साथ तुझी असताना.

आई आणि मुलाच्या नात्याची हळवी कथा


साथ तुझी असताना.


"... आणि आता याच विषयात आचार्य पदवी मिळविणाऱ्या श्रीमती रागिणी अविनाश तारे यांना मंचावर आमंत्रित करीत आहोत. त्यांच्याबद्दल विशेष सांगायचे झाले तर वयाच्या पन्नाशीतही नेटाने अभ्यास करून, अगदी झोकून देऊन त्यांनी ही आचार्य पदवी संपादन केलीय. ते खरंच कौतुकास्पद आहे."

निवेदिकेने रागिणीचे नाव घेतले तशी ती मंचावर आली.
पन्नाशीतील असली तरी अजूनही चाळीस - पंचेचाळीशीतील वाटावी अशीच ती दिसत होती. सोनेरी काठ असलेली शुभ्र अशी कॉटनची साडी, अगदी माफक मेकअप असलेल्या गोरापान चेहरा, ओठावर हलकी गुलाबी लिपस्टिक आणि केसात माळलेला मोगऱ्याचा गजरा. तो सुगंध विद्यापीठाच्या मंचावर प्रसन्न छटा पसरवून गेला.

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला साक्षात माननीय राज्यपाल आले होते आणि त्यांच्या हातून पदवी स्वीकारताना रागिणीचा ऊर दाटून आला होता.


तिने मंचावरूनच खाली बसलेल्या प्रेक्षकाकडे नजर टाकली. तिला अपेक्षित असलेला 'तो' तिच्याकडे अभिमानाने बघत होता. तो म्हणजे तिचा लेक अमेय.

ऊर हिचा दाटून आला होता डोळे मात्र त्याचे वाहत होते.


"फायनली यू डिड इट! काँग्रॅच्यूलेशन्स! आय एम रिअली प्राऊड ऑफ यू." ती जवळ येताच त्याने तिला मिठी मारली.

"थँक्स अमु. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. तू प्रोत्साहन दिलं नसतंस तर मला कुठे रे जमलं असतं?" त्याचे डोळे पुसत ती म्हणाली.

"काही काय गं आई? तू प्रयत्न केलेस म्हणून तुला यश मिळालं आणि खरंच तुला श्रेय द्यायचे असेल तर बाबांना दे, मला नको." अमेय तिचा हात हातात घेत म्हणाला.

त्याच्या उबदार स्पर्शाने तिला पुन्हा भरून आले. किती आश्वासक स्पर्श, अगदी त्याच्या बाबासारखाच.


"चल मग आजचा दिवस मस्त एंजॉय करूया." कार्यक्रम आटोपल्यावर कुठेतरी बाहेर जाऊन सेलिब्रेशन करण्याचा बेत असलेला अमेय रागिणीला म्हणाला.

"अमेय,आधी घरी जाऊया ना. प्लीज?" घराच्या कातरओढीने रागिणी.


अमेय तिचा चेहरा बघून मंद हसला. त्याला कळत होते तिच्या मनातील भाव अन लागत होता तिच्या हृदयाचा ठाव. तसे त्याला तरी कुठे बाहेर जायचे होते? आई काय म्हणते हेच तर ऐकायचे होते.


त्यांची कार घरापाशी थांबली आणि त्याच कातरओढीने रागिणी आत आली. दिवाणखान्यात अवीचा मोठा फोटो फ्रेम करून ठेवला होता. फोटोला माळ घातली आहे हे ती विसरूनच गेली. त्याचे बोलके डोळे तेवढे मात्र तिला दिसत होते. आपल्या केसात माळलेला मोगऱ्याचा गजरा तिने हळूच काढला आणि त्याचा सुगंध हुंगून फोटोसमोरच्या टेबलवर ठेवला.


"..रागिणी, तू जेव्हा तुझ्या अवार्ड फंक्शन साठी जाशील ना, तेव्हा मस्तपैकी पांढरी साडी नेसून जाशील, सोनेरी काठ असलेली.

आणि हो, केसात गजरा माळायला विसरू नकोस. कसली भारी दिसशील यार तेव्हा. स्टेजवर जाशील ना तेव्हा अभिमानाने मी टाळ्यांचा गजर करत राहीन. खूप अभिमान वाटेल मला तेव्हा तुझा."

गजऱ्याच्या सुगंधात रागिणी भूतकाळाच्या सुगंधी आठवण रमली.

"छे! रे अवी. कसल्या कल्पनेत रमतोस तू? मला हे असलं पीएचडी वगैरे काही करायचं नाहीये आणि तुलाही हे माहिती आहे." त्याच्या दाट केसात हाताने चाळा करत ती म्हणाली.

"असं कसं म्हणतेस गं? हुशार आहेस तू. जवळ अर्थशास्त्राची पदवी आहे. जमेल तुला."

"नाऽऽही." रागिणी ठाम स्वरात म्हणाली.

"राग.."

"तेच. मला फक्त राग व्हायचाय." त्याला मध्येच थांबवत ती म्हणाली.

"तुझ्या प्रेमाच्या संगीतातील राग! अवी,आत्तापर्यंत खूप अभ्यास केला, शिकले. पण आता बास. आता मला फक्त आपला संसार करायचा आहे. तू, मी आणि आपला अमु.

तू ऑफिसला गेलास की तू येईपर्यंत तुझी वाट पाहणं, तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुला शोधणं, सायंकाळी परतलास की तुझ्याशी गप्पा मारत चहा घेणं.. कसलं रोमँटिक आहे हे यार!

अमुच्या बाळलिलेत रमणं, घर आवरणं, हे सगळं आवडतं रे अवी मला. तू उगीच ते अर्थशास्त्राचे जाडजूड पुस्तकं घेऊन पीएचडी कर म्हणून माझ्या पाठी लागू नकोस." ती.

"अगं परत एकदा अभ्यासाला लागलीस की आवडेल तुला." तो.

"काय आवडेल रे? ते अकॉउंट, बँकिंग आता आपल्या पल्ले नाही पडायचं ब्वॉ! आपल्या घराचे अर्थकारण सांभाळतेय हेच माझ्यासाठी खूप आहे. कळलं?" त्याचे नाक ओढत ती म्हणाली.

"आता माझं नको ऐकू. नंतर वेळ गेल्यावर म्हणशील की अवी तयार होता, पुस्तकही आणणार होता पण मीच माती खाल्ली आणि त्याचं ऐकलं नाही."

"चल रे, असं काही होणार नाही."

"बघू बघू. मी नसल्यावर कळेल तुला." तो नाक फुगवून म्हणाला.

"मी कुठे जाऊ देईन तर जाशील ना?" ती त्याचे फुगलेले नाक पुन्हा ओढून म्हणाली.

"आणि हे शेवटचं सांगते बरं, तुला करायच्या असतील तर ढीगभर पीएचड्या कर, मात्र माझ्या मागे लागू नकोस. मला माझा संसार करायचा आहे.."


भूतकाळात रमलेल्या रागिणीच्या डोळ्यात पाणी केव्हा जमा झाले कळलेच नाही.

"आई " मागून अमेयने मिठी मारली तशी ती वर्तमानात परत आली.

"ए, रडू नकोस ना गं." समोर येत त्याने तिचे अश्रू पुसले.

"अवी असाच होता, सेम तुझ्यासारखा. असाच मागून येऊन मिठी मारायचा. त्याने मला कधी रडू दिलेच नाही आणि मग गेला रे मला एकटीला सोडून. पुन्हा कधीच न परतण्यासाठी." अमेयच्या मिठीत पडून ते हमसून हमसून रडू लागली.


"बाबा कुठे गेलेत? ते आहेत की आपल्यामध्येच आणि तू कुठे एकटी आहेस? मी सोबत नाहीये का? तूच तर नेहमी म्हणतेस की मी अगदी बाबा सारखा दिसतो. तोच रंग, तोच चेहरा तसाच हँडसम! हो की नाही?" लहानसा चेहरा करून अमेय म्हणाला.


"हो आणि रुसतोस देखील तसाच." डोळे पुसत ती म्हणाली.

"अवघ्या दहा वर्षाचा होतास रे अमु तेव्हा तू. आमच्या लग्नाची अकरावी ॲनिव्हर्सरी होती. मला सरप्राईज द्यायचं म्हणून अवी ऑफिस मधून लवकर निघाला आणि येताना झालेल्या ॲक्सिडेंट मध्ये तो मला कायमचा सरप्राईज देऊन गेला." तिचा पुन्हा हुंदका दाटला.

"आई, मी आहे ना? मी कधीच तुला सोडून जाणार नाही. आता डोळे पूस बघू. अशी रडत असलेली बाबाला तू आवडत नाहीस हे माहितीय मला आणि बाबा तुम्ही नुसते बघत काय बसलाय हो? तुमच्या बायकोला पीएचडीची पदवी मिळालीय त्याचा आनंद नाही का झाला? " त्याचा स्वर हळवा झाला होता.

"मी तर तुमच्या आवडीचे आईस्क्रीम पण घेऊन आलोय आणि आम्ही आता मस्त पार्टी करणार आहोत." डोळे पुसत तो स्वयंपाकघरात निघून गेला.

*****

रात्री दहादा या कुशीवरून त्या कुशीवर पलटून सुद्धा रागिणीला झोप येत नव्हती.

ती बेडवरून उठली आणि टेबलावरचा अवीचा फोटो हातात घेऊन छातीशी कुरवाळत राहिली. मनाच्या गाभ्यात तळ ठोकून असलेल्या सगळ्या आठवणी पुन्हा नजरेसमोर येत होत्या.

अवी अचानक ॲक्सीडेन्ट मध्ये गेला आणि सगळे होत्याचे नव्हते झाले. तिची सावलीच जणू अंतर्धान पावली होती. आजवर बाहेरच्या जगाशी काही देणे घेणे नसलेल्या रागिणीला व्यवहारी जगात पाय ठेवावे लागले. पदरात दहा वर्षाचे लेकरू पण तिने त्याला नेटाने सांभाळले.

अमेय हुशार होता. जसे डोक्यावरून बाबाचे छत्र गेले तसे लवकर मोठाही झाला. रागिणीने त्याला कशाची कमी पडू दिली नाही पण बाबाचा कोपरा मात्र रिकामाच राहिला. बघता बघता दहा वर्षाचा चिमुकला अमु मोठा होऊन हुशारीच्या बळावर बँकेत मोठया पदावर आरुढ झाला. रागिणीला मुलाच्या कर्तृत्वाचा अभिमान होता. स्वतःबद्दल मात्र एक सल मनात रुतून राहिली होती.


एकदा दुपारी अमेय घरी परतला तर त्याला आईचे एक वेगळेच रूप दिसले. त्याच्या पुस्तकांच्या रॅकमधल्या अर्थशास्त्राच्या पुस्तकात ती हरवली होती.

"आई काही हवं होतं का?" त्याच्या प्रश्नाने ती भानावर आली.

"नाही रे ते असंच.." तिचा भिजला स्वर त्याने बरोबर ओळखला.

"रडते आहेस तू?" तिच्यासमोर उभे राहत त्याने विचारले.

"अहं." तिने हळूच डोळे पुसले.

"आई, तुला शपथ आहे माझी. काय झाले ते सांग मला."

त्याने शपथ घातली तसे तिने कधीतरी अवीने बोललेल्या पीएचडी बद्दल सांगितले. त्यावर टेंशनमध्ये आलेला तो खळखळून हसला.

"एवढंच ना? मग कर की आता पीएचडी." तिला खुर्चीवर बसवत तो.

"काही काय अमु? आता नाही जमायचे मला. पन्नाशीची होत आलेय मी."

"अरे, त्यात काय झालं? शिक्षणाला कुठे वयाचं बंधनं असतं?" अमेय.

"अभ्यास नाही झेपवणार रे मला."

"का नाही झेपावणार? अगं बँकेत मोठया हुद्द्यावर असलेल्या एका स्कॉलरची आई आहेस तू. त्यामुळे हुशार तर नक्कीच असशील." तो मिश्किल हसत म्हणाला.

"आणि अडलंच कुठे तर मी आहे ना? मी मदत करेन तुला.
पण आता नाही म्हणशील आणि मग जेव्हा खरंच म्हातारी होशील आणि तुझे नातवंड पीएचडी करत असतील, तेव्हा म्हणू नको की अमु हो म्हणाला होता, मदतीलाही तयार होता, पण मीच माती खाल्ली."

तो हसत बोलत होता आणि रागिणीला अवीचे तेच शब्द आठवले. काही वर्षांपूर्वी तोही काहीसे असेच बोलला होता. क्षणभरासाठी वाटलं की अमेय नाही तर अवीच तिथे उभा आहे. तोच चेहरा, तोच वर्ण, तसाच हँडसम आणि कॉन्फिडन्ट!

"अमु, तू आहेस ना माझ्यासोबत? मग मी करेन हे." नकळत ती बोलून गेली आणि तिच्यातील आत्मविश्वास बघून अमेयने तिला उचलून गोल गोल फिरवले.

"ये हुई ना बात. आत्ता खरी तुझ्या अमेयची आई शोभतेस." तो म्हणाला तसे ती हलकेच हसली.


अमेयच्या बोलण्याने तिच्यात एकाएकी कुठली ऊर्जा आली तिलाच कळले नाही. त्याच्या मदतीने मग प्रवेश परीक्षा, गाईडची शोधाशोध आणि प्रबंधाचा विषय निवडला आणि बघता बघता तीन वर्षांच्या काळात सादर देखील केला. आज त्याचीच परिणती म्हणून तिला आचार्य पदवी बहाल करण्यात आली होती.


रात्र सरत आली होती रागिणी तशीच फोटोला छातीशी घेऊन खिडकीतून बाहेर बघत होती.

"अवी, आपल्या अमुमुळे तुझी इच्छा आज पूर्ण झाली रे." फोटोकडे बघत ती म्हणाली.


काहीतरी मनात येऊन ती अमेयच्या खोलीत गेली. तो गाढ झोपला होता. तिने हलकेच त्याच्या केसातून हात फिरवला.

"आई, अजून झोपली नाहीस का गं?" पेंगुळलेल्या आवाजात अमेयने विचारले.

"झोपते रे बाळा. अमु तुला थँक्स म्हणायला आले होते. थँक्स राजा. मला जशी साथ दिलीस ना तीच साथ लग्नानंतर तुझ्या बायकोला दे, हेच सांगायला आले होते." त्याला थोपटत ती म्हणाली.

"हो गं आई, हे सांगायची ही वेळ आहे काय? नेहाला भेटशील तेव्हा सांग ना." तो बरळत पुन्हा झोपी गेला.


"नेहा?" रागिणी मंद हसून तिच्या खोलीत परतली.


अवीचा फोटो जागेवर ठेवून तिने एक लांब श्वास घेतला. अचानक तिला खूप हलके हलके वाटत होते. सकाळी केसात माळलेल्या मोगऱ्याचा सुगंध श्वासात भिनू लागला होता.. पुन्हा एकदा!

*****समाप्त *****
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*