सती

कथा एका सतीची


सती..



" काय रे हे, कुठे आलो आहोत फिरायला? लोक सिमला, मनाली, काश्मिर गेलाबाजार माथेरान, महाबळेश्वरला जातात.. हे आपण कुठे आलो आहोत?" कनिका सुयशला विचारत होती.

" मलातरी काय माहित? दादाने सांगितले चांगला स्पॉट आहे.. चार दिवस आराम करून या म्हणून आलो इथे." गाडी चालवून चालवून थकलेला सुयश बोलला.

" पण मग गाडी अशी मध्येच कशी बंद पडली?"

" मला तरी काय माहित? तरी निघताना चेक करून घेतली होती. बहुतेक इंजिन गरम झालं असावं.. तू बाहेर बस.. मी बघतो." कनिका आणि सुयश दोघेही खाली उतरले. रानातला रस्ता. दूर दूरपर्यंत कोणी माणूसही दिसत नव्हते. मोबाईलला रेंज नव्हती. इथे तिथे बघितल्यावर कनिकाला मंदिरासारखे काहीतरी दिसलं.

" आता काय करायचे?" थोडे काळजीनेच कनिकाने विचारले.

" काय म्हणजे? मगाशी जिथे आपण चहा घेतला तिथे जातो मी. त्या माणसाशी बोलून बघतो कोणी मेकॅनिक आहे का?"

" मी काय करू मग?" कनिकाने घाबरून विचारले.

" तू.. तुला चालवणार आहे का एवढं?"

" नाही रे.. पण मला एकटीला भिती वाटते आहे."

" हे बघ.. काहिही झाले तरी अंधार पडायच्या आत आपल्याला इथून बाहेर पडलंच पाहिजे. मी पटकन जातो आणि येतो." सुयश कनिकाला जवळ घेत तिच्या कपाळावर ओठ टेकत म्हणाला.

" अजिबात उशीर करू नकोस. इथे रस्त्यात थांबण्याऐवजी मी तिथे थांबू?" कनिकाने मगाशी दिसलेल्या मंदिराकडे हात करत म्हणाली.

" चालेल.. पण जास्त लांब जाऊ नकोस.." सुयश आल्या रस्त्याने परत जायला लागला. कनिकाने गाडी लॉक केली आणि ती मंदिराच्या दिशेने जायला लागली. तिथे पोहोचल्यावर तिला समजले, ते जे तिला मंदिर वाटले होते ते मंदिर नसून एक समाधीस्थळ होतं. ती थोडी शहारली. तिला भिती वाटायला लागली. सुयश लवकर परत यावा असा ती मनाशी धावा करायला लागली. प्रवासाने आणि या मानसिक त्रासाने थकलेली ती तिथेच बसली. तिने डोळे मिटले.

" थकलीस?" एक मंजुळ आवाज आला. कनिकाने डोळे उघडले. समोर एक घरंदाज बाई उभी होती. हिरव्या रंगाची नऊवारी साडी, अंगभर घातलेले जुन्या पद्धतीचे दागिने, कपाळावर कुंकवाची आडवी चीर, केसांचा आंबाडा.. त्यावरून घेतलेला पदर. आणि डोळ्यातले ते सात्विक भाव.. कनिका बघतच बसली. या मगाशी का नाही दिसल्या मला.

" थकलीस का?" त्यांनी परत विचारले.

"अं... हं.. म्हणजे हो जराशी.. तुम्ही अचानक कुठून आलात. म्हणजे ते मी तुम्हाला येताना बघितले नाही ना. " कनिका अडखळत बोलली.

" पाणी प्यायचे आहे का?" त्यांनी तिचे बोलणे ऐकले नाही असं दाखवत तिला विचारले. कनिकाच्या मनात नको नको ते विचार आले.

" नाही.. आहे माझ्याकडे." तिने पर्समधली पाण्याची बाटली काढून दाखवली. त्या हसल्या.

" घाबरलीस.. तुला असं वाटलं मी तुला दगा करेन म्हणून?" आपल्या मनातले विचार त्यांना समजले म्हणून कनिका थोडी ओशाळली.

" नाही तसं काही नाही.. पण काळजी घेतलेली बरी ना?" स्वतःची बाजू सावरत कनिका बोलली.

" ते तर आहेच.. काळजी घेतलीच पाहिजे. कोणाच्या मनात काय चालू आहे ते नाही समजत." त्या सुस्कारा सोडत म्हणाल्या. विषय बदलण्यासाठी कनिकाने विचारले..

" हे नक्की काय आहे? वाटते तर समाधी आहे."

" हो.. समाधीच आहे ही.. सतीची समाधी."


कोण असेल ती बाई? काय नाते असेल कनिकाचे या सगळ्याशी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all