सतीचे वाण

भोसल्यांच्या स्त्रियांची भावस्थिती टिपण्याचा प्रयत्न
सतीचे वाण..


" काय विचार आहे तुमचा?" चिडलेल्या शहाजीराजांनी जिजाऊंना विचारले..
" आमचा काय विचार असणार? स्वारी जे ठरवेल ते आम्हाला मान्य आहे.." पडलेल्या आवाजात जिजाऊ उत्तरल्या..
" काय विचार करणार? एका बाजूला निजामशाही पाठी.. दुसरीकडे मोगलाई. आमच्या सोबत लहान पोर, तुम्ही गरवार.. कसा गाठणार मुक्काम? डोकेच चालेना."
"आम्ही एक सुचवू का?"
" बोला.."
" आम्ही इथेच थांबतो. तुम्ही जा पुढे."
" पण इथे कुठे थांबणार?"
"बघतो.. ज्याच्या पाठीशी देव आहे त्याला कोणाची भिती.. होईल काहीतरी सोय.."
"थांबा थोडा विचार करू दे.. इथेच आपले व्याही विश्वासराव आहेत.. तुम्ही इथे रहा.. सगळे स्थिरस्थावर झाले कि घेऊन जाईन.."
शहाजीराजे जिजाबाईंना घेऊन विश्वासरावांकडे गेले.. 
" यावे राजे.."
" आम्ही आलो आहोत तुमच्याकडे एका मदतीसाठी.."
" राजे, मदत काय म्हणताय? तुम्ही आज्ञा करायची आणि आम्ही पाळायची. सांगा काय करू?"
" तुम्हाला आमची अवस्था तर माहित आहे.. गनिम सतत पाठिशी.. त्यात राणीसाहेबांची हि अवस्था.. विचार करत होतो त्यांना काही दिवस तुमच्या सुपूर्द करावे.."
" अरे हा तर आमचा बहुमानच.. विश्वास ठेवा.. अगदी पोटच्या लेकीसारखे जपू.."
" तुम्ही आहात म्हणून काळजी नाही आम्हास.."
" राणीसाहेब आम्ही निघतो.."
" काळजी घ्यावी.. शंभुराजे इथे राहिले तर चालतील?"
" कसे शक्य आहे ते? आमचे चिरंजीव आहेत ते.. त्यांना या धामधुमीची सवय असलीच पाहिजे.."
" पण लहान आहेत अजून ते.."
" लहान असले तरी सिंहाचे छावे आहेत ते.. तुम्ही इथे सुरक्षित रहा.. आम्ही लवकरच येऊ आमच्या दुसर्‍या छाव्याला भेटायला.."

       शहाजीराजे प्रयत्न करीत होते स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा.. त्यांचा पराक्रम, स्वातंत्र्याची उर्मी, पारतंत्र्याची चाड हे जिजाबाईंनी ओळखले होते. त्या राजांच्या पाठिशी ठामपणे उभ्या होत्या.. पण आधीच्या चार बाळांचे झालेले मृत्यु आणि हि धावपळ जिजाबाईंना कितपत झेपेल हि राजांना काळजी होती.. म्हणूनच त्यांना शिवनेरीवर सुरक्षित ठेवून राजे निघाले होते त्यांचे जन्मालाही न आलेले स्वराज्य वाचवायला..

     छोट्या शंभूला घेऊन शहाजीराजे परत निघाले रणभूमीवर. डोळ्यात येणारी आसवे रोखून जिजाबाई जाणाऱ्या दोघांना पहात होत्या.. दिवस जात होते.. एकही दिलासादायक बातमी येत नव्हती.. एकामागून एक येत होत्या त्या फक्त वाईट बातम्या.. आज काय पुणे लुटले, गाढवाचा नांगर फिरवला, लोखंडी पहार जमिनीत ठोकली. फुटकी कवडी, तुटकी वहाण टांगली. कसाबसा जिजाबाई धीर राखून होत्या.. पण एक बातमी मात्र त्यांना सहनच झाली नाही.. खुद्द त्यांच्या जाऊबाईंना खानाने भर दिवसा उचलून नेले.. बातमी ऐकून त्यांचे मन विषण्ण झाले.. त्या सतत शिवाई देवीच्या मंदिरात जाऊन बसू लागल्या.. जाब विचारू लागल्या.. अजून किती काळ हे सहन करावे लागेल? अशी कशी ग तू शांत? घे तुझे कालीरूप आणि कर या दैत्यांचा संहार.. दार उघड बये दार उघड.. पण ती हि शांत होती.. हे हि कमी होते म्हणून कि काय शहाजीराजांनी मोगलाईत सरदारी पत्करली आणि ते मोहिमेवर निघून गेले.. जिजाबाईंना एकटीला सोडून. दोघांचेही स्वराज्याचे स्वप्न भंगले होते. विषण्ण, उदास जिजाबाई किल्ल्याच्या मावळतीकडे बसल्या होत्या.. विश्वासरावांची पत्नी लक्ष्मीबाई तिथे गेल्या..
" काय झाले राणीसाहेब? आमचे काही चुकले का?"
" असे का विचारता आहात वहिनीसाहेब?"
"मग काय? सतत उदास असता.. मान्य आहे, राजे मोहिमेवर आहेत. पण त्या पोटातल्या जीवाकडे तरी बघा.. थोडे तरी आनंदी रहा.."
" कसे आनंदी राहणार वहिनी? सतत डोळ्यासमोर आई आणि आबासाहेब येतात.. माझी भावंडे आणि सती गेलेल्या भावजया येतात.. उद्ध्वस्त झालेले माहेर डोळ्याला डोळा लागू देत नाही.. त्यांच्या किंकाळ्यांनी कान बधिर होऊन जातात.. असे वाटते, त्यांच्यावर झालेल्या वाराचे शिंतोडे आमच्या सर्वांगावर उडाले आहेत.. "
" शांत व्हा राणीसाहेब.. शांत व्हा.."
" आमच्या डोळ्यासमोर येतात आमच्या जाऊबाई.. काय झाले असेल त्या माऊलीचे विचारही करवत नाही.. असे वाटते घ्यावी तलवार हाती आणि कापून काढावे त्या गनिमास.."
" काय बोलावे तेच कळत नाही.. पण विश्वास ठेवा राणीसाहेब.. ज्या मातेसमोर तुम्ही बसता ना तिला येईल तुमची दया.. तिच सोडवेल आपल्या सर्वांना यातून.. पण आता आमचे ऐका. थोडी स्वतःची आणि त्या बाळाची काळजी घ्या.. तुमच्यासाठी नाही तर आमच्यासाठी..आम्ही राजांना काय तोंड दाखवणार? चला आत चला. थोडे खाऊन विश्रांती घ्या.."

जिजाबाईंचे दिवस भरत आले होते.. लक्ष्मीबाई जरी आईच्या मायेने सगळं करत असल्या तरी कुठेतरी आपल्या घराची आठवण जिजाबाईंना येत होती.. समोरचा लेण्याद्री धीर देत होता. पण तो पुरेसा नव्हता. नवरा आणि मुलगा दूर कुठेतरी मोहिमेवर होते..आणि त्या एकट्या शिवनेरीवर.. एकट्या? नाही त्यांचे एकटेपण दूर करायला जन्म घेतला शिवरायांनी.. फाल्गुन वद्य तृतीया. आणि जिजाबाईंची सर्व स्वप्न पूर्ण करायला त्यांचे सतीचे वाण सांभाळायला आले शिवराय..

     "राणीसाहेब, शाही मेणा येताना दिसतो आहे.."
" कळले का कोणाचा आहे ते?" जिजाबाई खुश होत म्हणाल्या..
" माणसांना पाठवले आहे. लवकरच कळेल."
दासी आत आली..
" उमाबाईसाहेब येत आहेत, असा निरोप आला आहे.."
" अग बाई.. सासूबाई?" जिजाबाई उठायचा प्रयत्न करू लागल्या.. त्यांना थांबवत लक्ष्मीबाई म्हणाल्या.. "तुम्ही पडून रहा.. आम्ही बघतो.."
उमाबाईसाहेब वाड्यात आल्या.. हातपाय धुवून आधी बाळाला बघायला त्या बाळंतिणीच्या खोलीत गेल्या.. त्यांनी बाळाला हातात घेतले.
" कसा सोन्यासारखा पोर आहे ग. माझीच दृष्ट लागेल त्याला.."
" आजीची कधी दृष्ट लागते का?" आपल्या गेलेल्या आईच्या आठवणीने बोलता बोलता जिजाबाईंचे डोळे पाणावले.. उमाबाईंना त्यांच्या भावना कळल्या. त्यांनी जिजाबाईंच्या डोक्यावरून हात फिरवला.. " तू बरी आहेस ना?" जिजाबाईंनी मान हलवली.. " राजांचा काही पत्ता..?" "मोहिमेवर आहे म्हणे स्वारी अजून.."
" आणि शंभू पण त्याच्या सोबत?"
" हो.."
" अग त्याला तरी ठेवून घ्यायचे तुझ्याजवळ.. एवढेसे पोर ते.. आणि याचे नाव ठेवले का?"
" नाही अजून. बाराव्या दिवशी घालूया का पाळण्यात?"
" हो.. तसे करू.. राजांना निरोप देऊ बारशाचा.. येतो आम्ही थोडा आराम करतो. खूप दगदग झाली आहे.. नाही सहन होत आता वयाप्रमाणे.." उमाबाईसाहेब निघाल्या. दरवाजापर्यंत गेल्या.. आणि पाठी वळून म्हणाल्या, "राजांनी दुसरा विवाह केला असे ऐकले.. खरे आहे का? तुला तरी काय विचारते मी.. अशा गोष्टी कधी खोट्या असतात का? कर आराम कर .."

उमाबाईसाहेब गेल्या हे बघून दाबून ठेवलेला हुंदका जिजाबाईंना फुटला.. आधी माहेर तुटले.. आणि आता पतीही थोरल्या लेकाला घेऊन दूर झाला.. आता आशेचा एकच किरण होता त्यांच्याकडे.. शिवाजी .. त्यांचा सिऊबा..

हि कथा ऐतिहासिक असली, ऐतिहासिक पुस्तकांचा अभ्यास करून लिहिली असली तरी लिहिलेल्या घटना सत्य आहेत असे लेखिकेचे कुठेही म्हणणे नाही.. हा एक प्रयत्न आहे भोसल्यांच्या स्त्रियांची भावस्थिती टिपण्याचा.. कसा वाटला ते सांगायला विसरू नका..

सारिका कंदलगांवकर
 दादर मुंबई

🎭 Series Post

View all