Login

सवत ! पार्ट 3 अंतिम भाग

.


माझी सवत बदलली होती. तिच्या मनात माझ्याविषयी द्वेष भरला होता. हे विष सासूबाईंनीच पेरले होते. माझी सवत तिच्या मुलाला माझ्या जवळही फिरकू देत नसत. तिचा ठाम विश्वास होता की मी जादूटोणा करते. तिला कोण सांगावे की नशिबानेच माझ्यावर जादूटोणा करून माझे सुख हिरावून नेले आहे. शेवटी ह्यांची बदली झाली. मला एकटे सोडून सर्वजण दुसऱ्या शहरात राहायला गेले. शेजारी राहणारी एक विधवा मैत्रीण बनली. तिचा नवरा मेला म्हणून ती एकटी आणि मी सवाष्ण असूनही एकटी. माझा नवरा असून नसल्यासारखा. दादाला नवीन पत्नीकडून पुत्ररत्न प्राप्त झाले. खूप वेळा वाटलं निघून जावे माहेरी पण बाप मेल्यावर लेकीचा माहेरावरचा हक्क उरत नाही. वहिनीचे एकदा पत्र आले होते. पोस्टमनकडूनच वाचून घेतले. आईचे दागिने हवेत का विचारत होती. वहिनीचा चांगुलपणा होता तो. पण नवराच जवळ नाही तर कुणासाठी दागिने घालू मी ? मी नकार दिला. माहेरी न जाण्याचे अजून एक कारण होते. वहिनी स्वतःच्या अस्तित्वासाठी सवतीसोबत भांडत होत्या. जिथं वहिनीचे अस्तित्व धोक्यात होते तिथे माझ्या अस्तित्वाचा तर प्रश्नच नव्हता. एवढे मोठे घर मला खायला उठले. एकटेपणा सहन होत नव्हता. माझी एकुलती एक विधवा मैत्रीण गर्भवती झाली. तिचा प्रियकर तिला पोटुशी करून पळून गेला. मला मैत्रिणीच्या नजरेत शारीरिक गरजांची भूक खूप आधीपासूनच दिसत होती. तिचे शरीर बंड करत होते पण ती स्वतःला पूजाअर्चेत व्यस्त करत होती. ती म्हणत होती की शास्त्रांमध्ये लिहिले आहे की विधवांनी हे करावे ते करावे. पण सर्व नियम स्त्रियांसाठीच का ? पुरुषांसाठीच काहीच का नाही ? हे सर्व नीतीनियम जर स्त्रियांकरवे ठरवले गेले असते तर समाज जास्त सुखी असता. असो. नंतर कानावर पडले की तिने स्वतःला जाळून आत्महत्या केली. पण मला समजायचे ते समजले. कदाचित घरच्यांनीच तिला मारले. इंग्रजांनी सतीप्रथेवर बंदी आणली आहे. तिला सती जायचे होते. ईश्वराने तिची ही इच्छा पूर्ण केली. गावातील एका गुंड व्यक्तीची माझ्यावर वाकडी नजर पडली. माझ्या मनात धडकी भरली. एकेरात्री त्याने डाव साधला. माझ्या घरात घुसून माझ्यावर बलात्कार केला.

" तुझा नवरा तुला सोडून गेला. पण मी आहे ना तुला सुख द्यायला. " तो नराधम मला म्हणाला.

मी खूप आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या शारीरिक ताकदीसमोर माझे प्रयत्न कमी पडत होते. रात्रभर त्याने माझ्यावर बलात्कार केला. सकाळी आम्ही दोघेही नग्नावस्थेत असताना माझा पती अचानक घरी आला. त्याला वाटले की आमचे प्रेमप्रकरण सुरू आहे. बलात्कारी ह्यांना ढकलून पळून गेला. मी तावडीत सापडले. माझे पती मला भेटायला आले नव्हते तर कामानिमित्त आले होते. ह्यांनी मला बऱ्याच शिव्या दिल्या. मग चाबकाने मला बडवले. पुन्हा कधीच तोंड नको दाखवू म्हणाला. मला काही बोलता आले नाही. हे निघून गेले. मी ताकद गोळा करत चार पावले चालले. विहीर मला खुणावत होती. मी उडी मारली. काही वेळाने मला मृत्यूने कवटाळले. माझा आत्मा देहरूपी पिंजरा तोडून उडाला. मी उंच झेप मारली आभाळात. या आभाळात मी कुणाची सून , पत्नी , मुलगी , सवत नव्हते. मी स्वतंत्र होते. कुणी मला वांझोटी म्हणून हिणवत नव्हते. कुणी माझ्यावर बलात्कार करत नव्हता. कुणी चाबकाने बडवत नव्हता. मी आत्महत्या केली पण माझी हत्या खूप आधीच झाली. जेव्हा वडिलांनी अपशकुनी ठरवले , पतीने सवत आणली , सासूने छळले आणि शेवटी तो बलात्कार. पण आता मी मुक्त होते.

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

समाप्त

🎭 Series Post

View all