सती.. भाग ३

कथा एका सतीची


सती.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की कनिकाला भेटलेली स्त्री सतीची कथा सांगत असते.. उमाची आणि सदाशिवची. आता बघू पुढे काय होते ते..


" आईसाहेब, वहिनी घात झाला.." जोरजोरात ओरडत बाळाजी घरी आला. त्याचा आवाज ऐकून उमाचा थरकाप झाला. ती हातातले काम सोडून खाली आली.

" काय झाले भाऊजी?" डोक्यावरचा पदर सावरत तिने विचारले. तोपर्यंत आईसाहेबही बाहेर आल्या.

" आईसाहेब.. दादासाहेब आपल्याला सोडून गेले.." बाळाजी रडत बोलला. ते ऐकून उमाच्या पायाखालची जमीनच सरकली. ती चक्कर येऊन खाली पडली.

" आम्ही जात होतो. दादांचा घोडा उधळला, ते पडले. आणि जागीच.. जाताना फक्त ते म्हणाले उमाला सांगा सती.." डोळे मिटायच्या आधी हे शब्द उमाच्या कानावर पडले. ती शुद्धीवर आली तेव्हा तिला सती पाठवायची सगळी तयारी झाली होती. सगळ्या बायका तिच्या भोवती येऊन बसल्या होत्या.

"उठून स्नान करून घे.." सासूबाईंनी सांगितले.

" आम्ही सती जाणार नाही.." उमाने ठामपणे सांगितले.

" अग पण सदाशिवची शेवटची इच्छा?"

" आमचा विश्वास नाही त्यावर. हे कदापिही असं सांगणार नाही. अशा परिस्थितीत तर अजिबातच नाही.." उमा बोलत होती.

" अशी परिस्थिती म्हणजे?"

" आम्ही गरोदर आहोत..." उमाचा तिच्याच शब्दांवर विश्वास नव्हता.

" खाली बघा.." आईसाहेब व्यथित स्वरात बोलल्या. तिथे रक्ताचे थारोळे साचले होते. आईसाहेब बोलत होत्या. "नवर्‍यानंतर जगणे फार वाईट पोरी. मी तरी पोरांकडे बघून जगले. तुझ्यापाठी ना मूल ना बाळ. जा बाई तू सती." उमा काही बोलायच्या आत त्यांनी बायकांना खुणावले. उमाला जबरदस्ती अफू खायला लावली. तिचे भान हरपल्यावर त्याच अवस्थेत तिची महायात्रा काढून तिचे सदाशिवसोबत दहन केले. आणि नंतर इथे तिचे हे मंदिर बांधले.


ती बाई बोलता बोलता थांबली. तिच्या डोळ्यात पाणी होते. जणू तेव्हाचा उमाचा आक्रोश अजूनही तिला ऐकू येत होता. कनिकाच्याही डोळ्यात पाणी आले.

" किती क्रूर असतात माणसे.. फक्त पैशासाठी असं वागायचं? किती त्रास झाला असेल त्या उमाला? आधी नवरा, नंतर मूल आणि नंतर जिवंतपणी..." कनिका शहारली.

" तुला माहिती आहे.. तिच्या किंकाळ्या ऐकू येऊ नये म्हणून ढोल बडवत होते. सतीच्या किंकाळ्या ऐकू नये म्हणायचे. तिला जळताना बघितलेलं चालायचं.." त्या स्त्रीच्या डोळ्यात वेदना होत्या.

" पण कोणीच काही बोलले नाही? तिच्या माहेरचे? "

" कोण काय बोलणार? माहेर दूर होतं तिचं.. येणार तरी कोण? आणि तिला वाचवणार तरी कोण? तिच्या माहेरी गेली ती थेट खबर." ती स्त्री वृंदावनाकडे बघत होती.

" पुढे काय झाले?" कनिकाने उत्सुकतेने विचारले.

" कोणाचे?"

" त्या बाळाजीचे?"

" केलेलं बदकृत्य कधीतरी समोर येतच.. त्याने आपल्याच भावाचा खून करवला हे समजले आईसाहेबांना.. आता तोच त्यांचा वारस होता म्हणून त्या काही बोलल्या नाहीत. पण त्याच्या पापाची शिक्षा त्याला मिळाली. शेतावर लागलेल्या आगीत तो होरपळून मेला."

" भीषणच आहे हे सगळे. एक विचारू?"

" विचार ना.."

" हे सगळे ऐकल्यावर तुम्हाला इथे एकटे थांबायची भिती नाही वाटत?"

" भिती? मेलं कोंबडं आगीला घाबरत नाही.." त्या विषण्णपणे बोलल्या. "आणि ते आहेत ना सोबतीला."

" ते म्हणजे? मला तर कोणीच दिसले नाही." कनिका बोलली.

" कनिका.. कनिका.." सुयशचा आवाज आला. कनिकाने तिथे वळून बघितले. सुयश तिला बोलावत होता.

" मी आलेच हं.." ती त्या बाईंना सांगायला वळली. त्या निघून गेल्या होत्या. कदाचित परपुरूषासमोर येत नसाव्यात. तिने मनाशी विचार केला.

" काय ग एकटीच काय बोलत होतीस?" सुयशने विचारले.

" एकटी कुठे? त्या बाई होत्या ना.."

" कोणत्या बाई?"

" सांगते नंतर.. तू एकटाच? गाडीचे काय करायचे?"

" अग ते दुकान बंद झाले होते. तू एकटी घाबरशील म्हणून मी लगेच आलो."

" मग आता काय करायचे?"

" गाडी परत एकदा चालू होते का बघू? नाहीतर गाडीत रात्र काढू. कोणी दिसलं आजूबाजूला तर ठीकच." सुयश खांदे उडवत म्हणाला. कनिकाने गाडीची चावी त्याच्याकडे दिली. त्याने गाडी चालू केली. मगाशी चालू न होणारी गाडी पटकन सुरू झाली.

"सुयश, गाडी पाठी वळव.."

"काय?"

" हो.. मी सांगते तसं कर.." कनिका ठामपणे बोलली.


गाडी परत वळवायला का सांगितले असेल कनिकाने.. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all