सती.. अंतिम भाग

कथा एका सतीची


सती.. भाग ५

मागील भागात आपण पाहिले की कनिकाचा दीर यतिन, या दोघांना मूलबाळ नाही म्हणून दत्तक घेण्याचा पर्याय सुचवतो. ते नाही म्हटल्यावर तो त्यांची ट्रिप अरेंज करून देतो. आता बघू पुढे काय होते ते.


" असे कसे पळाले ते? तुमचे लक्ष कुठे होते? कशासाठी पैसे दिले होते तुम्हाला?"

यतिन त्याच्या बंगल्याच्या आवारात फेऱ्या घालत फोनवर बोलत होता. कनिकाच्या सांगण्यावरून सुयशने गाडी थोडी लांब उभी केली होती. हलक्या पावलाने दोघे त्या बंगल्याबाहेर उभे राहिले होते. सुयशचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. समोर यतिन फोनवर फोन करत होता.


" आले का ते तिथे? नाही.. कुठे गायब झाले समजत नाही.. हो.. त्याचा फोनही बंद येतो आहे. ते दोघे तिथे आले की मला लगेच कळवा.. हो.. कितीही रात्र झाली तरी चालेल.. मी आहे जागा.. आणि काम आजच्या आज झाले पाहिजे."

कनिकाने सुयशचा हात धरला आणि त्याला सावरत ती त्याला गाडीपाशी घेऊन आली. त्याला गाडीत बसवून ती एका हॉटेलमध्ये उतरली. सुयश डोके धरून बसला होता.

" दादा, असं कसं वागू शकतो? आईबाबांच्या जागी मी त्याला मानत होतो."

" सुयश शांत हो.. आता आपल्याला आपला जीव आधी वाचवायचा आहे." कनिका सुयशला धीर देत होती. दोघांनी मिळून काही गोष्टी ठरवल्या. सकाळी सुयशने फोन ऑन करताच अनेक मेसेजेस यायला सुरुवात झाली. लगेचच यतिनचा फोन आला.

" सुयश, आहेस कुठे? कधीचा फोन करतो आहे.. अरे काळजी वाटत होती मला तुझी."

" दादा, माझी गाडी बिघडली होती. अडकलो होतो रस्त्यात." सुयश कोरडेपणाने बोलत होता.

" मग आत्ता कुठे आहेस.. अजून पोहोचला नाहीस का हॉटेलमध्ये? माझी माणसे सांगत होती."

" तुझी माणसे?"

" अरे हॉटेल बुक केले ना मी.. ते सांगत होते."

" अच्छा.. पोहोचल्यावर कळवतो." सुयशने फोन बंद केला. यतिन वैतागला होता. सुयश खरे बोलत नव्हता. हे त्याला समजले होते. तो कुठे आहे हे ही माहित नव्हते.. त्याचा सगळा प्लॅन बिघडला होता.

दोन दिवसांनंतर सुयशने यतिनला भेटायला बोलावले.

" सुयश, अरे कुठे गायब होतास? किती फोन केले तुला? त्या हॉटेलमध्ये पण गेला नाहीस?" यतिनने आल्या आल्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

" त्याचे झालेले नुकसान मी भरतो.." सुयश शांतपणे बोलत होता.

" पैशाचा प्रश्न नाही.. कमिटमेंटचा असतो." यतिन हात चोळत बोलला.

"बरी आठवण केलीस.. मी माझे मृत्युपत्र बनवले आहे.." सुयश बोलला.

" एवढ्या लवकर?? आणि अचानक?" यतिन गडबडला होता.

" हो काही घटना अशा घडल्या की मला करावे लागले.. मी आमच्या सर्व संपत्तीचा एक ट्रस्ट बनवला आहे.. आमच्या दोघांचा जर मृत्यू झाला तर सगळा पैसा तिथे जाईल.."

" आणि आम्ही?" यतिनच्या तोंडातून शब्द निघून गेले.

" मला आणि माझ्या बायकोला मारायचे बेत करणाऱ्या माणसाला मी काय आणि का द्यावे? मी तुला आईबाबांनंतर मानत होतो.. आणि तू? तुला मी पोलिसात दिले नाही हेच उपकार समज.." बोलताना सुयशच्या डोळ्यात पाणी होते. काहीच न बोलता यतिन तिथून निघाला.

सगळं स्थिरस्थावर झाल्यावर कनिका सुट्टी घेऊन घरी बसली होती. झाल्या गोष्टींचा तिला खूप मनस्ताप झाला होता. ती बसल्या बसल्या विचार करत होती. तिला अचानक आपले बालपण आठवले. तिच्या वाड्यात तिचे आजोबा पूजा करायचे. पूजा करताना तिला देवांना गंध लावायला फार आवडायचे. प्रत्येक देवाला गंध लावताना ती रोज आजोबांना त्या देवाची गोष्ट सांगायला लावायची. इतर देवांची गोष्ट बदलायची. पण एक गोष्ट नेहमी तीच असायची.. सतीच्या टाकाची..


सतीचा टाक.. चांदीच्या पत्र्यावर असलेला एका स्त्रीचा दिसेल न दिसेल असा चेहरा..

" आजोबा, हे काय आहे?" छोटी कनिका आजोबांना विचारत होती.

" तो सतीचा टाक आहे बाळा." आजोबांच्या डोळ्यात पाणी असायचे.

" पण हे आहे कोण?"

" आपल्या घराण्यातली लेक.. सासरच्यांनी सती पाठवले. तिला शेवटचे भेटूही दिले नाही. खरेतर ती आई होणार अशी बातमी आली होती.. आणि नंतर थेट तिच्या मृत्यूची. तेव्हापासून आपल्या घरात तिचा टाक बनवला आहे.. तिची आठवण म्हणून.. आणि आपल्या कोणत्याच लेकीला परत असा त्रास होऊ नये म्हणून.."

आजोबा गेले आणि देवावर विश्वास नसणाऱ्या बाबांनी देव गुंडाळून ठेवले. आई असेपर्यंत कधीतरी पूजा करायची. पण ती ही गेल्यानंतर सगळेच संपले.या मध्ये ती ते सर्व विसरून गेली होती. पुढे तिचा भाऊ परदेशी गेला. जाताना सगळे देव तिच्याकडे देऊन गेला. कामाच्या गडबडीत तिने त्यांची कधी पूजा केलीच नाही. कनिका उठली.. तिने ती देवघरातील संबळ उघडली. तिने ती तशीच ठेवली होती. सर्व देवांची पूजा करण्याऐवजी ती फक्त त्या पेटीला हळदीकुंकू वहायची. तिने पेटीला परत हळदीकुंकू वाहिले. नमस्कार केला. ती संबळ उघडली. त्यातील एकेक देव बाहेर काढायला सुरुवात केली. तिला तो दिसला. सतीचा टाक..

कनिकाने तो टाक हातात घेतला. तिला दिसू लागले तेच वेदनेने भरलेले डोळे, कपाळावरची कुंकवाची उभी चीर सोडलेले मोकळे केस..

" उमा.." कनिकाच्या तोंडातून शब्द निसटले.

"किती अन्याय झाला तुमच्यावर.. तरिही मला वाचवलेत तुम्ही. कशी मुक्ती मिळवून देऊ तुम्हाला?" कनिकाला रडू येत होते.

" झालेलं कोणीच बदलू शकत नाही. आता प्रयत्न करायचे हे परत होऊ नये यासाठी.. संकटात असणाऱ्या अनेक उमांना वाचवणे हिच माझी मुक्ती समज. करायचे असेल तर त्यांच्यासाठी काहीतरी कर.. अजून एक.. सतीचा आशीर्वाद आहे.. माझी नाही पण तुझी कूस नक्कीच उजावेल.." तो टाक जणू कनिकाशी बोलत होता..


काही वर्षांनी..


" उमा.. इथे तिथे पळू नकोस.."

" आई, मी फक्त त्या नदीपर्यंत जाते ना."

" नाही.. इथे ये.. पूजेला सुरुवात करायची आहे. गुरूजी बोलावत आहेत." छोटी उमा चिडून बाबांशेजारी जाऊन बसली. गाल फुगवून सुयशशेजारी बसलेल्या उमाला बघून कनिकाला हसू आले.. तिने स्त्रियांसाठी उभारलेल्या संस्थेची आज वास्तुशांत होती, उमाच्या हस्ते.. सतीच्या समाधीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर. कनिका उमाकडे कौतुकाने बघत होती. क्षणभरच उमाच्या जागी तिला उमाबाई दिसल्या. तिच्याकडे कृतज्ञतेने बघणाऱ्या.



कथा कशी वाटली ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all