Login

सावत्र ताई भाग ३ (परकी)

बायकोच्या सांगण्यावरून दादा ताईला घरातून निघून जायला सांगतो.
भाग ३:

सौदामिनी ताईचा रोजचा दिवस एकसारखाच होता — सकाळी लवकर उठणे, देवासमोर दिवा लावणे, पुतण्याला उठवणे, त्यांचा डबा तयार करणे, आणि मग घरातली कामे.

सुषमा आणि संजय दोघेही नोकरीला जात, मुले शाळेत. दुपारभर घर शांत असायचे. ताई एकटीच आपले जेवण उरकून आपल्या खोलीत देवासमोर बसायची, एखादे जुने पत्रक वाचायची, किंवा मूकतेत हरवून जायची.

मात्र तिच्या नकळत, घरातली हवा हळूहळू बदलत होती.

सुषमाच्या मनात ताईबद्दल आदरापेक्षा असूया वाढायला लागली होती. कुणीही पाहुणा आला की त्यांच्या तोंडी पहिले वाक्य हेच असायचे,

“ताई नसती तर आज तुम्ही हे दिवस बघू शकला नसता.”

सुषमा हसून ती वाक्य गिळायची, पण आतून कुरकुरत राहायची. तिला वाटायचे – हे घर तिचे आहे, संसार तिचा आहे, मग अजूनही ताईचे नाव का घेतले जाते?

संजयही कामात गुंतलेला असायचा. ताईच्या डोळ्यात त्याच्यासाठी अजूनही आईची माया होती, पण सुषमाच्या सूचनांनी संजयचे मन बदलत चालले होते.संजयला ती हळूहळू “घरातली एक वयस्कर आणि निरुपयोगी व्यक्ती” वाटू लागली होती.

“संजय, ताईला थोडे थांबायला सांग ना... सगळ्या गोष्टींमध्ये तिचे मत का असावे?”

“कधी कधी वाटते, ती आपल्याला स्वतंत्रपणे काही निर्णय घेऊच देत नाही.”

संजय सुरुवातीला सुषमाला विरोध करायचा, पण सुषमाचे बोलणे रोजचे झाले होते. त्यालाही कधी कधी वाटायचे— खरंच, ताई कुठे तरी स्वतःच्या अस्तित्वाची छाप पाडतेय का?

एक दिवस सकाळी सुषमाने ताईंना थोड्या कठोर सुरात विचारले,

“ताई, तुम्ही आमच्या त्या जुन्या कपाटात काहीतरी शोधत होतात काल. तुम्ही तिथे कुणाची परवानगी घेतली होती का?”

ताईला क्षणभर काहीच समजले नाही. ती शांतपणे म्हणाली, “ते कपाट जुने आहे गं. तुझ्या सासूबाईंचे.. मी फक्त त्या पूर्वी वाचायच्या ते जुने गुरू चरित्र शोधत होते, आपल्या शेजारच्या सावित्रीबाईंना हवे होते.”

सुषमा चिडली, “ताई, आता घरात प्रत्येक गोष्ट सांभाळायला तुम्ही येत जाऊ नका ! काही गोष्टी आमच्यावरही सोडा.”

ताई काहीच बोलली नाही. तिला पहिल्यांदा जाणवले — घरातल्या वस्तूंवरूनही आता आपली हक्काची नाळ तुटू लागली आहे.

त्या दिवसानंतर ताई अजूनच मागे सरली. घरातली कामे कमी केली. पुतण्याशी खेळणे कमी झाले. ती आता फक्त देव आणि एक निशब्द शांतता यांच्यात राहू लागली.

पण घरातल्या या नकारात्मक बदलांचा एक थरारक क्षण कधीतरी येणारच होता

एक दिवस सुषमाच्या मैत्रिणीचा नवरा गावात आला. संजय कामावर गेला होता. सुषमा घरात नव्हती. ताईंनी दरवाजा उघडला आणि तो आत बसला.

थोड्या वेळात सुषमा परत आली, आणि पाहिले – ताई व तिच्या मैत्रिणीचा नवरा गप्पा मारत बसलेत.

सुषमाचे रागाने डोके फिरले. तिने लगेच मैत्रिणीला फोन करून सांगितले,

“तुझा नवरा एकटा आमच्या घरी बसून आमच्या ताईशी काय बोलतोय? बिनधास्त,! हे काही योग्य नाही गं!”

मैत्रीणही रागावली. दुसऱ्या दिवशी गावात कुजबूज सुरू झाली. काहींनी सांगितले – “सौदामिनी ताईच्या वागण्यात अलीकडे बदल झालाय का?”
कोणी म्हणाले – “वय झाले तरी मनातले भाव थांबत नाहीत त्याला काय करायचे ?”

ताईच्या कानावर ही कुजबुज पोहोचली. तिचा आत्मा पिळवटून गेला. तिच्या नितळ त्यागी आयुष्यावर असा शंकेचा डाग?

त्याच रात्री संजय परत आला. सुषमा त्याला सगळे रडत रडत सांगू लागली —

“ताईच्या अशा वागण्यामुळे मला त्रास होतोय. लोक काय बोलतील याची भीती वाटते.”

संजयही गोंधळला. त्याला काहीच खरे वाटेना, पण सुषमा खूपच अस्वस्थ होती.

तो ताईजवळ गेला. ताई शांतपणे उभी होती, डोळ्यांत पाणी दाटून आले होते.

“ताई... खरंच असे काही झाले का?” संजयचा आवाज हळू पण संशयमिश्रित होता.

ताईने फक्त एवढेच उत्तर दिलं — “मी जे आयुष्य जगले, त्यात मी कुणाची सावली देखील माझ्यावर पडू दिली नाही. पण आता तुझ्या मनात शंका निर्माण झाली... हेच पुरेसे आहे.”

त्या रात्री ताईने पुन्हा एकदा आपल्या खिडकीतल्या देवळाच्या कळसाकडे पाहत नम्रपणे मान खाली घातली. देवळातील घंटांचा आवाज आणि घरातील अबोला – दोन्ही एका गूढ वेदनेने भरलेल्या होत्या.

पुढच्या काही दिवसांत ताई अजूनच हरवलेली वाटली. घरात कुठे फारशी दिसायची नाही. कोणाशी फारसे बोलत नव्हती. त्यांची खोली आता खरंच एक कोपरा झाला होता — घराच्या एकदम शेवटी, कोणाच्या लक्षातही न येणारा.

सुषमाच्या डोक्यात आता एकच विचार होता — “ताईंनी घर सोडावे, त्यांनी घरावर उपकार केलेत हे खरे, पण आता आमचे स्वतंत्र आयुष्य त्या घडू देत नाहीत.”

ती संजयजवळ बोलली, “ताईंना सांग ना एखाद्या वृद्धाश्रमात जावे, आपण खर्च देऊ. पण रोज घरात त्यांचे हे गप्प, अबोल अस्तित्व मला गुदमरायला लावते.”

संजय गोंधळात होता. पण तो आता सुषमाच्या शब्दांखाली दबला होता.

एक दिवस त्याने स्वतःच्या तोंडून हे बोलून टाकले— “ताई... आता तु इथे काय करतेस ? तु मला  लहानाचे मोठे केले, हे खरे... पण आता आमचे आयुष्य आम्हाला एकटे जगू दे ना.”

ताई काहीच बोलली नाही. तिने डोळे मिटले, आणि क्षणभर तोंडात एक कडवट हास्य उमटले.

“हो बाळा... आता मी इथे ‘काय करते’ हे मलाही समजेनासे झालंय.”

क्रमशः 

©®भालचंद्र नरेंद्र देव
जलद लेखन स्पर्धा मे २०२५


🎭 Series Post

View all