मला भावलेल्या सावित्रीबाई आणि सिंधुताई

It Is A Short Article About The Work Of Savitribai Phule And Sindhutai Sapkal
सावित्रीबाई आणि सिंधुताई

       त्या दोन सरिता खळाळत वाहणाऱ्या, जीवनदायिनी. स्वतः दोन्ही तिरा वरचे जीवन समृद्ध करणाऱ्या. गर्भिणी चे व्रत घेतलेल्या, समाजासाठी, स्त्रीयांसाठी , अनाथांसाठी ,रंजल्या-गांजल्या साठी झटणार्‍या दोन सुवर्ण शलाका. दुःखाच्या असीम निराशेच्या अंधारात आशेचा नवकिरण बनल्या त्या. रूढी शरण समाजात वन विचारांचे स्फुल्लिंग चेतवणाऱ्या, दुर्दैवाच्या अथांग सागरात निश्चल पणे उभे राहून सार्‍या मानवजातीसाठी दिपस्तंभ बनल्या त्या! पण आमचे दुर्दैव हेच , कि त्या असताना त्यांना मिळाली केवळ अवहेलना, ढोंगी समाजाची तुच्छ आणि हीन वागणूक, पण त्या होत्या सौदामिनी काळोख्या अंधार्‍या रात्रीत लखलखणाऱ्या, समस्त मानवजातीला नवदिशा,  नव प्रेरणा देणाऱ्या.
        क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी चा आणि अनाथांची माय सिंधुताई या आपल्याला ४ जानेवारीला सोडून गेल्या. दोघीही ममतेचा वात्सल्यसिंधू आणि ज्ञानाचा खळखळणारा अखंड झरा . नियतीचा हा केवढा मोठा दैवदुर्विलास नाही?
          सावित्रीबाई फुले यांनी पतीसमवेत काशीबाई नावाच्या गरोदर विधवा महिलेला आत्महत्या करण्यापासून तर रोखलेच, पण तिला आपल्या घरीच ठेवले . तिची काळजी घेतली ,वेळेवर तिची प्रसूती ही केली. नंतर तिचा मुलगा यशवंत याला दत्तक घेतले . त्याला चांगले शिक्षणही दिले. नंतर तो एक प्रसिद्ध डॉक्टर बनला.तर सिंधुताईंनी स्वतःची पोटची मुलगी ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. एवढेच नव्हे तर १५ डिसेंबर २०१३ रोजी सासर-माहेराने आयोजित केलेला माईं चा सत्कार सोहळा पार पडल्यावर ,माई जेव्हा उपस्थितांना भेटण्यासाठी मंचावरून खाली उतरत होत्या, तेव्हा त्यांच्या डाव्या बाजूला त्यांना कोणीतरी रडत असल्याचा आवाज त्यांनीं ऐकला. त्यांनी त्यांच्या दिशेने पाहिलं ,त्यांचे पती हमसून हमसून रडत होते . त्या त्यांच्याजवळ गेल्या, त्यांनी हसत हसत रडणाऱ्या पतिचा हात आपल्या हाती घेतला . थोडासा कुरवाळला ,स्वतःच्या पदराने डोळे पुसले. पतीला त्यांनी आठवण करून दिली कि ,\"मी दहा दिवसाची ओली बाळंतीण होती तेव्हा तुम्ही हाकललं तेव्हा, माझ्या पातळाला गाठी होत्या.आता तुमच्या धोतराला गाठी आहेत. रडू नका कुणी कुणाचं नसतं. माझा ऐका ,इथं खोकत , चिकत पडू नका. माझ्याकडे चला ,पण माझी एक अट आहे , पती म्हणून येऊ नका . आता मला तुमची पत्नी होता येणार नाही . ‌माझं बाळ बनुन या. मी तुमची पण आई व्हायला तयार आहे आणि त्यांना माई स्वतः सोबत घेऊन आल्या.
          सावित्रीबाईंनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.त्यांच्या या कृत्यामुळे सनातनी लोकांकडून त्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागला. पण तरीही त्यांनी आपले शैक्षणिक कार्य सोडले नाही. सावित्रीबाईंनी केवळ लोकांकडून होणारे अपमान सहन केले नाही तर , लोकांनी फेकलेल्या दगडांचा फटकाही सहन करावा लागला , शिक्षणाचे विरोधक कचरा , गाळ आणि शेण त्यांच्यावर टाकत असतं,त्यामुळे सावित्रीबाईंचे कपडे खूप घाणेरडे व्हायचे म्हणूनच सावित्रीबाई आणखीन एक लुगडे आपल्याबरोबर आणायच्या आणि शाळेत आल्याबरोबर लुगडे बदलत असतं. इतके असूनही त्यांनी हार मानली नाही आणि महिलांचे शिक्षण, सामाजिक कार्य आणि सामाजिक उत्थान याचे कार्य चालूच ठेवले.
           तर सिंधूताई नेहमी आपल्या भाषणात म्हणायच्या कि,माझ्या एकाही शाळेला कुठलंही सरकारी अनुदान नाही. माई नेहमी म्हणायच्या \"गुरुजी तुम्ही ज्ञानदाते आहात. तुम्हीच घडवू शकता उद्याचा भारत. शाळेतील गरीब विद्यार्थ्यांवर ही प्रेम करा. विद्येपासून कोणीही वंचित राहू नये याची तमा बाळगा. परिस्थिती गंभीर आहे. माझ्या महाराष्ट्रातील गुरुजींनो पगारासाठी नव्हे, तर विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यादानाचे काम करा.

           सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवन काळात पुण्यातच १८ महिला शाळा उघडल्या .१८५४ मध्ये जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी अनाथाश्रम उघडले. अवांछित गर्भधारणेमुळे होणाऱ्या बाल हत्या रोखण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह ही उभारले त्यांच्यासमोर स्थान कार्यात काम करीत ज्योतिबा यांनी आपल्या अनुयायांसह २४ सप्टेंबर १८७३ रोजी \"सत्यशोधक समाजाची\" स्थापना केली. ज्योतिबा हे स्वतः या संस्थेचे अध्यक्ष तर सावित्रीबाई या महिला विभागाच्या प्रमुख होत्या.
           सिंधुताई यांनी अनाथ बालकांसाठी १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. त्यांनी लहान मुलांच्या शिक्षणापासून ते उज्वल भविष्याची जबाबदारी घेतली. याशिवाय माईंनी बाल निकेतन हडपसर, पुणे . सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, चिखलदरा. अभिमान बाल भवन, वर्धा . गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा. (गोपालन) आणि सप्तसिंधू महिला आधार व बाल संगोपन व शिक्षण संस्था, पुणे. या संस्थान ची ही स्थापना केली.
       ‌‌१‌८९७ मध्ये पुणे व परिसरात प्लेग ची साथ पसरल्याने इंग्रज सरकार कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही करत नव्हते. हे लक्षात आल्यावर सावित्रीबाईंनी धनकवडी घोरपडे येथे पीडितांसाठी दवाखाना सुरू केला. डॉक्टर यशवंतला रुग्णांची सेवा करायला बोलावुन घेतले. पीडित रुग्ण पांडुरंग बाबाजी गायकवाड या बौद्ध वस्तीतील मुलाला पाठीवर घेऊन डॉक्टर यशवंतकडे नेत असताना त्यांना प्लेगचा संसर्ग झाल्याने १० मार्च १८९७ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी सावित्रीबाई यांची प्राणज्योत मालवली.
         २२ देश फिरून आलेली हाफ टाइम चौथी शिकलेली २८२ जावई, ४९ सुनांची सासू ,आणि हजारोंची माय वयाच्या 74 व्या वर्षी ४ जानेवारीला आपल्यातून निघून गेली.

शृंखला पायी असू दे ,मी गतीचे गीत गाईन,
दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही,
कोंडलेल्या वादळांच्या , ह्या पहा अनिवार लाटा,
माणसांसाठी उद्याच्या, येथून निघतील वाटा,
पांगळ्यांच्या सोबतीला, येऊ द्या बलदंड बाहू,
निर्मितीच्या मुक्त गंगा , द्या येथे मातीत वाहू,
नांगर ऊस स्वप्ने उद्याची, येथे फुलतील शेते,
घाम गाळील अज्ञान येथे , येथून उठतील नेते.
बाबाआमटे


संदर्भसूची
१. दिनांक 3 जानेवारी 2022 चा नागपूर येथून प्रकाशित महाराष्ट्र टाइम्स.
२. दिनांक 4 जानेवारी 2000 22चा नागपूर येथून प्रकाशित लोकमत वृत्तपत्र.
३. इतर माहिती  आणि फोटो साभार गुगल.

🎭 Series Post

View all