Login

सावित्रीचा वड भाग 1

Story Of
सावित्रीचा वड भाग _1


*डोक्यावर* आलेलं कडाक्याचं ऊन्ह झेलत ती एकटीच त्या सूनसान रस्त्यावरून जात होती. घामाच्या धारांनी सर्व अंग भिजले होते.त्यातच फिकट गुलाबी रंगाचा टॉप अन् त्यावर काळी जीन्स तिने घातली होती. घामाने भिजलेली ती आपली स्कूल बॅग सावरत एका कडेने निघाली होती.अन् अचानक तिच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली.आणि समोर धूसर एक दुचाकी तिच्या नजरेस पडली. मिटत असलेल्या डोळ्यातून ही तिने ती बाईक पाहिली अन् तिच्या चेहऱ्यावर स्मिथ हास्य आले.
अन् ती कोसळणार इतक्यात एका तरुणाने तिला सावरतच" निशू"अशी आरोळी ठोकली.

होय ती निशाच होती. वय अंदाजे 22 अंगाने सडपातळ, गोरा वर्ण, घारे डोळे, लांबसडक केस,नाजूक ओठ आणि चेहऱ्यावर कोणालाही भुरळ घालणारे गोड हसू इंजिनियरिगच्या तिसऱ्या वर्षाला असणारी निशा अगदी बिनधास्त असायची.घरात लाडकं शेंडफळ दोन मोठ्या भावाची एकुलती एक लाडकी बहीन असणारी निशा तिच्या भावंडांचा जणू जीव की प्राण..!

आज तिचा लाडका मोठा भाऊ सुधीर येणार होता.आणि नेमकं आजच तिची महत्वाची एक्साम होती. त्यामुळे कॉलेजला जाणे तिला भाग होते.पणं भाऊ येणार असल्याच्या आनंदात असलेल्या निशा मॅडमनी ब्रेकफास्ट न करताच कॉलेज गाठले होते. मित्रमैत्रिणी सोबत रोज कॅन्टीन मध्ये काही बाही खाणारी निशा भावाच्या भेटीच्या ओढीने जणू भूकच विसरून बसली होती. मला न्यायला कॉलेजवर यायचं हे सकाळी भावाला फोनवरून बजावून झालं होत. त्यामुळे ती भावाची वाट इतकी आतुरतेने पाहत होती की कॉलेज सुटून कधीच तास निघून गेला होता हेच ती विसरून गेलेली.
एका तासाचा दोन तास झाले तरीही सुधीर आला नव्हता.आणि रोज ती ज्या बस ने जायची ती बस देखील मिस झाली होती.तिच्या मैत्रिणी केंव्हाच निघून गेल्या होत्या.आता एकटं बसण्यात काहीच अर्थ नाही म्हणून ती ही पायी निघाली होती.एक विश्वास मात्र कायम तिच्या मनी ठासून भरलेला होता की तिचा दादू तिचा शब्द मोडणार नाही तो नक्की न्यायला येणार म्हणजे येणारच…!

भावाची आतुरतेने वाट बघणारी निशा आता वैतागत होती.कधीच इतका वेळ कोणाची वाट न बघणारी ती आता मात्र कंटाळत होती.भाऊ नक्की येईल ही आशा मात्र तिला होती.तिची कोणाचीतरी वाट पाहण्याची ओढ मात्र दुरून केंव्हापासून आलिशान कार मध्ये बसून तो पाहत होता.
आता मात्र तिला वाट पाहणे असह्य होऊ लागले. अकरा चे बारा आणि बाराचे एक कधी झाला समजलेच नाही. सकाळपासून काहीही न खाल्लेल्या निशाला आता एका जागी बसणे अशक्य होऊ लागले अन् घरी जाण्याचा तिने निर्णय घेतला.

पोटात सकाळ पासून काहीच नव्हत.त्यात दुपार झालेली कडाक्याचं ऊन्ह जणू अंगातील असलेली ताकत क्षणाक्षणाला कमी करत होते. अर्ध्यावर आली असेल तोवर तिला लटपटायला लागले.आपण कुठेतरी पडणार हेही ती क्षणभर विसरून गेली होती. तो मात्र तिची अवस्था पाहून बैचेन होत होता. क्षणाक्षणाला त्याचा जीव कासावीस होत होता.जावं आणि तिला पकडुन आपल्या गाडीत बसवून पोटभर तिला खाऊ घालावे असे त्याला एक क्षण वाटून गेले. पणं एक हुरहूर ही होती की ती नेमकी कोणाची वाट पाहत आहे ते त्याला बघायचं होत.

जीवघेणा तापलेला तो रस्ता आणि डोक्यावर आग ओकणारे ऊन्ह यातून आता पुढे जायची तिची शक्तीच निघून गेली.अन् एका क्षणात ती खाली कोसळणार तोच तिच्या लाडक्या दादू ने तिला आपल्या मिठीत सावरलं…

"नीशू…बाळा डोळे उघड हे बघ मी आलोय.."

"दादू…."इतकचं कष्टाने बोलली ती.

"होय बाळा आलोय ना मी आता नाही वाट पाहायला लावणार.. सॉरी बच्चा माझी ट्रेन लेट सुटली आणि तुला केलेलं प्रॉमिस मला पाळता आले नाही. पणं आता मी आलोय…चल पाणी पिऊन घे आणि काय ग तू काहीच खाल्ले नाहीस बोलली मम्मी खर आहे का?"

"होय…दादू तुला भेटायची इतकी आतुरता होती की माझी पोटची भूकच निघून गेली होती रे…"

"अस जर पुन्हा वागलेस ना तर तुझा दादू तुला भेटायला नाय येणार क…."

"दादू" तिने त्याच्या तोंडावर हात ठेऊन त्याचे शब्द अडवले कारण तो काय बोलणार होता हे तिला चांगलंच ठाऊक होत.


एका बहीण भावाचं नातं किती सुंदर अन् घट्ट असावं याच वास्तविक चित्रण तो त्याच्या डोळ्यांनी पाहत होता. निशा जेंव्हा खाली कोसळणार होतीच तेंव्हा तो क्षणाचाही विलंब न लावता तिच्या कडे धावत येत होताच की पाठमोऱ्या असलेल्या तिच्या भावाने तिला अलगद सावरलं होतं. अन् तो लगेच पाठमोरा फिरला कारण.तिची अवस्था बघून त्याच हृदय इतकं धडधडत होत की ते खरंच बाहेर येत की काय त्याला वाटून गेलं..

सुधीर ने निशाला पाणी पाजवले अन् तिला सोबत आणलेला वडापाव खाऊ घातला. निशाच्या आईने जेंव्हा सुधीर घरी आल्या आल्या मॅडम उपाशी गेल्याच सांगितलं तसा हा भाऊ तिला आणायला निघाला रस्त्यातल्या स्टॉल वरचा वडापाव घेऊन तो क्षणाचाही विलंब न लावता निघाला होता.कधी एकदा आपल्या लाडक्या परीला बघतो अस त्याला होऊन गेलं होतं.
"बच्चा बर वाटतं ना आता तुला?"

"काय रे..दादू इतका उशीर करतं का कोणी?"

"अग माझे आई…मी ज्या ट्रेन ने येणार होतो ना त्या ट्रेन मध्ये काही बिघाड झाला अन् ट्रेन उशिरा सुटली.म्हणून मला यायला ही उशीर झाला सॉरी बच्चा आणि अस एकटे नको कुठे जात जाऊ.."

"अरे दादू आज तू येणार हे मला ठाऊक होतं.आणि तुझ्यासोबत यायचं म्हणून मी माझी बस ही मिस केली"

"म्हणजे तू रोज बस ने येते जातेस.अग घरात दोन आलिशान गाड्या असताना तू बस ने का प्रवासात त्रास करून घेतेय?"

"दादू त्या दिवशी मी गाडीला शेवटचा हात लावलेला पुन्हा गाडीला हात लावणे मला भीतीदायक वाटतं रे त्या दिवशी जर तू सोबत नसता तर अवि.."

"बच्चा अजूनही तुझी भीती गेली नाहीय खरय ना?"

"हो दादू"

"अरे बच्चा जर आपण त्या भीतीला कवटाळून बसलो ना तर आपले धैर्य गळून पडेल अन् आपले आयुष्यचं भीतीच्या छायेखाली गाडले जाईल…बघ तू अशी भित्रे पणाने जगायला लागलीस ना तर कोण म्हणणार पण नाहीत की ही आर्मी ऑफिसर सुधीर देशपांडेंची बहिण आहे.ज्या सुधीर देशपांडे ने अनेक समाजकंटकांना नेस्तनाबूत केलं आहे अन् अनेक देशाच्या शत्रूंना कटस्नान घातलं आहे"

"माझा दादू ना जगात एक नंबर हिरो आहे बर का आणि हो माझी होणारी वहिनी म्हणजे विश्व सुंदरी असणार "

निशाच्य तोंडून वहिनी ऐकताच सुधीरच्या चेहऱ्यावर हसू उमटलं अन् त्याच्या डोळ्यासमोर प्राजक्ताचा चेहरा उभा राहिला..अन् तिला सकाळीच केलेल्या प्रॉमिस ची त्याला आठवण झाली."सुधीर आपण आज रात्री डिनर ला जायचं ना?"तिच्या या प्रश्नावर त्याने लगेच होकार तर दिला खरा पण घरची सगळी मंडळी मिळून आज बाहेर जाण्याचा आखलेला बेत तो तिच्या नादात सरळ सरळ विसरूनच गेला होता. प्राजक्ताच्या विचारत हरवलेल्या सुधीर समोर निशाने हातानं चुटकी वाजवली तसा तो भानावर आला.

"ओह..काय झालं बंधूराज वहिनीचे नाव काय काढले अन् आमचे बंधूराज स्मित हास्य काय करू लागलेत मज्जा आहे बाबा एखाद्याची "निशा नाटकी करत बोलली.

"गप्प ग तुला तर माहीतच आहे ना की तुझा दादा मनातील सगळं तुला नेहमी सांगतो ते"

"हो ते दादू…पणं कोणी असेल तर सांग हा माझ्या दादूच्या वरातीत मला तर खूप नाचायचं आहे बाबा"

निशाच्या बोलण्यावर दोघेही खळखळून हसले.कितीही केलं तरी ह्या बहीण भावाच नातं इतकं घट्ट होत की दोघे आपल्या मनातील किंतू परंतू नेहमी एकमेकांना शेयर करायचे.प्राजक्ताची आणि त्याची मैत्री कॉलेज मधली होती. प्राजक्ताचा शांत स्वभाव सुधीरला पहिल्यापासून आवडत होता.तर एका हिरो पेक्षाही सुंदर दिसणाऱ्या सुधीरला पाहताक्षणी प्राजक्ता त्याच्या प्रेमात पडलेली होती.


क्रमशः

निशाच्या मागोमाग येणारा तो नेमका कोण होता? निशा साठी त्याचा जीव इतका का तुटत होता? निशा भूतकाळातील अशा कोणत्या गोष्टीला घाबरते आहे?सुधीर प्राजक्ताच्या नात्यासंबंधी घरी सांगणार का? पाहूया पुढच्या भागात.

©®सविता पाटील रेडेकर
नेसरी

🎭 Series Post

View all