सावत्र आई भाग-2

Hi ek samajik कथा..

सावत्र आई.. भाग:- २

पूर्वार्ध: या कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की सुमित्राच्या पार्थिव देहाला अग्नी देण्यास काशिनाथने नकार दिला आणि शेतमजूर भीमाने अंतिम संस्कार केले.. सुमित्राची मैत्रीण राधाला मैत्रिणीची कर्मकहाणी आठवत होती  शेतमजूर रामा नाईक आणि शांतीची मोठी मुलगी, सुमी चंद्रभान पाटील या बीजवराशी लग्न करून वाड्यात आली होती.. कोण होते सुमी चे आईवडील? पाहूया आता पुढे ..


 

भाग:- २

रामा नाईक आणि शांती ऊसतोडणी करणारे कामगार होते.. जिकडे मजुरी मिळेल त्या शेतात ते जात असत.. कधी मजुरी मिळायची तर कधी नाही.. रामाचे वृद्ध आईवडील घरी असायचे.. आई सतत आजारी असायची.. कमावलेली बरीच पुंजी आईच्या औषधोपचार करण्यात खर्च व्हायची.. वडील वृद्धापअवस्थेमूळे थकलेले.. कायम घरातच.. 'सुमीत्रा'  सर्वात थोरली मुलगी.. सर्वजण तिला 'सुमी' म्हणत.. सुमीनंतर 'वंशाला दिवा हवा' या रामाच्या आईवडिलांच्या हट्टापायी  झालेली अजून चार भावंडं.. कमावती माणसं दोन आणि खाणारी इतकी तोंडं.. भागवता भागवता रामाचा जीव मेतकुटीला यायचा.. घरात अठराविश्व दारिद्य्र.. एक झाकायला जावं तर दुसरं उघडं पडायचं.. कधी पोटभर अन्न मिळालं नाही की कधी ल्यायला नवीन कपडा..सणासुदीला कोणी दिलेली वापरलेली जरा बऱ्यापैकी कपडे अंगी लागायची..कोणीतरी दिलेलं गोड जिन्नस मुखी पडायचा.. डोक्यावर छप्पर होतं तेही पावसात गळायचं.. मग गळणाऱ्या धारेखाली जर्मनची भांडी लावायची.. ती पण मोजकीच होती.. मग तसंच ओलित्याने रात्रभर कुडत बसून राहायचं.. शांती आपल्या मुलांना कशीबशी आपल्या लाकडी बाजेखाली फाटकी गोधडी टाकून झोपायला लावायची.. हौस-मौजेनं रामाच्या घराचा उंबरठा कधी ओलांडलाच नाही. गरिबीशी दोन हात करण्यात असंच सारं आयुष्य सरत होतं..

'सुमी' सर्वात मोठी म्हणून कुटुंबाची, भावंडांची, वृद्ध आजीआजोबांच्या शुश्रूषा करण्याची साऱ्या जबाबदाऱ्या आपसूकच तिच्याकडे चालत आल्या.. भातुकली खेळण्याच्या वयात ती  संपूर्ण घर सांभाळत होती. कुटुंबाच्या, भावंडांच्या जबाबदारी खाली तिचं बालपण हरवून गेलं होतं.. 'माय बाबा' कामाला गेल्यावर घरची पूर्ण जबाबदारी आता सुमी पाहत होती.. दिसा मागून दिवस सरत होते.. सुमी वयात आली तशी रामा आणि शांतीची काळजी वाढू लागली.. गरिबांकडे 'चारित्र्य' हाच एक अलंकार असतो.. तेवढीच त्यांची श्रीमंती..  पण त्यांच्या इज्जतीला श्रीमंतांच्या लेखी काहीच किंमत नसते.. त्यांची इभ्रत जणू कवडीमोल..आणि त्या इभ्रतीला काळिमा लावायला टपून बसलेली धेंडं काही कमी नव्हती गावात.. 

चंदूशेठ मुकादमाविषयी गावात बरीच चर्चा होती..मजुरांच्या लेकी सुनांवर त्याची वाईट नजर होती.. गावात एखादी देखणी बाई दिसली की त्यानं झडप घातलीच म्हणून समजायची.. कधी रानात.. कधी पाणवठ्यावर गाठून.. कुठेही.. कधीही..   रामाच्या कानावर त्याच्याविषयी बऱ्याच गोष्टी येत होत्या..काळजाचा थरकाप करत होत्या.. तरणीताठी, वयात आलेली मुलगी घरात सोडून जाताना जीव घाबरून जायचा...तसं रामा आणि शांती कामावर जाताना सुमीला, "सांभाळून राहा.. इकडं तिकडं फिरू नका.." असं सारखं बजावून सांगायचे.. शेतात काम करतानाही शांतीच्या मनात मुलींचाच विचार घोळायचा..

रात्री कामावरून दमून घरी आल्यावर रामा आणि शांती घरात सुमीने चुलीवर जी काही चटणी भाकरी बनवली असेल त्याचा' घासभर तुकडा' मोडून धरणीला टेकायचे. रात्री धरणीला अंग लागलं की दोघे काहीतरी कुजबुजायचे.!  "'मुलगी म्हणजे पदरातला निखारा..काचेचं भांडं.! कुठवर जपायचं, चंदूशेठची नजर पडली तर काय बी खरं नाय!!" दोघांची कुजबुज सुमीला ऐकू यायची.. तेव्हा सुमीला त्याचा अर्थ लागायचा नाही..

जसजसे दिवस सरत होते रामाची चिडचिड वाढत होती.. गरिबाला कोणी नातेवाईक, नातेगोते नसतात हेच खरं.. त्याच्या गळक्या घरी कोणी यायचं नाही.. रामा काहीबाही मदत मागेल की काय..!! या धास्तीने जाणारा येणारा मोडक्या दाराकडे बघत पुढे सरकायचा. घरी कधी कुणी पाहुणा आलेला सुमीला फारसं आठवत नव्हतं.. त्याचंही तिला कधी काही वाईट वाटलं नाही. पण बाबांची चिडचिड अचानक ऊचल खाऊ लागली...कारण तिला कळेना..!

सुमीच्या आयुष्यात पुढे काय घडलं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

निशा थोरे