Nov 30, 2021
वैचारिक

सवाष्ण

Read Later
सवाष्ण

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

सवाष्ण!

प्रत्येक विवाहित स्त्री ला या जगातून आपण सवाष्ण जावे असे वाटते. म्हणजे आपण पुण्य केलय असं मानलं जातं. अशी मानसिकता का आणि कशी झाली असावी  याची कल्पना मला नाही . . पण मी माझाच अंदाज लावते. . तो असा की पूर्वी स्त्रियांना सती जावे लागे. . मग त्यांची इच्छा  असो किंवा नसो. 
अन कुणी सती नाही गेली तर त्या काळी विधवांचे जीवन किती त्रासदायक होते हे सांगावयास नको !
कदाचित तेव्हापासूनच नवर्‍याच्या आधी मरण हे पुण्यकर्म वाटायला लागले असेल. .
पण हे सवाष्ण जाणं खरच प्रत्येकवेळी पुण्याचं असतं का?
तर उत्तर नाही असं येईल.

माझी एक जिवलग मैत्रिण  अचानक डिहायड्रेशन  ने गेली. . कळेपर्यंत  उशीर झाला होता. . वय वर्षे ३४!
लहान मुलगी अप्पर के जी मधे होती व मोठी मुलगी सातवी ला!
तिला नेताना सर्व बायका सवाष्ण म्हणून पाया पडत होत्या व मी मात्र तिच्या लहानशा मुलीला कवटाळून आत बसले होते. मला ते सर्व बघवलं गेलं नाही.  अर्धवट संसार टाकून गेली.
आणखी एक मावस  जाऊबाई  आयुष्यभर कष्ट उपसत राहिल्या . जेव्हा मुलं मोठी झाली व सुखाचे दिवस येऊ लागले. . मुलाचं लग्न झालं अन अचानक न्यूमोनिया ने गेल्या. त्यांचाही मळवट भरून सगळे सोपस्कार करून अंतयात्रा काढली गेली.  तिने आयुष्यात खस्ता खाल्ल्या, सुख भोगलच नाही!
आणखी एक मैत्रिण  मागच्या वर्षी कॅन्सर मधून बरी झाल्यावर डिप्रेशन  मुळे गेली.
मुलं लहान अर्धवट संसार . . तिलाही सवाष्ण म्हणून नटवत होते . . ते पाहवलं गेलं  नाही मला !
हो एक वृद्ध काकू सगळ्या जबाबदार्‍या पार पाडून , आनंदात जगून तृप्तीने गेल्या. . त्यांचं मला खरच पुण्य वाटलं होतं .

परवाच या कोरोना संकटात एका परिचित काकूंचा मृत्यु झाला. त्या कोरोनाग्रस्त  होत्या . . मग सवाष्ण जाऊनही त्यांचं दुर्दैव पहा . यातले काहीच सोपस्कार त्यांच्या नशीबी नव्हते. 

एकाचवेळी घरात मुलाला नवर्‍याला व त्यांना कोविड - १९ ने ग्रासले होते. अंत्य संस्काराला परवानगी काढावी लागली. आयुष्यभर जपलेली माणसं खांदा द्यायला पण नाहित हे किती दुर्दैव !

 प्रेताचं बांधलेलं गाठोडं . . . लांबूनच स्वस्थ असलेल्या मुलाने नमस्कार केला , लांबूनच साडी अंगावर फेकली आणि पी पी ई किट घालून अग्नि दिला.  नवर्‍याचा  तर नाइलाज होता . . सगळं फक्त पहात होते. कसलं मरण आलं असा विचार करून दुरूनच  हात जोडले असावेत.

म्हणजे असं संसारसतून उठल्यावर हे सवाष्णीचे सोपस्कार नशीबी नाही की चार मुलं असून एकाने पण प्रेताला कवटाळून आई म्हणून हंबरडा फोडला नाही, ते  भाग्य   नशीबी नाही. मळवट, हळदी कुंकवाचा सडा  किंवा  सुहागिनींचा वेढा नाही , ते शेवटचं नटवणं किंवा दर्शन घेणंही नाही. 

खरच या लॉकडाऊन च्या काळात गेलेल्या लोकांचं हे सामाजिक दुर्दैव आहे कि त्यांना मृत्युनंतरही योग्य तो मान सन्मान मिळू शकला नाही.
प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व  गेली तेव्हा गर्दीही उसळली नाही. घरी सांत्वनेसाठी लोक येऊ शकले नाहित. 

या काळात जन्म होणे , मृत्यु होणे , लग्न ठरणे किंवा कुठला अन्य आजार उद्भवणे .  हे म्हणजे खरच कठिण काम झालेलं अाहे. हा सगळा वाईट अनुभव !
काही दिवसांपूर्वीच  पक्ष- पंधरवडा सुरु झाला तेव्हा एक व्हाट्स अप  पोस्ट वाचली. लेखिका आठवत नाही पण लिहिलं ते योग्यच वाटलं.
त्यात असं होतं की स्त्रियांना मृत्युनंतर केवळ श्राद्धाचाच अधिकार आहे, पक्षाचा नाही. म्हणजे पक्ष पंधरवाड्यामधे केवळ पुरुषांना पिंडदान केलं जातं. जर स्त्री सवाष्ण गेली तरच तिला अविधवा नवमी किंवा अहेव नवमी ला पक्षाचा मान मिळतो. म्हणजे वर्षातून दोनदा जर हा मान हवा असेल तर स्त्रीने सवाष्ण मरायला हवं! हे कोणाच्या हातात आहे?
नवर्‍या अगोदर मरणे किंवा नवर्‍या नंतर मरणे हे स्त्रीच्या हातात अाहे का ?
मग हा भेदभाव का असं त्या लेखात विचारलं होतं. मी अंतर्मुख झाले . . खरच विचारात पडले की हे सगळं काय आहे? म्हणजे या प्रथा व परंपरांमागे नेमका काय विचार किंवा हेतु आहे?
उत्तर नाहीय.पण विचार आहेत.
परवा आमच्या परिचयातल्या काकूंची तब्येत गंभीर आहे त्या आय सी यू त आहेत असा एका मैत्रीणीचा फोन आला. ती आठवणींने भावनिक झाली. मला कितीतरी वर्षांनंतर त्यांच्याबद्दल कळालं अन डायरेक्ट गंभीर आहे असं कळालं. . काय करणार? मग पुन्हा फोन आला की त्यांना डिस्चार्ज झाल्या, घरी त्यांच्या गावी नेतायत. अजूनच काळजी वाटली. मग अर्ध्या तासातच जुन्या मित्र  मैत्रिणीं च्या ग्रुपवर त्यांच्या मुलाचा मेसेज आला की माझ्या मातोश्रींचे आत्ताच निधन झाले .
मी थक्क! पुन्हा मैत्रीणीचे शब्द आठवले. ती म्हणत होती त्या खूप छान आहेत गं स्वभावाने , आयुष्यभर कष्ट उपसले. थकल्या नाहीत सत्तरीपर्यंत !
त्या गेल्यावर विचार केला. कष्ट लेले, अॅक्टिव होत्या , दवाखान्यात नेण्या अगोदरपर्यंत काम करत होत्या.
दोन दिवस आय सी यू. त. व सरळ वैकुंठात. कुणावर भार नाही की शारीरिक व्याधींच्या वेदना नाहित , अंथरुणावर खिळून नाही की दवाखान्यात पडून नाही.
किती छान मरण आलं . मरताना चार मुली व एक मुलगा व नवरा, सगळे जवळच!
मोठ्या मुलीला नातवंड झालेलं पाहिलं अजून काय हवं?
आणि मान मिळवला. . त्या सवाष्ण गेल्या. .शिवाय पक्ष पंधरवाड्यात गेल्या अन सुदैव  म्हणजे अहेव नवमी दिवशीच गेल्या! म्हणजे श्राद्ध व पक्ष एकत्रच!
अभिमान वाटला की काकूंना खूप छान मरण आलं.
खरच मरण यावं तर काकूंसारखच . . .  असं वाटून गेलं मनात!
(हे माझं वैयक्तिक  मत आहे. कुणाला दुखवण्याचा हेतु नाही.)

©®. सौ. स्वाती बालूरकर देशपांडे ,सखी.
दिनांक 23.02.2021

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Swati Balurkar, Sakhi

Hindi teacher in CBSE school

I swati Balurkar, working as Hindi teacher in CBSE school in Aurangabad at present. Having 24 years of experience in teaching. worked 23 years in Hyderabad . 1990-1994 I wrote many stories n poems and got published. After break started writing in July 2018 again. I am published writer on PRATILIPI MARATHI and STORYMORROR.