चित्ती असावे....समाधान!

About Satisfaction


"ठेविले अनंते तैसेचि राहावे ,चित्ती असू द्यावे
समाधान।"


तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ,
आपल्याकडे जे आहे,आपण जसे आहोत तसेचं राहणे,जे आहे त्यात आनंद मानावा आणि समाधानी जीवन जगावे.

हे सर्व आजच्या जगात वाचण्यासाठी, बोलण्यासाठी आणि सांगण्यासाठी खूप सोपे आहे. पण आचरणात आणणे अवघड आहे.

तुकाराम महाराज खूप मोठे संत आणि विठ्ठल भक्तित उच्च पदावर आरूढ झालेले,जीवनात वैराग्य वृत्ती असलेले आणि विठ्ठलभक्तित रममाण झालेले संतशिरोमणी .

त्यांनी जे अनुभवले तसे त्यांनी लोकांना सांगितले.
त्यांना खरे सुख विठ्ठल भक्तीत जाणवले. आणि लोकांना त्यांनी परमार्थाची शिकवण दिली. जेणेकरून लोकांनाही समाधान मिळेल.

सर्व संत,महंत,ऋषी, मुनी,संन्यासी, तपस्वी हे सर्व ध्यान- धारणा करणारे, साधना करणारे ,कठोर तपश्चर्या करणारे थोर व महान लोकचं असे म्हणू शकतात की, ते जीवनात समाधानी आहेत.
कारण त्यांनी भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुखाचा अनुभव घेतलेला असतो. आयुष्यातील सर्व षडरिपूंवर विजय मिळविलेला असतो. सर्व इंद्रियांवर त्यांचा ताबा असतो. मन आणि बुद्धी वर नियंत्रण असते.

पण यासाठी अगोदर खुप कष्ट घ्यावे लागतात, साधना करावी लागते.
सर्व सामान्य जीवन जगणाऱ्या व्यक्तीला हे इतके सहज शक्य नाही.
तुमच्या व माझ्यासारख्या सर्व सामान्य लोकांमध्ये अशी एकही व्यक्ती सापडणार नाही की ती म्हणणार ," मी समाधानी आहे ." असे.

बरेचदा अनेक व्यक्तिंना आपण बोलताना पाहतो की ते समाधानी आहेत असे.
पण ते फक्त वरवरचे असते.फक्त दुसऱ्यांना सांगण्यासाठी आणि आपल्या भोळ्या मनाची समजूत काढण्यासाठी.
पण मनाला माहिती असते खरे काय ते!
भौतिक गोष्टींपासून कितीही सुख समाधान मिळवले पण नटखट मन काही समाधानी होतं नाही. ते कोठेतरी ,काही तरी असमाधानाचे कारण शोधतचं असते..


आम्हीं एके ठिकाणी लग्नवाढदिवसाच्या कार्यक्रमास गेलो होतो.आमच्या ओळखीतील आजी व आजोबा यांच्या लग्नाचा ७५ वा. वाढदिवस होता.
आजोबा वय ९७ वर्षे आणि आजी वय ९० वर्षे. त्यांच्या मुलामुलींनी,नातवंडांनी कार्यक्रमाचे छान आयोजन केले होते.
आजी आजोबा ही छान दिसत होते ,अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा!
या आजी आजोबांकडे पाहिले आणि मनात आले की, \"हे आजी आजोबा किती भाग्यवान!\"
लग्नाचा ७५ वा. वाढदिवस साजरा होत आहे. आपल्या जोडीदाराची इतकी वर्षे छान सोबत,मुले- सूना,मुली- जावई,नातवंडे जसे भरलेले गोकुळ..

या वयात ही आजी आजोबांना बारीक सारीक आजारपण सोडले तर काही त्रास नाही. ना डायबेटीस ना बल्डप्रेशर.या वयातही
चांगले ऐकू येते,चांगले पाहू शकतात .खाणेपिणे ही वयाच्या मानाने चांगले.
सर्व मुलेमुली त्यांच्या संसारात सुखी.अगदी त्यांना जावई आणि सुना आल्या तर.
आणि अगोदरही खुप त्रास झाला असे नाही.
आजोबांना
चांगली नोकरी होती,शेती होती.आजींनीही आजोबांना संसारात मदत करून मुलामुलींना वाढवले.
यांच्या जीवनाकडे पाहून वाटते, किती सरळ आणि सोपे जीवन असते.
कोठेही नाव ठेवायला, उणीव दाखवायला जागा नाही.

म्हणजे सर्व सामान्य माणूस ज्या गोष्टींसाठी असमाधानी असतो, त्या गोष्टी मिळवण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतो, जसे- चांगले आरोग्य, भरपूर पैसा,प्रसिद्धी, सर्व सुखसुविधा ,मदतीला धावून येणारे नातलगं व मित्रपरिवार, संस्कारी पिढी ,चांगल्या जोडीदाराची साथ इ.इ.
म्हणजे अगदी काहीही अडथळे नसलेले सुरळीत जीवन...
या सर्व गोष्टी विचारात घेऊन त्या आजी आजोबांकडे पाहिले तर काय कमी होते,त्यांच्या आयुष्यात? सर्व काही तर होते,म्हणजे ते आजी आजोबा सुखी समाधानी असायला हवेत ना?
पण कधीतरी प्रसंगाने त्यांच्याशी भेटणे ,बोलणे झाले तर ,
त्यांच्याकडून कधीही कळले नाही की,ते जीवनात समाधानी आहेत असे. जे हवे होते ते सर्व मिळाले किंबहुना अपेक्षेपेक्षा सर्व जास्तचं मिळाले. तरीही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले नाही. काहीतरी नाराजीचा सूर व्यक्त व्हायचा.
म्हणजेचं त्यांचे समाधान या सर्व गोष्टींमध्ये नव्हते का?

या सर्व गोष्टी त्यांना त्यांच्या कर्माने म्हणा किंवा नशिबाने सहज मिळाल्या. पण अनेकांना तर यातील एक गोष्ट मिळते तर दुसरी नाही, काहींना तर यातील काही ही चांगले भेटत नाही.
आयुष्यभर जे मिळवण्यासाठी कष्ट घेत असतात आणि जेव्हा ते मिळते तेव्हा आयुष्य संपलेले असते.
प्रत्येकाला कोणती ना कोणती समस्या सतावित असते. आरोग्य चांगले नसते ,पैशाचा प्रॉब्लेम असतो,कुटुंबात व नात्यात भांडणे,कलह असतात. असे एक ना अनेक प्रश्न भेडसावत असतात. एक सोडविला तर दुसरा तयारचं असतो. जीवन संपून जाते पण प्रश्न काही सुटत नाही .

का येत असतात असे प्रश्न? अशा समस्या माणसांच्या आयुष्यात?
कारण मनुष्याचा स्वभावचं तसा असतो. आपल्याकडे आहे त्यात समाधानी न राहता ,जे आपल्या जवळ नाही त्याकडे धाव घेणे. आहे त्यापेक्षा अधिक मिळविण्याची लालसा!
इतर पशुपक्षी, प्राणी कसे आनंदी वाटतात . मनुष्याला इतर प्राण्यांपेक्षा जी गोष्ट चांगली मिळाली ती म्हणजे विचार करण्याची बुद्धी, भावनाशील मन .
त्यामुळे मनुष्य प्रत्येक गोष्टीवर विचार करतो आणि त्यातून कधी आनंद मिळतो तर कधी दुःख वाट्याला येते.

मनुष्यप्राणी बुद्धिमान आहे त्यामुळेचं आज त्याने सर्व क्षेत्रात बुद्धी च्या जोरावर प्रगती केली आहे. त्याने आहे त्यात समाधान मानले असते तर आज एवढे शोध लागले असते का? एवढी सुखसोयींची साधने मिळाली असती का ?


"गरज ही शोधाची जननी आहे."

असे म्हटले जाते.म्हणजे माणसाला कोणत्या तरी गोष्टीची गरज भासत गेली आणि त्यातून शोध लागत गेले.

मनुष्य समाधानी राहून जगला असता तर ...
इतर प्राण्यांप्रमाणे तो ही तसाचं राहिला असता. पण त्याने आपल्या बुद्धीने,कल्पकतेने ,विचाराने जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणल्या. मेडीकल सायन्स मध्ये प्रगती झाली म्हणून अनेक असाध्य आजारांवर उपचार निघाले, लोकांना अवयवदानातून नवीन जीवन मिळू लागले. विज्ञान व तंत्रज्ञानात दिवसेंदिवस होणाऱ्या प्रगतीमुळे तर जीवन खुपचं सुलभ व सोयीचे झाले आहे.

जीवन आहे तिथे प्रगती होत राहणारचं.

गरीबाला ही श्रीमंत व्हायचं असतं, रोगीला ही निरोगी बनायचं असतं .
प्रत्येकाला संकटातून, कठीण परिस्थितीतून बाहेर पडायचं असतं .

"थांबला तो संपला "

याप्रमाणे जर कोणी काहीही न करता फक्त शांत बसला तर ...
लोक त्याला आळशी, कामचोर म्हणतील .

एक मनुष्य असाचं काही ही उद्योग न करता शांत बसलेला असायचा ,तेव्हा एकाने त्याला विचारले "तु काही उद्योग वगैरे का करीत नाही?"
तो म्हणतो " कशासाठी करायचा? "
ती व्यक्ती सांगते " उद्योग कर ,पैसा मिळव,सुखसोयीच्या वस्तू घे."
तो म्हणतो " या वस्तू कशासाठी ?"

ती व्यक्ती " तुला जीवन चांगले जगता यावे म्हणून."

तो म्हणतो " मग आता तर मी चांगलचं जगतो आहे ना? आरामचं करतो आहे ना ?"

गंमतीचा भाग आहे हा .

खरचं प्रत्येक व्यक्ती जीवनाकडे कोणत्या दृष्टीने बघतात त्यानुसार ते जीवन जगत असतात.

अर्धा ग्लास भरलेला आहे ,हे पाहणारे लोक जीवनात समाधानी राहतात तर अर्धा ग्लास रिकामा आहे ,हे पाहणारे लोक जे आहे त्यात समाधानी न राहता अजून काही तरी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत राहतात.

लहान मुलांचे समाधान हे छोट्या छोट्या गोष्टींत राहते.
खाणेपिणे, खेळणे ,हसणे वगैरे गोष्टी.
तरुण वयातील समाधान वेगळ्या गोष्टींमध्ये असते.
नोकरी, संसार इतर जबाबदाऱ्या अशा अनेक गोष्टी तर म्हातारपणात आरोग्य चांगले राहवे,मुलेबाळे व नातवंडे यांच्या सुखात सुख शोधणे. अशा गोष्टीत समाधान असते.

सर्व सुखसुविधा असलेला श्रीमंत मनुष्य जेव्हा अनेक व्याधींनी त्रस्त असतो आणि जेव्हा एखादा गरीब व्यक्ती त्याला पाहतो ,तेव्हा तो गरीब आपल्या निरोगी शरीराबद्दल समाधानी असतो.
आणि जेव्हा एखादा गरीब पैशाअभावी उपासमारीने मरतो तेव्हा ,ते पाहून श्रीमंत व्यक्ती आपल्या कडील पैशांमुळे स्वतः ला समाधानी समजतो.

अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यातून समजते की,

समाधान ही एक वृत्ती आहे ,जी परिस्थितीप्रमाणे,व्यक्तीपरत्वे बदलत असते.
आज ज्या गोष्टीत आपल्याला समाधान वाटते ,उद्या कदाचित त्यात आपल्याला समाधान असेलचं असे नाही.

म्हणजेचं समाधान मानने याला काही मोजमाप नाही, प्रमाण नाही .

चित्ती समाधानी असावे म्हणजे जे आपल्या ताटात वाढलेले आहे ,ते आनंदाने खाऊन समाधानी रहा. दुसऱ्याच्या ताटाकडे लक्ष देवू नका आणि ते घेण्याचा प्रयत्न ही करू नका. आपली शारिरिक कुवत,क्षमता आणि जे बदलता येणे शक्य नाही असे ,या सर्व गोष्टींचा स्विकार करून जगावे.
म्हणजेचं तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या विचारांचे पालन होईल.


शेवटी काय ?
जीवनात कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे,वयानुसार समाधानी वृत्तीचा कोठे पॉझ घ्यायचा हे ज्याने त्याने आपआपले ठरवायचे असते.