तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई
मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे
आद्य तू वंद्य तू आमची लाडकी सावित्री माई
स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार आदरणीय सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा.
ज्ञानज्योती सावित्रीबाई 1848 ते 1897 अशी सलग पन्नास वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह, दुष्काळात 1000 गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे या चार कामात सावित्रीने आपले नेतृत्व केले अशी कबुली दस्तूर खुद्द ज्योतिराव देतात. यातून सावित्रीबाईंचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित होते.
सावित्रीबाईंनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.त्यांच्या या कृत्यामुळे सनातनी लोकांकडून त्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागला. पण तरीही त्यांनी आपले शैक्षणिक कार्य सोडले नाही. सावित्रीबाईंनी केवळ लोकांकडून होणारे अपमान सहन केले नाही तर , लोकांनी फेकलेल्या दगडांचा फटकाही सहन करावा लागला , शिक्षणाचे विरोधक कचरा , गाळ आणि शेण त्यांच्यावर टाकत असतं,त्यामुळे सावित्रीबाईंचे कपडे खूप घाणेरडे व्हायचे म्हणूनच सावित्रीबाई आणखीन एक लुगडे आपल्याबरोबर आणायच्या आणि शाळेत आल्याबरोबर लुगडे बदलत असतं. इतके असूनही त्यांनी हार मानली नाही आणि महिलांचे शिक्षण, सामाजिक कार्य आणि सामाजिक उत्थान याचे कार्य चालूच ठेवले.
सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवन काळात पुण्यातच १८ महिला शाळा उघडल्या .१८५४ मध्ये जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी अनाथाश्रम उघडले. अवांछित गर्भधारणेमुळे होणाऱ्या बाल हत्या रोखण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह ही उभारले. विधवांची अवस्था सुधारण्यासाठी तसेच विधवांची सतीप्रथा रोखण्यासाठी पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले.
सावित्रीबाई फुले यांनी पती समवेत काशीबाई नावाच्या गरोदर विधवा महिलेला आत्महत्या करण्यापासूनच रोखलेच नाही तर तिला आपल्या घरीच ठेवले आणि तिची काळजी घेत वेळेवर तिची प्रसूती केली नंतर तिचा मुलगा यशवंत यास दत्तक घेत त्याला चांगले शिक्षण दिले तो नंतर प्रसिद्ध डॉक्टर बनला.
1863 मध्ये ज्योतिरावांनी ब्राह्मण विधवांसाठी \"बालहत्या प्रतिबंधक गृह\" सुरू केले. त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता. या जोडप्याने स्वतःच्या घरात एक वसतिगृह चालवले होते दूरदूरहून मुले शिक्षणासाठी तेथे येत असत. त्यांचा एक विद्यार्थी महादू सहादू वाघोले लिहितो, \"सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती कोणासही जेवू घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादवेळी तात्या तिला म्हणत, \"इतका खर्च करू नये\" त्यावर ती शांतपणे बारीक हसे आणि \"बरोबर काय न्यायचे आहे?\" असे तात्यांना विचारत असे.
त्यांच्या समाजोत्थान कार्यात काम करीत ज्योतिबा यांनी आपल्या अनुयायांसह २४ सप्टेंबर १८७३ रोजी \"सत्यशोधक समाजाची\" स्थापना केली. ज्योतिबा हे स्वतः या संस्थेचे अध्यक्ष तर सावित्रीबाई या महिला विभागाच्या प्रमुख होत्या.
१८९७ मध्ये पुणे व परिसरात प्लेग ची साथ पसरल्याने इंग्रज सरकार कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही करत नव्हते. हे लक्षात आल्यावर सावित्रीबाईंनी धनकवडी घोरपडे येथे पीडितांसाठी दवाखाना सुरू केला. त्या स्वतः आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणत. त्यांच्यावर उपचार करत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवा शुश्रुषा करत होत्या. डॉक्टर यशवंतला रुग्णांची सेवा करायला बोलावुन घेतले. पीडित रुग्ण पांडुरंग बाबाजी गायकवाड या बौद्ध वस्तीतील मुलाला पाठीवर घेऊन डॉक्टर यशवंतकडे नेत असताना त्यांना प्लेगचा संसर्ग झाल्याने १० मार्च १८९७ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी सावित्रीबाई यांची प्राणज्योत मालवली.
©® राखी भावसार भांडेकर.
जय हिंद.
संदर्भसूची
१. दिनांक 3 जानेवारी 2022 चा नागपूर येथून प्रकाशित महाराष्ट्र टाइम्स.
2. दिनांक 3 जानेवारी 2023 चे नागपूर येथून प्रकाशित लोकमत वृत्तपत्र
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा