सौदामिनी ( भाग-१)

A simple love story

जलद लेखन - कथामालिका

शीर्षक - सौदामिनी 

(भाग-१)


(ही कथा १९८५-१९९० या दशकातील (काल खंडातील ) आहे , त्यामुळे सहजच मोबाईल किंवा तत्सम गोष्टी कथेत आढळणार नाही. जगण्यातला साधेपणा हाच तेव्हा आयुष्याचा गाभा होता. . तर आशा आहे की कथा तुम्हाला नक्की आवडेल. वाचून प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात. )


सौदामिनी ( भाग -१)

मनातलं काही सांगायला कोणी नसेल तर डायरीच कामी येते. आठवणी शब्दबद्ध झाल्या की त्या नेहमीसाठी राहतात. म्हणून मी खूपदा विशेष प्रसंगी डायरी लिहित असतो. तिथे मी हवं तसं माझं मन रेखाटू शकतो! प्रसंग हवे तसे मांडू शकतो शिवाय मन मोकळं झाल्यासारखं वाटतं ते वेगळंच .
यावेळच्या सुट्ट्यांमधली घटना लिहिण्यासाठी मी डायरी हातात घेतली.

माझ्या शिक्षणातल्या शेवटच्या परीक्षा झालेल्या होत्या .
नोकरीसाठी दोन तीन ठिकाणी अर्ज दिलेले होते.
कंटाळवाण्या उन्हाळ्यात माझं शहरही मला कंटाळवाणं वाटत होतं.
नोकरी लागल्यावर पुन्हा निवांतपणा मिळणारच नाही असं वाटलं . . जरासा बदल म्हणून मी ताईकडे गेलो .
ताईचं गाव मोठं सुंदर ! शेतानी वेढलेलं,डोंगराळ भागातील , लहान इमारतींनी गजबजलेलं, निसर्गाच्या सान्निध्यातील ताईचं शहर पाहून मन माझं मोहून गेलं.
मला पाहून ताईला खूप आनंद झाला. पाय धुण्यास पाणी दिलं.
गप्पा जेवण सारं झाल्यावर भाऊजींनी मोकळ्या अंगणात खाट टाकून दिली.
झोपून तारे पहाण्यांची मजाच और! मी रात्री आकाशात ताऱ्यांकडे पाहात पडून होतो तोच बांगड्यांचा मंजूळ ध्वनी कानी आला.
मी चमकून तिकडे पाहिलं , तर एक पाठमोरी आकृती दिसली.
बहुतेकती भांडी घासत असावी.
मला त्या मुलीबद्दल खूप सहानुभूती वाटली आणि कुतूहलही!
पटापट सगळं आवरून जाता- जाता तिने विचित्र नजरेने माझ्याकडे पाहिलं अर्थात मी जागा आहे याची तिला कल्पना नव्हती.
कारण मी पूर्णतः अंधारात होतो, तिचा चेहरा देखील मला पुसटसा दिसला.
ती गेल्यावर उगाचच मनाला हुरहुर वाटली . . हा वयाचा या वयाचाच परिणाम असावा.
तिचा विचार करताना झोपलो असेन जो पक्ष्यांच्या चिवचिवाटाने जागा झालो.
तेव्हा अचानक माझे लक्ष तिकडे गेले तर पुन्हा तिच पाठमोरी आकृती अंगण झाडत होती.
मी तोंडावर पांघरूण घेतल्याचं सोंग केलं. सडा टाकताना माझ्यावर पाणी उडूनये याची ती काळजी घेत होती.
जाताना पुन्हा एकदा एक विचित्र कटाक्ष टाकून गेली तिचा चेहरा स्पष्टसा मला दिसला नाही पण मी नक्कीच चाळवलो गेलो होतो .
सकाळी घरात चहा घेताना मी ताईला विचारलं, शेजारी कुणी राहतं का गं?
ते आमचे घरमालक राहतात त्या बाजुलाच !
मला लगेचच लक्षात आलं की त्यांची मुलगी असले पाहिजे.
दुपारी जेवण झाल्यावर मी जराशी झोप काढली.
ज्योत्स्ना माझी लहानशी गोड भाची सध्या येथे नसल्याने मला तसं करमत नव्हतं .
सायंकाळी फिरायला गेलो. परत आल्यावर पाहिलं की शेजारच्या अंगणात बायकांचा मुलींचा घोळका बसला होता .
गप्पा रंगल्या होत्या.
मला पाहताच ताई पण उठून आली.
त्या घोळक्यात सकाळची ती मुलगी देखील होती.
दिसायला खरंच ती आकर्षक होती. . स्मार्ट!
तिने पुन्हा विचित्र दृष्टीने माझ्याकडं पाहिलं .
रात्री मी लवकर खाटेवर पडलो होतो व ताईकडून रेडिओ मागून घेतला होता.
सर्वत्र गार आणि शांत वाटतं होतं ! माझ्याही नकळत माझे डोळे तिच्या दाराकडे वळले .
इतक्यात मागच्या दारातून काल प्रमाणेच ती आली. पुन्हा तिच्या बांगडय़ा वाजल्या माझ्याकडे तिरपा कटाक्ष टाकून तिच्या कामाला लागली.
रेडिओवर छान फिल्मी गाणी लागली होती व वातावरण खूप वेगळं झालं होतं.
थोड्या थोड्या वेळानंतर तिच्याकडे पाहताना मला वेगळं सुख मिळत होतं.
एक दोनदा तिची व माझी नजरानजर झाली.
एवढ्यात कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला म्हणून मी रेडिओचा आवाज कमी केला आणि तोंड वळवूण झोपलो.
थोड्यावेळाने हळूच पाहिलं तर आणखी एक मुलगी तिच्या मदतीला आली होती. त्यांच्यात काहीतरी गप्पा चालल्या होत्या.
नक्कीच ती तिची बहीण असणार.
रात्री सगळं शांत झाल्यावर मी पुन्हा रेडियोवर गाणी लावली, माझ्या खाटेवरून त्यांचा व्हरांडा दिसायचा.
त्याला अर्ध्या भिंतीवर जाळी हाेती.
त्या व्हरांड्यात ती झोपली होती , मध्ये एकच भिंत आडवी होती.
ती कदाचित मी लावलेली सगळी गाणी ऐकत ही असेल.
जवळजवळ रात्री एक वाजता मी झोपलो.
मध्यरात्री अचानक मला जाग आली.
पुन्हा झोप येईना म्हणून मी उठून हिंडायला लागलो.
सहज हळूच जाळीतून आत डोकावून पाहिलं, गळ्यापर्यंत पांघरूण घेऊन ती कॉटवर शांत झोपलेली होती.
किती मोहक!
बराच वेळ तिला न्याहाळलं !
पुन्हा जाऊन झोपलो.
कालप्रमाणे आजही पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागा झालो.
सर्वत्र अजूनही अंधारच होता, तांबडं फुटलं होतं, ती अजून उठलेली नसावी कदाचित मीच लवकर उठलो असेन.
मला आीला मदत करण्यासाठी लवकर उठायची सवयच होती.
मी उठून दात ब्रश करत अंगणात चकरा मारत होतो तेवढ्यातच आळस देत तिने दरवाजा उघडला.
मला पाहताच ती वरमली.
त्यानंतर ती तिच्या कामाला लागली व मी माझ्या!
यानंतर चे आठ दिवस हे असंच चाललं.
ती कपडे धुताना, काम करताना, भांडी घासताना, तिच्या बहिणीसोबत फिरायला जाताना. .. . प्रत्येक वेळी मी तिला पाहायचो.

आता मात्र मला हा अबोला असह्य झाला होता.

तिची आणि माझी जन्म जन्मांतराची ओळख आहे असं मला उगाचच वाटायला लागलं.

तिला पाहिल्याशिवाय मला चैन पडायची नाही.

तिच्या बहिणींसोबत बाहेर जाताना ती इतकी सुंदर दिसायची की मी बरंच काही ठरवत राहायचो.

एक दिवस ताईच्या घरमालकांनी मला चहाफराळाला बोलावले.
तिनेच आम्हाला चहा व पोहे आणून दिले.
मी मनात स्वप्न रंगवत होतो. . कांदेपोह्याचे!

मला तिचं नाव जाणून घ्यायचं होतं.
ते अजून कळालंच नव्हतं. . जोत्स्नाही नव्हती ना इथे! माझी भाची.
मी तिलाच विचारावं असं ठरवलं.
तिच्या डोळ्यातही मला माझ्यासाठी आकर्षण दिसत होतं.
आज मला येऊन दहा दिवस झाले होते. नेहमीप्रमाणे मी रेडियोवर गाणी लावून खाटेवर पडलो होतो.
ती नेहमीप्रमाणे भांडी घेऊन आली व मला पाहून गोड हसली!
मी देखील प्रतिसाद दिला.
मग मी हळूच उठलो समोर जाऊन उभा राहिलो.
तिने वर पाहिलं.
"काय चाललंय ?"
"रोजचं काम! दुसरं काय?" ती तुटकच बोलली.
" एक विचारू?"
" हो??"
"तुमचं नाव काय? " मी भीतच विचारलं.

हा पहिलाच अनुभव अनोळखी मुळीशी बोलण्याचा .

"नाव कशाला हवंय?"

"असंच वाटलं माहीत असावं. . म्हणून!"

तिकडून तिची आई आलेली दिसली आणि मी काढता पाय घेतला .

असं दोन- तीन वेळा झालं .

तिचं नाव सांगतानाच नेमकं कुणीतरी यायचं!

आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहोचली.

ताईला सरळच विचारावं तर लाजिरवाणं वाटायचं .

शेवटी एके दिवशी रात्री मी तिच्या समोर उभा राहिलो व म्हटलं. .

"तुझं नाव कळाल्याशिवाय मी येथून हलणार नाही. माझं नाव गौरव , मी नंदाताईंचा भाऊ आहे, आता तुझं नाव सांग!"

ती खाली पाहतच म्हणाली, " मला तुमच्याबद्दल सगळं माहीत आहे. माझं नाव सौदामिनी!"

आणि ती झटकन आत गेली.

मला तिचं वेडच लागलं होतं जणु!

सौदामिनी आठवतच मी झोपी गेलो.

मी इथे येऊन बरेच दिवस उलटले होते.

आज आईचं पत्र आलं होतं.

इंटरव्ह्यूसाठी घरी पत्र आलं होतं .

परत जायचं होतं , ताबडतोब निघणं भाग होतं.

सौदामिनीला सोडून जावंसं वाटत नव्हतं.

मी सामान आवरलं.

दुसर्‍या दिवशी निघण्याची तयारी केली.

रात्री नेहमीप्रमाणे सौदामिनी कामात होती.

मी तिला एवढंच सांगू शकलो की मी उद्या परत जातोय.

तिच्या डोळ्यात एक थेंब चमकल्यासारखा वाटला.

पहाटे उठलो तेव्हा ती बाहेर पायरीवर बसून होती.

मी जवळ गेलो व म्हणालो. . "सौदामिनी काळजी घे. . मी लवकरच परत येईन."

"पण मी . .मला तुम्हाला काही सांगायचे होते ना गौरव. .!" ती एवढीच बोलली की ताईने उठण्यासाठी अावाज दिला.

मी तिला पहातच घरात आलो.

ती किती असहाय्य वाटली!

सर्व आवरून मी घराबाहेर पडलो .

भावजी म्हणाले " मग बोला गौरव लग्नाच्या लाडू कधी खाऊ घालताय?"

"बघू कधी योग आहे "व मी लाजलो.

ताई विचारत होती. ." बोलना रे पुन्हा कधी येणार?"

आईला ते सांग हे सांग सुरू झाल्यावर मी मिश्किल पणे म्हणालो, "आता मी लग्नाचं आमंत्रण द्यायलाच येईन!"

पाहिलं तर ती तिच्या कुटुंबियांसोबत बाहेर उभी हाेती.

जाताना मी सर्वांकडे नजर टाकून मोठय़ाने म्हणालो "बरं! जाऊन येतो !"

क्रमशः 

©® स्वाती  बालूरकर,  सखी

दिनांक  - जानेवारी २०२१

पुनः  प्रकाशन - ९ डिसेंबर  २०२२


🎭 Series Post

View all