सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 17

person changes with time

सवत-एक सामाजिक व्यथा-भाग 17

आज सकाळी उठल्यानंतर नेहाला खूप  फ्रेश वाटत होते, कारण तिने परत जॉब करायचा निर्णय घेतला होता.जे झाले ते तर ती बदलू शकत नव्हती , परंतु तिला परत आपण बिझी होणार या गोष्टीचा आनंद होता आणि बिझी असलं की कोण काय म्हणते याचा विचार करायलाही वेळ मिळत नाही.

तिने 11.00 च्या दरम्यान सरांना फोन करुन सांगितल की मी दोन दिवसांनी जॉईन करते.

दोन दिवसात तिने बरीच कामे केली,सरोजला घेऊन शाळेत जाऊन आली ,तिथे तिची सगळ्यांशी ओळख करून दिली,दोन तीन तास तिला सोडून बाकीची काही कामे होती ती पूर्ण केली,सरोजला नवीन मैत्रिणी मिळाल्या म्हणून ती खुश होती, हे पाहुन नेहाला बरं वाटलं ,आतपर्यंत ती कधीच अशी कुठे शाळेत गेली नव्हती,तिथे तिच्याच वयाच्या अजून दोन मुली यायच्या त्यांना वेगवेगळया प्रकारचे  दिवे,आकाश कंदील, ग्रीटिंग बनवायला शिकवायचे, तिथल्या ज्या मुख्य शिक्षिका होत्या त्यांचा मुलगा पण तसाच होता ,म्हणून त्यांनी हा असा खटाटोप सुरु केला होता. त्यांच्याशी चर्चा केल्यावर  नेहाला हे ही कळाल की त्या वस्तू ते विकतात आणि त्यातून या मुलांसाठी रोजगार निर्माण करतात,म्हणजे ते सक्षमही होतात.

शेवटी जॉब वर जॉईन व्हायचा दिवस उगवला, नेहाने पटापट सगळ्यांचे डबे भरले,रमेश तिला सोडवायला येत होता,रस्त्यातच सरोजला सोडून नंतर तो नेहाला सोडून ऑफिसला जाणार होता. 

सरोजला नेहा आत जाऊन सोडून आली, तिथल्या ताई म्हणाल्या ,तुम्ही काही काळजी करू नका तिची ,तसं काही वाटलं तर मी फोन करेल.जवळच तर आहे.

नेहा-"त्यादिवशी छान राहिलेली,आज माहित नाही,पूर्ण दिवस आहे ना"

रमेश-"तू सांगितल आहे ना मग राहील व्यवस्थित,नको काळजी करू "

नेहा-"आज किती दिवसांनी चाललीय,होईल ना रे सगळं ठीक "

रमेश-"अग तू सगळं व्यवस्थितच करते, बेस्ट लक पहिल्या दिवसासाठी "

नेहा-"मी काय परिक्षा द्यायला नाही चालली ,तुझ आपलं काहीतरीच"

रमेश-"परिक्षा नाही पण कामामुळे तरी निदान मला माझी पहिली नेहा परत मिळेल ही अपेक्षा "

नेहा-"चल बाय, भेटू संध्याकाळी "

असं म्हणून ती हॉस्पिटल मध्ये जाते ,ती आत जाईस्तोवर तिच्या पाठमो-या मुर्तीकडे पाहत राहतो,ती दिसेनाशी  झाल्यावर स्वत:शीच हसतो आणि गाडी चालू करून ऑफिसला जातो.

इकडे सरोजला एक नवीन छान मैत्रीण मिळते,तिच नाव साक्षी  ,ती सरोजला ग्रीटिंग कसे करायचे ते शिकवते ,सरोजचा त्यात छान दिवस जातो.

नेहा हॉस्पिटल मध्ये पोहोचते तर तिच्या डेस्क वर बूके ठेवून त्यावर वेलकम बैक असं लिहिलेलं असतं ,ती ते पाहते आणि नेहमी जिथे बसते तिथे बसणार तितक्यात तिला आवाज येतो ,तुम्ही त्या खुर्चीवर असं नाही बसू शकत,चहा पार्टी पाहिजे आम्हाला.

नेहा ते वाक्य ऐकून पहिली थोडी शॉक होते ,पण दुस-या वाक्याला समोर पाहते ,तर आधीचा सगळा स्टाफ समोर उभा असतो आणि ज्योती बोलत असते.

स्वाती-"ती कधीच पार्टीला नाही म्हणत नाही,बंडू जा रे सगळ्यांना चहा सांग,ती जॉईन झाल्याबद्दल माझ्या कडून चहा"

नेहा -"अगं कशाला स्वाती,मी देईन,जा बंडू घेऊन ये चहा"

असं म्हणून बंडू चहा आणायला जातो, हो सांगायला विसरलीच बंडू म्हणजे तिथला  वार्डबॉय ,तो जाता जाता बोलतो,नेहा मैडम तुम्ही परत आल्या तर सगळ्यांना छान वाटलं.

नेहा-"मलाही तुमच्या सगळ्यां बरोबर काम करायला आवडतं ,खरं सांगू घरी बसून खूप बोर झालेली,इथं असलं की कामात वेळ कसा जातो ते कळतच नाही "

तितक्यात बंडू चहा घेऊन येतो,सगळे चहा घेतात आणि आप आपल्या ठिकाणी जाऊन बसतात.

नेहाच्या डेस्क वरिल फोन वाजतो ,सवयी प्रमाणे ती फोन उचलते ,"दिस इज संजीवनी हॉस्पिटल,हाउ कैन आय हेल्प यू"

समोरून आवाज येतो,"इफ आय एम  नॉट रॉन्ग,यू आर नेहा करेक्ट,नाइस टू सी यू आगेन"

नेहा-"थैंक्स,बट आय डीडंट रेकगनाईज यू"

समोरून-"अगं मी डॉ सुमन बोलते,कशी आहेस तू,तुझ्या आवाजावरून ओळखलं,डॉ समीरला सांग ,मी 10.00 ला येते,असही ओटी 10.00 ला सुरु करणार आहे "

नेहा-"चालेल मैडम,मी सांगते सरांना"

सुमन-"तुझा आवाज ऐकून छान वाटलं "

नेहा-"थैंक यू मैडम "

असं म्हणून फोन खाली ठेवते.

त्यानंतर सारखाच अपोइंटमेंट साठी फोन वाजत होता आणि नेहा हसत खेळत सगळ्यांना अपोइंटमेंटची वेळ देत होती,असं करता करता 10.00 कसे वाजले  कळलच्ं नाही ,डॉ समीर आणि सुमन दोघेही आले होते,ऑपरेशन नंतर डॉ समीरची ओपीडी सुरु होणार होती,तो पर्यंत नेहाने चहा घेतला तर तिचा मोबाइल वाजला , रमेशचा फोन होता ,मग कसा चाललाय पाहिला दिवस . नेहा म्हणाली ,असं वाटतच नाही खुप दिवसांनी आलीय,थोडसं इकडचं तिकडचं बोलून फोन ठेवला आणि तिथे स्वाती आली ,तिने पुढील कामाची तिला सगळी कल्पना दिली,त्यावर नेहा म्हणाली ,तुम्ही सगळे आहात तर मला काही काळजी नाही. 

स्वाती-"तसही तुला एकदा समजावल की परत सांगायची गरज पडत नाही ,म्हणून तर सरांनी तुला लगेच जॉईन करायला सांगितलं."

नेहा-"हं ,मी भेटायला आले तर मला लगेच म्हणाले कधी जॉईन करतेस ,मला फक्त पंधरा दिवसाच्या अटीमुळे रमेश ऐकेल का ,ही शंका होती पण त्याने पण होकार दिला"

स्वाती-"देणारच ना ,त्यांना पण दोघांना एकांत मिळेल,त्याने त्याचा स्वार्थ पाहिला ,सगळे पुरुष एक जात सारखेच असतात"

नेहा-"नाही ग ,तो तसा नाही मी तुला जेवताना सांगते सगळं "

स्वाती-"चल ओपिडी चालू व्हायची वेळ झाली,डॉक्टरही येतील आता बाहेर,भेटू जेवायला"

मग ओपिडी सुरु होते आणि संपता संपता 2.30 वाजतात,डॉक्टर घरी गेल्यावर नेहा सुध्दा स्वाती कडे जेवायला जाते . 

स्वाती-"रमेशनी तुझ्यावर अशी काय जादू केली की,त्याने दुसरंं लग्न करूनही तू त्याच्या बाजुने बोलते "

नेहा-" त्याने स्वत: हून नाही केल,मी घर सोडून जायची धमकी दिल्यावर शिवाय त्याच्या अटींवर ,त्याने अजून सरोजला एकदाही हात लावला नाही,म्हणून कधी कधी मला अपराधी वाटते की माझ्यामुळे सरोज वर अन्याय तर होत नाही ना असं कधी कधी वाटतं ."

स्वाती-"तू खरचं ग्रेट आहेस ,असं कधी कुणी स्वत:साठी सवत आणली नसेल"

त्यावर नेहा त्या पाठीमागची सगळी पार्श्वभूमी तिला सांगते,आता तूच सांग मी काही चुकीचं वागले का.

स्वाती-" मी तर हो म्हणेन,स्वत:चा विचार न करता सगळा विचार दुस-यां साठीच केला, ह्या सगळ्या प्रकारात निदान एक गोष्ट चांगली केली ,जॉब वर परत जॉईन तरी झालीस, जर कधी रमेशच्ं मन बदललं आणि त्याने सरोजला स्विकारल तरं तुझं काय होईल "

नेहा-" सगळा विचार करून मी ही नोकरी स्वीकारली,कारण पंधरा दिवस ते दोघेच घरात असतील ,तर रमेश सरोजचा निदान स्विकार तरी करेल,मी घरात असल्यावर तो अपराधी पणाच्या भावनेने तिच्या जवळ जात नसेल,आता मी हे सत्य स्वीकारलं आहे की जसा माझा रमेश वर अधिकार आहे तसाच तिचाही आहे"

नेहा-"मी रमेशलाही सांगितलं आहे ,तुझ्या मनात सरोज बद्दल जर काही आलं तर त्यात गैर काहीच नाही,कारण तीही त्याची बायको आहे,ती अशी आहे म्हणून तिचा  संसार करण्याचा अधिकार मी एक स्त्री या नात्याने काढून घेऊ शकत नाही आणि मी तिच्या बद्दल कधी वाईट विचार सुध्दा मनात आणू शकत नाही,कदाचित त्या दिवशी ज्योती मला अचानक भेटली त्यामागे देवाचा मला मार्ग दाखविणे हा उद्देश असू शकतो,असं समजून जे सुचलं ते केलंं"

स्वाती-"खरचं ग्रेट आहेस तू , स्वत: बरोबर सरोजचाही विचार करत आहेस,नाही तर आता पर्यंत ज्या सवती बघितल्या त्या एकमेकींवर नुसते आरोप प्रत्यारोप करत असतात , तुम्हाला दोघींना देव सुखात ठेवू दे"

नेहा-" तथास्तु " आणि हसतच दोघीही आपआपल्या कामाला लागतात.

नेहा आजच्या सगळ्या एण्ट्री कॉम्प्युटर मध्ये करत असते त्यात वेळ कसा जातो कळतच्ं नाही. सहा वाजता तिचा फोन वाजतो ,पाहते तर रमेशचा असतो , तो तिला विचारतो ,काय मैडम ,आज घरी यायचं नाही का, ती म्हणते,आलेच मी पाच मिनिटांत,असं म्हणून सगळ्या फाईल्स आपल्या जागेवर ठेवते,कॉम्प्युटर शट डाऊन करते आणि स्वातीला बोलते ,निघायचं नाही का,त्यावर स्वाती बोलते,निघतच्ं आहे तू हो पुढे,त्यावर नेहा बाय करते आणि बैग घेऊन खाली येते ,तर समोरच रमेश गाडी घेऊन उभा असतो, ती जाऊन गाडीत बसते.

रमेश-"कसा होता आजचा दिवस"

नेहा-"बिझी होता,पण छान वाटलं "

तितक्यात सरोजची  स्कूल येते ,नेहा उतरुन सरोजला आणायला जाते , तिला यायला थोडा उशीर होतो ,दोघी गाडीत बसल्यावर रमेश विचारतो ,उशीर का झाला . त्यावर सरोज त्याला सांगते की तिथल्या  ताई म्हणत होत्या ,मधून मधून सरोजला तुमची आठवण आली की भरभरून  तुमच्या बद्दल सांगायची ,नाही तर छान राहिली ,मग सरोज उद्या येणार ना परत असं नेहाने तिला विचारलं. त्यावर सरोज म्हणाली ,हो येणार ,मग तिने दिवसभरात जे जे मजा केली ती सगळी गाडीत सांगितली,हे सांगताना ती खुश दिसत होती हे पाहुन नेहालाही बरं वाटलं,तितक्यात घरही आलं, नेहा आणि सरोज उतरून घरात गेल्या आणि रमेश गाडी पार्किंग करायला.

सरोजने तिची डब्याची पिशवी किचन मध्ये जाऊन बेसिन मध्ये डबे ठेऊन घासायला लागली तर नेहा म्हणाली-"मी घासते,राहू दे,तू फ्रेश हो"

सरोज-"नाही मी घासते, माझी मैत्रीण रोज घरी गेल्यावर घासते ,कारण तिची आई जॉब करुन आल्यावर थकते ,म्हणून तिची कामे ती स्वत: करते ,तू पण जॉब वरून आलीस ना म्हणून,झाल की मी जाते फ्रेश व्हायला "

नेहा-"अरे वा! छानच "

सरोज डबे घासून तिच्या रूम मध्ये फ्रेश व्हायला जाते,नेहाही जाते,फ्रेश झाल्यावर मस्तपैकी आल्याचा चहा सगळ्यां साठी ठेवते,तितक्यात रमेशही फ्रेश होऊन येतो ,सरोज मात्र आलेली नसते म्हणून नेहा तिला हाक मारते,तर पाच मिनीटात सरोज येते.

नेहा-"काय करत होतीस,चहा थंड होईल"

सरोज-"काही नाही"

असं म्हणून ती चहा बिस्किट खाते,चहा पिल्यावर सरोज तिच्या रूम मध्ये जाते आणि रमेश तिथेच टिव्ही पाहत बसतो.नेहा तिची जेवण बनवायची तयारी करत असते,जेवण बनवून होते तरी सरोज तिच्या रूम मध्येच असते.

नेहा तिला हाक मारते,तशी ती येते.

नेहा-"अगं,जेवायला चल आणि आज तुला कार्टून नाही बघायचं का"

सरोज विषय टाळण्यासाठी -"भूक लागली आहे,चला लवकर"

तिघे मिळून जेवतात ,नेहमी प्रमाणे नेहाच्ं किचन आवरल्यावर ते बागेत शत पावली करताना,नेहा रमेशला तिचा आल्या नंतरचा डब्याचा किस्सा सांगते आणि बोलते सरोज खुश आहे तरं बरं वाटलं.

रमेश-"आणि तुझं काय?"

नेहा-" मी ही खुश ,नाही तर घरात बसून कंटाळले होते, आज हॉस्पिटल मध्ये वेळ कसा निघून गेला कळलच नाही"

मी जावून सरोजला झोपवून येते ,रूम मध्ये जाते तर सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या असतात आणि सरोज तिला पाहताच काही तरी लपवण्याचा प्रयत्न करते.

नेहा-"अरे वा रूम एकदम छान आवरला आहेस तू आणि हे काय लपवत आहेस"

सरोज-"काही नाही , ते तुझ्या साठी आज ग्रीटींग बनवलं होतं ते आहे"

नेहा-"हो का ,बघू मग"

नेहा ते उघडून पाहते आणि तिला म्हणते ,छान आहे,तू बनविल का?

सरोज मानेनेच हो म्हणते.

नेहा -"आता पंधरा दिवसांनी माझी नाईट शिफ्ट असेल,तर आता तू स्वत: झोपायची सवय लावून घे"

सरोज-"हो माझी मैत्रीण म्हणाली ,आता आपण लहान नाही ,आपली कामे आपण स्वत:ची काम स्वत:च करायची,म्हणून तर रूम पण आवरला,आवडलं का तुला"

नेहा-"तुझी मैत्रीण भारीच हुशार आहे ,काय नाव तिचं"

सरोज-" साक्षी , उद्या तुझी तिच्याशी ओळख करून देईल."

नेहा-"तू झोप आता ,मी जरा वेळ बसते आणि जाते"

सरोज हो म्हणून झोपते. नेहा तोपर्यंत पेपर वाचत बसते,थोड्या वेळाने पाहते ,तर सरोज झोपलेली असते, हे पाहून नेहा तिच्या रूम मध्ये झोपायला जाते.

दुस-या दिवशी सकाळी सरोज नेहाची साक्षीशी ओळख करुन देते - "ताई आहे माझी "

नेहा-"सरोज तुझी खुप तारिफ़ करत असते,तिला सांभाळून घे ,चल येते मी उशीर होतोय मला"

असं म्हणून नेहा जाते.

तिच्या कडे पाहत प्रश्नार्थक नजरेने साक्षी विचारते -"ही तुझी ताई कशी ,हिचे मिस्टर कोण आणि तुझही लग्न झालय मग तुझे मिस्टर कोण"

सरोज-"अगं वेडीच आहेस ,माझे आणि तिचे मिस्टर एकच आहे ,आम्हांला दोघींना एकत्र राहता याव म्हणून तिने माझ तिच्या मिस्टरांशी लग्न करून दिले "

साक्षी-" एक मिस्टर आणि एक मिसेस असचं असतं ,मी पहिल्यांदाच पाहिल की दोन मिसेस आणि एक मिस्टर,मी उद्या आईला विचारून  सांगते,चल मी तुला ग्रीटींग चा दुसरा प्रकार शिकवते."

आणि दोघी ग्रीटींग बनवायला घेतात. सरोज पहिल्यांदाच अशी शाळेच्या निमित्ताने घराबाहेर पडलेली असते,बाहेरच्या जगाशी संपर्क आल्यावर तिच्यात अजून बदल होतील का, काय होईल या सर्व गोष्टिंचा परिणाम,दोघींच एकमेकींवरच प्रेम आबाधित राहिल काय या सगळ्या गोष्टींची उत्तरे पुढच्या भागात....

तुमच्या सर्वांच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

ऑफिसची व घरातली सगळी कामे करून लिहायला थोडा वेळ लागतो पण तरीही नेहमीच एक प्रामाणिक प्रयत्न असतो की निदान दोन दिवसात एक भाग पूर्ण झाला पाहिजे, असाच तुमच्या शुभेच्छा नेहमी बरोबर असू देत.मराठी लिहिताना थोडा जास्त वेळ जातो.

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all