सवत ! पार्ट 2

.


आयुष्य एक कोडे असते. कधीकधी ते सुटते तर कधी कधी सुटत नाही. मलाही माझे कोडे सोडवता येत नव्हते. खरच माझा दोष काय ? मी का शिक्षा भोगत आहे ? सवत आल्यानंतर सर्व अचानक बदलले. ह्यांचे दर्शन फार दुर्लभ होऊ लागले. मला सवय पडली एकटेपणाची. माझी सवत विलक्षण सुंदर होती. मी तिच्यासमोर खूप कुरूप दिसत. सौंदर्यवान माणसांना प्रेमाचे अनेक द्वार सताड उघडे असतात. कुरूप लोकांना प्रेमाचा अधिकार नसतो. सुरुवातीला आमच्यात फक्त अबोला होता. तिच्या नजरेत एक अपराधीपणा दिसत होता. ती स्वतःच्या मर्जीने आलीच नव्हती. बहुधा ती गरीब कुटुंबातील होती. वडिलांना ओझे झाले असावे तिचे. नाहीतर इतकी सुंदर तरुण टवटवीत कन्या कुणी प्रौढ व्यक्तीच्या गळ्यात का बांधेल ? ह्यांचे वय जास्त असल्यामुळे हुंड्याचा खर्च माफ झाला असावा. एकाच घरात राहून फार काळ अबोला धरणे शक्य नव्हते. हळूहळू संवाद घडू लागला. सासूबाई तिच्या मनात माझ्याविषयी विष भरवू लागल्या. मग आमच्यात दुरावा आला तो कायमचा. यांनी माझ्या खोलीकडे पाठ फिरवली होती. वर्षातून एकदा चोळीबांगडी भेटत. माझे वडील देवाला प्रिय झाले. माहेरशी असलेली शेवटची नाळ तुटली. माझी आई विधवा झाली. किती सुंदर दिसायचे दागिने तिच्यावर. बाबा गेले आणि सर्व दागिने उतरवावे लागले. पती निर्वतल्यावर स्त्री वाळलेल्या झाडासारखी होते.
माझ्या सासूबाई पण विधवा होत्या पण आईचे सवाष्ण आणि वैधव्य ही दोन्ही रूपे याची देही याची डोळा पाहिल्याने दुःख अधिक झाले असावे.
वहिनीच्या मनात माझ्याविषयी किंचित का होईना कळवळा दिसत होता. काही दिवस मी तिथेच राहिले. एकदा भिंतीवर लटकलेल्या काही चित्रांवर माझी नजर गेली.

" वहीनी , हे चित्र अगदी हुबेहूब दादाचेच वाटत आहे." मी विचारले.

" अहो नणंदबाई , ते चित्र नाही. त्याला फोटो म्हणतात. एक यंत्र असते त्याने फोटो काढतात. " वहिनीने सांगितले.

" अय्या हो का. हा बाजूला धोती नेसलेला माणूस कोण आहे?" मी विचारले.

" अहो ते खूप मोठे असामी आहेत. बापूजी म्हणतात त्यांना. ते भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार आहेत." वहिनीने सांगितले.

" स्वातंत्र्य म्हणजे ?" मी विचारले.

" म्हणजे भारतावर इंग्रज राज्य नाही करणार. भारतीय राज्य करतील. " वहिनीने सांगितले.

" देश कधीतरी स्वतंत्र होईलही. स्त्री कधी स्वतंत्र होईल ? तिच्या हातापायात रूढी परंपराच्या बेड्या असतात. त्या कोण तोडणार ?" मी मनातल्या मनात म्हणाले.

***

काही वर्षांनी माझ्या दादानेही दुसरे लग्न थाटले. दुर्दैव म्हणजे आईच्या सांगण्यावरून.

" आई , सवतीचे जे हलाहल विष मी प्राशन केले तेच वहिनीला का देत आहेस ?" मी जाब विचारला.

" वंशाच्या दिव्यासाठी. तुझ्या वहिनीला तीन मुली आहेत. म्हणजे तीनवेळा हुंडा द्यावा लागेल. पंडित म्हणाले की तिच्या नशिबी पुत्रयोग नाही. मला वारस हवाय. वारश्यासाठी प्रत्येक स्त्रीला हे सवतरुपी विष प्राशन करावंच लागत. जग तुला वांझोटी म्हणत. तुला मुली जरी झाल्या असत्या तरीही सवत आणलीच असती जावईबापूंनी. " आई म्हणाली.

***

माझ्या सवतीला दिवस गेले. सासूबाई तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत. मलाही आनंद झाला होता. नावाने का होईना त्या कुटुंबाचा मी भाग होते. नाहीतर माझी अवस्था एका मोलकरीणसारखीच होती. सवतीला पुत्ररत्न प्राप्त झाले. सवत तशी मनाने चांगली होती. तिने मला बाळाला लाड करू दिले. पण बाळ अचानक आजारी पडले. सासूबाईंनी मी चेटूक केले असा सर्वत्र बोभाटा केला. सुदैवाने बाळ वाचले. सासूबाई काही दिवसानंतर निर्वतल्या. माझी आईही देवाला प्रिय झाली. दोघींमध्ये एक गोष्ट समान होती की दोघींनीही आपल्या सुनांना सवतीचे दुःख दिले होते.

क्रमश...

🎭 Series Post

View all