सवत ! पार्ट 1

.
स्पर्धा : जलद कथा लेखन
थीम : तिचं आभाळ
कथा : सवत ! पार्ट 1

" मी दुसऱ्या लग्नाचा विचार केला आहे. मुलगीही शोधली आहे. ती मुलगी मला पसंत आहे. "

किती सहजपणे त्यांनी हे उद्गार काढले. असे बोलत होते जसे की घरात एखादी नवीन वस्तू आणत आहेत. ते माझ्या सवतीला घरी आणत होते. आता मला माझ्या पतीला सवतीसोबत वाटायचे होते. ह्यांना रडलेले आवडत नसत. मी हळूच एक हुंदका दिला. त्यांना ऐकू न जावा इतक्या लहान आवाजात. खूप कर्मठ विचारांचे होते आमचे घर. खळखळून हसायला परवानगी नव्हतीच पण मनसोक्तपणे रडताही येत नसत. आमच्या लग्नाला दहा वर्षे झाली. पण घरात पाळणा हलला नाही. सासूबाई रोज तोंडसुख घेत. " पांढऱ्या पायाची " " वांझोटी " अशी अनेक विशेषणे मला रोज लावण्यात येऊ लागली. मला सवय झाली होती त्यांची. भावाला जेव्हा मुलगी झाली तेव्हा त्याने निमंत्रणही पाठवले नाही बारश्याचे. अपशकुन होईल म्हणून. यांनी माझ्यासोबत दहा वर्षे संसार केला हीच खूप मोठी गोष्ट होती. नाहीतर माझ्या एका बहिणीला तर मूल होत नव्हते म्हणून पतीने जिवंत जाळले होते. यांनी कधीच माझ्यावर हात उगारला नाही. तसा कधी प्रसंगच ओढवला नाही. सुरुवातीला हे माझ्या वाटेला फक्त रात्रीच यायचे. त्या काळोखात दोघांचे देहमिलन होत. पण मनोमिलन कधीच नाही झाले. पतीपत्नी फक्त रात्री भेटतात आणि तेही फक्त प्रणय करण्यासाठीच हे मी गृहीत धरून चालले होते. पण नंतर हळूहळू किंचित संवाद होऊ लागला. आमचे हे इंग्रजांच्या विरोधात आहेत. वृत्तपत्रामध्ये त्यांचे लेख छापून येतात. ते मला खूप वाचू वाटतात पण मी पडले अशिक्षित. मी यांच्याकडे एकदा खूप आग्रह केला शिक्षणासाठी पण माझ्या सासूबाई ऐकणार नाहीत म्हणून नकार दिला ह्यांनी मला. यांच्यामते इंग्रजांनी भारतीयांना समान अधिकार दिले पाहिजेत पण यांनी घरात कधी मला समान अधिकार दिला नाही. हक्क आणि अधिकार मागणे सोपे असते पण देणे अवघड. इंग्लंड देश भारताचे शोषण करतो , वरच्या जातीचे लोक खालच्या जातीच्या लोकांचे शोषण करतात , सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे घरात पुरुष स्त्रियांचे शोषण करतात. कधीकधी सासू झाल्यावर स्त्रीही स्त्रीचे शोषण करते. प्रत्येक नात्यात शोषण असते. राजकारण असते. सरकार उगाच बदनाम आहे. जे घराघरात घडते ते देशपातळीवर करतात ते. असो. भाऊबीजेला भावाची ओवाळणी करण्यासाठी गेले. बाबांकडे हा सवतीचा विषय काढला.

" चूक तुझीच आहे. तू मूल देऊ शकली नाही. आता भोग स्वतःच्या कर्माची फळे. तुझी सावली नातीवर पडू नये म्हणून मीच निमंत्रण नाही पाठवले बारश्याचे. " बाबा म्हणाले.

माझा बाप माझी वेदना समजू शकला नाही. त्यालाही मी पांढऱ्या पायाची वाटली. आईला वेदना समजत होती पण ती काही करू शकत नव्हती.

" बाईचा जन्म असाच असतो. पुरुषांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या तर सुखाचा नाहीतर दुःखाचा. " आई म्हणाली.

मी परत सासरी आले. लग्नाची तयारी सुरू झाली. माझे दुर्दैव बघा मीच माझ्या सवतीच्या आगमनाची तयारी करत होते. शेवटी ती आली. सासूबाईंनी मलाच तिला नटवून पतीच्या खोलीत पाठवायला सांगितले. मी तिला नटवून ह्यांच्या खोलीत जी कधीकाळी माझीही होती ( की नव्हतीच ? ) नेऊन सोडले. दार लावले ह्यांनी. मी क्षणभर भिंतीला टेकून उभी होते. क्षणभर मी भूतकाळात गेले. मला माझा तो दिवस आठवला. खूप भीती दाटली होती मनात. चौदा वर्षाची असेल मी. लग्नानंतर काय करतात काय नाही कसलीच कल्पना नव्हती. त्या रात्री ह्यांनी दार लावले. दिवा विझवला. मग झडप घेतली माझ्या नाजूक कोवळ्या अंगावर. खूप ओरडले मी. खूप रडले. पण यांनी तोंड दाबलं. कदाचित प्रणय असाच केला जातो. प्रेम या हिंसेद्वारेच व्यक्त होत असेल. कदाचित पुरुषांना या हिंसेची परवानगी मिळावी म्हणून लग्न ही संस्था उदयास आली असावी आणि वासनेचा पूर कुठेतरी झिरपावा म्हणून वेश्याव्यवसाय उदयाला आला असावा.

" ए पांढऱ्या पायाची , उभी का आहेस ? चेटूक करणारे का त्यांच्या संसारावर ?" सासूबाई म्हणाल्या.

मग मी पदर सावरत माझ्या नवीन खोलीत आले. खोली माझ्यासाठी नवीन असली तरी जुनीच होती. घरातले अडगळ आणि जुने सामान त्या खोलीत ठेवले जात होते. सासूबाईंनी तिथेच माझी व्यवस्था केली. कारण मीही आता अडगळच झाले होते. लग्नाच्या पहिल्या रात्री यांनी दूर जावे असे वाटत होते आणि आज यांनी माझ्या जवळ यावे असे वाटत आहे. माझी सवत प्रणयवेदनेने रडत होती आणि मी माझ्या फुटक्या नशिबावर रडत होते.

क्रमश....

🎭 Series Post

View all