साथ स्वतःची (भाग-२)

Marathi blog, Marathi katha, sath swathachi, bhag 2

      अनामिकाने सगळ्या सामानाची बांधाबांध करायला घेतली..... अनुप घरातच होता पण त्याला काही फरक पडत नव्हता... त्याने साधं विचारलं सुद्धा नाही तू मुलींना घेऊन कुठे जाणार आणि कशी राहणार! अडवायचं तर सोडाच पण उलट एकटाच बडबडत होता; "बरं झालं... तुम्ही तिघीही इथून जाताय... आता कुठे मला नीट जगता येईल! नाही तर रोज पोरींची कटकट होतीच बाबा फिरायला ने, बाबा आमच्या बरोबर खेळ, बाबा अभ्यास घे! Finally आता हे सगळं संपलं... हुश्श!!" हे सगळं अनामिकाने तर ऐकलंच पण तिथेच युक्ती आणि मुग्धा पण होत्या त्यांनी पण ऐकलं... दोघी रडायला लागल्या... आई खरंच आम्ही एवढा त्रास दिला का.... बाबा असं का बोलतोय... त्यांना सावरत, समजावत अनामिकाने विषय बदलला आणि सांगितलं काही नाही बाळांनो.. तुम्ही तर माझी गुणी बाळं आहात ना... असं रडायचं नाही जा तुमची सगळी वह्या, पुस्तक, खेळणी, सगळं एका बॅगेत भरा जा... दोघी आत गेल्यावर अनामिका अनुप ला म्हणाली; "निदान पोरींसमोर तरी गप्प बस! किती लहान आहेत त्या... त्रास होतो त्यांना..." या वर अनुप सरळ सरळ मला काही फरक पडत नाही.. लवकरात लवकर माझ्या घरातून निघा.....आणि हो मी घेतलेल्या वस्तुंना हातही लावायचा नाही... जे तू घेतलं आहेस तेवढंच घेऊन निघा... असं बोलून निघून गेला...  
        सगळ्या सामानाची बांधाबांध झाल्यावर ती युक्ती आणि मुग्धा कडे आली.... "बाळांनो हे काय हि खेळणी कोण भरणार?" या वर युक्ती म्हणाली; "अगं आई, तू घेतलेली सगळी खेळणी घेतली... पण मगाशी बाबा म्हणाला ना मी घेतलेल्या कशालाही हात लावू नका... ऐकलं मी ते... ही तर बाबा ने घेतलेली खेळणी आहेत.. नको आम्हला ती नाही तर परत बाबा ओरडेल..." अनामिकाने दोघींना जवळ घेतलं... त्यांचा पापा घेतला आणि गालावरून हात फिरवून म्हणाली चला आता खाली जाऊ... खाली गाडी आली आहे त्यात बसा तो पर्यंत मी सामान घेऊन येते.... युक्ती आणि मुग्धा जमेल तसं हलकं हलकं सामान घेऊन जातात आणि गाडीत बसतात.... अनामिका शेवटची नजर घरावर फिरवते.... प्रत्येक घराच्या कोपऱ्यात काही ना काही आठवणी असतातच! दोघींचे जन्म... त्यांचे पहिल्यांदा रांगणे, चालणे, बोबडे बोल, वाढदिवस... बरंच काही... जे क्षण अनुप आणि अनामिकाने दोघांनी एकत्र जगले असतात ते सोडून जाताना तिचं अंतःकरण जड झालेलं असंत... इतक्यात अनुप बाहेरून येतो; "झालं ना सगळं आता निघा लवकर... मला कामं आहेत..." अनामिका काही न बोलता स्वतःला सावरत आणि खोटं हसत खाली येते... गाडीत बाकीचं सामान ठेवते आणि युक्ती आणि मुग्धाला जवळ घेऊन बसते..... थोड्यावेळात नविन घर येतं...... अनामिका दोघींना घेऊन घरात जाते.... त्यांच्या आधीच्या घराइतकं जरी मोठं घर नसलं तरी युक्ती आणि मुग्धाला आईच्या कष्टाची जाण असते... त्या मस्त घरभर नाचतात... "ये... नविन घर... नविन घर..." अनामिका पण त्यांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत सगळा त्रास विसरून त्यांच्यात सामील होते. 
           थोड्यावेळात दारावरची बेल वाजते! अनामिका दार उघडते. अनामिकाची जिवाभावाची मैत्रिण स्मृती आलेली. स्मृती लगबगीने आत आली... तिच्या हातात बरेच सामान होते. आधी तिने युक्ती आणि मुग्धाला मस्त चॉकलेट दिले. दोघी खेळायला पळाल्या.. अनामिका स्मृतीशी बोलू लागली; खरंच स्मृती तू मला खूप मदत केलीस... खरं तर या सगळ्यात मी खूप तुटून गेले होते, पण स्वतःला सावरत मी काम केलं ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच. तूच मला प्रेरणा दिलीस नविन घर घेण्याची.... नाहीतर मी काम केलं असतं पण तिथेच कुढत राहिले असते! मला हिम्मतच झाली नसती हे पाऊल उचलण्याची. अनामिकाला तोडत स्मृती म्हणाली; "झालं का तुझं आभार प्रदर्शन!!! आता हे बघ मी काही सामान घेऊन आलीये ते लावूया पटकन... हे बघ थोडाफार किराणा, थोडी भांडी आणि घरात लागणार लहान मोठं सामान आणलंय...." अनामिका आता हळवी झाली होती; खरंच स्मृती तू देवासारखी धावून आलीस.... आम्ही तिघी तर फक्त कपडे आणि नावाला मी घेतलेले दोन चार डबे, ताटल्या एवढंच घेऊन आलो होतो. तिला शांत करत स्मृती म्हणाली; "अगं बास बास... आवर पटकन आपल्याला अजून खरेदीला जायचंय... आणि हो हा माझ्याकडून गृहप्रवेशाचा आहेर समजायचा.... त्यामुळे पैश्याची काळजी करू नकोस! आणि हो मला तुझं काही ऐकायचं नाहीये... हवंतर युक्ती आणि मुग्धा साठी त्यांच्या मावशी ने केलं असं समज...." 
         अनामिका स्मृतीला घट्ट मिठी मारते, स्मृती तिला सावरत धीर देते. एवढ्यात युक्ती आणि मुग्धा येतात! स्मृती दोघींना सांगते; "चला आता आपण आईला सामान लावायला मदत करूया मग आपण फिरायला जायचं." दोघी खुश होतात आणि थोडीफार मदत करतात. सामान लावून झाल्यावर आता चौघी बाहेर पडतात. बाजारात जाताना नेहमीसारखा आईस्क्रिम वाला युक्ती आणि मुग्धाला दिसतो, पण दरवेळे सारखं त्या हट्ट करत नाहीत. सरळ पुढे जात असतात.... हे अनामिकाच्या लक्षात येतं. एवढ्या लहान वयातच दोघींनी दाखवलेला समजूतदारपणा आणि आलेली परिस्थितीची जाण अनामिकाला अजून भक्कम होण्यासाठी मदत करते. सगळं सामान खरेदी करून चौघी घरी येतात.... परत सामानाची लावालाव करून अनामिका पार दमून जाते...... त्यात सतत झाल्या प्रकाराने तिला अजून त्रास होत असतो. स्मृतीच सगळ्यांसाठी छान खिचडी, कढी बनवते आणि तिघींना खाऊ घालते.... आज तर आता बरंच घरच काम झालेलं असत; पण अनामिकाची खरी परीक्षा उद्या पासून सुरु होणार असते... 

क्रमशः..... 

(टीप:- वरील कथा पूर्णतः काल्पनिक असून कोणालाही दुखावण्याचा किंवा कोणाचा अपमान करण्याचा हेतू नाही)

🎭 Series Post

View all