Login

सौंदर्य संतूर मॉमचे

This is abou how you see beauty of a Woman

सौंदर्य संतूर मॉमचे 
---------------------------------------------

आज देशमुख आज्जी आजोबांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस!!

तसं तर आज्जी आजोबांचं त्या काळातलं लव्ह मॅरेज. आज्जी आजोबा दोघंही काळानुरूप वागणारे. आधुनिक बदल त्यांनी अंगिकारले होते. आज्जी खूप हौशी तर आजोबा मिश्किल !!

मुलांनी मोठ्ठा हॉल बुक केलेला. सगळ्यांना बोलावलेलं आई बाबांच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यासाठी!! .

देशमुख आजोबा तर आज भलतेच खुश होते. त्यांनी नातवंडांना विश्वासात घेऊन मस्त डॉक्युमेंट्री बनवलेली आज्जींसाठी. आज्जींना पहिल्यापासूनच सरप्राईज खूपच आवडतात हे आजोबांना माहित होतं आणि आजोबा नेहमीप्रमाणेच काहीतरी भन्नाट भेट देणार हे आज्जी जाणून होत्या पण आजचं सरप्राईज काही अौरच होतं ज्याचा आज्जींनी कधी विचारही केला नसेल.

कार्यक्रमला सुरूवात झाली. मुलींनी, सूनांनी मिळून दोघांचं छान अौंक्षण केलं. मुलांनी, जावयांनी छान छान भेटवस्तू दिल्या आणि आता कार्यक्रम रंगात आला. आज्जींच्या काही मैत्रिणींनी, बहिणींनी, इतर नातेवाईकांनी आज्जींसाठी काही अभिप्राय लिहून आणले होते, काहींनी कविता केल्या होत्या. नातवंडांनी काही गाणी म्हंटली तर काहींनी नाच केला. एवढा छान सोहळा चालू असूनही आज्जी मात्र बेचैन !! त्यांना वेध लागले होते आजोबांच्या भेटवस्तूचे.

सर्वांचं नाचून, गाणी गाऊन, बोलून झाल्यावर आजोबा उठले आणि त्यांनी प्रोजेक्टरवर आपली डॉक्युमेंट्री प्रकाशित करण्यास सुरूवात केली. डॉक्युमेंट्रीच शीर्षक होतं " सौंदर्य संतूर मॉमचे". शीर्षक वाचूनच आज्जी लाजेने लाल लाल झाल्या. त्यांच्या नजरेतून आजोबांना 'तुमचं आपलं काहीतरीच' ची झलक मिळत होती.

डॉक्युमेंट्री पूर्ण झाल्यावर आजोबा आपल्या मिश्किल स्वभावानुसार बोलू लागले -

" आज ही डॉक्युमेंट्री तुम्ही सर्वांनी पाहिली आणि कदाचित तुमच्या असं मनात आलं असेल काय या म्हातार्‍याला या वयात एवढं काही रोमँटिक सुचतंय वगैरे तर मला काही बोलायचंय या विषयावर.

गेली कित्येक वर्ष आपण सारे ही जाहिरात बघतोय. एखादी तरूणी जी कॉलेज तरूणी वाटते तिला तिचं लेकरू दूरवरून कुठूनतरी पळत येतं आणि आई आई करत घट्ट मिठी मारतं आणि सगळे अचंबित होतात. हा झाला त्या संतूर वाल्यांचा दृष्टीकोन स्त्री च्या किंवा एका आईच्या सौंदर्याकडे बघण्याचा!! ही जाहिरात सर्वांनाच स्त्रीचं वरकरणी सौंदर्य पाहायला शिकविते. पण माझ्या दृष्टीने प्रत्येक स्त्री ही त्या संतूर मॉम सारखी सुंदर आई आहे अगदी या डॉक्युमेंट्रीमधल्या माझ्या सुशीलासारखी.

असं म्हणतात स्त्री ही क्षणभराची पत्नी आणि अनंतकाळची माता असते. जी झटत असते आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी आणि इतर आपण मात्र एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली की लगेच शब्दांचा तोफखाना घेऊन तिच्यासमोर सज्जं होतो. तिने दिवसभर किती कष्ट घेतले याची आपण साधी दखलसुद्धा नाही घेत. ती कितीही थकली तरी हत्तीचं बळ शरीरात आणून ती फक्त झटत असते, झटत असते अाणि झटत असते. ती आई म्हणून तर कधीच रिटायर होत नाही. अगदी मुलांची लग्न झाली, त्यांना मुलं झाली तरिही!! ती तिचं सौंदर्य हे कायम आपल्या कुटुंबाच्या सौंदर्यात, त्यांच्या सुखात शोधत असते. ती फक्त शरीरानेच म्हातारी होते पण मनाने मात्र ती आपल्या पिल्लांसाठी आयुष्यभर चिरतरूणच राहते या संतूर मॉम सारखी. माझी माझ्या मुलांना, जावयांना, नातवंडांना ही नम्र विनंती आहे की अंतर्बाह्य सौंदर्य बघायला शिका ते चिरकालीन असतं !!"

संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमत होता. आयुष्याची पन्नास वर्ष सार्थकी लागल्याचं सुख आज्जींच्या डोळ्यातून अोसंडून वाहात होतं आणि पुन्हा एकदा स्वत:च्या जोडीदाराला त्या नव्याने पहात होत्या.

                                                     - आरती शिरोडकर

                   ********* समाप्त ********

वाचकहो, कथा काल्पनिक आहे पण अंतर्बाह्य सौंदर्याचा विचार नक्की करा. लेख कसा वाटला ते कळवा. आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आपला अभिप्राय माझ्यासाठी महत्वाचा आहे. माझे इतरही लेख, कविता आवडल्यास मला फॉलो नक्की करा. धन्यवाद ????????

PC : Google