सवत माझी लाडकी अंतीम भाग 5.

सवत माझी लाडकी अंतीम भाग
"मग तू काय केलं आई ?"

"तू शलाकाला जाब विचारलास का ?"

हे ऐकून मानसीने आपला ओठ चावला. काही क्षण तिला त्या आठवणींनी नकोसं झालं. तिने जणू ही गोष्ट अस्तित्वात नाही अश्या प्रकारे शलाका आणि मोहनच्या संबंधाकडे डोळेझाक केली होती.

पण आभाच्या प्रश्नांनी मानसीला पुन्हा त्याच कठड्यावर उभं केलं होतं ,जेव्हा तिच्या शेजारणीने शलाका आणि मोहनबद्दल सांगितलं होतं. तिनेसुद्धा दुसऱ्यांच्या घरात आग लावून उब शेकणाऱ्या माणसांच्या स्वभावाप्रमाणे तिलाही हेच विचारलं होतं.

"मानसी आता काय करणार गं तू ?"

आधीच ह्या धक्याने हादरलेली मानसी संताप ,निराशा, विश्वासघाताच दु:ख काहीच व्यक्त करू शकली नाही. ती पुर्णपणे आतून गोठली गेली. काही क्षणानंतर तिला जाणवलं की तिच्या नवऱ्याने खरतरं तिचा विश्वास घात केलाय...पण हे सगळं तिला का नाही दिसल ?  का दिसुनही तिने दुर्लक्ष केलं. हल्ली मोहन मानसीला जास्त त्रास देत नसे. रोज रोज आग्रही असणारा मोहन आता शांत असे. अंथरूणावर पडल्या पडल्या तो झोपी जाई. हल्ली क्वचितच तो मानसी बरोबर शारीरिक जवळीक साधे.

हे खरतर मानसीला खुपच सुखवणार होतं. तिलाही तर आराम मिळतचं होता, पण तिने कधी हा विचार केला नव्हता की मोहन आपली गरज कुठे भागवून तिला आराम देत आहे. त्याक्षणी तिला आभासारखाच शलाकाचा प्रचंड राग आला. तिनेही मोहनलाच का गटवावं..कीती पुरूष असले असते तिची शय्यासोबत करायला ..पण मग मोहनच का?

जाब विचारण्यासाठी मानसी मग संध्याकाळी मोहन घरी आल्यावर शलाकाच्या घराकडे वळली. ती बेल वाजवणार
इतक्यात नुकतीच दहावीत पास झालेल्या आभाच्या चपला तिकडे दिसल्या. आभा इकडे कशाला आली असावी ह्या विचारात मानसी असताना आभाचा आवाज तिच्या कानावर पडला. ती आडोशाला उभी राहीली आणि आभा व शलाकाचं बोलण ऐकू लागली.

"थँक्यू सो मच मावशी. तू क्लासची फी भरलीस.आईला सांगितलं होतं तेव्हा ती म्हणाली होती दहावीला कशाला क्लास हवा. जमेल तितका कर अभ्यास असं म्हणाली होती मला. आम्हाला काही तुझं महागडं डॉक्टरकीचं शिक्षण परवडणार नाही, पण मावशी मला डॉक्टर व्हायचचं आहे . त्यासाठी चांगले टक्के हवे होते आणि चांगल्या टक्यांसाठी चांगला क्लास. हे सगळं तुझ्यामुळे झालं ..नाहीतर."

आभाचा स्वर जसा कातर झाला तसं आभाचं बोलण ऐकून मानसीलाही गलबलून आलं आणि मग तिच्या कानी शलाकाचा स्वर आला,

"मी काही उगाच फी नाही भरली. माझाही एक स्वार्थ आहे?  "

"स्वार्थ ? कसला मावशी ?" आभाने कुतूहलाने विचारलं .

"हाच की तू मोठेपणी मला फुकट औषध देशील. देशील ना !"

मग  शलाकाच्या ह्या मस्करीवर दोघी खळखळून हसल्या आणि मानसी आल्या पावली  शलाकाला न भेटताच घरी गेली. तिने शलाकाला कोणताच जाब विचारला नाही आणि शलाकाशी नेहमीच तसचं वागत आली जसं ती आधी वागत होती. हे सगळं आठवल्यावर मानसी आभाला म्हणाली,

"मी तुझ्या वडीलांना हवं ते देण्यात असमर्थ होते. त्यात त्यांना सुचेल तो उपाय त्यांनी केला. शलाकालाही तर कोणाची साथ हवीच होती ना..मग तिनेही तुझ्या वडीलांचा हात धरला. पण तिने तर उपकारच केले ना माझ्यावर..मला नको असलेल्या संबधातून मुक्त केलचं, पण माझा संसारालाही आधारच दिला."

"आभा कधीतरी आम्ही एकमेकांचं नशीब बघून हेवा करत होतो. तिला माझा नवरा मुलबाळ असलेला संसार दिसत होता आणि मला तिचं काहीही ,केव्हाही करायचं स्वातंत्र्य व गाठीशी असलेला पैसा."

"पण आम्हाला आमच्या नशिबाची, समाजाची मर्यादा होती. असं समज की तुझ्या वडीलांच्या अफेअरमुळे काही अंशी तुम्हाला मनासारखं वाढवायचं स्वातंत्र्य मला मिळालं. तिलाही संसाराच आणि मलांच सुख गवसलं. आम्ही एकमेकांचं नशीब बदलून घेतलं. शलाका खरं तर माझी सवत आहे, माझी पण लाडकी सवत."

" आभा, माझ्या आई वडीलांनीही पैशाअभावी मला शिकू दिलं नव्हतं  ह्याची सल मला आयुष्यभर होती आणि मीही तर तेच करत होती तुमच्याबरोबर. शलाकाने पैसे दिले नसते तर तू डॉक्टर, सान्वी एम.बी.ए. होऊ शकला असता का ?  "

"शलाका तुमचं नशीब माझ्यासारखं किंवा तिच्यासारखं होण्यापासून टाळत होती हेच त्यादिवशी मला समजलं आणि मी त्या दोघांच्या संबधाकडे गांधारीची पट्टी बांधून पहायचं ठरवलं. कोणी कधी मला ह्याबद्दल सावध केलं तरी मी ऐकूनही न ऐकल्यासारखी करायची आणि माझ्यामते तुही तेच करावं.  "

एवढं बोलल्यावर मानसी ढसाढसा रडायला लागली. खुप वर्षांनी  मानसीने कोणासमोर आपलं मन मोकळं केलं होतं.आभालाही ते जाणवलं, पण आभा तरी न राहवून बोलली.

"आई ! चुकी तुझी कधी नव्हतीचं.  तू जेवढं बाबाबद्दल सांगतलं, त्यावरून मला जाणवलं की, त्यांना हायपर सेक्सुएलीटाचा आजार आहे. अश्या माणसांना त्यांच्या सेक्स संबधित भावनांना संयमात ठेवता येत नाही. अशी लोक ही गरज पुर्ण करण्यासाठी तत्पर असतात.

वासनांध असतात अशी लोक. अश्यावेळी ते केवळ  आपल्या शाररीक गरजा पुर्ण करण्यासाठी जोडीदाराचा विश्वासघात करून बाह्य संबध ठेवतात कींवा लग्न न करता फक्त लैंगिक सुखासाठी एकापेक्षा जास्त लोकांबरोबर संबंध प्रस्थापित करतात."

"खरतरं लैंगिक शिक्षण नसल्यामुळे अश्या लोकांना आपल्याला असा काही आजार आहे तेच कळत नाही. ह्यावरचा उपचारही सहज आणि काही महिन्यात बरा होणारा असतो. जर बाबांना हे माहित असतं तर कदाचित तुमच्या संसाराची अशी वाताहात झाली नसती. तसचं तुलाही  घुसमटत राहवं लागलं नसतं. "

"आता कळलं की फक्त बाळंतपण नाही तर जोडादारच्या  विश्वासघातचं दु:ख पोखरत होतं आणि तू  मनावर घेतलेली अपराध बोधाची भावनाही. आता माझा ऐक, तुझा काही दोष होता हा विचारही काढून टाक. परिस्थिती अशीच विचित्र होती . खरतरं कोणाचा दोषी नव्हता ग."

हे ऐकल्यावर तर मानसीच्या मनावर असलेली सल पुर्णपणे उतरली. ती आभाकडे पाहून खुप वर्षांनी पहिल्यासारखी हसली. आभालाही आपल्या आईला चिंताविरहीत हसताना पाहून फार बरं वाटलं. तिने ठरवलं की शलाका मावशीला तेच मान द्यायचा जो तिच्या आईचा आहे..कारण शेवटी तिही तर तिची आईच आहे ना..


समाप्त.

तळटीप : hypersexuality, compulsive sexual behavior ,वासनांधपणा हा आजार आहे जो ह्या कथेप्रमाणे काल्पनिक नाही आहे. हा आजार असेल तर त्याला औषधे, फिजओथेरीपी आणि इतर उपचार आहेत. गरज आहे ती वेळेत आजार ओळखण्याची आणि त्यावर उपचार करण्याची. खऱ्या आयुष्यात मात्र दरवेळी बायकोची सवत लाडकी असेलच असं नाही.

©®वृषाली गुडे

🎭 Series Post

View all