सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 18

Womens are emotional fools

सवत-एक सामाजिक व्यथा-भाग 18

दुस-या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे नेहा सरोजला सोडते आणि पुढे हॉस्पिटलला जाते. इकडे साक्षी सरोजला सांगते ,तिने तिच्या आईला विचारलं तर तिच्या आईने सांगितल की ,दोन बायका असल्या की त्यांना सवत म्हणतात,आणि त्या एकमेकींशी खूप वाईट वागतात ,पण नेहा ताई तर तुझी खूप काळजी घेते,आई असही सांगत होती की गावाकडे जर कुणाला मुल नाही झाल तरी तिला सवत आणतात.तुझ्या नेहा ताईला मूल नाही आहे ना ,म्हणून एखाद्या वेळी तुझ्याशी लग्न केलं असेल.

सरोज-"नाही ग,आम्हाला दोघींना एकत्र राहायचं होतं म्हणून लग्न केलं,पण आईने नेहाताईच्या घरी येताना हेही सांगितले होते की,बाळ होण्यासाठी नवरा थोडा त्रास देतो ,पण रमेशने मला  आतापर्यंत कधीही त्रास दिला नाही,उलट काळजी घेतात माझी"

साक्षी-"जाऊ दे तू आनंदात आहेस ना,मग झालं तर ,आपण आज रमेशला देण्यासाठी कार्ड बनवू "

सरोज-"हो चालेल,तो बघून खुश होईल "

आणि त्या कार्ड बनवतात ,पण दिवसभर सरोजच्या डोक्यात विचार घोळत असतात,तिला सगळं नेहा ताईला विचारायच्ं होत,त्यामूळे कधी एकदा ताई घ्यायला येईल आणि मी तिच्याशी बोलेल असं तिला झालं होतं.

एकदाचे सहा वाजतात, सरोजच सगळं लक्ष दरवाजाकडे असतं आणि तिला नेहा ताई दिसते ,तर तिला बरं वाटतं, आज रमेशला ऑफिस मध्ये काम होतं म्हणून तो येणार नव्हता ,मग या दोघी रिक्षानेच घरी गेल्या, चहा पिताना नेहाला असं वाटल्ं की सरोजला काही तरी बोलायचं आहे.

नेहा-"सरोज तुला काही सांगायचं आहे का "

सरोजनी सकाळी तिच्यात आणि साक्षीत झालेलं संभाषण सांगितलं त्यावर नेहाला काय बोलावं ते सुचेना.

तिने दोन मिनीटं विचार करून मग बोलायला सुरुवात केली -"सरोज ही गोष्ट खरी आहे की मला मूल होऊ शकत नाही,पण म्हणून मी तुला लग्न करून आणलं असं नाही,तुझ्या बाबांना असं वाटतं होतं की तुझं लग्न व्हावं त्यांनी खूप प्रयत्न केले,पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही,ज्यावेळी त्यांना माझ्या बद्दल कळाले तेव्हा त्यांनी स्वत:हून माझ्या बाबांना विचारले,तेव्हा मी नाहीच सांगितल होतं , पण तुही माझ्या बरोबर येण्याचा हट्ट करायचीस ,नाही म्हटल्या मुळे तुझ्या बाबांनी टेन्शन घेतलं आणि ते हार्ट एटक नी देवाघरी गेले आणि त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि थोडा माझा स्वार्थ ही होता,कारण सासू बाईंनी मला रमेशच्या दुस-या लग्नासाठी एक महिन्याची मुदत दिली होती नाहीतर जीवाचं काही बरं वाईट करेल असं बोलल्या होत्या ,त्या परिस्थितीत मला जे योग्य वाटलं ते मी केले. मी हे तुला आता सगळं सांगण्याच्ं कारण हे की,बाहेरचे लोक तुझ्या मनात माझ्या बद्दल काही गैरसमज निर्माण होण्यापेक्षा मीच सर्व तुला सांगितले आणि सरोज मी नेहमीच तुला  माझी लहान बहीण समजते,जरी तू माझ्या नव-याची दुसरी बायको असलीस ,तरी तू माझी सवत आहेस असं माझ्या मनात कधीच विचार आला नाही, तुला आनंदी बघून मला आनंद होतो, आपण जे झालं ते बदलू शकत नाही ,पण दोन बहीणी प्रमाणे आनंदात राहू शकतो ,इतके दिवस मी तुला लहान समजत होते ,पण तुमच्या दोघीं मधील संभाषण ऐकून मी तुला जे खरं आहे ते सांगणं योग्य वाटलं आणि बाहेरच्या लोकांकडून चुकीचं समजण्यापेक्षा मीच तुला सांगितल ,हे जे काही आहे ते दोघींच आहे आणि तू सध्या जे वागतीयेस त्या वरून असही वाटलं की तू आता मोठी झाली आहेस मग तू मला नक्कीच समजून घेऊ शकतेस "असं बोलता बोलता नेहाच्या डोळ्यातून पाणी येतं.

सरोज-"ताई मला तुझं मन दुखवायच नव्हतं ग, मला माहित आहे तू माझी किती काळजी घेतेस ते  आणि तू अशी रडू नको ,मला नाही आवडत तू रडलीस की,जाऊ दे मी आता साक्षीशी नाही बोलणार ,तिच्या मुळे मी तुला विचारलं आणि तू रडायला लागली "

नेहा-" असं काही नाही ,तिने जे प्रश्न विचारले ,ते निरागसपणे विचारले,पण एका अर्थी बरच्ं झालं ,तुला सगळं सांगून माझं मन हलकं झालं,तुला काहीही वाटलं तर तू मला बिनधास्त विचारू शकतेस ,आजपासुन आपण नुसत्या बहिणीच नाही तर मैत्रिणी सुध्दा आहोत,हो ना"

सरोज-"मी तुझ्या वर कधीच रागावू शकतं नाही आणि मी तुझ्या पासून काही लपवू शकत नाही "

नेहा आणि सरोज दोघी एकमेकांच्या हातावर टाळी मारतात आणि हसतात.

असेच दिवसामागून दिवस जात होते,सरोज नवनवीन गोष्टी शिकत होती,घरी आल्यावर सगळं जे जे घडलं ते सांगत होती.

एक दिवस सरोज नेहाला म्हणाली,मला रमेशला एक ग्रीटींग द्यायच आहे ,जे मी  स्वत: बनविले आहे ,साक्षीनी मला कसं बनवायच्ं ते सांगितलं.मी त्याला दिलं तर आवडेल का? तो ओरडणार नाही ना?

नेहा-"दे ना ,तू बनवलं म्हणजे छानच असेल,अरे हो तुला एक सांगायच राहिलं,उद्या पासून माझी नाईट शिफ्ट आहे ,तेव्हा व्यवस्थित ऐडजस्ट करशील ना ,मी जेवण बनवून जात जाईन,तू तुला आणि रमेशला वाढून घेत जा आणि दोघे एकमेकांची काळजी घ्या " असं म्हणून ती हसली.

सरोज-"काय तू पण ना ताई ,मी काय त्यांची काळजी घेणार ,तेच किती काळजी घेतात आपली"

नेहा-"हो का? बरं ते जाऊ दे ,मी पटकन पोळ्या करते तोवर रमेश येईल,मग आपण जेवू"

थोड्या वेळाने रमेश घरी येतो ,सरोज ताट आणते ,पाणी आणते मग नेहा जेवण वाढते ,जेवताना रमेश म्हणतो,अरे वा सरोज शाळेत जायला लागल्या पासून तुला मदत करायला लागली आहे ,हे ऐकून सरोज थोडी लाजते. 

नेहा-"हो छान मदत करते ती मला आता ,आता मोठी आणि समंजस सुध्दा झाली आहे,हो की नाही सरोज"

सरोज खाली बघतच मानेनेच होकार देते,तिच्यातला हा बदल नेहाला जाणवतो .

नेहा-"रमेश उद्या पासून माझी नाईट शिफ्ट आहे ,मी सरोजला सगळं सांगितल आहे आणि असही तू आल्यावर मी 8.00वा मी निघेन ,सकाळी 8.00 वा पोहोचेल."

रमेश-"मी रात्री तुला सोडत जाईल"

सगळं आवरल्यावर नेहा पण त्यांच्या रूममध्ये जाते,रमेश वाटच पहात असतो,ती विचारते ,झोपला नाहीस अजून

रमेश-"कसं झोपणार लग्न झाल्यावर पहिल्यांदा असे पंधरा दिवस वेगळे राहाणार आहोत,मी तर विचारच करु शकत नाही "

नेहा-"अरे,असे पटापट दिवस निघून जातील,कळणार पण नाही,तेवढाच तुलाही थोडासा बदल "

रमेश-"मला काही बदल नको आहे आणि बोलण्यात वेळ्ही घालवायचा नाही आहे"

असं म्हणून तो तिला जवळ ओढतो ,तर ती त्याला हळूच त्याच्या कानात बोलते ,दिवसेंदिवस जास्तच चावट होत चालला आहेस,त्यावर तो बोलतो ,बायकोशीच  तर करतोय,त्यात काही चुकीचं नाही,असं म्हणून दोघे एकमेकांत सामावून कधी जातात ते त्यांनाही कळत नाही.

दुस-या दिवशी नेहाला नाईट असते ,म्हणून ती घरीच असते,सरोजला शाळेत सोडून येते आणि तिला सांगते आज लवकर येईल घ्यायला,सरोज ते ऐकून खुश होते. 

नेहा घरी येते ,थोडीशी घरातली एक आठवड्याची कामे उरकते ,नंतर थोडा आराम करते,चार वाजता जाऊन सरोजला घेऊन येते,दोघी चहा घेतात आणि बागेत फिरुन आल्यामुळे सरोज खुश असते.

बागेतून आल्यावर नेहा जेवण बनवते. सगळं किचन आवरते आणि रेडी व्हायला जाते , पण तिला एक हुरहुर जाणवत असते , तिलाही कळत नसतं असं का होतय्ं ,तितक्यात रमेश येतो ,अरे वा रेडी पण झालीस ,चल मी तुला सोडवायला येतो,अस म्हणून दोघेही बाहेर जायला निघतात तर सरोज येते आणि ती म्हणते,मी पण येणार तुला सोडवायला,ठिक आहे ,चल,असं म्हणत तिघेही गाडीत बसतात.

नेहाच्या हॉस्पिटल जवळ गेल्यावर ,नेहा उतरते आणि बाय करुन जायला लागते.

तर सरोज -" मी आज तुला खुप मिस करेन."

नेहा-" होईल  हळू हळू सवय सर्वांनाच" ,असं म्हणून ती निघून जाते.

 रमेश-" चला आपण निघूया"

सरोज-"हम्म"

घरी पोहोचल्यावर रमेश सरोजला बोलतो मी फ्रेश होऊन येतो ,मग जेवू आपण.

तो फ्रेश होऊन येईस्तोवर सरोज जेवण टेबल वर आणून ठेवते आणि ताट,पाण्याची ग्लास सुध्दा आणते.

तेवढ्यात रमेश येतो ,सगळी तयारी झाली पाहून म्हणतो ,अरे वा सगळं रेडी करून ठेवली आहे ,तुझी ताई बोलत होती ते बरोबर आहे की आता सरोज मोठी झाली आहे.

असं म्हणताच सरोज लाजते पण रमेशच्ं तिच्या कडे लक्ष नसतं तो जेवण वाढून घेतो आणि टिव्ही पाहात जेवत असतो ,त्याचं सरोज कडे लक्ष नसतं ,तिला वाटतं तो तिलाही वाढून देईल. थोडया वेळाने त्याच तिच्या कडे लक्ष जातं तो तिला म्हणतो,अग तुलाही घे ना .

सरोज जेवण वाढून घेते आणि जेवत असते ,जेवताना तिला नेहा ताईची आठवण होते कारण ती रोज जेवताना तिला हवं नको ते सगळं पाहायची.

जेवण झाल्यावर ती सगळं व्यवस्थित किचन मध्ये ठेवते,तिचं ठेवून झाल्यावर रमेश तिला विचारतो ,मी सगळं बंद केलं आहे तुला कार्टून पाहायच आहे का,मी चाललो झोपायला,असं म्हणून तो झोपायला निघून जातो.

इकडे सरोजही तिच्या रूम मध्ये येते पण तिला झोप येत नसते ,सारखं देवाच नाव घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत होती ,झोप काही लागत नव्हती ,नेहा ताई शिवाय ती पहिल्यांदाच एकटी घरात होती ,घर तिला खायला उठलं होतं.

इकडे नेहा हॉस्पिटल मध्ये पोहोचली परंतु तिचं सगळं लक्ष घरी होतं,पहिल्यांदाच रमेश आणि सरोज दोघेच फक्त घरात होते,तिच्या मनात विचार आला,काय करत असतील ,करु का फोन त्यांना ,नको डिस्टर्ब कशाला करायचं ,मी तर सगळं स्विकारलं आहे मग तरीही मला का वाईट वाटतय,असा विचार करत असताना तिचा फोन वाजतो,पाहते तर रमेशचा फोन असतो,ती उचलते 

नेहा-"झोपला नाही अजून "

रमेश-" तू काय करते "

नेहा -"काही नाही आता राऊंड मारुन येते आणि जर रात्री कुणी पेशंट आला तर बिझी नाही तर थोडीशी डुलकी काढू शकते,तसं आज स्वातीचीही नाईट आहे ,ते एक बरं झालं "

रमेश-"तू नाही आहेस तर झोप नाही लागत"

नेहा-"बरं बरं,सरोज झोपली का ,तिला एकदा बघून ये ,तिला एकटीला भिती वाटते,नाहीतर तिकडेच झोप"

रमेश-"हे काय नवीन , मी बघून येतो पण मी इकडेच झोपणार "

नेहा-"बरं ठीक आहे,पण बघून तरी ये"

रमेश-"लव्ह यू डीअर "

 नेहा-" लव्ह यू टू आणि गुड नाईट"

असं म्हणून फोन ठेवला. इकडे रमेश सरोजच्या रूममध्ये जातो ,तर त्याला रडण्याचा आवाज येतो. तो जवळ जाऊन सरोजला हाक मारतो ,ती डोळे पुसत पुसत उठते.

सरोज-"काय झालं"

रमेश-"मला काही नाही झालं ,तुच का रडत आहेस"

सरोज-"मला नेहा ताईची आठवण येत आहे आणि झोप पण नाही येत म्हणून "

रमेश-" ठिक आहे ,मी झोपतो इकडे सोफ्यावर मग तर तुला झोप येईल ना"

सरोज-"हं ,प्रयत्न करते"

कुणी तरी आपल्या बरोबर आहे या जाणिवेनी तिला झोप लागली,रमेशचाही तिथेच पडल्या पडल्या डोळा लागला.

इकडे नेहाच काम उरकल्यामुळे ती स्वाती कडे गेली आणि विचारलं,कॉफी घेणार का.

ती हो म्हणाली ,तसं दोघीं साठी कॉफी घेऊन आली .

स्वाती-"आज तू अस्वस्थ वाटत आहेस?"

नेहा-"नाही ग,असं काही नाही "

स्वाती-"मी तुला चांगलीओळखते ,नककीच काहितरी बिनसल आहे,रमेश बरोबर भांडण झालं का ?"

नेहा-"तो सगळचं माझ्या मना प्रमाणे करतो तर त्याच्याशी काय भांडणार, अगं पहिल्यांदाच दोघेच घरात आहे ना ,म्हणून मन नाही लागत कशात,दुसरं काही नाही "

स्वाती-"मी समजू शकते तुझ्या भावना आपल्या नव-याला  दुस-या स्त्री बरोबर नाही पाहू शकत जरी ती कुणीही असली तरी ,पण मला हे सांगताना खुप दु:ख तू स्वत:हून ओढून घेतले आहे."

नेहा-"मी तुला सगळं सांगितल तरी तुला असचं वाटतं,जाऊ दे तुला नाही कळणार माझी काय परिस्थिती होती आणि  मला निर्णय घेताना किती त्रास झाला होता,मला वाटलं निदान तू तरी मला समजून घेशील, जावे ज्याच्या वंशा तेव्हाची कळे उगाच नाही म्हणत"असं बोलून जायला लागते.

स्वाती तिचा हात धरून बसवते.

स्वाती-"समजू शकते, पण सरोजला न्याय देण्याचाही तुझाच अट्टाहास,मग स्व:ताला त्रास का करून घेते"

नेहा-"तू बोलते तेही खरंच,मग मला का त्रास होतो आहे,चल आपण टिव्ही पाहू ,म्हणजे मन थोडसं डाईवर्ट होईल".

स्वाती-"ठिक आहे "

असं म्हणून दोघी टिव्ही पाहतात, आज तर काही रमेश आणि सरोज मध्ये झालं नाही ,पण पुढेही असचं राहिल की ते नवरा बायकोच्ं नातं स्विकारतील हे पाहुया पुढच्या भागात...

वाचत रहा ,पुढचा भाग दोन दिवसांनी 

रुपाली थोरात 


 

🎭 Series Post

View all