सावत्र आई भाग १२

Hi ek samajik katha

सावत्र आई.. भाग:- १२

पूर्वार्ध: या कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, संग्राम आणि गौरीला सुमी त्यांची जन्मदाती आई नसल्याचं सत्य समजल्यानंतर त्यांच्या नात्यात अंतर पडत चाललं होतं.. पुढे कालांतराने मुलं शिक्षणासाठी मोठ्या शहरात गेली.. मुलं मोठी झाली.. चंद्रभानने सुयोग्य स्थळ पाहून गौरीचा विवाह निश्चित केला आता पुढे..

सावत्र आई.. भाग:- १२

गौरी आणि विराज यांचा विवाह सोहळा सुरू होता.. लग्नातले विधी सुरू झाले.. गुरुजींनी मंत्रपठण सुरू केलं.कन्यादानाच्या विधीला सुरुवात झाली.. कन्यादान करण्यासाठी गुरुजींनी चंद्रभान आणि सुमीला आवाज दिला..चंद्रभान आणि सुमी मंडपाच्या दिशेने येऊ लागले.. चंद्रभान गुरुजींच्या समोर येऊन बसला. त्याच्या शेजारी सुमी येऊन बसणार.. इतक्यात गौरी ताडकन उभी राहिली. सुमीकडे जळजळीत कटाक्ष टाकत मोठ्याने ओरडून म्हणाली," थांब..!!" एक पाऊलही पुढे टाकू नकोस.. तिथेच थांब..! तू माझी आई नाहीस.. आमची आई लहानपणीच आम्हाला सोडून गेली.. आमच्याच तुकड्यावर जगलेली बाई तू.. आमच्याशी बरोबरी करणार काय ?? तुझी लायकी तरी आहे का माझं कन्यादान करण्याची? तुझ्यासारख्या दरिद्री भिकारड्या बाईकडून मी कन्यादान मुळीच करून घेणार नाही.. आणि ही कन्यादान करणार असेल तर हे लग्नच होणार नाही" 

सुमीची पावलं जागच्या जागीच थबकली.. काळ्या मेघातून वीज अंगावर कोसळावी असा भास झाला.. ती जागच्या जागी थिजली..डोळ्यांत आसवांची गर्दी झाली.. सुमीला काय बोलावं..! काय करावं? काहीच सुचेना.. तिला लहानपणीची गौरी आठवू लागली.. दुडूदुडू सुमीच्या मागे धावणारी.. 'आई, आई' करत आपल्या इवल्याशा हातांची वीण गळ्याभोवती घालणारी गौरी तिला आठवली. वरणभाताचा घास भरवताना सांगितलेल्या चिऊ काऊच्या गोष्टी आठवल्या.. रात्री जोजवताना म्हटलेली अंगाई तिला आठवली.. सुमीचं बोट धरून पहिलं पाऊल टाकणारी गौरी तिला आठवली..पाटीवर पेन्सिलीने तिचा हात धरून गिरवलेलं पहिलं अक्षर "श्री" सुमीला आठवलं.. गौरीच्या आजारपणात तिच्या उशाशी बसून जागवलेल्या कैक रात्री सुमीला आठवल्या.. आणि आज गौरी इतकी मोठी कधी झाली तिचं तिलाच कळेना..  इतकी मोठी झाली की आता ती सुमीला आई समजत नव्हती..सुमीचा आई म्हणून असलेला तिचा कन्यादानाचा हक्क नाकारत होती.. तीचं 'आई असणं' नाकारत होती.. सुमीचं मन आक्रंदत होतं," देवा.., हाच दिस दावण्यासाठी तू माज आईपण हिसकावून घेतलंस का रं..!!,कंच्या पापाची शिक्षा देतूस रं..हा दिस दावण्यापरीस माजा जीव का नाय घेतलास…!!" एक कैफियत तिच्या डोळ्यांतून झरत होती.. 

गौरीचं बोलणं ऐकून चंद्रभान अवाक झाला..आजचा हा क्षण अनपेक्षितपणे आपल्या वाट्याला येईल  असा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता.. तोही स्तब्धपणे सुमीकडे पाहू लागला.. लग्नात राधिका आणि तिचे कुटुंबियही आले होते.. गौरीचे शब्द ऐकून राधिका पेटून उठली.. आपल्या मैत्रिणीचा झालेला हा अपमान तिला सहन झाला नाही ती रागाने गौरीवर खेकसली," गौरे..! काय बोलतीस..?? माय हाय तुजी ती..तळहाताच्या फोडापरीस तुमास्नी वाढीवलं.. असं पांग फेडतिस व्हय..!!  काय नाय केलं तिनं.. तुमच्यापाई त्या माऊलीनं…." ती पुढे बोलणार इतक्यात सुमीनं तिला अडवलं.. शांत व्हायला सांगितलं..राधिका रडत होती.. मैत्रिणीसाठी तीचा जीव तुटत होता.. ती एकमेव साक्षीदार होती तिच्या वाट्याला आलेल्या दुःखाची.. गौरी राधिकावरच डाफरून बोलू लागली," काकू, तू मध्ये पडू नकोस..हा आमचा घरगूती मामला आहे" राधिका अजूनच चिडली आणि रागाने लग्न अर्धवट सोडून निघून जाऊ लागली.. सुमीने पळत जाऊन तिचा हात पकडला," ताये,,  आन हाय तुला माजी..माज्या पोरीचं लगीन सोडून जाऊ नको ग..!!" सुमी काकुळतीला येऊन राधिकाला विनवत होती..तिची आर्त हाक राधिकाचं हृदय पिळवटून टाकत होती.. मैत्रिणीची आर्त साद ऐकून राधिकेची पाऊलं जागच्या जागी थबकली.. ती थांबली..

चंद्रभान गौरीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता.. "नंतर बोलू, पाहुण्यांत उगीच तमाशा नको.. एवढं लगीन होऊन जाऊ दे" गौरीला वारंवार समजावत राहिला.. पण गौरी ऐकून घ्यायला तयार नव्हती..तीही हट्टाला पेटून उठली होती.. लग्नात आलेल्या पाहुण्यांमध्ये कुजबुज सुरू झाली.. लग्नाची घटिका सरत चालली होती.. लग्न स्थगित होईल की काय..! सर्वांना प्रश्न पडला होता. तमाशा बघणाऱ्यांची छान करमणूक होत होती.. चंद्रभान गौरीची विनवणी करत होता..आणि गौरी त्याला, त्याच्या आर्जवांना जुमानत नव्हती.. का हा अट्टहास..!! चंद्रभानला उमजत नव्हतं..सुमीने पोटच्या मुलांसारखं मुलांना वाढवलं होतं मग तिचा अधिकार का नाकारायचा? इतकी का गौरी कठोर झाली? सुमीने आजवर केलेलं निःस्वार्थ प्रेम कशी काय विसरली? कोणी आणि कधी मुलांच्या मनात विष पेरलं गेलं? चंद्रभानच्या मागे प्रश्नांचा ससेमिरा सुरू झाला.. 

शेवटी आपलं मन घट्ट करत सुमीने डोळ्यांतले अश्रु पुसले.. आपल्यामुळे लग्नाला गालबोट नको, पाहुण्यांचा खोळंबा व्हायला नको म्हणून सुमीनेच चंद्रभानला समजावून सांगितलं..ती चंद्रभानला म्हणाली,"धनी, राहू द्या..तुमी करा आपल्या पोरीचं कन्यादान..म्या हाय की इथंच..दुरून पाहीन..ती कितीबी नाय म्हणली तरीबी म्याच तिची माय हाय..येळ दवडू नगा.. लगीन येळ सरायला लागलीय.. पाव्हनमंडळी नाराज व्हतील..पोरीच्या आयुष्याचा प्रश्न हाय..ती एक अजून लहान हाय..नाय उमज तिला..काय बी बोलती तुमी तरी समजून घ्या..चला उठा लवकर,विधी करून घ्या" चंद्रभान अगतिक झाला होता..सुमीचा समुजदारपणा पाहून त्याचे डोळे भरून आले.. तो उठला मंडपात गुरुजींच्या समोर येऊन बसला..कन्यादानाचा विधी करण्यासाठी..सुमीशिवाय.. डोळ्यांत तळ वाहू लागलं.. आपण काय करून बसलो??.. मनात विचार थैमान घालू लागले.. 

सुमी एका कोपऱ्यात उभी राहून कन्यादानाचा विधी पाहत होती.. डोळ्यात पाणी होतं.. आज तिला तिच्याच निर्णयावर राग येत होता.. स्वतःचीच चीड येत होती.. ज्या मुलांसाठी तिनं तिचं सारं आयुष्य वेचलं होतं.. त्यांनीच तिचं आईपण नाकारलं होतं.. काय हे तिचं दुर्भाग्य..!! सांगू कशी कोणाला..! कळ आतल्या जीवाची..जणू अशीच तिची अवस्था होती.. सुमी पूर्णपणे कोलमडून गेली होती..  राधिका आपल्या मैत्रिणीची अवस्था पाहून व्यथित होत होती.. उघड्या डोळ्यांनी पाहण्याखेरीज तिच्याकडे कोणताच मार्ग नव्हता.. 

गौरी आणि विराज यांचाविवाह सोहळा संपन्न झाला.. गौरीची पाठवणी करण्यात आली.. गौरी सासरी निघून गेली..आपल्या संसारात रममाण झाली.. 


पुढे काय होतं? पाहूया पुढच्या भागात..

क्रमशः
निशा थोरे..

🎭 Series Post

View all