साथ स्वतःची (भाग-९)

Marathi katha, Marathi blog, Sath swathachi, part 9

     दुसऱ्या दिवशी मुग्धा अभ्यासाला लायब्ररीत जाते. अनामिका स्मृतीला फोन करून बोलावून घेते. आता स्मृती आणि अनामिका दोघी युक्तीला डॉक्टर कडे घेऊन जातात. आज त्या स्मृतीच्या ओळखीच्या डॉक्टर कडे आलेल्या असतात सेकंड ओपिनियन साठी! स्मृती युक्तीचे सगळे रिपोर्ट्स डॉक्टर ला दाखवते. अनामिका आधीच्या डॉक्टर ने काय काय सांगितलं होतं ते सगळं या डॉक्टरना सुद्धा सांगते. डॉक्टर रिपोर्ट्स बघतात... युक्तीला पुन्हा तपासतात आणि आधीच्या डॉक्टरने जे सांगितलं आहे ते बरोबर आहे तुम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपचार सुरु करा. युक्ती होईल बरी उपचाराने असं सांगतात. आता तिघी डॉक्टर ने ज्या नवीन टेस्ट करायला दिलेल्या असतात त्या करण्यासाठी जातात. सगळ्या टेस्ट होतात.... रिपोर्ट्स उद्या सकाळी  मिळणार असतात...
स्मृती:- अनामिका तू आणि युक्ती आता घरी जा! मी ऑफिस ला जाते. आणि हो उद्या मी पण येतेय तुमच्या बरोबर! आपण आधी रिपोर्ट्स घेऊ आणि मग लगेच डॉक्टर कडे जाऊ. या फाईल माझ्याकडेच ठेवते! सावकाश घरी जावा दोघी. 
युक्ती:- थँक्यू गं मावशी! खरंच आज तू आहेस म्हणून आई सगळं धीराने घेतेय... आणि आता तुझ्या मदती मुळेच हे मुग्धा पासून लपवून ठेवता येतंय! 
स्मृती:- चूप वेडा बाई! मावशी म्हणतेस आणि आभार कसले मानतेस! जास्त विचार करणं सोडून दे.... लवकर बरं व्हायचं आहे ना.... आपली कंपनी तुला खूप मोठी करायचिये ना... मग असं आजारी राहून कसं चालणार आहे... लवकर बरी हो आणि एवढा विचार नको करत जाऊस! 
अनामिका:- स्मृती मावशीचं तरी ऐक.... आता कासलंच टेन्शन घ्यायचं नाही... सगळं छान होणार आहे! 
युक्ती:- हो... हो... नाही घेत कसलं टेन्शन... बरं चल मावशी बाय बाय... भेटू उद्या...
असं म्हणून अनामिका आणि युक्ती घरी जातात. 
        दुसऱ्या दिवशी रिपोर्ट्स घेऊन अनामिका, युक्ती आणि स्मृती डॉक्टर कडे जातात. डॉक्टर सगळे रिपोर्ट्स बघतात.... 
डॉक्टर:- हम्म... हे रिपोर्ट्स आहेत तसे नॉर्मल.. म्हणजे मला ज्या कॉम्प्लिकेशन्स असतील असं वाटत होत त्या तरी नाहीयेत.... ऑपरेशन ची सध्या तरी गरज नाहीये.... नंतर हि ट्रीटमेंट ला कसा प्रतिसाद देते त्या वर हे रिपोर्ट्स बदलत राहतील. आत्ता मी औषधं बदलून देतोय... हा डोस जरा हेवी असेल त्यामुळे सारखी झोप येईल.... निदान आठवडा भर तरी कुठे बाहेर जायचे नाही फक्त आराम करायचा..... असं म्हणून डॉक्टर युक्तीला पुन्हा तपासून औषध बदलून देतात. आता मला तुम्ही तीन दिवसांनी दाखवायला या... काय प्रोग्रेस आहे हे बघून मग आपण पुढे काय करायचं हे ठरवू! 
        डॉक्टर कडून आता तिघी निघतात... स्मृती सगळे युक्तीचे रिपोर्ट्स घेऊन जाते. घरी आल्यावर अनामिका पटकन युक्तीला गरमा गरम खिचडी बनवून देते... खाऊन झाल्यावर युक्ती औषध घेऊन गाढ झोपते आणि उठते ती डायरेक्ट संध्याकाळी मुग्धा घरी आल्यावर! अनामिका मुग्धाला चहा करून देते. 
मुग्धा:- आई आज मी खूप खुश आहे... माझी जवळ जवळ तीन वेळा माझा सराव झालाय आणि मागच्या १० वर्षांचे पेपर सुद्धा सोडवलेत मी... परीक्षा एका आठवड्यावर आली आहे...
अनामिका न कळत बोलून जाते हो ना... आठवडा फार महत्वाचा आहे... पण सुदैवाने मुग्धाला संशय येत नाही... ती म्हणते; "अगं आई! नको काळजी करुस... मला माहितेय आठवडा फार महत्वाचा आहे... म्हणूनच मी आता विचार केलाय घरात बसून अभ्यास करणार... जेणेकरून माझा येण्या - जाण्याचा वेळ ही वाचेल..." हे ऐकून मात्र अनामिकाच्या पायाखालची जमीनच सरकते!  
        अनामिका मनातल्या मनात म्हणते; बापरे! आता ही घरातच बसणार तर हिला युक्तीच्या आजाराबद्दल कळायला वेळ लागणार नाही... आणि जर लायब्ररीत जा म्हणलं तर संशय येईल मी का असं म्हणतेय म्हणून... काहीतरी मार्ग काढला पाहिजे यातून... असा विचार करून अनामिका मुग्धाला म्हणते, चल मी खाली जाऊन भाजी घेऊन येते. दिदी झोपली परत तर उठवू नकोस तिला... आज जरा ऑफिस मध्ये जास्त काम होत त्यामुळे दमली आहे ती... असं म्हणून बाहेर पडते. बाहेर आल्यावर ती स्मृतीला फोन करते... 
अनामिका:- हॅलो स्मृती... अगं मोठा घोळ झालाय.... मुग्धा आता घरातच थांबून अभ्यास करणार म्हणतेय... आपण सारखं डॉक्टर कडे जातोय आणि युक्ती कामाला येत नाहीये हे समजेल गं तिला.... तुझी हरकत नसेल तर युक्ती तुझ्याकडे येऊन राहिली तर चालेल का तुला? मुग्धाला सांगूया ऑफिसच्या कामासाठी काही दिवस तुझ्याकडे राहणार आहे ती... म्हणजे तुला सुद्धा अभ्यासात डिस्टर्ब नाही होणार... 
स्मृती:- अगं मग त्यात विचारायचं काय... चालेल कि मला... युक्ती माझी पण मुलगीच आहे!
क्रमशः....

(टीप:- वरील कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाचा याच्याशी काहीही संबंध नाही. यातून कोणाचाही अपमान करण्याचा किंवा कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

🎭 Series Post

View all