सावत्र आई

Hi ek samajik katha..

सावत्र आई..

चितेवर शांत विसावलेलं तिचं कलेवर पाहून राधाला पुन्हा पुन्हा उमाळा दाटून येत होता.. मनात सुरू असलेला आक्रोश बंड करून पेटून उठू पाहत होता.. शेवटचं दर्शन घेत  असताना  तिच्या भेगाळलेल्या रुक्ष पायांना स्पर्श झाला.. डोळ्यातल्या आसवांनी तिच्या पायावर अभिषेक केला.. अजूनही तिच्या मृतदेहाला अग्नी कोण देईल? हा वाद विकोपाला चालला होता.गावकऱ्यांनी किती समजावून सांगितलं तरी काशीनाथ ऐकत नव्हता.. अंतीम संस्कार करायला त्याने साफ नकार दिला.. आपल्या सखीच्या देहाची चाललेली ही अवहेलना राधाला पाहवेना.. शेवटी घरात काम करणाऱ्या  मजुरांनी तिला स्मशानभूमीत आणलं शेतात काम करणाऱ्या मजूर भीमाने तिच्या मृतदेहाला अग्नी दिला.. अग्नीच्या बाहुपाशात तिचं कलेवर अलगद स्वाधीन होत होतं..अग्नीच्या ज्वाळा जणू आसमंताला टेकू पाहत होत्या.. अग्नीच्या ज्वाळा मनातला अंधार दूर करू शकत नव्हत्या.. राधेची सखी अंतिम प्रवासाला निघाली होती.. या स्वार्थी भावनाहीन समाजाचा तिने निरोप घेतला होता.. राधेने तिला अंतिम प्रणाम केला आणि ती सर्वांसोबत तिच्या घराकडे निघाली.. मन मात्र भूतकाळात धाव घेऊ लागलं.. तिचा जीवनपट डोळ्यांसमोर तरळून गेला.. एक दुर्दैवी कहाणी पुन्हा पुन्हा आठवू लागली.. 

राधेला तो दुर्दैवी दिवस.., हो!!, तिच्यासाठी दुर्दैवीच म्हणावं लागेल.. डोळ्यासमोर उभा राहिला.. ज्या दिवशी ती 'चंद्रभान' पाटलांशी लग्न करून वाड्यावर आली होती.. फार गाजावाजा न करता साध्या पद्धतीने कमी पाहुण्यांना सोबत घेऊन विवाहसोहळा आटोपला होता.. चंद्रभान पाटलांचं हे दुसरं लग्न होतं.. त्यामुळे एका बीजवराचं लग्न फार धुमधडाक्यात करण्याची कोणाला गरज वाटली नाही की इच्छा झाली नाही..घाई घाईत लग्न उरकलं.. आणि तिनं त्या वाड्याचं माप ओलांडून 'गृहप्रवेश' केला.. सयाजीराव पाटलांची सून, 'चंद्रभान'ची पत्नी बनून आलेला तो इवलासा जीव..घाबरलेला, थोडासा बावरलेला.. नुकतंच सोळावं वर्ष  सरलं असावं.. दिसायला नाकीडोळी नीटस, गव्हाळ वर्णाची, नाजूक नवरी, पाटलांच्या प्रतिष्ठेला शोभेल इतके अंगभर दागिने..कशीबशी भरजरी शालू सावरत ती एका कोपऱ्यात बसून होती.. सगळेच तिच्यासाठी अपरिचित..दावणीला बांधलेल्या गाई सारखी तिची अवस्था.. कसायांच्या तावडीत सापडावी तशी..  राधा ही शेजारच्या वाड्यात राहणाऱ्या चंद्रभान पाटलांच्या मित्राची संग्रामची पत्नी.. चंद्रभान आणि संग्राम जिवलग मित्र असल्याने राधेचं पाटलांच्या वाड्यावर येणंजाणं चालू असायचं..आजही लग्नविधी पूर्ण आटपून झाला तरी राधा इथेच होती..नव्या नवरीला सोबत करण्यासाठी राधा थांबली होती.. राधाने सुमीची ओळख करून घेतली.. तशी फार कष्ट पडले नाहीत.. आधीपासूनच थोडी जुजबी ओळख होतीच तिची..

'सुमीत्रा' नाव होतं तीच.. सगळे तिला 'सुमी'च म्हणत असत.. पाटलांच्या शेतात 'ऊसतोडणी' च्या कामासाठी येणाऱ्या 'रामा नाईक' मजुराची थोरली मुलगी.. रामा मजूर आपल्या बायकोसोबत त्यांच्या शेतात मजुरी काम करायचा..  

मग सुमीच्या आयुष्यात काय असं घडलं की तिला एका बीजवराशी लग्न करावं लागलं पाहूया पुढील भागात..

क्रमशः

निशा थोरे..

नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काही दिवसांसाठी काही कारणास्तव  कथा लेखनाला स्वल्पविराम दिला होता..पुन्हा एकदा नवी सुरुवात.. एक नवीन ऊर्जा घेऊन  एका  नवीन कथेसह मी आपली शब्दसखी निशा थोरे आपल्या भेटीला आलेय..  कथा कशी वाटली जरूर कळवा… आपल्या  प्रतिक्रिया माझे लेखन प्रगल्भ करतील यात शंकाच नाही..????????

धन्यवाद

आपली शब्दसखी

निशा थोरे.. ????????????????????????