सावित्रीबाई फुले माहिती मराठीमध्ये(Information In Marathi About Savitribai Phule)

Savitribai Phule Information In Marathi
सावित्रीबाई फुले यांचा गौरव करताना 'सावित्री माय' कवितेत डॉक्टर यशवंत मनोहर लिहितात

ती लाथाडीत होती निर्वात
तेव्हा हादरत होते रक्तपिणारे
चिरेबंदी वाडे शोषकांचे.
तिच्या मागून येत होती वाट
तिलाच वाट विचारीत.
तिला आणले नाही चंद्र सूर्याने,
तिनेच आणले चंद्र सूर्य
इथल्या सर्वव्यापी निष्पर्णतेत.


ज्ञानज्योती सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग पन्नास वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह, दुष्काळात १००० गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे या चार कामात सावित्रीने आपले नेतृत्व केले अशी कबुली दस्तूर खुद्द ज्योतिराव देतात. यातून सावित्रीबाईंचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित होते.



सावित्रीबाईंनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. या शाळेत अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार, जनी कर्डिले या चार ब्राह्मण एक मराठा व एक धनगर जातीच्या मुलींना प्रवेश दिला. सावित्रीबाईंनी १५ मे १८४८ ला अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढून १ मे १८४९ पुणे येथे उस्मान शेख वाड्यात प्रौढांसाठी शाळा काढली. त्या शैक्षणिक प्रचार व प्रसार करत म्हणुन त्यांच्या या कृत्यासाठी सनातनी लोकांकडून त्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागला. पण तरीही त्यांनी आपले शैक्षणिक कार्य सोडले नाही. सावित्रीबाईंनी केवळ लोकांकडून होणारे अपमान सहन केले नाही तर , लोकांनी फेकलेल्या दगडांचा फटकाही सहन करावा लागला , शिक्षणाचे विरोधक कचरा , गाळ आणि शेण त्यांच्यावर टाकत असतं,त्यामुळे सावित्रीबाईंचे कपडे खूप घाणेरडे व्हायचे म्हणूनच सावित्रीबाई आणखीन एक लुगडे आपल्याबरोबर आणायच्या आणि शाळेत आल्याबरोबर लुगडे बदलत असतं. इतके असूनही त्यांनी हार मानली नाही आणि महिलांचे शिक्षण, सामाजिक कार्य आणि सामाजिक उत्थान याचे कार्य चालूच ठेवले.

सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवन काळात पुण्यातच १८ महिला शाळा उघडल्या .१८५४ मध्ये जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी अनाथाश्रम उघडले. अवांछित गर्भधारणेमुळे होणाऱ्या बाल हत्या रोखण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह ही उभारले. विधवांची अवस्था सुधारण्यासाठी तसेच विधवांची सतीप्रथा रोखण्यासाठी पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले.

सावित्रीबाई फुले यांनी पती समवेत काशीबाई नावाच्या गरोदर विधवा महिलेला आत्महत्या करण्यापासूनच रोखलेच नाही तर तिला आपल्या घरीच ठेवले आणि तिची काळजी घेत वेळेवर तिची प्रसूती केली नंतर तिचा मुलगा यशवंत यास दत्तक घेत त्याला चांगले शिक्षण दिले तो नंतर प्रसिद्ध डॉक्टर बनला.


१८६३ मध्ये ज्योतिरावांनी ब्राह्मण विधवांसाठी 'बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरू केले. त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता. या जोडप्याने स्वतःच्या घरात एक वसतिगृह चालवले होते दूरदूरहून मुले शिक्षणासाठी तेथे येत असत. त्यांचा एक विद्यार्थी महादू सहादू वाघोले लिहितो, 'सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती कोणासही जेवू घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादवेळी तात्या तिला म्हणत, 'इतका खर्च करू नये' त्यावर ती शांतपणे बारीक हसे आणि 'बरोबर काय न्यायचे आहे?' असे तात्यांना विचारत असे.

त्यांच्या समाजोत्थान कार्यात काम करीत ज्योतिबा यांनी आपल्या अनुयायांसह २४ सप्टेंबर १८७३ रोजी \"सत्यशोधक समाजाची\" स्थापना केली. ज्योतिबा हे स्वतः या संस्थेचे अध्यक्ष तर सावित्रीबाई या महिला विभागाच्या प्रमुख होत्या.

सावित्रीबाई फुले यांचा 'काव्यफुले' हा कवितासंग्रह १८५४ साली प्रकाशित झाला त्यात ४१ पैकी बारा कविता मोडी लिपीत आहेत. आधुनिक कवितेचे जनक म्हणून ज्या केशवसुतांना ओळखतात त्यांचा जन्म १८६६ सालचा;तर त्यांच्या जन्माच्या पूर्वीपासून सावित्रीबाई फुले यांचा कविता संग्रह आहे.

ज्या अंधःकार युगात स्त्री-शुद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. देवदर्शनाशिवाय इतर कोणत्याही कारणांसाठी घराबाहेर पडणे स्त्रियांना शक्य नव्हते, जाचक रुढी, प्रथांनी स्त्रियांना बंदिस्त करून ठेवलेले होते त्या काळात महात्मा ज्योतिरावांच्या प्रेरणेने सावित्रीबाईंनी झाडाच्या सावलीत, माय मातीच्या काळ्या पाटीवर, वाळलेल्या काड्यांच्या लेखणीने अक्षरे गिरवली. अक्षरे जुळली, मने जुळली, विचार जुळले आणि शिक्षण पूर्ण होऊन परंपरागत विचार सरणीला शह देत, विरोधाला न जुमानता पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा सन्मान मिळवला.

वयाच्या नवव्या वर्षी विवाह होऊन जाणतेपणात ज्योतिरावांच्या सोबतीने संसाराची वाटचाल करताना या महात्म्याच्या वैचारिक कृती प्रवण जीवनशैलीलाही त्यांनी आत्मसात केले. ज्योतिरावांची पत्नी एवढ्या पुरते सीमित न राहता स्वतःच्या अलौकिक गुणांमुळे त्यांच्यातल्या ज्ञान-रोपट्याचे बघता बघता वृक्षात रूपांतर झाले. ज्योतिरावांचे श्रेय मान्य करताना सावित्रीबाई 'संसाराची वाट' कवितेत म्हणतात-

माझ्या जीवनात l ज्योतिबा स्वानंद ll
जैसा मकरंद l कळीतला ll

ज्योतीरावांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यात संसार, समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच! त्या काळाच्या निकषावर विचार करतात एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच!

भवतालाशी मीळते-जुळते घेत, ध्येयाच्या दिशेने आपला अखंड प्रवास सुरू असतो. या प्रवासातली वळणे, थांबे, भेटलेली माणसे, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्ती, त्यांची सुख-दु:खे आणि आपल्या आतले विश्व या साऱ्या संमिश्रतेतूनच आकारास येते कलावंताचे विश्व. साकारली जाते त्याची निर्मिती; मग काळ कुठलाही असो. जबाबदाऱ्यांचा व्याप सांभाळत कवितेच्या प्रांतातला सावित्रीबाईंचा वावर विशेष उल्लेखनीय ठरतो. काव्य जाणीवा, काव्यसौंदर्य, रसास्वाद यांचे आकलन झालेल्या त्यांनी कोणती काव्य समीक्षा अभ्यासली असेल, की सभोवतीच्या आकांतातून, संघर्षातून, सहचराच्या प्रेमातून उपजतच उमलून आली असतील त्यांची काव्य फुले?

स्त्री-शुद्रांना हालअपेष्टांचे जगणे जगायला भाग पाडणाऱ्या समाजात महात्मा फुलेंच्या रूपाने आशेची ज्योत प्रकाशू लागली होती. शतकानूशतकाच्या मुस्काटदाबीच्या प्रतिकाराचा झंजावात स्वाभिमानाने जगण्याची आशा मनात रुजवू लागला होता. विशिष्ट वर्गाची मक्तेदारी समजून आजवर तीजोरीत कोंडून ठेवलेल्या विद्येचा झरा प्रवाहित होण्याला सुरुवात होण्याच्या या मन्वंतराचे सावित्रीबाईंनी साध्या, सहज शब्दातून, निसर्ग प्रतिमेतून बोलके वर्णन केले.

मानवप्राणी निसर्गसृष्टी द्वय
शिक्याचे नाणे
एकच असे ते म्हणुनी सृष्टीला
शोभवु मानव लेणे

मानवामुळेच सृष्टी शोभून दिसते. निसर्ग आणि मानव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सृष्टी भेदभाव करीत नाही तसेच मानवाने एकमेकांप्रती प्रेम, जिव्हाळा, विश्वास, आदर ठेवला पाहिजे.

मानवी जीवन हे विकसूया
भय चिंता सारी सोडूनिया
इतरा जगवू स्वतः जगूया

'जगा आणि जगू द्या' हे सृष्टीचे तत्व आहे. भयमुक्त समाजातच सुख, शांती, समाधान लाभते. अज्ञान, अंधश्रद्धा, विषमता, गुलामगिरी, धार्मिक कर्मकांड, प्रतिगामी विचार, विशिष्ट वर्गाची बडेजावी अशा अनिष्ट गोष्टींमध्ये अडकलेल्या समाजाला समानतेची शिकवण देणाऱ्या या काव्यपंक्ती आधुनिक काळातही अभिनव ठरतात.

मानवी कल्याणाचा, ज्ञानप्रसाराचा, समाज जागृतीचा वसा घेतलेल्या सावित्रीबाईंच्या विचारसृष्टीचे, समर्पित जीवनाचे, निसर्ग विषयक प्रेमाचे दर्शन त्यांच्या कवितेतून घडते. त्यांनी आपल्या शब्दांची कृतीची पणती सदैव उजळत ठेवली. सामाजिक व साहित्य क्षेत्रात आपल्या विचार कर्तृत्वाने सावित्रीबाईंनी मोठी क्रांती घडवून आणली. समाजाच्या सर्व स्तरातील माता भगिनींनी आज मुक्त मोकळा श्वास घेता येतो सर्व क्षेत्रात वावरता येते याचे श्रेय माऊलींकडेच जाते.


१‌८९७ मध्ये पुणे व परिसरात प्लेग ची साथ पसरल्याने इंग्रज सरकार कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही करत नव्हते. हे लक्षात आल्यावर सावित्रीबाईंनी धनकवडी घोरपडे येथे पीडितांसाठी दवाखाना सुरू केला. त्या स्वतः आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणत. त्यांच्यावर उपचार करत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवा शुश्रुषा करत होत्या. डॉक्टर यशवंतला रुग्णांची सेवा करायला बोलावुन घेतले. पीडित रुग्ण पांडुरंग बाबाजी गायकवाड या बौद्ध वस्तीतील मुलाला पाठीवर घेऊन डॉक्टर यशवंतकडे नेत असताना त्यांना प्लेगचा संसर्ग झाल्याने १० मार्च १८९७ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी सावित्रीबाई यांची प्राणज्योत मालवली.


तू क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई

तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई

मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे

आद्य तू वंद्य तू आमची लाडकी सावित्री माई


©® राखी भावसार भांडेकर.