Login

सत्यवान- सावित्री: आधुनिक धम्माल

This is just imaginary humorous conversation between people for vatpaurnima.


आज वटपौर्णिमा म्हटल्यावर समस्त महिला वर्ग आवडीने किंवा समाजभयाने आपआपल्या “नवरा सातजन्माचा” योजनेच्या  नुतनीकरणासाठी बाहेर पडतात.

पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी असणारी आधुनिक सावित्री आणि तितकाच आधुनिक सत्यवान यांच्यातल्या लग्नानंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेला आपसूकच घडून येणाऱ्या धम्माल मस्तीचे विनोदी स्वरूप संवाद स्वरूपात पाहूयात. 

सत्यवान: अग,चहा-नाश्ता दे ग.

सावित्री: इकडे बायकोचा उपवास आहे. कोणासाठी? तर नवऱ्यासाठी! आणि नवरा बदल्यात काय बोलतोय? चहा आणि नाश्ता दे. 

सत्यवान: (तोंड पाडून) बरं राहू दे. मी आईला सांगतो.

सावित्री: म्हणजे आजच्या दिवशीही शिव्या खाऊ घालणार न? देते देते. काही गरज नाही तिकडे सांगायची. आणि लवकर काय ते हादडून घ्या आणि तयार व्हा बरं.

सत्यवान: का? आय मीन माझं काय काम आज?

सावित्री: अरे एवढा उपवास धरतेय कोणासाठी? एवढी सजून देवळात जातेय कोणासाठी? तुमच्यासाठीच ना? तुमचं आयुष्य वाढावं म्हणून ना? मग किमान निघायच्या आधी काही फोटो तर काढाल की नाही?

सत्यवान: अरे देवळात जाण्यासाठी मुळात सजून जाण्याची गरज काय? तिथे तर भक्तिभाव असावा लागतो. आपल्या बाह्यरूपाला भुलून जाऊन त्या अनादी शक्तीला शरण जायचं असतं.( कालच आजोबांनी टीव्हीवर लावलेलं प्रवचन योग्य ठिकाणी वापरता येण्याची खुशी काही औरच असते.)

सावित्री: हो का? चालेल हो चालेल. आमच्यात भक्तिभाव नसला तरी चालेल पण स्टेट्स ला फोटो तेवढे हवेत. गपचूप लवकर आवरा. आई तयार होऊन बाहेर येण्याच्या आधी चार-पाच चांगले पिक्स काढा. 

सत्यवान: आलिया भोगासी..

सावित्री: काय? आलिया काय?

सत्यवान: कुठे काय? आलियाची पण पहिली वटपौर्णिमा असेल न?

सावित्री: असेल. ते रणबीर बघून घेईल. तुम्हीं फक्त मला लक्षात ठेवा.

काही वेळ असाच टंगळ-मंगळ करण्यात गेल्यावर अखेरीस भडका उडतोच.

सावित्री: तुम्हीं माझे फोटो काढणार आहात की नाही? एवढा भाव तर माझा भाऊ पण खात नव्हता. काढा ना फोटो. असं काय करता?

एक-दोन फोटो काढून होईपर्यंत  सासूबाई बाहेर आलेल्या असतात.

सासू: चल ग लवकर. नंतर तिकडे बायकांची गर्दी होईल.

सत्यवान: चला चला लवकर चला. 

सावित्री तोंड पाडून नाईलाजाने बाहेर पडते. मंदिरात आत शिरल्या शिरल्या मात्र तिचा चेहरा अगदी आनंदाने खुलतो.

सावित्री: अहो ऐकलं का? जरा इकडे या ना पटकन. तुम्हांला गंम्मत दाखवायची आहे.

सत्यवान: काय ग? (खरंतर गम्मत शब्द ऐकूनच पोटात गोळा आलेला असतो)

सावित्री: बघा, बघा या सगळ्यांकडे बघा. कसे स्वतःहून फोटो काढत आहेत. प्रेम लागतं हो त्यासाठी. कुठे एक क्लिक करायला सांगितलं तर भक्तीभावाची कॅसेट केली प्ले.

सत्यवान: एकच मिनिट थांब बरं. मित्रा, हे फोटो तू स्वतःहून काढतोय का?

खरंतर सत्यवानाला एकाच वेळी अनेकांना विचारायचे असल्याने त्याने मित्रा हा शब्द वापरला होता आणि त्याने अपेक्षित परिणाम साधला होता. एकाच वेळी तीन सत्यवानांच्या माना सत्यवान क्रमांक एक कडे वळल्या होत्या.

सत्यवान २- नाही रे भाई. हिला इंस्टा वर रील बनवायचं आहे. नाहीतर फुगून बसेल.

सत्यवान ३- हा न मित्रा. माझाही तोच इश्यू आहे. हिला तिच्या आईला फोटो पाठवायचे आहेत. व्हाट्सएपच्या स्टेट्सला फोटो हवेत म्हणून मला कामाला लावलंय.

उत्तरे ऐकून सत्यवान १ च्या सावित्रीच्या चेहऱ्यावरचा रंग उडू लागला होता. एकंदरीत वटपौर्णिमा नसती तर त्यावेळेस आम्हां तिघांनाही गंभीर इजा होण्याची दाट शक्यता तिच्या डोळ्यांत दिसत होती.

सत्यवान ४- काय यार तुम्हीं लोक. अरे काढायचे ना पिक्स! त्यात काय एवढं. अरे बायको खुश तर आपण खुश. तुम्ही लोक पण ना यार.

अखेर जे व्हायला नको होतं ते झालंच होतं. सावित्रीच्या चेहऱ्यावरच्या रंगाने विजयाचे रिफिलिंग केलं होतं.

“चला नवीन आलेल्या भगिनींनीं पूजेसाठी बसून घ्या”- भटजींनी आवाज दिला आणि आमचा जीव भांड्यात पडला होता.

आई: अरे गुरुजी पूजेसाठी गूळ खोबरे लागेल बोलतात. तसे ते साखर चालेल बोलतात पण हिची पहिलीच वटपौर्णिमा आहे ना, उगी काही विचित्र नको.

सत्यवान १: काळजी नेमकी तिची आहे की लेकाची?

आई: कार्ट्या, आता घेऊन येतोस का निमूटपणे?

भर उन्हात गूळ-खोबरे आणून आई-साहेबांच्या हाती द्यावा तेवढ्यात वडाच्या झाडाला दोरा गुंडाळणाऱ्या स्रियांना पाहून सत्यवानाचे कुतूहल जागे होते.-‘ आई तुमच्याकडे तर लहानच धागा आहे. सात फेऱ्याला पुरेल का?’

आई: मलाही तिच शंका आहे. आहे का दुकान जवळच?
स्वखुशीने पायावर धोंडा पाडून घेतलेला सत्यवान जे काही चाललं आहे ते आपल्याच साठी अशी समजूत घालून दोरा मिशनवर बाहेर पडला होता. काही अंतराची पायपीट करत ,मिशन पास करत मंदिरात परतताच आईच्या चेहऱ्यावरील केविलवाणा हसू पाहून त्याच्या कानात ‘डेंजर डेंजर’ चा गजर सुरू झाला होता.

आई: बाळा, कापूर लागेल रे आरतीला. तेवढा शेवटचा आण ना.

घामाने डबडबलेले कपाळ रुमालाने पुसत सत्यवान आता कापूर मोहिमेवर निघाला होता. यावेळेस कापूर त्या कपुरासारखा व्हीआयपी असल्याने आजूबाजूच्या दुकानातून कधीच रिकामी झाला होता. काही मिनिटे इकडेतिकडे भटकल्यावर कापूर रत्न प्राप्त झाले तसे ते घेऊन सत्यवान माघारी परतला होता. 

भर उन्हातून तीन फेऱ्या मारल्यानंतरची त्याची घामाघूम अवस्था पाहून मंदिराच्या आवारात पूजा आटपून बसलेल्या सावित्र्याही हळहळ व्यक्त करत होत्या.

इकडे पूजा सुरू झाली होती. सत्यवान ४ अगदीच फॉर्मात होता. मोबाईल स्क्रीनवर पडणारा काळोखही त्याला फोटो काढण्यापासून रोखू शकत नव्हता.

सत्यवान ४- भाई काढ न फोटो. अरे काढ बिनधास्तपणे.
तो मुद्दाम काहीसा जोरात बोलला असं वाटलं कारण एकजात सगळ्या सावित्र्यांच्या माना त्याच्या दिशेने वळल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे कौतुकभाव आम्हांला चिंतेत टाकणारे होते.नेमकं त्याच्याच आईने असं काही तोंड वाकडं केलं की त्याला आपसूक मोबाईल काही वेळ जीन्सच्या खिश्यात म्यान करावा लागला.

आधीच उन्हाने त्रासलेल्या सत्यवान १ च्या डोक्यात रागाची तीव्र सनक पोहचली होती. सत्यवान २ अन ३ हि आता त्याच्यावर चिडले होते. त्याला खाऊ की गिळू भावनेने पाहत असताना सत्यवान १ ने मध्ये पडत त्यांना शांत केलं.

आता लगेच हल्ला करणे योग्य नाही असे मनाशी ठरवत सत्यवान १ आपला मोबाईल काढून त्याच्या सावित्रीचे फोटो टिपू लागला होता. त्याने इशारा करताच सत्यवान २,३ ही परत एकदा फोटो काढण्यात व्यस्त झाले होते. सर्वांना तसं पाहताच सत्यवान ४ ची भीड काहीशी कमी झाली आणि तो पुनः एकदा आपल्या मूळ अंदाजात फोटो काढू लागला होता.

सत्यवान १: मित्रा तुझी बायको कोणती रे यात? (यावेळी आवाज जास्त नसला तरी सावित्र्यांच्या कर्ण रडारापर्यंत पोहचण्यासाठी पुरेसा होता. सगळ्यांच्या माना पुनः एकदा फिरल्या होत्या.)

सत्यवान ४: एक्स्क्यूज मी. हॅलो. काय प्रॉब्लेम आहे?

सत्यवान १: अरे दादा तसं नाही. तू सरसकट सगळ्या बायकांचे फोटो काढतोय म्हणून विचारलं. म्हणजे कसं चुकून माझ्या बायकोचाही फोटो आला असेल तर तो मी तुझ्याकडून घेईन न.

सत्यवान २,३: अरे यार, सेम रे. आमच्या पण हिचे आले असतील बघ फोटो.

सत्यवान ४: मी.. मी फक्त माझ्याच बायकोचे फोटो काढतोय. बाकीच्यांचे मी कशाला काढू. ( तो भयंकर चिडला होता)

सत्यवान १: बरं दादा. (तेवढ्यात डोळ्याने इशारा करत बाकी दोघांना पुढे बोलण्यापासून थांबवलं).

काही वेळ असाच शांततेत गेल्यावर प्रत्येक सत्यवान आपआपल्या सावित्रीची छबी फोन मध्ये टिपण्यात गुंग झाला होता. इतक्यात भटजींनी पूजा समाप्तीची घोषणा करत आरतीला सुरुवात केली. आरती संपताच सर्व स्रियांना इतर किमान सात जणींना वाण देण्यास सांगण्यात आले. सत्यवान ४ फुल्ल जोशात त्याच्या सावित्रीचे इतरांना वाण देतानाचे फोटो काढत होता.

सत्यवान३: भाई कर ना मघास सारखं काहीतरी. हा बघ परत अति करायला लागलाय. 

सत्यवान १: थांब तेच डोकं चालवतो आहे.

सत्यवान १ च्या नजरेने आधीच सत्यवान ४ ची आई लक्षात ठेवलीच होती. आता गरज होती ती जवळ जात काहीतरी आगळीक करण्याची.

सत्यवान ४: काकी, तुमचा मुलगा व्यावसायिक फोटोग्राफर आहे ना ओ? मागचा अर्धा तास इतक्या उन्हात तो सगळ्यांचे फोटो अगदी न थकता काढतोय म्हटल्यावर मानायला हवं. 
काकी: कसला फोटोग्राफर. कुठेही जोडीने गेले तरी अर्धा वेळ नुसते फोटो काढण्यातच घालवतील. ते काय ‘थोबाड-पुस्तकावर’ टाकतात.

सत्यवान १- काकू, थोबाड-पुस्तक??

काकी: अरे फेसबुकवर रे. (काकूंच्या मराठी भाषांतराला अगदी जोरदार आरोळी देत दाद द्यावीशी वाटली पण परत त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आणि त्यांनी अजून काही भाषांतरे समोर मांडली तर तिथे पळण्यासाठी अगदीच चिंचोळी वाट असल्याने विषय लगोलग थांबवला गेला.)

सत्यवान १: माझी आई तर देवळात असं काही फोटोसेशन केलं तर खूप रागावते. देवळात आल्यावर माणसाने असले चाळे करू नये असं तिने बजावूनच ठेवलंय. त्यामानाने तुम्हीं खूप समजूतदार दिसताय. ( शेवटची फोडणी टाकली गेली होती.)

काकू: बरोबर आहे तुझी आई. ये हिरो; चल पुरे झाले तुझे नखरे. आटपा आता तुमचं फोटोसेशन. बाकीचे खोळंबले आहेत. ( काकूंचा आवाजच एवढा खणखणीत होता की सून दिलेली पोज सोडून, साडी सावरत सासूच्या दिशेने चालत आली होती.)

सावित्री १: एकतर स्वतः स्वतःच्या बायकोचे फोटो काढायचे नाहीत आणि दुसरा कोण काढत असेल तर त्याच्यासोबत अश्या काड्या करायच्या. खडूसपणाची अगदी हद्द ओलांडली तुम्हीं.

असेच काहीसे टोमणे सत्यवान २ आणि ३ लाही बसत होते. सावित्री आर्मी आता अधिक आक्रमक झालीच होती की अचानकपणे पुढे काहीसा भांडणाचा स्वर ऐकू येऊ लागला होता.

सावित्री ४: ते बरोबरच बोलत होते. यात माझे फोटो कुठे आहेत? यात तर सगळे बाकीच्याच बायकांचे फोटो आलेत. माझे तर पाच-सहा आलेच आणि तेपण अर्धे कट झालेत. म्हणजे तुम्हीं इतका वेळ बाकीच्याच बायकांचे फोटो काढत होतात.

सत्यवान४: अरे मी पटापट क्लिक करत होतो. नेमकी तुझी डायरेक्शन चुकली होती. मागून अंधार येत होता म्हणून मी वेगळा अँगल ट्राय करत होतो. तू पूजेला बसताना बरोबर जागा पकडून बसायचं ना.

सावित्री ४ पाय आपटत निघून गेली तसा तिचा सत्यवानही तिला मनवायला मागोमाग पळत गेला.

सत्यवान ३: भावा कमाल आहेस यार तू. कसली अद्दल घडवलीस त्याला. आता परत असा शो ऑफ करणार नाही.

सावित्री ३: शो ऑफ काय? बायकोचे फोटो काढायचे प्रयत्न करत होता तो. त्यात काही चुकीचं नव्हतं. आज आम्हीं जे सजलोय त्याच थोडंही कौतुक नको का व्हायला??
इतर सावित्रीही तिला दुजोरा देत सामिल झाल्या. सत्यवान २ आणि ३ च्या माना नकळतपणे सत्यवान १ कडे वळल्या.

सत्यवान १: वहिनी पूजेला उशीर झाला असता तर तुमच्या सासू बाईनीं समजून घेतलं असतं का?

‘अजिबात नाही.’- सगळ्याजणी एकाच सुरात बोलत्या झाल्या.

सत्यवान १: फोटो काढता काढता तुम्हाला मिनिटांचा उशीर झाला असता तर त्याने थेट अर्ध्या तासाचा फरक पडला असता की नाही? मग सासू मुलाला रागे भरेल की तुम्हांला?

‘ऑफकोर्स आम्हालाच’- पुनः सुरात एकी.

सत्यवान १: म्हणूनच आम्हीं कोणी त्यांच्यासारखं भारंभार फोटो काढायच्या भानगडीत पडलो नाही. आम्हीही तुमचे फोटो काढलेत. तेही फक्त तुमचेच. तुमच्या नकळत काढलेत. अगदी कँडीड. म्हणजे कोणी थेट तुम्हांला बोल लावणार नाही. प्रेमाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात वहीनी. कोणी जाहीर करत नसलं तरी काळजी असतेच. 

सावित्री २: बरोबर भावोजी. यांनी अगदी पाच मिनिटांसाठी मला आणि आईनां रिक्षाने आणलं.

सावित्री ३:- हो ना. आमच्यानींसुद्धा.

एकमेकींना वाण देत साऱ्या सावित्री पुढे निघून गेल्या आणि मागे सत्यवान राहिले होते.

सत्यवान २: भावा, भारी आहेस यार! वकील वगैरे आहेस का रे? 

सत्यवान ३: हा ना यार! काय करतोस तू??

सत्यवान १: कोण मी? मी ईरा ब्लॉगिंग साईटवर काल्पनिक कथा लिहीतो.

-समाप्त-

वाचकांसाठी:- आज घडलेल्या काही सत्य प्रसंगाना, काल्पनिक प्रसंगाची फोडणी देत हे संवाद रचले आहेत. यातून कोणत्याही व्यक्तींच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नसून केवळ विनोदनिर्मिती हा एकच उद्देश अभिप्रेत आहे.