणार नाही.माझं ह्यांच्यापुढे काहीच चालत नाही."


रामभाऊ म्हणाला,

"सावित्रीच्या नवऱ्याला त्याची मुलगी नकोय. तू तिला सांभाळू शकत नाही. प्रगतीची जबाबदारी अंगावर पडायला नको, म्हणून संजय आम्हाला बघायला सुद्धा आला नाही. तर आता प्रगतीला दत्तक देण्यासोडून माझ्यापुढे कुठलाही मार्ग उरला नाहीये. माझं मन खंबीर आहे, पण शरीर साथ देत नाही. आमच्या नंतर प्रगतीचं काय होईल? ही काळजी सतत लागून राहते, म्हणून नाईलाजाने मला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. सावित्रीने तिला जन्म दिलाय, म्हणून एक शब्द तिला विचारुन घेतला. पुढे जाऊन मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये."


सावित्री म्हणाली,

"बाबा कोणी तुम्हाला काही बोलणार नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा. बाबा एक विनंती करु का?"


"कसली विनंती?" रामभाऊने विचारले.


सावित्री म्हणाली,

"प्रगतीला सांगा की, तिला जन्म देणारी आई तिच्या जन्माच्या वेळीच देवाघरी गेली. मी जिवंत आहे, हे तिला कधीच कळू देऊ नका."


"का?" रामभाऊने विचारले.


सावित्री म्हणाली,

"बाबा तिला जन्म देणारी आई तिला सांभाळू शकत नाही, हे तिला कळल्यावर किती वाईट वाटेल? तिच्या मनात माझ्याबद्दल घृणा उत्पन्न होईल."


रामभाऊ म्हणाला,

"माफ कर पोरी, पण मी असं काही तिला सांगणार नाही. अजून तरी तिला आई म्हणजे काय असते? हे कळत नाही. पुढचं पुढे बघू. तू स्वतःच्या जीवाला खाणं सोडून दे. आपण नशिबाच्या पुढे जाऊ शकत नाही. स्वतःची आणि पोरांची काळजी घे. मी निघतो आता."


एवढं बोलून रामभाऊ कुसुमच्या घरातून बाहेर पडला. घरी गेल्यावर रखमाला घडलेली सर्व हकीकत सांगितली. प्रगतीला डॉ पुनमला दत्तक देण्यासाठी त्याने रखमाला तयार केले होते. एक आठवड्यानंतर रामभाऊ सदाला सोबत घेऊन डॉ पुनमच्या हॉस्पिटलला गेला. रामभाऊला अचानक आलेलं बघून पुनम म्हणाली,


"काका तुम्ही अचानक इथे कसे काय आले?"


रामभाऊ म्हणाला,

"ताई तुमच्या सोबत थोडं बोलायचं होतं?"


पुनम म्हणाली,

"बोला ना काका."


रामभाऊ म्हणाला,

"त्या दिवशी रखमा जर तुम्हाला जास्त काही बोलली असेल तर मी तिच्या वतीने तुमची माफी मागतो. तुमच्या बोलण्यावर मी बराच विचार केला आणि त्यावरुन असं वाटतंय की, तुम्ही सुचवलेला मार्ग एकदम बरोबर आहे. आमची प्रगती तुमच्याकडे सुखात राहू शकते. जी स्वप्न प्रगतीच्या भविष्यासाठी मी बघितली आहे, ती तुमच्याकडे राहिल्यावरच पूर्ण होतील. आम्ही प्रगतीला तुम्हाला दत्तक द्यायला तयार आहोत. 


आम्हाला कागदपत्रांची काही माहिती नाहीये. दत्तक विधीसाठी तुम्हाला जी काही कागदपत्रे लागतील, ती तयार करुन घ्या. आम्ही तुमच्यावर खूप मोठा विश्वास ठेवून प्रगतीला तुमच्या ताब्यात देणार आहोत. आमचा विश्वास तेवढा मोडू देऊ नका."


रामभाऊचं बोलणं ऐकल्यावर पुनमच्या डोळयात पाणी तरळलं. डोळ्यातील पाणी पुसत पुनम म्हणाली,


"काका मी तुमचा विश्वास कधीच मोडणार नाही. मला आत्ता किती आनंद झाला आहे, हे मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाहीये. काका मी तुमची खूप आभारी आहे."


पुनमने तिच्या नवऱ्याला संदीपला बोलावून घेतले. संदीप रामभाऊ व सदा सोबत या विषयावर सविस्तर बोलला. 


पुढील एक ते दोन महिन्यात दत्तक विधीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव संदीपने केली. कायदेशीर रित्या पुनम व संदीपने प्रगतीला दत्तक घेतले. रामभाऊच्या घरी प्रगतीचा दत्तक विधी पार पडला. प्रगतीच्या दत्तक विधीला गीता व कुसुम या दोघी उपस्थित होत्या. प्रगतीला पुनमच्या ताब्यात देताना उपस्थित असणाऱ्या सर्वांचेच म्हणजे रामभाऊ, रखमा, सदा, सुमन,गीता व कुसुमचे डोळे पाणावले होते. 


प्रगतीला आपल्या सोबत घरी घेऊन जाता येईल, म्हणून पुनम व संदीप खूप खुश होते. प्रगती घरी जाताना गाडीत आनंदी रहावी, म्हणून पुनम व संदीपने तिच्यासाठी भरपूर खेळण्या आधीच घेऊन ठेवल्या होत्या. खेळण्यांच्या आकर्षणामुळे प्रगतीने गाडीतून जाताना संदीप व पुनमला काहीच त्रास दिला नाही.


पुनमच्या घरी प्रगतीचे जंगी स्वागत करण्यात आले होते. प्रगतीच्या खेळण्यांसाठी एक सेपरेट रुम तयार केली होती. एवढया खेळण्या आणि एवढे मोठे घर बघून प्रगती भारावून गेली होती. संध्याकाळ झाल्यावर प्रगतीला आजी बाबांची आठवण येऊ लागली होती, तेव्हा पुनमने तिला रामभाऊला फोन लावून दिला. रामभाऊने प्रगतीला समजावून सांगितल्यावर तिने रडणे थांबवले.


पुनमने प्रगतीला स्वतःच्या हाताने जेवण खाऊ घातले. रात्री पुनमने आपल्या सोबत प्रगतीला झोपवले. प्रगतीच्या येण्यामुळे पुनम व संदीपचे पूर्ण आयुष्य बदलून गेले होते. पुनम आता एकच वेळ हॉस्पिटलला जायची, इतर पूर्णवेळ ती प्रगती सोबत खेळण्यात घालवायची. प्रगतीचं मन रमण्यासाठी पुनम तिला दररोज गार्डनमध्ये घेऊन जायची. प्रगती सोबत वेळ घालवता येण्यासाठी संदीप हॉस्पिटल मधून लवकर घरी येऊ लागला होता. 


प्रगतीला आजी बाबांची आठवण येत असल्याने पुनमने त्यांना प्रगतीला भेटण्यासाठी बोलावून घेतले. रामभाऊ व रखमा एक दिवस प्रगतीच्या इच्छेसाठी पुनमच्या घरी मुक्कामी राहिले. पुनमने रामभाऊ व रखमाचे चांगल्या पद्धतीने आदरातिथ्य केले. पुनमचं घर आणि राहणीमान बघून रामभाऊ व रखमाचे डोळे दिपले होते.


प्रगती आता पुनमच्या घरी रुळू लागली होती. आता तिला रामभाऊ व रखमाची फारशी आठवण येत नव्हती. पुनमने प्रगतीला जवळच्या शाळेत ऍडमिशन घेतले. प्रगतीला शाळेत जायला आवडायला लागलं होतं. प्रगती आता पुनमला मम्मा आणि संदीपला डॅड म्हणू लागली होती. प्रगतीला कदाचित या शब्दांचा अर्थ माहीत नसेल, पण इतर मुले जसं म्हणतात, तसं ती म्हणू लागली होती.


पुनम अधूनमधून रामभाऊ व रखमाला प्रगतीला भेटण्यासाठी बोलावून घ्यायची. रामभाऊ व रखमाला पुनम व संदीपने कधीच परकेपणा भासू दिला नाही. शाळेतून आल्यावर प्रगती जेव्हा इंग्लिश गाणे म्हणून दाखवायची, त्यावेळी रामभाऊ व रखमाला खूप छान वाटायचे. आपला निर्णय बरोबर आहे, असं त्यावेळी त्यांना वाटायचं.


एकदा अचानक प्रगती आजारी पडल्यावर पुनम व संदीप काळजीने रात्रभर तिच्या उशाशी बसून होते. प्रगती पुनमची जीव की प्राण झाली होती. प्रगतीला एवढंस खरचटलेलं सुद्धा पुनमला सहन व्हायचं नाही. प्रगतीला सुद्धा पुनम व संदीपची खूप सवय झाली होती. 


©®Dr Supriya Digheईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//