सौदामिनी (भाग -४) अंतिम

A simple love story

जलद लेखन कथामालिक‍ा

शीर्षक - सौदामिनी

(भाग -४)

पूर्व सुत्र-

रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर वळत होतो डोळे मिटले की सिनेमासारखी ती सौदामिनिो अन आताची सौदामिनी डोळ्यांसमोर दिसायला लागायची.
तिची अवस्था ही काही माझ्यापेक्षा वेगळी नसणार आहे याची कल्पना मला होती.
पण ते खूप असहाय्य वाटली होती मला , वडिलांशी लढण्याची ताकद तिच्यात नव्हती किंवा मग गावामध्ये राहिल्यामुळे म्हणा किंवा गरीबीमुळे तिचा स्वभाव खूप सहनशील झाला होता.

कथा पुढे -

सौदामिनी (भाग -४) ( अंतिम)

आम्ही मुद्दामच त्यांच्याकडे गेलो होतो असं तिच्या आईच्या लक्षात विशेष आलं नाही पण मला वाटलंच की प्रयत्न करून पाहुयात .

शिवाय ताई पण यावेळी माझ्या बाजूने उतरली होती त्यामुळे विश्वास वाटला.

पुढचं सगळं ठरत होतं.

दुसऱ्या दिवशी ताई आणि भावजी पुन्हा त्यांच्या गावी गेले.

तिच्या आईला विश्वासात घेऊन त्यांनी माझ्याबद्दल सगळी गोष्ट सांगितली आणि त्यांना तालुक्यात मृणालकडे येण्याची विनंती केली.
घरातलं वातावरण बघता तिच्या आईला ते शक्य होईल असं वाटलं नाही त्यामुळे तिने सौदामिनीच्या हाताने एक निरोप मालकीणबाईनं साठी दिला. ताईने सौदामिनीला सुद्धा विश्वासात व जवळ घेवून शांत रहायला सांगितलं.

आम्ही परत आलो खरे पण माझा जीव तिथेच घुटमळत राहिला होता.
संपर्काचं काही साधन नव्हतं.
माझ्या मनातली घालमेल व मानसिक अवस्था तिला कळाली होती आणि तिची मला, इतकंच पुरेसं होतं.

सत्यपरिस्थिती जेव्हा मालकीणबाईं पर्यंत गेली तेव्हा त्या खूपच आनंदल्या.

" ज्योत्स्नाची आई मला तर वाटतंय की आम्ही पुढाकार घेऊन हे लग्न करून द्यावे. परंतु घरामध्ये झालेले वाद आणि सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात त्यावरून वाटतय की थोड्या दिवसात त्यांच्या भावा- बहिणींशी वगैरे बोलून निर्णय घ्यावा. घाई नको."
घर मालकांनीही माझ्या पाठीवर थोपटत कौतुक केले. " आताच्या पिढी कडून हेच अपेक्षित आहे. हुंडा व श्रीमंती न बघता मनाने चांगली व गरजू मुलगी पाहून लग्न केलं तर जीवनाचं सोनं होईल. . पण त्यात कुठेही उपकाराची भावना नको."

"नाही ,नाही अशी भावना नाहिय माझ्या मनात. . मला खरच ती आवडलीय. मी तर तिला . . " मी अडखळलो.

"हो ना आमची मुलगी समजला होतात. हिने सांगितलं मला !" त्या मालकिन वहीनी म्हणाल्या.

" तुमची पुतणी असली तरीही. . मुलगी समजून तुम्हीच थोडा पुढाकार घ्या आता."
ताई थोडी भावनिक होऊन बोलली.

मी शक्यतो माझ्या मनातलं कधी इतकं उघडपणे बोलायचो नाही त्यामुळे यावेळच्या या विषयाला ताईने खूप गंभीरतेने घेतलं होतं.

" ठीक आहे . . अगदी बरोबर. पहाना आमच्या सोनलच्या लग्नाला अजून चार -पाच वर्षे तरी बाकी आहेत म्हणून आम्ही मिनीला आमची मुलगी समजूनच प्रयत्न करू!" वहिनींनी आश्वासन दिलं.

मी ताई व जोत्स्ना सोबत माझ्या गावी परत आलो.
परत आल्यानंतर आईला सगळं व्यवस्थित सांगितलं. कारण मी तिला काहिच कल्पना दिली नव्हती.
आई काही माझ्या निर्णयाच्या विरुद्ध नव्हती फक्त मुलीचा स्वभाव कसा आहे याची तिला शंका होती.
ताईने व मी तिला पटवलं होतं.

तो आठवडा माझ्यासाठी खूप खूप वाईट गेला.
मी अ‍ाता डायरीत लिहिण्या ऐवजी तिला रोज एक पत्र लिहून ठेवायला लागलो. पोस्ट करू शकत नव्हतो. . पण माझ्या मनाला हलकं वाटत होतं. ती पत्र तिला कधी पाठवेन हे मलाही माहीत नव्हतं किंवा तिला प्रत्यक्ष च देईन वाचायला.

आठ दिवस केले आणि पुन्हा शनिवार रविवारी मी ताईकडे आलो.
ठरल्याप्रमाणे ताई ,भाऊजी मी आणि वहिनी- मालक आम्ही त्यांच्या गावी गेलो.
यादरम्यान मालकांनी त्यांच्या दुसऱ्या चुलत व मावस भावांनाही निरोप दिला होता येण्यासाठी.
तिच्या वडिलांना हे सगळं असं अपेक्षित नव्हतं . म्हणजे त्यांच्यासाठी त्यांचं कर्ज फेडण्यासाठीचं माध्यम होती सौदामिनी .

पहिले तर ते तिच्यावरच चिडले की \"तुला तालुक्याला घरी काकाकडे कामासाठी पाठवलं होतं का अशा भानगडी करायला वगैरे !\"
सर्वांनी बसून त्यांना विश्वासात घेवुन सगळी माहिती काढली. त्यांचं कर्ज किती व दबाव किती वगैरे.
त्यांना आमच्या घराची व माझ्या नोकरीची वगैरे माहिती दिली आणि मग मी हुंड्याशिवायच नारळ आणि मुलगी सुद्धा घ्यायला तयार आहे हे पटवलं.

सगळी परिस्थिती समजावल्यानंतर सौदामिनीची आई तिच्यं नावावरचं शेत विकायला तयार झाली.

मी तिथे पोहोचल्यावर ही सगळी बोलणी चालू असताना ताईने आम्हाला दोघांना शेजारच्या घरी बसून बोलण्याची व्यवस्था करून दिली होती.

सौदामिनीला व मला म्हणजे आम्हाला अगदी साध्या पद्धतीनं लग्न करायचं आहे हे ठरलं होतं. आम्हाला दोघांना सारखंच वाटलं याचं खूप आश्चर्य होतं.

आम्ही जेव्हा हे सांगितलं तेव्हा तिच्या वडिलांनाही आनंद झाला. म्हणजे शेताचा थोडा भाग विकूनही त्यांचं कर्ज फिटणार होतं.

पुढे आम्ही तिला शिकवणार आहोत . . हे ताईने सांगितल्यावर तर तिच्या आईच्या मनावरचा जणु सगळाच ताण उतरला.

ताईचे घर मालक, त्यांचे चुलत भाऊ आणि हे मावसभाऊ सावकाराकडे जावून बोलून व समजावून आले. . म्हणजे पुन्हा लग्नामधे विघ्न नको.

या तिघांनी तिच्या आईवडिलांसमोर बसूनच लग्न करण्याचे नियोजन ठरवले.

मला आता कळालं की मागच्या आठवड्यात जातानाच ताईनेमला एक माझ्या आवडीची साडी घेवून ठेव म्हणून सांगितली होती व ती यावेळी घेवून ये असंहिो सांगितलं होतं.

माझ्यावर आज देवाची प्रचंड कृपा असावी.

ताईला देखील माहित नसावं की पहिल्या पगारामध्ये आईला जेव्हा साडी घेतली होती तेव्हा तिच्यासाठी . . सौदामिनी साठी . . बोगनवेलीचा गुलाबी कलर असतो तशी सुंदर साडी घेऊन ठेवली होती.

ताई सकाळी निघाली तेव्हाच त्यांनी फुलांचा गजरा आणि मिठाई व (साखरेचा पुडा) घेतलाच होता, शुभ शकुन म्हणून.

आज मात्र स्वप्नवत गोष्टी घडाव्यात अशा घडल्या.
संध्याकाळ होत आली व सगळ्यांच्या संमतीने आमचं लग्न ठरलं. बोलणं झालं.
लगेचच माझ्या नावाचा साखरपुडा तिच्या ओटीत घेण्यासाठी ताईने तिला बोलावलं.

ती तिच्या आईला विचारत होती . . अशीच येवू की तुझी कुठली साडी नेसू?

ताईने पटकन मी आणलेली साडी तिला कंकू लावून दिली.

आतापर्यंत तिच्या वडिलांनी बर्‍यापैकी मला मान्य केलं होतं. मग माझ्यासारखा सरकारी नोकरीवाला जावई मिळतोय हे लक्षात आल्यावर खुश झाले.


तिच्या आईच्या तर जीवावरचं ओझंच उतरलं होतं .
मोठ्या मुलीचं सगळं ठीक झालं होतं.
सौदामिनी चं कसं होईल अशी काळजी त्यांना होती.
हिचं लग्न झालं तर छोटा शेताचा तुकडा बाकी होता आणि खानावळ. . त्यात दोघे कसेही जगतील. . . त्याची काळजी त्यांना नव्हती.

आणि अशाप्रकारे मला आवडलेली सौदामिनी माझ्या आयुष्यात येण्यासाठी सज्ज झाली होती. ती साडी नेसून आली. तिच्या ओटीत साखरपुडा दिला.
तिच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्यांनी आत जावून जुनी ट्रंक काढली व त्यांच्या वडिलांची आठवण म्ह्मणून ठेवलेली बदाम आकाराची सोन्याची अंगठी काढली व त्यांच्याकडून माझ्या बोटात घातली व तोंडात साखर टाकली.

त्या क्षणीचा आनंद मी शब्दात वर्णु शकत नाही.

मग सर्वांनी आम्हाला दोघांना बाहेर फिरून येण्याची परवानगी दिली. . जवळच्या देवीच्या मंदिरात जावून या . . तोपर्यंत आम्ही पुढचं बोलणं करतो.

इतक्या छोट्याशा गावात हे त्या काळी मी फिरायला निघालो तर सगळ्याच दाराच्या बाहेर येवून लोक बघायला लागले. खूप अवघड वाटलं.
देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन, मंदिराच्या सभामंडपातच खूप वेळ आम्ही दोघेजण बोलत बसलो.

ती इतकी सुंदर दिसत होती. . म्हणजे मनाने निर्धास्त व आनंदी झालेला चेहरा जास्त गुलाबी की तिची साडी असा प्रश्न पडला. तिला तर सारंच स्वप्नवत होतं. . तिने मला दोनदा चिमटा काढला . . हे पाहण्यासाठी की सगळं खरंच घडतय का !

अशी ती डायरीत रेखाटलेली मनातली कल्पना प्रत्यक्षात उतरली होती.

आम्ही परत येईपर्यंत मोठ्या माणसांनी लग्नाची तिथी आणि तारिख व स्थळ ही निश्चित केले होते.

मग पुढं जे झालं ते सगळं रितसर झालं.
गावातच साध्या पद्धतीने ३०-४० माणसांतच आमचा विवाह सोहळा पार पडला.

माझ्या मनात भरलेली सौदामिनी. . आता सौ. सौदामिनी गौरव पाटील झाली होती , त्याचा मला खूप अभिमान आहे. ताई व भावजींनी यात केलेली मदत मी कधीच विसरणार नाही.

या माझ्या या सगळ्या विरहाच्या काळात माझी डायरीच माझी सगळ्यात जवळची मैत्रीण होती. जिच्याशी मी मनातलं सगळं बोलत होतो.

जेव्हा माझ्या आयुष्यात सौदामिनी सारखी साथीदार आली. . तर आता मला डायरीची गरज नाही . . असं वाटलं.

मला काय वाटेल ते मी तिच्याशी बोलू शकतो
सौदामिनीच माझी चालती बोलती डायरी होती आता.

समाप्त
© स्वाती बालूरकर देशपांडे, सखी

दिनांक १९.०१ .२०२१

पुनः  प्रकाशन - ०९. १२. २०२२


(कथा कशी वाटली ते अवश्य प्रतिक्रिया देवून कळवावे. ही एकाच भागाची कथा होती पण केवळ वाचकांच्या आग्रहाखातर मी पुढचे ३ भाग लिहून पूर्ण केली.)


🎭 Series Post

View all