सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 15

women is mystery

सवत-एक सामाजिक व्यथा-भाग 15

मागच्या भागात आपण पाहिले की रमेशच आणि त्याच्या आईचं बोलणं झालं आणि  तो पकडला गेला.

नेहाने रमेशला विचारलं-"आता काय करतील त्या"

रमेश-" मला काय माहित ,माझ्या मनावरील ओझे मात्र कमी झाले"

नेहा-"तू असं कसं बोलू शकतो"

रमेश-"केवळ तुझ्यासाठी मी हे सगळं करत होतो"

नेहा-" तुझं मन तू मोकळं केलं ,आता मी तुला सांगते,मी माझं मन मोकळं करते ,त्यादिवशी रात्री तू मला विचारत  ना,की कुणाचा फोन आला होता,तो तुझ्या आईचा होता आणि त्यांनी मला एक महिन्याची मुदत दिली होती ,तुला लग्नासाठी तयार करण्यासाठी  नाही तर त्या स्वत:चा जीव देतील असं त्या म्हणाल्या होत्या,आता तूच सांग मी काही चुकीचं केलं का"

रमेश-"चल आत्ताच जाऊन विचारू,ती असं कसं करु शकते आणि तू याआधी मला काही बोलली नाही"

नेहा-"नाही नको,मला जर तुमच्या दोघांत अंतर आणायचं असतं तर आधीच सांगितलं असतं,बघू पुढे काय होतय"

दुस-या दिवशी सकाळी वातावरण तसं शांतच होतंं, रमेश ऑफिसला निघून गेला,नेहा किचन मध्ये बाकीची कामे पूर्ण करत होती,तितक्यात सासूबाई पण किचन मध्ये आल्या.

नेहा -"काही हवं आहे का?"

सासू-"जे हवं आहे ते दे, सांगितल्याप्रमाणे केलस्ं पण सगळं अर्धवट "

नेहा-"असं काय कोड्यात बोलताय"

सासू-"तुला खरंच मी काय बोलते ते कळत नाहीये का, की कळत नसल्याच नाटक करत आहेस"

नेहा-"असं नाही आहे , तुम्हांला नातवंड हवं होत ते ट्रिटमेंट नी आज ना उद्या मिळेलच,मग मी तुम्हांला कसं फसवल्ं"

सासू-"केली ना इतके दिवस ट्रिटमेंट ,झाला तिचा काही उपयोग"

नेहा-"थोडा वेळ लागेल,लगेच सगळं काही संपल नाही"

सासू-"मग लग्न करून देण्याची काही गरज नव्हती, असं पैसे खर्च करून अजून चांगल्या मुलीच्या पोटात गर्भ वाढवला  असता, एवढं लग्न करून एक माणूस सांभाळायला आणून ठेवलं ते,मी तयार झाली या लग्नासाठी कारण यातून अर्र

सा-यांचाच हेतू साध्य होत होता,सरोज अशी असल्यामुळे रमेश तुझ्या बरोबरच नेहमी राहणार होता,तुच विचार कर जर तिच्या जागी एखादी दुसरी चांगली मुलगी असती तर तिने तुला रमेश पासून कधीच दूर केलं असतं,इतक्या दिवस शांत बसली नसती,तुम्ही तिच्यावरही अन्यायच करत आहात,लग्नाची बायको आहे ती रमेशची ,तिचा ही हक्क आहेच की त्याच्यावर,आणि  असही तुझ्या संमतीने आणि तू स्वत: त्या दोघांच लग्न लावून दिल आहे ,तर मी जे बोलते त्यात चुकीचं असं काय आहे का"

नेहा-"पण रमेश या गोष्टीला कधीच तयार होणार नाही "

सासू-"लग्नालाही तो होता का तयार ,तू त्याला तयार केलेसच ना ,मग ही गोष्ट ही होऊ शकते "

नेहा-"मी प्रयत्न करेन "

सासू-"तुला वाटतं असेल मी स्वार्थी आहे,आहे मी स्वार्थी,तुला वाटतं असेल मी तुझा काही विचार केला नाही,पण तुझा विचार करूनच सरोजच्या स्थळासाठी हो म्हटले कारण जेव्हा दोन्ही बायका हुशार असतात ,तेव्हा दोघींच्या मध्ये नव-याचेही हाल होतात,दोघीं मध्ये स्पर्धा असते,दोघींनाही आपली मन मारावी लागतात,कोण सगळयात चांगली सून म्हणुनही चढाओढ,बायको म्हणुनही तसचं आणि त्या घरात शांतता उरतच्ं नाही,सरोजची परिस्थिती तुझ्या बाबांनी सांगितल्यावर,मी तयार झाले,कारण इथे सगळ्यांच हित साधलं जात होते."

नेहा-"तुम्ही म्हणताय ते पटतय्ं पण सरोजच्या जागी दुसरी कुणी असती तर मी स्वत:हून रमेशला या नात्यातून मोकळं केलं असतं पण तोही त्याच्या हट्टाला पेटल्यामुळे मला मधला मार्ग काढावा लागला."

सासू-" तू त्यांना दोघांनाच घरात ठेवलं तर ते दोघे एकत्र येऊ शकतात,तू घरात असताना रमेश सरोजचा विचारही करणार नाही, काहितरी कामनिमीत्त घराबाहेर पडलीस ,तर काही तरी होईल "

नेहा-"बघू काय करता येईल "

सासू-"मी तुला सल्ला देण्याचं काम केलं आता तू ठरव काय करायचं आणि कसं करायचं ,मला फक्त तुम्हांला सगळ्यांना आनंदी बघायचय,एकदा का ह्या घरात मुल आलं ना की त्याच करता करता तू हे सार विसरून जाशील,एक बाई म्हणून सांगते,मुल ना खरच देवा घरची फुल असतात,त्यांच्या येण्याने घराला एक घरपण येतं,बघ तुला पटतय , मी काय अडाणी बाई ,तुम्हांला शिकलेल्या लोकांना जास्त कळत आणि हो मी उद्या चाललीय गावाला ,एखाद्या सीरियल मधल्या खाष्ट सासू सारखी तुझ्या नव-याला तुझ्या पासून तोडणार नाही आणि अजून एक सांगू का ,तू सरोजची खरचं एखाद्या बहिणी सारखी काळजी घेते,खूप मोठं मनं लागत त्यासाठी , खुश रहा पोरी"

हे सगळं ऐकून नेहाच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं.

नेहा-"माहित नाही देव सार माझ्या बरोबरच असं का करतोय?"

सासू-"काही गोष्टी आपल्या हातात नसतात ,जे आपल्याला शक्य आहे ते करावं,आता हेच बघ ना जर तुझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी व्यवस्थितअसत्या तर तू चुकून सुध्दा सरोजचा विचार केला नसता ,काही चांगल्या गोष्टी आपल्या हाताने घडायच्या असतात म्हणून काही वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, जे होतं ते भल्यासाठी असा विचार करून पुढे चालत रहायचं हेच तर आयुष्य आहे  आणि मला माहित आहे की,यातून पुढे काही तरी चांगलच्ं असेल"

नेहा आज सासूचं वेगळच रूप पाहत होती.

विषय बदलण्यासाठी सासू म्हणाली ,आता माझ्या पोटात कावळे ओरडायला लागले,चला जेवून घेऊ.

जेवल्यानंतर मस्तपैकी तिघींनी एक मराठी सिनेमा पाहिला,त्यानंतर सरोज मागे लागली म्हणून तिचं कार्टून लावले.

नेहाने संध्याकाळी छान आल्याचा चहा केला,कार्टून पाहून लहान मुलांसारख तिघिही खळखळून हसत होत्या.

तितक्यात रमेश ऑफिस मधून आला आणि तिघींना असं हसताना पाहून त्याला बरं वाटलं,नाहीतर तो ऑफिस मधून येताना विचार करत होता की,रात्रीच्या प्रकारानंतर  ,आज घरातलं वातावरण जरा तंग असेल.

रमेश फ्रेश होऊन येइस्तोवर नेहाने चहा केला, तो ही सगळ्यांसोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसला.

जेवणानंतर आई रमेशला म्हणाली ,उद्या सकाळच्या गाडीने मला बसवून दे,गावी पोरं वाट पहात आहेत,आज सकाळीच फोन आलेला आजी कधी येणार म्हणून.

रमेश-"मला आधी सांगितलं असतं तर ऑफिस मधून येताना काही तरी खायला घेऊन आलो असतो,ठिक आहे ,सकाळी 9.00 च्या गाडीने बसून देतो ,म्हणजे दुकानं पण उघडतील."

नेहमीसारखं नेहाने सरोजला झोपवत असताना ,तिच्या मनात सासूबाई बोलल्या त्या बद्दल तिचे विचार चालू होते.

ती विचार करत होती,खरच जर सरोजच्या जागी दुसरी कुणी असती तर मला रमेशला सोडून जावं लागलं असतं आणि रमेश शिवाय मी जगण्याचा विचारच करू शकत नाही आणि या सगळ्यांत जर एक स्त्री म्हणून विचार केला तर ,लग्न म्हणजे काय नुसत्या भौतिक गरजा पुरवल्या की झालं असं थोडी असं वाटतं,चुकतय्ं का माझं काही मी फक्त स्वत: चाच विचार करत आहे का,जर सरोज माझी खरंच सख्खी बहीण असती तरी मी असचं वागले असते का, किंवा सरोज माझ्या जागी असती आणि मी तिच्या जागी असते तर सरोज म्हणून मी काय विचार केला असता अश्या अनेक प्रश्न तिच्या मनात निर्माण झाले होते .

सरोजला झोपलेलं पाहुन ती त्यांच्या रूममध्ये झोपायला गेली.

रमेश-"मला आज ऑफिस मधून निघाल्यावर वाटलेलं की आता घरातील वातावरण गरम असेल,पण इथे येऊन पहिलं तर सगळं व्यवस्थित,असं कसं झालं"

नेहा-"आज मला तुझ्या आईचं एक वेगळ्च रूप पहायला मिळालं"

रमेश-"असं काय केलं तिने"

नेहा-"ते महत्त्वाचं नाही ,सगळं व्यवस्थित आहे हे महत्त्वाचं "

रमेश-"मला तर तुम्हां बायकांच काहिच कळत नाही,कधी एकमेकांवर आरोप करता ,तर कधी गळाभेट"

नेहा-"जाऊ दे,तू नको विचार करु जास्त ,पेलणार नाही तुझ्या डोक्याला"

रमेश-"काय म्हणालीस ,पेलणार नाही माझ्या डोक्याला,दाखवू का"

असं म्हणत त्याने नेहाला आपल्या मिठीत कैद केले,तीही लाजेने चुरचुर झाली ,तिच्या गालांवर लाली आली आणि हा तर रमेशचा विक पॉइंट आहे,मग काय दोघेही एकमेकांत कधी सामावले ते त्यांच त्यांनाही कळलं नाही.

दुस-या दिवशी सकाळी रमेशने आईला गाडीत बसवून दिलंं,गाडीत बसल्यावर त्याच्या आईने देवाला प्रार्थना केली,देवा सगळ्यांना सुखात ठेव. 

नेहाच्या मनात जे प्रश्न निर्माण झालेले त्याची उत्तरं तिला मिळतील का आणि मिळाल्यावर ती त्यावर काय निर्णय घेईल हे पाहुया पुढच्या भागात....

रुपाली थोरात 


 

🎭 Series Post

View all