अनामिकाची नविन वाटचाल सुरु होते. स्मृती ने सांगितल्या प्रमाणे सगळं नीट सुरु असतं. काही महिने उलटतात.... अनामिका कडे आता आधी पेक्षा भरपूर काम येत असतं! आता वेळ आलेली असते ती छोटंसं दुकान घेण्याची. अनामिका स्मृतीशी या विषयावर बोलून घेते आणि एक छोटंसं पण सध्या भाड्याने मौक्याच्या जागी असलेलं दुकान घेण्याचं ठरतं. काम वाढलं असल्यामुळे आता अनामीकाकडे काम करणाऱ्या बायकांची संख्या पण वाढलेली असते. एव्हाना युक्ती आणि मुग्धाच्या शाळांची सुट्टी पण संपलेली असते आता मुग्धा ५वी आणि युक्ती ७वीत म्हणजे दोघी एकत्र शाळेत जातील त्यामुळे अनामिकाची काळजी जरा कमी होते. आता दोघी सकाळी क्लास ला आणि नंतर शाळेत म्हणजे त्यांना कोण बघणार ही काळजी अनामिकाला नसते.
स्मृती आणि अनामिकाच्या परिश्रमांना फळ मिळतं! त्यांना हवं तसं दुकान मिळत. दुकानाचं उदघाटन अनामिका आणि तिच्या कडे काम करणाऱ्या महिला मिळून करतात आणि सुरु होते तिच्या जीवनातल्या नवीन पर्वाला! दुकानामुळे आता अनामिकाची अजूनच जाहिरात होत होती आणि अजून काम वाढले... सध्या तिची अक्षरशः तारेवरची कसरत चालू होती... मुलींचे डबे, त्यांना क्लास आणि शाळेत सोडणं, agency चे काम, दुकान सांभाळणे आणि परत शिवणाचे क्लास पण होतेच! पण तरीही न डगमगता ती सगळं पेलत होती. युक्ती आणि मुग्धा पण अगदी समजूतदार पणे वागत होत्या... त्यांनीही कधी अनुप चा विषय काढून आईला त्रास नाही दिला कि कधी कसला हट्ट केला नाही. उलट लग्नाच्या वाढदिवसाला जेव्हा अनामिकाला खूप त्रास व्हायचा तेव्हा याच दोघी समजून तिला शांत करायच्या! मदतीला स्मृती होतीच... ती सुद्धा अनामिकाला तिच्या आयुष्याची सकारात्मक बाजू दाखवून अजून खंबीर करायची.
असेच काम करता करता अजून काही महिने जातात.... आता अनामिकाच्या शिलाई च्या व्यवसायातूनच सगळा खर्च निघून बऱ्यापैकी बचत पण होत असते... स्मृतीशी चर्चा करून ती आता agency च काम सोडून देण्याचा निर्णय घेते जेणेकरून पूर्ण लक्ष व्यवसायावर देता येईल आणि यामुळे मुलींना पण वेळ देता येईल. ठरल्या प्रमाणे अनामिका agency सोडून देते आणि व्यवसायावर लक्ष केंद्रित करते. व्यवसाय विस्तार वाढवण्यासाठी आता ती आर्टिफिशियल ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फुलांचे पुष्पगुच्छ करायला शिकून घेते आणि गरजू महिलांना हाताशी घेऊन ते काम पण सुरु करते. सगळं काही सुरळीत चालू असतं! तिच्या फिनिशिंग आणि चोख कामाची चर्चा आता दूर दूर पसरत असते. अनामिकाकडे आलेला कोणताही ग्राहक निराश होऊन जात नसतो, उलट तोच अजून दोन चार नवीन ग्राहक घेऊन येत असतो. हळूहळू अनामिकाचा आत्मविश्वास अजून वाढतो; जो तिला अजून जोमाने काम करण्यास प्रवृत्त करतो. अशीच व्यवसायात वाढ होत होत दोन - तीन वर्ष निघून जातात. एव्हाना घराचे पण हप्ते जास्त जास्त भरून तिने कर्ज संपवत आणलेलं असतं. दुकान पण आता भाड्याचं नसून तिचं स्वतःचं असतं! तिची प्रगती, वाढलेला आत्मविश्वास, जिद्द हे सगळं बघून स्मृती तिच्या समोर अजून एक प्रस्ताव मांडते; "बघ अनामिका तुझा विस्तार आता वाढत चाललाय... आता हीच ती योग्य वेळ आहे तू स्वतःच विश्व उभं करण्याची! व्यवसायासाठी तू जी बचत करत होतीस ती पण आता बऱ्यापैकी वाढली आहे. आता वेळ आलीये ती तुझ्या नावाची एक कंपनी बनवायची! एक ब्रँड बनवायची! युक्ती आणि मुग्धा पण आता बऱ्यापैकी मोठ्या झाल्यात... त्यांना आता स्वतःची काळजी स्वतः घेता येते, अभ्यास पण करतात दोघी मिळून.... हीच ती संधी आहे... गमवू नकोस..."
अगं हो हो... जरा श्वास घे.... आणि मला विचार करायला वेळ सुद्धा हवाय... एकदम एवढं मोठं पाऊल उचलून पडायला नको गं! इतक्या वर्षांची मेहेनत पणाला लावायचिये... अनामिका म्हणाली! स्मृती बोलू लागली; "ओ मॅडम जरा ऐकता का माझं... तुझी काळजी स्वाभाविक आहे कदाचित मी तुझ्या जागी असते तर हेच केलं असत... पण ऐक आधी माझं... बघ आता घराचं कर्ज फिटत आलंय.... त्या साठी काही जास्त हप्ता जात नाहीये... आपल्याकडे व्यवसायचं saving वेगळं ठेवलेलं आहे.... सरकारी योजने अंतर्गत तुला महिलांसाठी व्यवसाय कर्ज कमी व्याजदरात मिळेल..... आपण इन्व्हेस्टर्स शोधून त्यांना कंपनीत शेयर्स देऊ शकतो.... तुझं नाव आधीच प्रसिद्ध झालंय त्यामुळे जास्त काही त्रास नाही होणार.... उलट स्वतःहून इन्व्हेस्टर्स पुढे येतील... आणि या मुळे ज्यांना खरंच कामाची गरज आहे अश्यांना सुद्धा काम मिळेल... त्यांच्यात लपलेली कला बाहेर येईल...." अनामिका म्हणाली; बरं ठीक आहे! तसही इन्व्हेस्टर्स मिळे पर्यंत मला वेळ मिळेल मनाची तयारी करायला! स्मृतीचे शब्द अनामिकाच्या मनात सतत घोळत असतात आणि त्यातूनच ती अजून जोमाने काम करून savings अजून वाढवते! मुंबईच्या सगळ्या वेस्टर्न लाईन वर अनामिका क्रीयेशन्स नाव गाजलेलं असत... इन्व्हेस्टर्स शोधता शोधता साधारण चार ते पाच महिने जातात... स्मृती आणि अनामिका मिळून सगळा business plan तयार करतात... फक्त मुंबईतिल काही भागांपूर्त नाव मर्यादित न ठेवता अजून विस्तार करण्याच्या तिच्या धडाडी वृत्तीला चांगला प्रतिसाद मिळतो! अनामिका क्रीयेशन्स आता पूर्ण मुंबईत नावारूपाला येते... कंपनीत कारकुनी कामासाठी भरती होते, शिलाई काम आणि बाकी कामासाठी नविन महिलांची ट्रेनिंग सुरु होते, सगळ्यात आधी अनामिका सोबत काम करणाऱ्या काकूंना ती सुपरवाईझर करते! इतर माहिल्यांच्या कामाचं फिनिशिंग, quality हे त्या तपासत असत!
बघता बघता मोठं मोठ्या ऑर्डर्स अनामिकाला येऊ लागल्या.... अनामिकाच्या सांगण्यावरून स्मृती सुद्धा आता अनामिका बरोबर काम करू लागली.... दोघींचं चांगलं बॉण्डिंग नवनवीन कल्पना उतरवत व्यवसायाचा विस्तार अजून वाढवत होत! या उलट तिकडे अनुप जुगारापाई सगळं गमावून बसला होता... पण त्याचा अहंकार फार वाढला होता..... मी का जाऊन बोलू? मला काही गरज नाहीये... याच अविर्भावात तो राहत होता... अनामिकाची प्रगती त्याला समजली होती... इर्षेपोटी तो सुद्धा तिच्यापेक्षा मोठं होण्याची स्वप्न बघत होता... पण ती फक्त स्वप्नच होती... इथे अनामिकाच्या आयुष्यातला वाईट काळ संपला होता... अनुप तर अनामिकाच्या मनातून उतरला होता त्यामुळे तो परत आला असता तरी काही फरक पडला नसता... युक्ती आणि मुग्धाला सुद्धा आईच जवळची होती... ज्या वयात त्यांना त्यांच्या बाबाच प्रेम मिळायला हवं होतं तेव्हा मिळालं नव्हतं... त्यामुळे त्यांनाही अनुप विषयी काहीही भावना मनात शिल्लक नव्हत्या... त्या तिघींच आयुष्य मस्त सुखात आणि समाधानात चाललं होतं.... सोबत स्मृती होतीच.... अनामिका जेव्हा तिच्या आयुष्याच्या पुस्तकात मागे डोकवायची तेव्हा तेव्हा ती स्वतःला एका नव्या रुपात बघत होती... तिच्या या यशामागे खरा मोठा वाटा युक्ती आणि मुग्धाच्या सामंजस्याचा आणि स्मृतीच्या आधाराचा होता! स्मृतीच्या आधाराने आणि मुलींच्या निरागस विश्वासाने तिने हे डोंगराएवढे दुःख पेलून स्वतःला सिद्ध केलं होतं...न डगमगता.... न हार मानता....!!
आज अनामिकाला सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिकेचा पुरस्कार प्रदान होणार होता.... तिच्यासारख्या असंख्य महिलांची ती प्रेरणा होती.... कोणाचीही साथ नसताना जेव्हा सगळेच सोडून जातात तेव्हा स्वतःलाच स्वतःची साथ देत जिद्दीने सगळी आव्हानं पेलत हसत मुखाने प्रसंगांना सामोरं जाण्याचं मंत्रमुग्ध उदाहरण आज समोर उभं होत.... तिच्या सारख्या अनेक स्त्रियांची प्रेरणा बनून....
क्रमशः ...
(टीप:- वरील कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाशी याचा काहीही संबंध नाही.... यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही.)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा