सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 9

Mind game

सवत-एक सामाजिक व्यथा-भाग 9

नेहाने रमेशला जो प्रश्न विचारला,त्यावरुन तिला त्याच्या मनात काय आहे ते कळेना , शिवाय तिला अजून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे,त्याने तिला अजुनही विश्वासात घेऊन काहीही सांगितले नव्हते ,जे काही तिला कळाले ते तिच्या आईवडीलांकडून , तिला असे वाटत होते जर त्याच्या मनात तसे काही नाही तर त्याने तिच्या पासून गावाला जे घडले ,ते सांगायला हवे होते.

असेच दोन दिवस गेले, नेहाच्या बाबांचा नेहाला फोन आला,त्यांनी तिला सांगितले ,सरोजच्या बाबांना हृदयविकाराचा झटका आला  आणि त्यातच ते मरण पावले.

नेहा म्हणाली -"एवढं सगळं अचानक कस काय झालं?"

बाबा-"त्यांनी सरोजच्या आईला तुझ्या बद्दल सांगून म्हटलेले की सरोजच्या लग्नाची आपली इच्छा पूर्ण होईल आणि मला माहित आहे की,नेहा तिला कधीही अंतर देणार नाही ,पण त्यांना मी जेव्हा तुझे विचार सांगितले ,तेव्हा बरं म्हणाले ,पण तेव्हा पासून ते घरात जास्त कुणाशी बोलत नव्हते,बघ तुला वेळ मिळाला तर सरोज आणि तिच्या आईला येऊन भेटून जा"

नेहा-"हो बाबा,बघते एक दोन दिवसात येऊन जाईल."

असं म्हणून फोन ठेऊन दिला .

संध्याकाळी रमेश आल्यावर त्याला सांगितले की , सरोजचे बाबा आता ह्या जगात नाही तर मी भेटून येते, तो म्हणाला,अशा वेळी तर जायलाच हवं.

दुस-या दिवशी रमेश तिला बस मध्ये बसवून देतो,आणि ऑफिसला जातो ,तो तिला सांगतो जर उशीर झाला तर उद्या आली तरी चालेल,त्यावर ती म्हणते ,शक्यतो आजच येण्याचा प्रयत्न करेल,उशीर झाला तर तू न्यायला ये.

बस मधे बसल्यावर बाबा जे बोलले ते विचार तिच्या डोक्यात चालू असतात,त्यात कधी गाव येते ते कळतच नाही,बाबा तिला घ्यायला आलेले असतात,मग बाबा म्हणतात ,आधी घरी जाऊया ,थोडी फ्रेश हो मग जाऊ आपण सरोजच्या घरी.

घरी जाऊन फ्रेश होऊन येते,आईने चहा ठेवला होता, ती कप समोर ठेवते, चहा पाहताच ती आईला म्हणते,खरचं चहाची गरज होती,तुला न सांगता माझ्या मनातलं सगळं कसं कळतं.

आई-"आई आहे मी तुझी"

बाबा-"चल जाऊन येऊ परत तुला दुपारी निघायचं आहे ना"

नेहा-"हो चला"

बाबा आणि नेहा सरोजच्या घरी जातात, तिथे गेल्यावर पाहतात सरोज आणि तिची आई फ़ोटो समोरच बसलेले असतात,कारण कुणी ना कुणी सारखं भेटायला येतच असतात.

सरोज-"नेहा ताई तू कधी आलीस,बघ ना बाबा देवाघरी गेले,त्या आधी त्यांनी मला सांगितलं होतं की ते मला तुझ्या बरोबर तुझ्या घरी पाठवणार होते,माझं लग्न पण करणार होते ,त्यानंतर मी तुझ्याबरोबर रहाणार म्हणून किती खुश होते तेव्हा,नंतर मी हट्ट करायची मला ताई कडे जायचयं म्हणून तर त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं आणि म्हणायचे ,बघू नंतर , तू ने ना मला आता तुझ्या बरोबर "

सरोजची आई-"तिच्या बाबांना खूप अपेक्षा होती तुझ्या कडून,ते म्हणायचे नेहा हो म्हटली की माझं सगळं टेन्शन संपल,मी मरायला मोकळा,मी त्यांना म्हणायची असं का बोलताय,आणि बघ ना आधीच निघून गेले,एक आठवडा झाला,तसे खूप शांत शांत असायचे,किती विचारलं पण काही सांगितल नाही ,तू त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करणार ना नेहा,म्हणजे निदान त्यांच्या आत्म्याला  शांती तरी मिळेल"

नेहा-"काकू मला थोडा वेळ द्या "

तिने सरोजला समजावले आणि मग घरी आले,आईने जेवणाची तयारी करून ठेवली होती,ती त्यांना म्हणाली , चला जेवून घेऊ.

सर्व जेवायला बसले,पण नेहाच्ं काही जेवणात लक्ष नव्हते, आई-"अग तुझं लक्ष कुठे आहे,तू जेवतच नाही,काय झालं"

तिने बाबांकडे पहिले त्यांनी तिला जेवण्यासाठी खुणावलं,

मग तिने जेवायला सुरवात केली.

जेवण झाल्यावर ती बाबांना म्हणाली -"मी निघते आता"

बाबाही जास्त काही न बोलता म्हणाले -"मी सोडवायला येतो "कारण ते तिची मनस्थिती काय झाली असेल ते समजू शकत होते.

तिला बसमध्ये बसवून देऊन घरी आल्यावर सरोजच्या घरी काय झालं ते सविस्तर सांगितलं,त्यावर आई म्हणाली -"देव तिला योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य देवो".

इकडे बसमध्ये सरोज विचार करत होती , जसं बसमधून उतरायची वेळ आली तिने तिच्या मनाशी काहितरी ठरवलं होतं.

फक्त आता ते आमलात कसं आणायचं या बद्दल तिला विचार करावा लागणार होता,तिने पाहिले,रमेश तिला घ्यायला आला होता,तिने विचारलं-"तुला कसं कळलं की मी ह्या बसने येतेय."

रमेश-"तुला फोन लावत होतो ,तू उचलला नाही ,मग बाबांना फोन करुन विचारलं,कधी निघालीस,आणि पोहचलो तुला घ्यायला ,का तुला आवडलं नाही का मी आलो ते"

नेहा-"नाही रे तसं काही नाही ,मला बस मध्ये फोनचा आवाज ऐकू नाही आला"

रमेश-"ठीक आहे,चल आता लवकर घरी "

असं म्हणून दोघे गाडीत बसले.

गाडीत बसल्यावर रमेश तिला विचारतो-"कशी  आहे सरोज आणि तिची आई "

नेहा-"सरोजला तर समजत नाही ती म्हणते देवाघरी गेले आणि तिची आई तर आता खूप खचली आहे "

रमेश-" हो ना ,आता त्यांना एकट्याने सरोजची काळजी घ्यावी लागेल "

नेहा-"हं,पण काय करणार दुसरा काही पर्याय नाही "

थोड्या वेळाने नेहा-"तिच्याशी करेल का रे कुणी लग्न जर प्रयत्न केला तर म्हणजे काकांची तशी इच्छा होती आणि जर झाले तर काकूंचीही काळजी मिटेल"

रमेश-"मला नाही वाटत कुणी करेल ,कारण तिचीच काळजी घ्यावी लागेल,कोण असा स्वत:हून पायावर धोंडा नाही पाडून घेणार आणि तिला कळतं का की,लग्न वगैरे काय असतो"

नेहा-"बाबाही तेच म्हणाले ,कुणी तयार होत नाही,बघू त्यातून काही होतय्ं का"

बोलता बोलता घर येतं ,नेहा पटकन खिचडी टाकते,जेवल्यावर किचन आवरते आणि झोपायला जाते,शांत शांतच असते ,रमेश काही बोलत नाही ,त्याला वाटतं आज तिकडे जाऊन आली आहे त्यामूळे शांत असेल,तो झोपून घेतो ,नेहा मात्र काहितरी मनातल्या मनात ठरवत असते. काय ठरवत असते ते पाहुया पुढच्या भागात.........

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all