सावित्रीची लेक भाग ११

Story Of One Girl

सावित्रीची लेक भाग ११


मागील भागाचा सारांश: प्रगतीला मला दत्तक द्याल का? हे पुनमने रखमा व रामभाऊला विचारले. प्रगतीला दत्तक देण्यास रखमाने विरोध केला. पुनमने रखमा व रामभाऊला प्रगतीला दत्तक घेण्यामागील कारण सविस्तर रित्या समजावून सांगितले.


आता बघूया पुढे…


पुनम निघून गेल्यावर रखमाने बडबड करायला सुरुवात केली,


"आपण उगाच ह्या बाईला देवाचे स्थान दिले. स्वतःला मूलबाळ होत नाही, म्हणून ही आपल्या पोरीला दत्तक घ्यायला निघाली. गोड गोड बोलून आपल्याला जाळ्यात ओढू पाहत होती. आपलाच दोष आहे, आपण कोणालाही मानपान देत बसतो. आपण गरीब असल्याचा लोकं फायदा उचलतात. ही बाई मला पुन्हा आपल्या दारात दिसायला नकोय. मी माझी प्रगती कोणालाही देणार नाही."


इतक्या वेळ शांत बसलेला रामभाऊ जोरात ओरडून म्हणाला,

"तुझं तोंड जरावेळ बंद करशील का? केव्हापासून वटवट चालू आहे. ( सुमनकडे बघून म्हणाला) सुमन प्रगतीला जरावेळ घरी घेऊन जा. मला रखमा सोबत बोलायचं आहे."


सुमनने मान हलवून होकार दिला, ती प्रगतीला आपल्यासोबत घरी घेऊन गेली. प्रगती आणि सुमन निघून गेल्यावर रामभाऊ म्हणाला,


"रखमा प्रगती समोर हे असं बोललंच पाहिजे का?"


रखमा म्हणाली,

"अहो पण आपण आपली पोरगी दत्तक देऊ, असं त्या डॉक्टर मॅडमला वाटलंच कसं? तिने आपला विश्वासघात केला."


रामभाऊ म्हणाला,

"रखमा देवाने बोलायला तोंड दिलं, म्हणून काहीही बोलू नये. डॉक्टर मॅडम असं काय चुकीचं बोलल्या? त्यांनी आपला काय विश्वासघात केला? त्यांनी आपल्या प्रगतीला पळवून नेलं का? 

अग रखमा त्यांनी ज्या पद्धतीने आपला विचार केला, त्या पद्धतीने आपल्या पोटच्या मुलाने तरी आपला विचार केला का?"


"तुम्ही प्रगतीला दत्तक द्यायचा विचार करताय का?" रखमाने विचारले.


रामभाऊ म्हणाला,

"रखमा प्रगती आता तीन वर्षांची होत येईल. प्रगतीच्या जन्मापासून संजय आपल्याकडे फिरकलेला सुद्धा नाही. आपण जिवंत आहोत की नाही, याची साधी त्याने चौकशी सुद्धा केली नाही. रखमा डॉक्टर मॅडमने आज माझे डोळे खऱ्या अर्थाने उघडले आहे.


रखमा या प्रश्नाकडे भावनिक रित्या न बघता वास्तविक परिस्थितीचा विचार करुन बघायला पाहिजे. आपण गेल्यानंतर संजय आपल्या शेतजमीनीचा वारसदार होईल, तो प्रगतीला सांभाळणार नाही, तो तिला अनाथ आश्रमात ठेऊ शकतो. आता राहिला प्रश्न सदा आणि सुमनचा, तर ते प्रगतीला अंतर देणार नाहीतच, पण त्यांच्या ताब्यात प्रगतीला दिल्यावर तिचं भविष्य किती उजेडात असेल? याची मला शंका आहे. 


आपण गेल्यावर प्रगतीला तिच्यावर माया करणार असं कोणीच उरणार नाही. आपल्याला प्रगतीला खूप शिकवायचे आहे, पण त्यातील आपल्याला काहीच कळत नाही.


याउलट प्रगतीला जर आपण डॉक्टर मॅडमला दत्तक दिलं, तर आपल्या प्रगतीच्या भविष्यात उजेडचं उजेड असेल. रखमा डॉक्टर मॅडमला एका मुलाची आवश्यकता आहे, तर आपल्या प्रगतीला चांगल्या पालकांची आवश्यकता आहे.


आपण प्रगतीला आयुष्यभर साथ देऊ शकणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. रखमा कदाचित देवाच्याच मनात हे सगळं असेल तर…

आता हेच बघ ना, सावित्रीची डिलिव्हरी डॉक्टर मॅडमच्या हातून होणे, त्यांचा अपघात होणं, सावित्रीच्या नवऱ्याने मुलीला न्यायला नकार देणे, मी आजारी पडणे, त्यांच्याच हॉस्पिटलला जाणे, मॅडमची भेट होणे, मॅडमने आपल्या घरी येणे.


ह्या सर्व घटना विधिलिखित असू शकतात. हे सर्व घडणे देवाच्याच मनात असेल तर…. "


रखमा म्हणाली,

"अहो तुम्ही जे बोलत आहात, ते सर्व पटतंय, पण आपल्या पोरीला असं दुसऱ्याच्या ताब्यात देताना कसं वाटेल?"


रामभाऊ म्हणाला,

"पोरींची लग्न करताना हा विचार मनात आला होता का?"


रखमा म्हणाली,

"अहो ती गोष्ट वेगळी आणि ही वेगळी आहे. तुम्ही खरंच प्रगतीला दत्तक देण्याचा विचार करत आहात का?"


रामभाऊ म्हणाला,

"प्रगतीच्या बाबतीत निर्णय घेणार आपण कोण आहोत? हा सर्वस्वी हक्क तिच्या आईचा आहे, जिने तिला नऊ महिने तिला पोटात वाढवलं."


रखमा म्हणाली,

"पण तुम्ही सावित्रीला कसं भेटू शकाल? तिच्या सासरच्यांनी तर आपल्याला भेटायला मनाई केली आहे ना?"


रामभाऊ म्हणाला,

"रखमा मी सवित्रीचा जन्मदाता आहे. मी काहीही करुन तिला भेटणार आहेच."


रखमा पुढे म्हणाली,

"अहो पण तिला आपल्या मुळे काही सासुरवास व्हायला नको."


रामभाऊ म्हणाला,

"मी त्याची काळजी घेईल."


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून रामभाऊ घराबाहेर पडला. सकाळची पहिली एस टी पकडून तो कुसुमच्या घरी गेला. सकाळी सकाळी आपल्या वडिलांना दारात बघून कुसुम काळजीने म्हणाली,


"बाबा तुम्ही आणि इकडं तेही असे अचानक, घरी सगळं ठीक आहे ना?"


रामभाऊ म्हणाला,

"हो, घरी सगळं ठीक आहे. माझं तुझ्याकडे एक काम आहे, म्हणून आलो होतो."


कुसुम म्हणाली,

"बाबा तुम्ही आता येऊन बसा, मग आपण निवांत बोलूयात."


रामभाऊला थांबण्याची इच्छा नव्हती, पण कुसुमचा नवरा समोर असल्याने रामभाऊ घरात जाऊन बसला. कुसुम चहा बनविण्यासाठी किचनमध्ये गेली, तर तिचा नवरा तिच्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी निघून गेला.


चहाचा कप रामभाऊच्या हातात देत कुसुम म्हणाली,

"बाबा रवीच्या शाळेची वेळ झाली होती, म्हणून त्याचे बाबा त्याला शाळेत सोडवायला निघून गेले. तुम्ही वाईट वाटून घेऊन नका."


रामभाऊ म्हणाला,

"मी कशाला वाईट वाटून घेऊ. बरं मला एक सांग, एवढ्यात सावित्रीची काही निरोप बातमी आली का?"


कुसुम म्हणाली,

"तुम्ही हे विचारायला आला आहात तर. काल सावित्री आमच्या गावात एका लग्नाला आली होती. मी आग्रह करुन तिला दोन दिवसांसाठी थांबवून घेतलंय, यावेळी दाजींनी लगेच परवानगी दिली. दाजी सुरजला आपल्या सोबत घेऊन गेले. सावित्री एकटीच थांबली. बिचारीला तिच्या संसारातून काही सुटका भेटत नाही, म्हणून मी मुद्दाम तिला थांबवून घेतलं. सावित्री कालच प्रगती आणि तुमच्या बद्दल विचारपूस करत होती. बरं झालं तुम्ही आलात, तुमची आणि तिची भेट तर होऊन जाईल."


"सावित्री कुठे आहे?" रामभाऊने विचारले.


कुसुम म्हणाली,

"अजून झोपलेली आहे. मीच तिला उठवलं नाही. दररोज तिच्या घरी तिला पहाटेच उठावं लागतं."


रामभाऊ म्हणाला,

"बरं केलंस. सावित्रीला उठवते का? मला तिच्या सोबत थोडं बोलायचं आहे. जावईबापू येण्याच्या आत बोलणं व्हायला पाहिजे."


कुसुम सावित्रीला उठवण्यासाठी निघून गेली. पाच ते दहा मिनिटांनी सावित्री रामभाऊ समोर येऊन उभी राहिली. रामभाऊला बघून सावित्रीचे डोळे भरुन आले होते. सावित्रीला बघून रामभाऊच्या डोळयात सुद्धा पाणी आले होते. 


"पोरी कशी आहेस?" रामभाऊने विचारले.


सावित्री रडक्या आवाजात म्हणाली,

"बाबा मी बरी आहे. तुम्ही कसे आहात?"


रामभाऊ म्हणाला,

"खुशाल."


सावित्री म्हणाली,

"बाबा आई कशी आहे?"


रामभाऊ म्हणाला,

"तुझी आई पण बरी आहे आणि आपली इवलीशी प्रगती पण बरी आहे."


सावित्री म्हणाली,

"बाबा माझ्यामुळे तुम्हाला या वयात डोक्याला ताण झालाय. आईचं आणि तुमचं वय झालंय, पण तुम्हाला माझ्या पोरीला सांभाळण्याचं काम लागून गेलं. बाबा मला माफ करा."


रामभाऊ म्हणाला,

"तू कशाला माफी मागते. आमचंच चुकलं, लग्न करण्याच्या वेळी आम्ही मागचा पुढचा विचार केला नाही. समोर जे स्थळ येईल, त्याच्याशी तुमचं लग्न उरकलं. आपली पोरगी त्या घरात सुखी राहील की नाही? हा साधा विचार सुद्धा केला नाही. जी चूक आम्ही तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत केली, ती चूक आम्ही प्रगतीच्या बाबतीत करणार नाही. आम्ही प्रगतीला लई शिकवणार आहोत."


सावित्री म्हणाली,

"बाबा तुम्ही जे केलंत, ते आमच्या चांगल्यासाठीचं केलं. कोणतेच आईवडील आपल्या मुलीचं वाईट व्हावं, याचा विचार करत नाहीत. आमच्या नशिबात जे होतं, ते घडलं."


रामभाऊ म्हणाला,

"सावित्री मला तुला भेटायचं होतं, म्हणूनच मी कुसुमकडे आलो होतो. तू सावित्रीला जन्म दिला आहेस, त्यामुळे तिच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे, त्याचा पुरेपूर हक्क तुला आहे. सावित्री प्रगतीला दत्तक दिलं तर चालेल का?"


सावित्री काय उत्तर देईल? हे बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all