Login

सावित्री

Marathi katha

"सावित्री, तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी देणार आहे. तू पार पडशील ना?"

"तुमी एकादी जबाबदारी द्येऊन तर बगा मी नक्की पार पाडंन. तुमच्या ईश्वासाला तडा जाऊ द्येणार न्हाई."

"तू स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घे आणि स्त्रियांना ही चौकट ओलांडायला सांग. घरची चौकट ओलांडून शाळेच्या चौकटीतून प्रवेश घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दे आणि ही सुरुवात तुझ्यापासून व्हायला हवी."

"आवं, पर म्या कसं करणार. मला तर काय बी येत न्हाय. त्ये शिकशन आणि पुसतक, ती अकशर मला काय बी समजत न्हाय. मग म्या कशी करणार? मला न्हाय जमणार. दुसरं काय बी आसलं तर सांगा, म्या लगेच करीन."

"नाही सावित्री, तुला हेच काम करायचे आहे आणि यासाठीच तुझा जन्म झाला आहे. तू नक्कीच तू ही चौकट पूर्ण करशील. स्त्री शिक्षणाचा झेंडा रोवशील आणि पुढील स्त्रीयांचा यामुळे उद्धार होईल."

"पण मला जमंल का?"

"का नाही जमणार? मी तुझ्यासोबतच आहे आणि मी सोबत असताना तुला कशाची भीती? तुला सगळे काही जमेल आणि तू पुढे तसाच वारसा घेऊन जाशील. आज स्त्रियांना खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागतात. जर स्त्रीने शिक्षण घेतले तर ती काहीही करू शकेल. स्वतःच्या पायावर उभे राहू शकेल, तिच्या अडचणी कमी होतील, स्वतःचा उदरनिर्वाह ती स्वतः करू लागेल आणि याचा नक्कीच फायदा स्त्रीला होईल. आणि याची सुरुवात तू तुझ्यापासून करायला हवी आहेस."

"तुमी जसं म्हणशीला तसं मी करीन. मला यातलं काय बी समजत न्हाय. पण आता समजून घीन. तुमी हाय न्हव माज्यासोबत."

"हो मी आहेच की."

सावित्री अर्थातच सावित्रीबाई फुले यांनी जोतिबा फुले यांच्या सांगण्यावरून घरची चौकट ओलांडून शाळेतील चौकटीमध्ये प्रवेश केला आणि स्त्रीशिक्षणाचा झेंडा रोवला. हे सर्व काही करताना त्यांना खूप कष्ट झाले. लोकांकडून नाही नाही ते बोल ऐकून घ्यावे लागले. एवढेच नाही तर शेण आणि चिखल यांचा मारा करून घ्यावा लागला. जर त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी ती चौकट ओलांडली नसती तर आज समस्त स्त्रियांनी इतकी जी प्रगती केली आहे ती कधीच झाली नसती, आज स्त्रीला स्वातंत्र्य मिळाले नसते, स्त्री शिक्षित झाली नसती, ती अजूनही चूल आणि मूल या चौकटीमध्येच राहिली असती. याचे सगळे श्रेय जाते ते सावित्रीबाई फुले यांना.

जोतिबांनी सावित्रीला अ आ इ ई पासून अक्षर ओळख शिकवले आणि पहिली शिक्षिका होण्याचा मानही त्यांना मिळाला. 

सावित्रीबाई फुलेंना साथ दिली ती ज्योतिबा फुले यांनी. त्यांना सर्व विरोध करत असताना त्यांनी बायकोची साथ दिली आणि त्यांना पहिली विद्यार्थिनी होण्याचा मान मिळाला.

वेळप्रसंगी काहीतरी चांगले होण्यासाठी एखादी चौकट ओलांडायला लागतेच. चौकट ओलांडली की खूप हाल अपेष्टा सोसावे लागतात पण नंतर आयुष्य सुखकर बनते. म्हणून कधीही चौकट ओलांडलेली चांगलीच असते.