सावत्र आई भाग ८

Hi ek samajik katha

सावत्र आई.. भाग:- ८

पूर्वार्ध: या कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, सुमीच्या होकारानंतर मोजक्या आप्तेष्टांना घेऊन अगदी साध्या पद्धतीने सुमी आणि चंद्रभान पाटील यांचा विवाह  सोहळा संपन्न झाला.. लग्नाच्या पहिल्याच रात्री चंद्रभानच्या हातातली रामाच्या नावाची शेतीची कागदपत्रे पाहून सुमी आनंदून गेली  सुमीच्या परिवाराला मदत करून जणू चंद्रभानने तिला ही एक अमूल्य भेट दिली होती..आपल्या कुटुंबासाठी आपल्या पतीने चंद्रभानने केलेल्या सहकार्यामूळे कृतज्ञतेची भावना तिच्या मनात दाटून आली..  आनंदाने हरकून जाऊन ती त्याच्या प्रेमात विरघळून गेली.. आता पुढे.. 


 

सावत्र आई.. भाग:- ८

सकाळी सुमीला जाग आली..चंद्रभान शेजारीच शांतपणे निजला होता..आपल्याच नवऱ्याचं निरागस रूप पाहून सुमी जराशी लाजली.. गालातल्या गालात हसली.. "धनी माजा किती त्यो गुणी.. उदार काळजाचा..मोठ्या मनाचा..माज्या माय-बाच्या गरजंला उभा राह्यला.. आता आजी बरी व्हयील, अवंदाच्या वर्षी भावंडं चांगल्या शाळेत जात्याल..समद्या काळज्या मिटल्या, तुमी मिटवल्या.. कारभारी,! कसं ओ पांग फेडू?" स्वतःच्याच मनाशी सुमीचा संवाद चालला होता..

प्रातःविधी आटोपून स्नान उरकून ती आवरत होती.. इतक्यात सासूबाईनी तिच्या खोलीचं दार ठोठावलं.. सुमीने दरवाजा उघडला.. सासूबाई आपल्या दोन नातवंडाना घेऊन आल्या होत्या.. संग्राम आणि गौरी आजीच्या पदराआड लपत होती.. आजी हसून म्हणाली," संग्राम, गौरी!! पोरांनो..!! ही तुमची माय हाय..आजपास्न  तुम्हाला काय बी पायजेल तर तुमच्या मायला सांगायचं.आता मला तरास द्यायचा नाय" सुमीने मायेनं मुलांच्या डोक्यावरून हात फिरवला..मुलं थोडी बुजली होती..तिच्या नवखेपणाला घाबरली होती..तिच्या मायेच्या स्पर्शानं गौरी अलगद तिला येऊन बिलगली..

मुलांच्या आवाजानं चंद्रभानला जाग आली.. झोपेतून उठून बसत त्याने मुलांना जवळ बोलावलं "आबा..आबा!!" करत मुलं चंद्रभानला जाऊन चिटकली.. इतक्यात सासूबाई म्हणाल्या," सुमे..!! आज सैपाक घरातला तुजा पहिला दिस हाय..काय तर ग्वाड कर बाय.. तसा रिवाज हाय आमच्यात..चल तुला सैपाकाची खोली दावते.." सुमीने मान डोलावली आणि काही न बोलता गुपचूपपणे त्यांच्या मागोमाग चालू लागली..

पाटलांचं स्वयंपाकघर म्हणजे अगदी भव्य..आलिशान.. आश्चर्याने सुमीचे डोळे विस्फारले.. आयुष्यात पहिल्यांदाच इतकं मोठं स्वयंपाकघर तिनं पाहिलं होतं..सुमीला माय-बाच्या आधीच्या संपूर्ण घराएवढी ती एक खोली वाटली.. सासूबाईं तिला स्वयंपाक घरातल्या प्रत्येक गोष्टीची ओळख करून देत होत्या..  स्वयंपाक करणाऱ्या बायांची ओळख करून दिली.. नंतर त्यांनी तिला वरच्या फडताळीतल्या पितळेच्या डब्यातून रवा, तूप, साखर आणि सुकामेवा परातीत काढून दिला.. सुमीने छान गोड शिरा बनवला.. बटाट्याची भाजी पोळी, वरणभात, कांदेभजी, कोशिंबीर, पापड आणि लोणचं असा छान साग्रसंगीत जेवणाचा बेत आखला.. सासूबाई आणि स्वयंपाकघरात  काम करणाऱ्या मावश्या होत्याच तिच्या मदतीला..त्यांच्या मदतीनं तिने संपूर्ण स्वयंपाक बनवला.. रोज ताटात चटणी भाकरी असणाऱ्या सुमीनं आयुष्यात पहिल्यांदाच इतकं साग्रसंगीत जेवण पाहिलं होतं..सुमीला या गोष्टींचं खूप अप्रूप वाटत होतं..जेवणाची वेळ झाली.. घरातली पुरुष मंडळी जेवायला बसली.. चंद्रभानने पहिला घास तोंडात घातला त्याचा तृप्त चेहरा सांगून गेला.. "छान!!  नकळत त्याच्या मुखातून शब्द बाहेर उमटले.. चंद्रभानने जेवताना तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. त्याची ती नजर बरंच काही सांगून गेली.. सुमीला त्या नजरेची अबोल भाषा बरोबर उमजली होती.. जेवण खूपच स्वादिष्ट झालं होतं..सर्वांनी पोटभर जेवणाचा आस्वाद घेतला.. तृप्तीचे ढेकर दिले.. सर्वांनी नव्या सुनेच्या हातच्या जेवणाचं कौतुक केलं.. "सुमीच्या हाताला चव आहे" असं म्हणत सयाजीरावांनी नव्या सूनबाईंला, सुमी 'नको नको,' म्हणत असतानाही आशीर्वाद म्हणून काही रुपये सुमीच्या हातात दिले.. सुमीने खाली वाकून सासू सासऱ्यांना नमस्कार केला.. झालेल्या कौतुकाने सुमी आनंदून गेली.

रितीरिवाजानुसार सगळे सोपस्कर यथासांग पार पडले..  सत्यनारायणाची पूजा झाली..देवदर्शन झालं..दिवस खूप छान सरत होते.. नवखी सुमी आता सासरी छान रुळली होती.. सुरूवातीला सुमीच्या नवखेपणाला घाबरणारी दोन्ही बाळं आता सुमीसोबत चांगली मिसळून गेली होती. इकडून तिकडे हुंदडावे..'आई आई' करीत भोवती पिंगा घालावा… सुमीनं मायेनं त्यांना पोटाशी घट्ट धरावं..काही दिवसांतच  सुमीशिवाय त्यांचं पान सुद्धा हलेना.. सुमी मुलांची 'यशोदा माय' बनली.. चंद्रभान हे दृश्य पाहून आनंदी होतं होता.. सुमीचे सासरे-सासूबाई मुलाचा सुखी संसार बघून समाधानाने भरून पावले होते..

सगळं अगदी छान सुरळीत सुरू होतं.. काही दिवस उलटले.. "चार दिवस बाहेर फिरून येतो" असं म्हणत चंद्रभानने आपल्या आईवडिलांची बाहेर जाण्यासाठी परवानगी घेतली.. आपल्या नवऱ्यासोबत एकांतवेळ घालवायला  मिळणार म्हणून सुमी आनंदून गेली.. दोन चार साड्या, चंद्रभानचे एक दोन जोड कपडे बॅगेत भरले.. प्रवासात खाण्यासाठी शिधा बांधून घेतली.. "आम्ही पण येतो" म्हणून मागे लागलेल्या रडणाऱ्या बाळांना "म्या लवकर येती बाळांनो..!" असं म्हणत गोड पापा घेतला. दोघांनी सासूसासऱ्याना नमस्कार करून त्यांचा निरोप घेतला.. आणि चंद्रभान आणि सुमी गाडीत बसले..गाडी सुरू झाली. थोड्या अंतरावर गेल्यावर गाडीने वेग धरला.. सकाळ पासून घरातल्या कामामूळे सुमी दमली होती.. मंद गार वारा वाहत होता.. सुमीला डुलकी लागली..

करकचून गाडीचा ब्रेक दाबला गेला. सुमीला जाग आली.. डोळे चोळत तीने गाडीच्या काचेतून बाहेर पाहिलं.. गाडी मोठ्या शहराच्या रस्त्याला लागली होती.. आणि एका मोठ्या  दवाखान्यासमोर गाडी उभी राहिली..चंद्रभान सुमीकडं पाहत म्हणाला," सुमे..!!तुला माजी लग्नाच्या आधी घातलेली अट ध्यानात हाय नव्ह..तुला स्वताच्या पोराची माय व्हता नाय येणार.. त्यासाठी आपुन इथं आलूय" सुमीचं डोकं सुन्न झालं.. नवऱ्यासोबत एकांतात राहायला मिळणार या कल्पनेने आनंदलेल्या सुमीचा आनंद मावळून गेला.पुन्हा एकदा स्वप्नांचा चुराडा झाला..सुमीला आता ध्यानात येत होतं.. चंद्रभानने तीला बाहेर फिरायला नव्हतं आणलं.. लगीन गाठ बांधण्याआधी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी तो तिला इथं घेऊन आला होता.. डॉक्टरांशी त्याने आधीच बोलून ठेवलं होतं. सुमीच्या किरकोळ तपासण्या झाल्या आणि तिला शस्त्रक्रिया विभागात नेण्यात आलं.. आणि सुमीवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पार पडली.. तिचं आईपण हिरावून घेणारी.. शस्त्रक्रिया.!!.आता ती फक्त एक बाई होती..!!कधीही आई न होऊ शकणारी.. तिचा मातृत्वाचा हक्क समूळ नष्ट करण्यात आला होता.. 

पुढं काय होतं? अजून कोणतं वादळं सुमीच्या आयुष्यात थैमान घालणार होतं? पाहूया पुढील भागात...

क्रमशः

निशा थोरे..

🎭 Series Post

View all