सवत-एक सामाजिक व्यथा-भाग 20(अंतिम भाग)
मागच्या भागात आपण पाहिले की,रमेशच मन त्याला खात होतं ,परंतु नेहाने मात्र सत्य स्वीकारलं होतं, जी गोष्ट झाली त्यासाठी आधी पासूनच ती तयार होती,उलट सरोज वर आपण अन्याय करत नाही,ही भावना तिच्या मनातून कमी झाली.
तिच्या डोक्यात सरोज जे बोलली ते सारखं घोळत होते, खरच जर सरोजला बाळ झालं तर दोघी मिळून त्याला छान सांभाळू,आता घरात जी शांतता असते ,ती त्या बाळाच्या येण्याने घराला एक घरपण येईल,त्याच्या किलकिलाटाने घर गजबजून जाईल ,अशी स्वप्न पाहात होती,शेवटी किती काही केलं तरी ती एक स्त्री होती ,तिलाही आई होणं अनुभवायचं होतं,तिने या विषयावर रमेशशी बोलयचं ठरवलं.
इकडे रात्री नेहाला सोडून आल्यावर ,रमेश डायरेक्ट त्याच्या रूममध्ये गेला,जेवायची वेळ झाली होती तरी तो आला नव्हता,त्याला सरोज बरोबर बोलायची इच्छा नव्हती आणि त्याला तिला सामोरं जावं असं वाटतं नव्हतं . वाट बघून बघून शेवटी सरोज रमेशला बोलवायला गेली, तो डोळे मिटून पडला होता,सरोजने हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याने तिचा हात झटकला ,सरोज रडायला लागली तसं तो उठला आणि सॉरी म्हणाला आणि विचारलं,काही काम होत का.
सरोज-"मला भूक लागली आहे,तुम्ही जेवायला नाही आले म्हणून बोलवायला आले"
त्याने विचार केला,ही मला जेवायला बोलवायला आली आणि मी तिच्या सोबत कसा वागलो,ठिक आहे ,चल मी आलोच ,तो पर्यंत तू ताट वाढ.दोघेही शांततेत जेवले,त्यानंतर सरोज आवरून झोपायला गेली.रमेश तिच्या रूममध्ये गेला आणि तिला म्हणाला ,काल जे झालं त्याबद्दल सॉरी,पुन्हा माझ्या कडून अशी चूक होणार नाही.
सरोज-"पण तुम्ही काही चूक केली नाही ,आईने मला सांगितल होत बाळ होण्यासाठी असा त्रास सहन करावा लागतो "
रमेश तिच्या कडे पाहातच राहतो.
ती त्याला म्हणते सोफ्यावर झोपण्या ऐवजी तुम्ही इथे बेडवर झोपू शकता,तो म्हणतो,नाही मी इथेच ठिक आहे,असं म्हणून दोघेही झोपतात.दुस-या दिवशी नाष्टा करताना नेहा रमेशला सांगते ,की तू माझी शेवटची इच्छा पूर्ण कर ,मी परत तुझ्या कडे कोणत्याही गोष्टीची मागणी करणार नाही.
रमेश तिच्या कडे पाहत विचारतो ,आता अजून काय करायला लावणार आहे.
नेहा बोलते ,काल तुझ्या मते तुझ्याकडून जी चूक झाली ,ती बाळ होइस्तोवर कर ,त्यानंतर तुझी इच्छा जे करायचं ते करु शकतोस ,मलाही बाळाच सुख अनुभवायचं आहे आणि सरोजलाही बाळ हवयं,तुला नाही वाटत का आपल्याला मुल असावं.
बाळ आल्यावर आपलं घर गोकुळ होईल,मी त्याची आई यशोदा ,त्याच्या बाळ लीला पाहताना आपण हे सारं विसरूनही जाऊ,त्याचे लाड पुरवू.
तो काहीही न बोलता निघून जातो , तो असाच एकटा बसलेला असतो तेव्हा विचार करतो ,दोघींना मुल हवयं,मला पण बाप व्हावस वाटतं पण आपण काही तरी चुकीचं करतोय असं वाटतं राहत.
असेच दिवसा मागून दिवस जात असतात, सहा महिने होतात पण तरीही सरोज कडून कोणत्याही प्रकारची गुड न्यूज मिळत नाही, रमेश स्वत:ला चेक करून घ्यायचं ठरवतो,त्याचे रिपोर्ट येतात आणि डॉक्टर त्याला सांगतात की ,तो बाप होवू शकत नाही,हे ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसला होता,तो तिथून निघतो,तेव्हा त्याच्या डोक्यात विचार येत असतो ,नेहाचा प्रोब्लेम आहे हे समजल्यावर आपण स्वत: बद्दल काहीच विचार केला नाही,दोघींनाही बाळाची आशा लागली आहे त्यांना कसं सांगणार ,आता सध्या तरी कुणाला काही नको सांगायला.वेळ बघून सांगता येईल. तो घरी आला ,नेहाने विचारले ,खुप काम होतं का आज ,थकल्या सारखा दिसतोय,तो हो म्हणाला आणि रूम मध्ये गेला. फ्रेश होऊन येईल असं नेहा विचार करत चहा करते, अजून आला नाही बघायला जाते तर तो डोळे मिटून बसला होता.
नेहा-"काय रे बरं नाही वाटत का,डॉक्टर कडे जावून येऊ"
रमेश-"नाही ग,थोड थकलोय म्हणून ,बाकी काही नाही "
नेहा-"मग चहा प्यायला येतोस की आणू इकडे "
रमेश-"चालेल, इथच दे आणून "
ती गेल्यावर तो रिपोर्ट कपाटात ठेवतो आणि विचार करतो,योग्य वेळ आल्यावर सांगेल.
नेहा चहा घेऊन येते आणि त्याला विचारते -"डोक दाबून देऊ का?"
रमेश-"थोडा आराम केला की बरं वाटेल"
नेहा-"ठिक आहे,जेवायला तरी ये"
रमेश-"हो येतो"
जेवतानाही रमेश शांत शांत होता ,नेहाला वाटले ,आधीच त्याला बरं नाही वाटत कशाला विचारायच परत एकदा.
जेवल्यानंतर तो म्हणतो,मी जाऊन झोपतो. सगळं आवरून नेहा येते ,तर त्याने डोळे झाकलेले असतात ,तिला वाटतं झोप लागली असेल म्हणून तीही लाईट बंद करुन शेजारी झोपते.
रमेश जागाच असतो त्याला रात्रभर झोप लागत नाही,त्याच मन त्याला खात होतं.
कधीतरी रात्री उशीरा त्याला झोप लागली,मग सकाळी उशीराच जाग आली,उठून रेडी होवून तो बाहेर जातो,नेहा नाष्टा देते आणि बोलते-"बरं नसेल वाटत तर सुट्टी टाक ,डॉक्टर कडे जावून येऊ"
रमेश-"जातो ,नाही बरं वाटलं तर संध्याकाळी जाऊ"
नेहा-"ठिक आहे "
रमेश ऑफिसला जातो तो परत घरी कधीही न परतण्यासाठी,ऑफिस मध्ये गेल्यावर त्याच्या छातीत अचानक कळ आली , घामाघुम झाला त्याच्या तोंडातून आवजही निघेना ,तो तसाच खाली कोसळला,आवाज झाला म्हणून आजुबाजूला असलेल्या लोकांच्या लक्षात आलं,त्यांनी त्याला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये भरती केले,पण उशीर झाला होता,हार्ट अटैक इतक्या जोरात होता की हॉस्पिटल मध्ये पोहोचताच त्याचे हार्ट बिट्स बंद झाले, ऑफिस मधल्या लोकांनी नेहाला फोन करून सांगितलं,तिला तर काही कळतच नव्हते तिने फक्त स्वातीला या गोष्टीची कल्पना दिली ,सरोजला घेतले ,दोघी हॉस्पिटलला गेल्यावर कळाले की तो आता आपल्यात नाही,नेहाला धक्काच बसला ,ती मटकन खाली बसली,त्याच्या ऑफिस मधला एक मित्र बोलला ,घरी फोन करुन सांगा म्हणजे ते लोक वेळेत येतील ,तेव्हा तिने दिरांंना फोन करून सांगितलं, त्यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला,सगळे गावावरून आले ,तोपर्यंत बॉडी हातात मिळाली होती,नेहा बरोबर रमेशचे ऑफिसचे मित्र होते म्हणून सगळ्या हॉस्पिटलच्या फॉर्मलीटीज पूर्ण केल्या आणि बॉडी घरी आणली.
सगळे विधी पूर्ण झाले,पुढचे विधी गावी करणार म्हणून दोघीही सगळ्यां बरोबर गावी गेल्या , सगळे विधी पूर्ण झाल्यावर सासू सासरे बोलले आता इथेच रहा दोघी ,तिथे तुमच्या सोबतीला कोणी नाही.
नेहा-"असं अचानक निघून आल्यामुळे घरात सगळं तसचं आहे , जाऊन बघतो आणि तसं काही वाटलं तर गावी येऊ"
सासरे -"ते पण बरोबर आहे म्हणा , रमेशचा मित्र पी एफ आणि पॉलिसी बद्दल काही म्हणत होता ,तेही बघा ,तेवढाच तुम्हाला दोघींना आधार,पाहिजे तर आम्ही एखादी चक्कर मारु आठ दिवसांनी."
नेहा-" हो, पण आता त्याबद्दल काही वाटत नाही जर आपलं माणूसचं या जगात नसेल तर बाकी सगळ्या गोष्टी निरर्थक वाटतात"
सासरे-"तुझं खरं आहे पोरी ,पण आता तुम्ही दोघी एकमेकींसाठी जगा"
नेहा आणि सरोज परत घरी येतात , त्यांच्या बरोबर नेहाचे आईवडील आणि सरोजची आई पण असते ,घर पाहुन दोघींनाही खूप भरुन येते,एकमेकिंच्या गळ्यात पडून मनसोक्त रडून घेतात, आईवडीलांनाही भरून येत.
प्रत्येक वस्तूत त्याच्या आठवणी असतात. त्या इकडे आल्यावर भेटायला येना-या लोकांची रांगच लागते, नेहाच्या ऑफिस मधले ,सरोजच्या शाळेतले -इतक्या दिवसांत सरोजनी सगळ शिकुन घेतले होते आणि आता ती तिथे शिकवायला जात होती.
असेच आठ दिवस निघून गेले आणि नेहाने सहजच आठवण आली म्हणून कपाट उघडलं तर त्यात तिला रिपोर्ट असलेला लिफाफा दिसला,तिने उघडून पाहिल्यानंतर तिच्या लक्षात आलं की रमेश का अस्वस्थ होता ,तिने ते रिपोर्ट फाडले आणि फ्लश केले,जी व्यक्ती ह्यात नव्हती आता तिच्या बद्दल कुणाला काही सांगून उपयोगही नव्हता.
नेहाचे आईवडील त्यांच्या घरी गेले,सरोजची आई मात्र काही दिवस राहणार होती. नेहाला पॉलिसी आणि पी एफ चे जे पैसे मिळाले त्यातून तिने घराचे कर्ज फेडले आणि निम्मे निम्मे पैसे दोघींच्या नावावर फिक्स डीपॉझिट मध्ये टाकले आणि सरोजच्या आईला सगळे कागदपत्र ही दाखवले.
सरोजची आई नेहाला म्हणाली-"हे सगळं दाखवण्याची काही गरज नव्हती,मला माहित आहे की तू सरोजला कधीच एकटीला सोडणार नाही "
नेहा-"जो पर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत सरोज ही माझी जबाबदारी आहे आणि मला जर अचानक काही झालं तर म्हणून हे सगळं, कुणाचा काहीही भरवसा नाही देता येत"
सरोजची आई-"असं काही बोलू नकोस,देवा आमच्या दोन्ही पोरींना आनंदात ठेव " असं म्हणून हात जोडते.
नेहा-"तसं तुमच्या सर्वांचे आशिर्वाद आमच्या पाठी आहेतच ना"
सास-यांचा गावावरुन फोन येतो ,की गावाला या ,त्यावर नेहा त्यांना समजावून सांगते ,माझा इथे जॉब आहे आणि सरोजही शाळेत शिकवायला जाते,इथे आमचा दोघींचा वेळ जाईल,गावाला येवून तरी आम्ही काय करणार ,तुम्हीच येत जा अधून मधून आम्हाला भेटायला आणि राहायला ,आम्हालाही बरे वाटेल,दोघीही आता परत कामावर जायला लागल्या होत्या,तरीही त्यांचे मन मात्र लागत नव्हते.
एक दिवस असचं नेहा रमेशच्या आठवणी सरोजला सांगत होती,तेव्हा तिला अनाथ आश्रमाचा किस्सा आठवला, आणि माहित नाही,तिला असं वाटलं की ,आपण तिथे एकदा जावून यावं.तिला वात्सल्य मधील जुई डोळ्यासमोर उभी राहते. तिला गलबलून येतं,ती सरोजला म्हणते ,की या रविवारी मी तुला फिरायला घेऊन जाईन .
सरोज रविवारची वाट पाहत असते, दोघी तयार होवून बाहेर पडतात,रिक्षा वात्सल्यच्या गेट जवळ थांबते,दोघी उतरून आत ऑफिस मध्ये जातात, विनायक नेहाला ओळखतो,तुम्ही परत आलाच नाही.
नेहा जे जे झालं ते सगळं त्यांना सांगते,विनायक म्हणतो,सगळं ऐकून खूप वाईट वाटलं, पण मी आता तुमची काय मदत करु शकतो.
नेहा-"तुम्हांला आठवतंय का , आम्ही आलेलो तेव्हा जुई होती ,मला तिला भेटायचं आहे की तिला कुणी दत्तक तर नाही घेतलं ना"
विनायक-"ओह जुई का नाही नाही ,पण ती कुणाला आता भेटत ही नाही"
नेहा-" तुम्ही जे त्यावेळी कागदपत्र सांगितले होते,ते आणले आहेत,एकदा बघा ,रमेशची तिला दत्तक घेण्याची खूप इच्छा होती आणि आम्हा दोघीं कडे सगळं आहे पण जगण्यासाठी काही उद्दीष्ट नाही,तिला दत्तक घेतले तर आमच्या जीवनाला एक नवीन पालवी फुटेल"
विनायक सगळी कागदपत्रे बघतो ,सगळी असतात -"आपल्याला काही न्यायालयात जाऊन कायदेशीर कारवाई करावी लागेल मग तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता."
नेहा-"तुम्ही सांगा कधी करायचं त्या नुसार आम्ही येऊ आणि मग जुईला घेऊन जाऊ,जाण्याआधी आम्ही तिला दूरून तरी पाहू शकतो का ?"
विनायक -"हो हो,का नाही"
नेहा सरोजला हात करुन जुई दाखवते आणि सांगते-"आपली मुलगी ,कशी आहे?"
सरोज-"एकदम छान "
दोघीही समाधानाने घरी जातात ,त्याच आठवड्यात सगळी कायदेशीर कागदपत्रे पूर्ण करुन जुईला घरी घेऊन येतात.
तिच छान स्वागत करतात,तिची रूम छान सजवलेली असते,ते पाहून जुई खूप खुश होते,ती नेहाला "थैंक यू आई म्हणते आणि हिला काय म्हणू ?"
नेहा-"तिला मम्मी म्हटलं तरी चालेल किंवा आई म्हटलं तरी चालेल"
सरोजला ती मम्मी म्हणून बिलगते आणि नंतर नेहाला ,दोघींच्या डोळ्यांत पाणी आलं,तसं जुई बोलते -"मला भूक लागली आहे " तसं त्या नॉर्मल आहे असं दाखवत जेवण वाढायला घेतात,तिला आणायला जाण्या आधीच विनायकला विचारून तिचे आवडीचे सगळे पदार्थ बनवले असतात.
ती सगळे आवडीचे पदार्थ पाहून खूश होते,तिघी हसत हसत जेवत असतात, तिच्या येण्याने घराला घरपण आलेल असतं आणि त्यांच्या जगण्याला ही कारण मिळालं होतं ,त्यांना तिघींना असं जेवताना बघून रमेश मात्र फोटोतं हसत होता, नेहाच्ं लक्ष फोटो कडे जाताच तो त्यांना पाहून हसत आहे असा तिला भास झाला आणि ती मनातल्या मनात हसली.
आता त्या दोघी आणि जुई असं त्यांच तिघींच विश्व होत ज्यात त्या रममाण झाल्या आहेत आणि तिघी एकमेकींसाठी जगत आहेत.
दरम्यानच्या काळात त्यांचे सासू सासरे दोघेही येवून गेले,तेव्हा त्यांनी कोण कुठली मुलगी तिला दत्तक घेण्या ऐवजी दिराच्या मुलाला दत्तक घ्या म्हणून सांगितलं,पण त्या दोघी आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या ,त्यांनी त्यांना रमेशची इच्छा होती,असे सांगितल्यावर सासू सासरे काही बोलले नाही.
जुई दोघींच्या आयुष्यात आल्यामुळे दोघींना जगण्याची एक नवीन उभारी मिळाली होती आणि जुईला हक्काच घर मिळाल.
समाप्त.
वाचकांशी हितगूज: ही कथा लिहिण्याचा उद्देश हाच आहे की,आपल्याला असे वाटते की ,समाज सुधारला आहे ,पण अशा काही घट्ना पाहिल्या की,मन सुन्न होतं,असं वाटतं ,समाज सुशीक्षित अडाणी आहे.कोणत्याही संसारात दोन जण असतील तर संसार सुखाचा होतो तिघे झाले की तिथे सगळ्यांचीच फरपट होते.कितीही स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी केल्या तरी एखाद्या जोडप्यास जर मुल होत नसेल ,तर त्यासाठी स्त्रीलाच जबाबदार ठरविले जाते आणि हे ठरवणारी ही एक स्त्रीच असते ही त्याहून जास्त वाईट गोष्ट आहे ,त्या स्त्रीला वांझोटी म्हटले जाते,तिला नेहमी कोणत्याही चांगल्या कामाच्या ठिकाणी चांगली वागणूक मिळत नाही . जुन्या काळात जर पहिल्या बायकोला मुल झाले नाही तर दुसरी बायको सर्रास करुन देत,तिथे पुरुषा मध्ये कधी दोष नसतो तर नेहमी स्त्री मधेच असतो असं आपला समाज समजतो. हे कुठंतरी थांबल पाहिजे ,बदललं पाहिजे ,शारीरिक दोष हा कुणातही असू शकतो आणि ही गोष्ट आपल्या हातात नसते हे दुस-याने समजून घेतले पाहिजे आणि दत्तक घेऊन एखाद्या अनाथ मुलाचे भविष्य घडविले पाहिजे. मुल जन्माला घालणं हा पुरुषार्थ नसुन पतीने पत्नीला सगळ्या प्रकारची साथ देऊन संसाराची नौका किना-याला लावायची असते तो खरा पुरुषार्थ.
तुम्हांला ही कथा कशी वाट्ली त्याचा अभिप्राय नक्की द्या आणि वाचत राहा ,आनंदात राहा.
तुमच्या भरभरून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
रुपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा