Login

सावित्रीचा वड भाग 4

Story Of
सावित्रीचा वड भाग 4


मन्या ने बाजीच घर जरी चेहऱ्यावर हसू ठेऊन सोडलं असल तरी त्याच्या पुढे खूप मोठी दरी उभी होती.आई होती तोवर मायेचा आधार होता. कष्ट काय सगळ्यांनाच तर करावे लागतात.माणसाला मायेचा आधार आयुष्यात खूप महत्वाचा असतो.तो जर त्याला मिळत नसेल तर त्याच आयुष्य म्हणजे एक वाळवंट असतं हेच खरं!

मन्या आपल्या दोन महिन्यापासून बंद असलेल्या आपल्या घरी परतला.त्याच घर म्हणजे दोन छोट्या छोट्या खोलीची झोपडीच होती.त्याने दार उघडलं आणि त्याचे डोळे भरून आले.ज्या आईच्या सहवासात तो लहानाचा मोठा झाला होता तीच आई आज त्या घरात नव्हती.तिच्या हातून खाल्लेली मीठ भाकरी ,तिने फिरवलेला डोक्यावरून मायेचा हात,चुकल्यावर ओरडणारी आणि पुन्हा मायेनं जवळ घेणारी त्याची आई त्या घरात आज नव्हती. आई जरी नसली तरी त्या घरात तिच्या खूप आठवणी होत्या.

मन्याने डोळे पूसले सगळ घर झाडून स्वच्छ केलं.घराची जमीन शेणाने सारवून घेतली.हे सारवण आई असताना तीच करायची आई आजारी पडल्यावर स्वतः मन्या करत होता.दोन छोट्या खोल्या देखील टापटीप असायच्या.एका खोलीत चूल, चार भांडी ,एका काठीवर टागलेल अंथरून बाकी दोन चार धान्य साठवण्याचे डेऱ्याच्या आकाराचे लाकडी तट्टे(हे धान्य साठवण्यासाठी पूर्वी वापरात असत) लाकडे घरच्या मागे आईने जमवली होतीच त्यातली लाकडे आणून त्याने चूल पेटवायला घेतली अन् आईचा शब्द त्याला आठवला.

त्याची आई आठवड्याला चूल आणि जमीन सारवून घ्यायची आठवड्यात मंगळवारी गावचा बाजार भरायचा आणि त्या दिवशी शेतात काम करणाऱ्या सर्व बाया माणसांना सुट्टी असायची.त्या दिवशीच केलेल्या कामाचा पगार त्याच्या हातात पडायचा. मग त्यातूनच आठवड्याला लागणारे सर्व सामान बायका बाजारातून आणून ठेवायच्या.एक दिवस घरात राहून दुसऱ्यादिवशी नित्यनियमाने काम चालू व्हायचं. अश्याच एका मंगळवारी मन्याची आई सर्व सारवून चूल पेटवायला घेत होती पणं ती थांबली आणि मन्याला बोलली

" मन्या देवा जवळचा कुंकवाचा करंडा घेऊन ये बघू"

"आई आता कुंकू कशाला पाहिजे ग तुला?"

"आर चुल्ह सारवून झाल्यावर तिला हळदी कुंकू लावून तिची पूजा करून मगच पेटवायची"

"अस का ग?"

"चुल्ह म्हंजी अन्नपूर्णा आई असते तिची पूजा करून मगच ती पेटवायची असते असा रीतिरिवाज माझ्या आजी पणजी पासून चालत आलाय मग आपण नको का पाळायला?"

"अस व्हय पुजव पूजव खरं लवकर जेवण कर शाळेला उशीर होतोय माझ्या"

"व्हय र लेकरा आत्ताच भाजी करती बघ भाजी भाकर अन् देती तुला थांब वायच "
आईच्या डोळ्यातली काळजी बघून त्यावेळेला मन्या हसत होता.आणि आज आई नसताना आईच्या संस्कारात तो आता घरातली बाई बनणार होता.कारण पोटासाठी करावं लागतं सगळ्यांनाच.

चूल सारवून चुलीच्या पाठीमागे आई जशी काढायची तशीच नक्षी कुंकू अन् हळदी ने त्याने काढली आणि नमस्कार करून चूल पेटवली.चुलीवर चहाच आदन ठेवलं.कारण सुरवातीला गोड कायतरी करावं असं त्याला एक दिवस त्याची आई बोलली होती.म्हणून त्याची आठवण ठेऊन त्याने पहिल्यांदा चहाच ठेवला सकाळी पणं बाजीच्या घरून चहा सुद्धा पिला नव्हता त्याने. चहा करून दोन वाटीत त्याने तो ओतला.एक वाटी आपण घेतली अन् एक वाटी आई रोज जिथं चहा पिण्यासाठी बसायची तिथं ठेवली.जड अंतःकरणाने त्याने तो चहा संपवला आणि त्या दुसऱ्या वाटीतला चहा घरातल्या कितेक दिवसापासून भुकेने व्याकूळ झालेल्या मनीसमोर (मांजर) ठेवला पेटलेल्या चुलीवर त्याने भात ठेवला अन् आपण अंघोळीला गेला.अंघोळ करून आल्यावर घरच्या देवाला (एक नारळ आणि दोन मुर्त्या येवढाच त्याचा देव)स्वच्छ पाण्याने पुजवल आणि उदबत्ती लावून त्याने देवासमोर हात जोडले.भात झालाच होता आता डाळ चुलीवर शिजत ठेऊन तो अभ्यास करत बसला. थोडा अभ्यास करून त्याने आमटी बनवली आणि आपल्यापुढे ताठ वाढून घेतलं नशिबात त्याने हे पहिल्यांदाच जेवण बनवलं होतं.त्याच्या ध्यानी मनीही नसेल की आपल्याला स्वतः जेवण करून खावं लागेल. काहीवेळ तो वाढून घेतलेल्या ताटाकडे पहताच राहिला.त्याक्षणी त्याचे डोळे डबडबले होते.आईच्या आठवणीने त्याचा जीव कासावीस झाला होता.

"काश आज आई तू असतीस तर आज मी केलेल्या जेवणाचा पहिला घास तुला माझ्या हातून चारवला असता ग " जड अंःकरणाने त्याने तो घास घष्याखाली उतरवला.
तो जेवत असतानाच बाजी त्याच्या घरी दाखल झाला.

"मन्या तू आमचं घर सोडून का आलास?"

"कधीतरी यायचंच होत बाजी ते आजच आलोय"दुखऱ्या पणं शांत स्वरात तो बोलून गेला.

"बा काय तर बोलला असणार म्हणून तू इथ आलाइस "

"अजिबात नाही बाजी आई गेल्यापासून एका पोटच्या पोरासारख तुझ्या आई बाबांनी मला सांभाळलं त्याचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही बाजी पण आता मला माझ्या स्वतच्या हिमतीवर जगायचं आहे. स्वबळावर कीर्ती मिळवायची आहे."

"बर तुला जे करायचं ते कर खर रात्री तुझ्यासोबतीला मी रोज येणार आहे इथ "

"अरे बाजी बाबा ओरडतील तुला नको माझी काळजी करू कधीतरी मला एकट्यालाच जीवन जगावं लागणार आहे त्याची सुरुवात तर आजच मी केलीय. मी राहील रे एकटा.खूप आठवणी आहेत इथ आई सोबतच्या त्या रोज सोबत करतील मला. चल आज मी जेवण केलं आहे जेवून घे." बोलता बोलता त्याने बाजीलाही वाढलं दोघांनी बोलत बोलत जेवण केलं.थोडा अभ्यास केला आणि बाजी निघून गेला.

बाजी होता तोवर त्याला विर्गुळा भेटला होता तो गेल्यावर मात्र सगळ भकास दिसू लागलं.अख्या रात्री त्याला एकट्याला झोप लागली नाही.बिचारा एकटाच त्या सूनसान शेतात राहत होता. किरकिरकीड्याची किरकिर अधून मधून कसले कसले आवाज बिचाऱ्याला घाबरवत होते.

कशीबशी सकाळ उजाडली त्याने घाईघाईत आपल्या डब्याची तयारी केली. सगळ आवरले अन् सातच्या ठोक्याला तो हॉटेलात दाखल झाला.हॉटेलात पडलेली सगळी काम करून आकरा वाजता तो शाळेत गेला. दिवसभर सोबत असलेले त्याचे सोबती रात्री मात्र कोणीच सोबत नसणार होते.दिवसभर शाळेत अभ्यास पूर्ण करून रात्री हॉटेलात जाऊन तिथली काम आवरून जेवून तो घराकडे निघाला.

काळ्याकुट्ट काळोखातून वाट काढत निघालेल्या मन्याला आपल्याला कोणतरी घाबरवत आहे असा भास झाला.म्हणून त्याने मागे पाहिलं तर मागे सावकार उभा होता.ज्याच्याकडे त्याच्या अडाणी आईने कोणताही विचार न करताच पदरी असलेला एक तुकडा चार पैश्यासाठी गहाण ठेवला होता.तो तुकडा आपल्या खिशात घालण्यासाठी कितीतरी दिवसापासून तो टपून बसला होता.पणं मन्या आता त्या जमीनीचा वारसदार असल्याने त्याला तो बळकावने शक्य नव्हते.आता मन्याचां कायमचा निकाल लावायचाच हा विचार करून तो त्याच्या पाठीमागून आला होता. त्याच्यासोबत त्याचे चार हाताखालचे साथीदार देखील होतेच. येवढंस पोर आपल्याला कसला प्रतिकार करणार हा भ्रम मनाशी बांधूनच ते निवांत मन्याच्या मागून येत होते.त्याच्यावर ते झडप घालणार होतेच तोवर मागून मोठा आवाज आला.

"मन्याSsss"

आवाज येताच पाठीमागे असलेल्या सावकारासोबतच त्याच्या साथीदारांनी ही पळ काढला.

"बाजी तू?"

"होय"

"आर पण इथ काय करतोय तू?"

"मन्या खरं सांगू तुला एकट्याला इथ ठेऊन मला झोप येईना बघ"

"आर बाजी येडा हाईस का तू मी खुश आहे माझ्या घरात नको काळजी करू"

"तू काय बी म्हण मन्या पर हा बाजी तुला एकट्याला नाय राहू द्यायचा मी रोज येणार तुझ्या सोबतीला "

"बाजी,," तो काय पुढं बोलणारच की बाजी च बोलला

"चल बे लय झोप आलीय" त्याच्या बोलण्यावर हसतच मन्या ने मान डोलवली.कारण मन्या जाणून होता बाजीला कधीच झोप आवरता येत नाही ते आणि एकदा झोपला रे झोपला सकाळी नऊ वाजल्या शिवाय हा जागा होत नाही. अगदी त्या कुंभकर्ण बिभीषण सारखाच हा बाजी.

घराकडे वळताना बाजीने आपल्या छातीवर हात ठेऊन उसासा टाकला.कारण ज्या वेळी तो आपल्या आईला बोलवायला सावकाराच्या घरी गेला होता.तेंव्हा सावकाराचे आणि त्याच्या साथीदारांचे बोलणे त्याने ऐकलं होत.

"पट्ट्यानो काय बी करून त्या पाटलाच्या मनोहरला आज जित्ता गाडायचच..अजिबात दया दाखवायची नाय त्याला."

"व्हय सावकार आज ते पोरग संपणार म्हणजे संपणार तुम्ही नगा व काळजी करू आम्ही तुमचं काम फत्ते पाडू "
सावकाराला त्या साथीदारांवर विश्वास नव्हता कारण पैसे कसे लाटायला एक नंबर असलेली ही गँग आपला देखील पैसा लाटनार हे तो जाणून होताच

"आर मी हाय तुमच्या सोबत तुम्ही काम फत्ते करा की माझ्या डोळ्यासमोर तुमचं इकड काम फत्ते आणि इकडे तुमच्या हातात पैसे काय म्हणता?"

तसे सर्वजण हसू लागले .त्याच बोलणं बाहेरून ऐकणाऱ्या बाजीला मात्र घाम फुटला.काय बी करून मन्याला वाचवायचं च हा निर्धार मनाशी पक्का बांधून तो ताबडतोब मन्याच्या हॉटेल बाहेर त्याला न दिसता लपून बसला होता.पणं जाता जाता त्याने आईला आपण मन्याच्या घरी राहणार आहोत हे सांगायला तो विसरला नव्हता.

मन्या आपली सर्व कामे आवरून हॉटेलातून बाहेर पडला तसा बाजी ही मागून लपत लपत चालू लागला थोड्या अंतरावर सावकार आणि त्याची माणसे दबा धरून बसलेली होती हे बाजीने पाहिले आणि तो दुसऱ्या वाटेने चालू लागला…!


सावकाराच्या तावडीतून बाजी ने मन्याला सोडवलं आहे पणं सावकार गप्प बसणार का? मन्या या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ आहे त्याला सावकाराची खेळी समजेल का? बाजी आणि मन्या मध्ये वाद का होणार? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील भागात तोवर वाचत रहा 'सावित्रीचा वड '