साथ स्वतःची (भाग-३)

Marathi katha, Marathi blog, Sath swatachi, bhag 3

      दुसरा दिवस उजाडतो..... अनामिका उठून सगळं आवरून घेते आणि मुलींना उठवायला जाते. आज दोघींही शहाण्या सारखं एका हाकेत उठतात आणि कसलीही टंगळमंगळ न करता स्वतःचं आवरून घेतात. अनामिकाला खरी काळजी असते ती मी कामावरून येई पर्यंत युक्ती आणि मुग्धा नीट राहतील ना? त्यांना एकटं राहण्याची सवय नाही.... पण दुसरा पर्याय सुद्धा नाहीये.... एकदा समजावून तरी बघूया काय म्हणतायत दोघी! असा विचार करून अनामिका दोघींना जवळ घेते आणि सांगते; "मी आता थोडा वेळात कामाला जाणार आहे; दुपारी तीन पर्यंत येईन. घरी सगळा स्वयंपाक करून ठेवलाय तुम्ही दोघी घेऊन खाल ना..... राहाल ना एकट्या??" युक्ती बोलते; "हो गं आई! नको काळजी करुस. आम्ही राहू.... आणि मी आहे ना मी मुग्धाची काळजी घेईन आणि आम्ही नीट जेवण पण करू.... तू जा बिनधास्त आणि जमलं तर लवकर ये कारण तुला परत शिवण शिवायचंय ना? मग तुला आराम कसा मिळेल?" अनामिकाला मुलींचा समजूतदारपणा बघून गहिवरून येतं. ती दोघींचा पापा घेते आणि सगळं आवरून निघते. जाताना भांडू नका गं दोघी आणि कोणी आलं तर दार उघडू नका.... मी किंवा स्मृती मावशी आलो तर हाक मारून सांगू तेव्हाच दार उघडा.... मी चावी घेऊन जातेय... झोप आली तर झोपा हा बाळांनो... आणि वेळेत जेवा.... अश्या सगळ्या सूचना देऊन बाहेर पडते. 
          इथे घरी टीव्ही पण नसतो. तरीही मुली शहण्यासारखं कसलाही गोंधळ न करता कुठे चित्र काढ, पत्ते खेळ किंवा बाहुलीशी खेळ असं करत वेळ घालवतात. दुपारी युक्ती दोघींसाठी जेवण वाढून आणते आणि दोघी पोटभर खातात. मुग्धा युक्तीला विचारते; "दिदी आता काय करायचं? आई यायला तर अजून वेळ आहे..." युक्ती मुग्धाला जवळ घेते आणि सांगते; "जा तुझं गोष्टीच पुस्तक आण मी तुला गोष्ट वाचून दाखवते आपण आता झोपूया हा" युक्ती मुग्धाला गोष्ट सांगत असते ती ऐकता ऐकताच मुग्धा झोपते; तिला झोपलेलं बघून युक्ती पण झोपून जाते. थोड्यावेळाने अनामिका घरी येते. तिची चाहूल लागताच युक्ती उठते! एरवी दहा हाका मारल्या कितीही आवाज केला तरी न उठणारी मुलगी आज फक्त एका चाहुलीने उठते! अनामिका म्हणते; "अरे बाळा झोपली होतीस ना झोप कि मग!" युक्ती उठते आणि म्हणते; "नको आई, झाली माझी झोप. तू थांब हा मी तुला पाणी आणते आणि जेवायला पण आणते. तू जेवून घे आणि थोड्यावेळाने शिवायला बस." असं बोलून पटकन आत जाते आणि अनामिकाच्या हातात पाण्याचा ग्लास आणि ताट आणून देते. एव्हाना मुग्धा पण उठते. दोघी आम्ही थोडावेळ खेळायला जाऊ का विचारून बाहेर जातात. अनामिका जेवून घेते. तिच्या मनात आज खूप भावना दाटून आलेल्या असतात. ज्या वयात कसलीही काळजी न करता, फक्त अभ्यास, खेळ आणि मौजमजा करायची त्या वयात युक्ती आणि मुग्धा खूपचं समजूतदार झाल्यात! 
          इतक्यात दारावरची बेल वाजते. स्मृती आणि अनामिकाची शिवण कामात मदत करणाऱ्या बायका आलेल्या असतात. अनामिका त्यांना काय काय काम करायचे आहे ते समजावून सांगते. त्या दोघी गेल्यावर स्मृती बोलू लागते; "तुझं काम अजून वाढवण्यासाठी माझ्याकडे काही कल्पना आहेत. एकदा ऐकून घे मी स्वतः तुला यात मदत करेन." तिला मधेच तोडत अनामिका बोलते; खरंच गं स्मृती तूच मला खूप मदत केली आहेस! मी आधी कामाला होते तेव्हाच्या थोड्या savings वापरून तूच मला हे काम करायला प्रेरणा दिलीस. कर्ज मिळवून देऊन आणि परत तू स्वतः थोडे पैसे घालून हे घर घ्यायला सुद्धा हिंमत दिलीस! खरंच तू जर मला मार्ग दाखवला नसता तर आज माझी खूप वाईट अवस्था झाली असती..... मग युक्ती आणि मुग्धाच काय झालं असत हा विचार पण करवत नाही गं! तू जे सांगशील मी नक्कीच ऐकिन.... माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. हे सगळं ऐकून स्मृती म्हणते; "बास ग बाई तुझं हे आभार प्रदर्शन.... नाही तर मी काही सांगणार नाही हा...." असं बोलून थोडं वातावरण हलकं करते. ऐक आता मी सगळं पद्धतशीरपणे मांडलं आहे... "तू सध्या डिजिटल मार्केटिंग म्हणजे सोशल मिडिया वरच तुझा व्यवसाय वाढवतेयस.... त्यामुळे होतंय काय कि, नविन लोकांना या बद्दल माहितीच नाहीये... ओळखीचे जे आहेत ते आणि त्यांच्या नात्यातले एवढेच लोक आपल्याकडे येतायत आणि कामात सातत्य राहत नाहीये. कधी खूप काम तर कधी काहीच नाही. म्हणून आता आपण तुझा एक ब्रँड बनवायचा... हो जरा वेळ जाईल यात पण तुझं कामाचं कौशल्य आणि जिद्दच याला उभारी देईल! बघ आपण आता एक website तयार करायची, सुरुवातीला फक्त मुंबईत वेस्टर्न लाईन वरच सर्विस देऊ. 
          या सगळ्याला चांगला प्रतिसाद येई पर्यंत तू शिवणाचे ऍडव्हान्स क्लास घ्यायला सुरुवात कर.. म्हणजे क्लास ची फी येईल ती आपल्याला website manage करायला वापरता येईल शिवाय कामाचा विस्तार वाढला की तुझ्या शिवणाच्या क्लास मधल्यांनाच काम देता येईल. त्यांना पण उत्पन्नाचा मार्ग मिळेल आणि तुझं काम पण हलकं होत जाईल. तुला काही रोज रोज agency च्या कामासाठी बाहेर जावं लागत नाही... तुझ्या सोयीप्रमाणे तू क्लास चे वार आणि वेळ ठरवं! सुरुवातीला अगदी २ जणं जरी आले क्लास ला तरी खूप आहे; वाढेल मग हळूहळू विस्तार...." हो चालेल तुझी हि कल्पना खूप छान आहे आणि माझी पण मेहनत करायला पूर्ण तयारी आहे. मी पण कुठून होलसेल मध्ये स्वस्त आणि मस्त मटेरियल मिळेल हे सर्च केलं आहे; त्यामुळे जर मोठी ऑर्डर आलीच तर लेस, धागे जे काही सामान लागतं ते कुठून आणि किती आणायचं हा अभ्यास मी आधीच करून ठेवलाय... अनामिका बोलली. उद्या आता या काकू पूर्ण केलेलं काम द्यायला येतील तेव्हा त्यांना क्लास च पण सांगेन म्हणजे कोणी ओळखीचं असेल तर क्लास पण सुरु होईल. स्मृती बोलू लागली; "अजून एक कल्पना आहे माझ्याकडे! तुझं शिवणकाम करून झाल्यावर बरेच कट पीस शिल्लक राहतात त्याच्या तू साध्या पण आकर्षक पर्स तयार करू शकतेस! या कस्टमर च्या आऊटफिट ला एकदम मॅचिंग पण असतील. ज्यांची मोठी ऑर्डर असेल त्यांना गिफ्ट म्हणून या पर्स द्यायच्या; आपोआप मग याची जाहिरात होईल आणि त्याच्या पण ऑर्डर्स यायला सुरुवात होईल." स्मृतीचं बोलणं ऐकून अनामिकाला नवीन हुरूप आला आणि ती बोलली; मस्तच गं! मी शिकून घेतेच आता. बरं ऐक थोडावेळ बस मी चहा टाकते आणि खायला काहीतरी आणते. बोलता बोलता संध्याकाळ झालीये, आता दोघी खेळून पण येतील त्यांना पण भूक लागली असेल असं म्हणून अनामिका चहा करायला जाते. एवढ्यात युक्ती आणि मुग्धा खेळून येतात. सगळे छान हसत खेळत चहा नास्ता करून घेतात. 
        स्मृती आता तिच्या घरी जाते. युक्ती आणि मुग्धा एकत्र गोष्टीचं पुस्तक वाचत बसतात आणि अनामिका रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागते! तिच्या मनात सतत विषय घोळत असतो; खरच स्मृती मुळे आज धीर मिळतोय. तीच नवीन नवीन मार्ग दाखवतेय आणि मला सावरायला मदत करतेय. युक्ती आणि मुग्धा पण आहेतच! एवढ्या लहान असून पण त्यांना सगळी जाण आहे. सुरुवातीला मला एकटं वाटत असलं तरी स्मृतीनेच मला धीर देत स्वतःच स्वतः कसं भक्कम बनायचं हे शिकवलं. आता तिने सांगितलेल्या काही नवीन कल्पना बहुतेक माझ्या आयुष्याला नवीन कलाटणी देणार आहेत. 
 क्रमशः....

(टीप:- वरील कथा पूर्णतः काल्पनिक असून यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कोणाचा अपमान करण्याचा हेतू नाही.)

🎭 Series Post

View all