सावत्र आई भाग ११

Hi ek samajik katha

सावत्र आई.. भाग:- ११

पूर्वार्ध: या कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, सुमी संग्राम आणि गौरीला अतिशय प्रेमाने सांभाळत होती.. मुलांनाही तिचा लळा लागला होता.. सयाजीरावांच्या मृत्यूनंतर मात्र सुमीच्या सासूबाई पूर्णपणे बदलल्या.. अजून एका नातवाच्या हव्यासापायी त्या सुमीचा जाच करू लागल्या.. आता पुढे..

सावत्र आई.. भाग:- ११

सुमीच्या प्राक्तनातले भोग काही संपत नव्हते.. संग्राम आणि गौरी जसजशी मोठी होत गेली.. तसतशी सुमी आणि  मुलांच्या नात्यात अंतर पडत गेलं.. सुमी आपली जन्मदाती आई नाही म्हटल्यावर तिच्या बद्दलची माया कमी होत चालली होती.. त्यांच्याही मनात आजीच्या बोलण्यामूळे द्वेष निर्माण होऊ लागला.. शेजाऱ्यांच्या बोलण्यातून 'सावत्र आई कशी वाईट असते' याच्या भाकडकथा मुलांच्या कानावर पडू लागल्या.. आई आणि मुलांच्या  नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला.. 'खरी आई, खोटी आई' हा भेद दिसू लागला.. 

कालचक्र त्याच्या नियमानं, त्याच्या गतीनं चालत होतं..सुमीच्या  सासूबाई आता खूप थकल्या होत्या..सतत आजारी राहू लागल्या..आजारपणामूळे क्षीण झाल्या होत्या..सारं काही अंथरुणातच होतं.. पण सुमीला कधीच त्या गोष्टींचा तिटकारा आला नाही..कधी त्यांची घाण वाटली नाही.. सुमीच त्यांचं सारं पाहत होती.. त्यांची शुश्रूषा करत होती. आजवर कित्येकदा त्या सुमीला टाकून बोलल्या होत्या पण सुमीने मात्र त्यांची साथ कधीच सोडली नव्हती.. तिने कायम तिचं, सुनेचं कर्तव्य, ती जबाबदारी व्यवस्थित रित्या पार पाडली होती..अजूनही ती त्यांच्याशी प्रेमानेच वागत होती.. तिची सेवा पाहून आता तिच्या सासूबाईंना तिच्या प्रेमाची, समर्पणाची जाणीव होऊ लागली होती.. ते प्रेम पाहून डोळ्यांत पाणी येत होतं.. म्हणतात न..!! अंतिम क्षणी आपल्या चुकांची उपरती होते.. आपल्या चुका समजू लागतात..त्यांच्या बाबतीत तसंच काहीतरी होत होतं.. आणि एक दिवस त्या सर्वांना सोडून देवाघरी निघून गेल्या.. 

अजून एक नातं हात सोडून अंतिम प्रवासाला निघून गेलं.. सुमीच्या डोळ्यांतल्या पाण्याचं झरणं सुरू होतं.. सुमी एवढ्या मोठ्या वाडयात एकटी झाली..एकाकी झाली..

राधिका, तिची मैत्रीण, तिच्या प्रत्येक सुख दुःखाची ती एकमेव साक्षीदार होती.. कायम तिच्या सोबत असायची.. कालांतराने सुमी, संग्राम आणि गौरी यांच्या नात्यातला तिढा वाढतच गेला..राधिका मुलांना खूप समजवून सांगायची.. सुमीने त्यांच्यासाठी काय काय केलं..सगळं बोलून दाखवायची..कधी प्रेमानं..कधी रागानं.. पण मुलं काहीच ऐकत नव्हती.. घरात सुमीला काडीचीही किंमत नव्हती.. एका मोलकरणीपेक्षा तिचा वेगळा असा दर्जा नव्हता..पुढे गौरी आणि संग्राम उच्च महाविद्यालयीन शिक्षणासाठी मोठ्या शहरात गेले आणि मग ती दोघे सुमीपासून अजून जास्तच दुरावत गेली.. स्वतःच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मुलं तिचा दुःस्वास करू लागली..गरीब घरातली म्हणून तुच्छ लेखू लागली.. 

जसजसं वय वाढत होतं.. तसतसं चांद्रभानला सुमिबद्दल आस्था वाटू लागली..सुमीने अगदी मनापासून संसार केला..मुलांना वाढवलं.. मोठं केलं.. सुमीने एक धर्मपत्नी म्हणून प्रत्येक वेळीस तिचं कर्तव्य चोखपणे पार पाडलं होतं.. सुमी एक सर्वगुणसंपन्न सून होती..एक पत्नी म्हणून स्त्रीधर्म पाळला होता..आई म्हणून एका आईची कर्तव्ये अगदी योग्यरीत्या पार पाडली होती..चंद्रभानच्या आईचा, पोटच्या मुलांचा तिरस्कार सहन करूनही सुमीने कधी त्रागा केला नव्हता.. घरी येणारे पै पाहुणे, त्यांचं आदरातिथ्य सारं अगदी आपुलकीनं केलं होतं.. सुमीने आपल्या वर्तणुकीने चंद्रभानच्या मनात एक प्रेमाची जागा निर्माण केली होती.. आता त्याला सुमीबद्दल प्रेम, माया वाटू लागली होती..एक जिव्हाळा निर्माण होऊ लागला होता.. आजवर तिने केलेल्या त्यागाची जाणीव होऊ लागली.. पण आता काय उपयोग..? वेळ बदलता येते का? पुन्हा मागे जाऊन सारं ठीक करता येईल का? सुमीचं हिरावून घेतलेलं मातृत्व परत तिला देता येईल का? 

मुलं शिकून सवरून मोठी झाली.. उच्चशिक्षित झाली.. गौरी सुध्दा आता लग्नाच्या वयाची झाली होती.. तिच्यासाठी मोठमोठ्या तालेवार घरण्यातली स्थळं लग्नाची मागणी घालू लागली..एकुलती एक पाटलांची मुलगी..पूर्ण पंचक्रोशीत  चंद्रभान पाटलांच्या इतका गर्भश्रीमंत कोणी दुसरा व्यक्ती नव्हता.. मग स्थळं स्वतःहून चालून येऊ लागली.. आणि तोलामोलाचं घराणं पाहून गौरीच्या पसंतीने एक योग्य स्थळ चंद्रभान पाटलांनी तिच्यासाठी सुनिश्चित केलं..

शेजारच्या गावच्या पाटलांच्या मुलाशी 'विराज' शी गौरीचा विवाह ठरवण्यात आला.. योग्य मुहूर्त बघून लग्नाची तारीख ठरवण्यात आली.. सर्वांना, पूर्ण गावाला आमंत्रणं देण्यात आली.. गौरीच्या लग्नाची खरेदी सुरू झाली.. गौरीने आपल्या मैत्रिणींच्या सोबत जाऊन लग्नाची खरेदी करायला सुरुवात केली.. महागडी, उंचीL वस्त्रे पसंत केली.. भरजरी शालू खरेदी केला..तिच्याच पसंतीने लग्नाच्या इतर साड्यांची खरेदी झाली.. गौरींच्या आणि तिच्या मैत्रिणींच्या पसंतीने दागिन्यांची खरेदी झाली.. पाहुण्यांच्या मानपानाची आहेराची वस्त्रे, वस्तू खरेदी करण्यात आल्या..लग्नात गौरीला आंदण देण्याकरिता म्हणून घरातल्या प्रत्येक लहान सहान वस्तूही  खरेदी करण्यात आल्या.. चंद्रभानला आपल्या मुलीच्या लग्नात कशाचीही उणीव भासू द्यायची नव्हती.. मुक्त हस्ताने वारेमाप पैसा खर्च करण्यात आला..पण यात सुमी कुठेच नव्हती.. गौरीने तिला कशातच सहभागी करून घेतलं नव्हतं.. जन्मदाती सखी आई नव्हती न..!! 

वाड्याला नव्याने रंगरांगोटी करण्यात आली.. फुलांच्या माळा पूर्ण वाड्याभर लाऊन वाडा सजवण्यात आला.. पुन्हा एकदा  दारात मांडव घालण्यात आला.. दारावर तोरणं सजली..अंगणी सुरेख रांगोळ्या रेखाटल्या गेल्या.. पुन्हा एकदा पाहुण्यांनी वाडा गजबजून गेला.. सनई चौघड्याचे स्वर कानी उमटू लागले.. फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली होती.. 

सुमीला तिच्या लग्नाच्या दिवसाची आठवण झाली.. अशीच सारी गजबज होती.. तसंच मोहक चित्र ती पुन्हा एकदा नव्याने पाहत होती.. आपण किती बावरलो होतो.. गडबडलो होतो तिला सारं आठवत होतं.. ओठांवर नकळत स्मित हास्य उमटून गेलं.. गौरीला नवरीच्या रुपात सजताना पाहून सुमीच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं.. "इवलीशी नाजूक पोर माझी..सारं वाड्याभर पैंजणाचा रुणझुण  आवाज करत 'आई आई' करत माज्या मागे फिरायची..बघता बघता एवढी मोठी झाली"  आता माहेरच्या प्रत्येक नात्याला सोडून परक्या घरी जाणार.. लग्न करून तिच्या सासरी जाणार.. अगदी मी जशी आले होते तशीच.. सुमीच्या डोळ्यांत आसवांनी दाटी करायला सुरवात केली.. 

लग्नाची लगबग सुरू होती.. सुमी स्वतः सगळ्यांची व्यवस्था करत होती..कोणाला काय हवयं नको स्वतः पहात होती..

विराज आणि गौरीला मंडपात बोलवण्यात आलं..गुरुजींनी मंत्र पठण करायला सुरुवात केली.. कन्यादानासाठी चंद्रभान आणि सुमीला आवाज दिला..

चंद्रभान आणि सुमी आपल्या लेकीचा गौरींचा कन्यादानाचा विधी करण्यासाठी मंडपाच्या दिशेने चालू लागली..

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात.. 

क्रमशः

निशा थोरे..

🎭 Series Post

View all