Jan 26, 2022
नारीवादी

लाडकी लेक

Read Later
लाडकी लेक
सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे ,सर्वत्र उत्साहाचे,आनंदाचे वातावरण आहे.देवीची भक्तीभावाने आराधना केली जात आहे.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने स्त्रीच्या विषयी लिहावेसे वाटले...
घराघरात मुलगी,बहीण,पत्नी, आई अशा वेगवेगळ्या रूपात स्त्रीशक्ती चा म्हणजे देवीचा वास असतो.
आज ज्या रुपाचा विचार मांडणार आहे ती म्हणजे..
आईच्या गर्भात उमलणारी नाजूक कळी, जन्माला आल्यावर आई-वडिलांसाठी लक्ष्मी ठरणारी,आपल्या गुणांनी घराचे नंदनवन करणारी,लग्नानंतर सासरी जाऊन माहेरचे संस्कार जपणारी ...
म्हणजेचं
आपल्या आई-बाबांची लाडकी लेक!
म्हटले जाते,
\"लेक म्हणजे काय असते
आई सारखी दुसरी माय असते\"

ज्यांच्या घरात मुली जन्माला येतात ,ज्या आई बाबांना मुलींचे प्रेम मिळते ते खरचं भाग्यवान असतात.

समाजात \"वंशाचा दिवा\" म्हणून मुलांकडे बघितले जाते.त्यांची विशेष काळजी घेतली जाते.फार पूर्वी पासून समाजात मुलींपेक्षा मुलांना जास्त महत्त्व दिले गेले आहे. वंश चालवणारा असतो तो मुलगा.. मुली ला नेहमी परक्याचं धन म्हणून पाहिलं जातं,दुय्यम स्थान दिले जाते, शिक्षण असो की इतर सुख सुविधा अगोदर मुलांना प्राधान्य. मुलींनी फक्त घरकाम, सेवा,चाकरी अशीच कामे करावी असे सांगितले जाते.मुली कितीही हुशार, गुणी असल्या तरी त्यांनी आपले मत मांडू नये,व्यवहारात लक्ष देवू नये,आज्ञेचे पालन करावे.मुलींचे जग घरातील चार भितींच्या आत असते ,असेचं पिढ्यानपिढ्या विचार चालत राहतात आणि तशीचं मुलींना वागणूक दिली जाते.लग्नात मुलींना हुंडा द्यावा लागतो म्हणून काही आईवडील मुलगी जन्माला येऊ देत नाही. आजी,आई या स्वतः स्त्रिया असून एका स्त्री रुपाचा जन्माला येण्या अगोदरचं बळी घेतात.
मुलींचा एवढा तिरस्कार का? अपत्याला जन्म देणारी, सर्वांची सेवा करणारी,प्रसंग पडल्यास व्यवहारी वागणारी,आपल्या गुणांनी कुटुंबाची जबाबदारी पेलणारी ,सहनशीलतेची मूर्ती एक स्त्री चं असते ना?
जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, राणी अहिल्याबाई अशी अनेक स्त्रियांची उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या गुणांनी संसार तर व्यवस्थित केलाच पण राज्यकारभार देखील इतका चांगला केला की इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले. मग तरीही समाज मुलींचा आदर न करता उलट तिच्या वर अन्याय, अत्याचार करतो.
मुली लग्न झाल्यानंतर सासरी जातात आणि आपल्याला सांभाळणारे मुलेचं असतात म्हणून मुलांना जास्तीत जीव लावतात का ?आपला वंश,आपले नाव मुलगा चालवणार असतो आणि लग्न झाल्यानंतर मुलगी सासरची होऊन जाते म्हणून मुलगा- मुलगी असा भेदभाव केला जातो का?
पूर्वी पासून जे सुरू आहे ते चं आपण सुरू ठेवायचे म्हणून तसेचं वागायचे का ?जर घरातून चं आई वडिलांनी आपल्या लेकीला प्रेम दिले नाही, तिची काळजी घेतली नाही तर ...समाजाकडून ती काय अपेक्षा ठेवणार?
कधी कधी जन्मदातेचं आपल्या मुलीचे शत्रु बनतात ....असे का? कारण फक्त तिचा स्त्रीजन्म असतो म्हणून?
आजपर्यंत किती लेकींनी जन्माला येण्यापूर्वीच शेवटचा श्वास घेतला असेल,आजारपण,कुपोषण, सुख सोयींचा अभाव ,बालविवाह, कमी वयात आईपण,सासरकडून होणारा छळ, हुंडाबळी,वासनापूर्ती साठी पुरुषाकडून स्त्री शरिराचा घेतला जाणारा उपभोग अशा अनेक त्रासांमुळे होणारे मरण,
हुंडा देवू शकत नाही म्हणून, समाजात आपली इज्जत ठेवण्यासाठी आई वडिलांनी मुलींचा जीव घेतला असेल.
आई वडिलांच्या प्रेमावर मुलींचा ही अधिकार असताना त्यांना प्रेमाच्या ऐवजी मिळते फक्त अवहेलना...
आज समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे.मुलांप्रमाणेच मुलींना शिक्षण, आरोग्य सुख सुविधा देण्यात येतात.आपले कार्य क्षेत्र तसेचं जीवनसोबती निवडण्याचा अधिकार मिळत आहे. प्रत्येक क्षेत्रात मुली आपल्या गुणांनी सरस ठरत आहे.दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करून आपले कर्तव्य पार पाडीत आहे.
\"कन्या दिवस\" साजरा करून मुलींचे मनोबल वाढविले जात आहे.
\" बेटी बचाओ,बेटी पढाओ\" अभियान राबविले जात आहे.
तरीही स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, शोषण,बलात्कार यासारख्या घटना घडत असतात ...
कधी होईल स्त्री पुर्णपणे सुरक्षित ?

शेवटी एवढचं म्हणावेसे वाटते

लेक असते...

लेक असते घरातील गोजिरी,बोलकी हसरी,परी
आणि घरात आनंदाच उधळण आणणारी
लेक असते आईवडिलांच्या ह्रदयाचा ठाव घेणारी
आणि प्रत्येक नातं मनापासून जपणारी
लेक असते आईवडिलांना कन्यादानाचे भाग्य देणारी
आणि सासरी गेल्यावर माहेरी आठवणीत राहणारी
लेक असते सर्व सहन करणारी
आणि बदल्यात फक्त प्रेम देणारी.....
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now