साथ स्वतःची (भाग-१)

Marathi blog, marathi katha, sath swathachi, part 1

       अनामिका आज खिडकीतून बाहेर एक टक लावून बघत बसली होती. आज अनामिकाच्या आयुष्यातला सगळ्यात खास क्षण होता.... ती ज्या दिवसाची वाट पाहत होती तो क्षण आज आला होता.... पण तिच्या मनात तर गेल्या काही महिन्यांचं दृश्य एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकत होतं!  अनामिका, अनुप (अनामिकाचा नवरा) आणि त्यांच्या युक्ती व मुग्धा दोन मुली असं चौकोनी कुटुंब!..... खरंतर सगळं छान चाललेलं! अनामिका आणि अनुप चा प्रेम विवाह! दोघेही उच्चशिक्षित! लग्नाला १५ वर्ष झाली आणि नियतीचे फासे उलटावे तसं सगळंच उलटलं..... अनुप च घरात असणं - नसणं सारखंच होतं. कधीकाळी कुटुंबावर प्रेम करणारा अनुप आता फारच बदलला होता. आता सगळी जबाबदारी अनामिकालाच पार पाडावी लागत होती! दोन्ही मुली अजून शाळेत होत्या; त्यांची शिक्षणं, घर खर्च आणि इतर सगळंच अनामिकाला पाहावं लागत होत! 
        अनुप एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्यावर कामाला होता. घसघशीत पगार आणि बोनस सुद्धा मिळायचा, पण अचानक वाईट संगतीत जाऊन त्याने कुटुंबाकडे लक्ष देणं सोडून दिलं! अजून मोठं होण्याच्या नादात... लवकर भरपूर पैसा कमावण्याच्या अट्टाहासापाई जुगाराच्या नादी लागला. युक्ती आणि मुग्धा होण्याआधी अनामिका सुद्धा एका प्रतिष्ठित कंपनीत कामाला होती; पण नंतर घरची जबाबदारी घेताना तिने नोकरी सोडून जवळ जवळ ६ - ७ वर्ष झाली होती. अनुपच्या बदलत्या स्वभावाचा अंदाज घेऊन तिने त्याच्याशी खूप बोलून समजवण्याचा प्रयत्न केला होता; तरी अनुप च्या डोळ्यावर तर आता स्वार्थाचीच पट्टी बांधली गेली होती त्याला कुठे कळत होती बायकोची तळमळ! एकेदिवशी भांडण एवढ्या विकोपाला गेलं की अनुप ने जाहीर करून टाकलं, "तू आणि तुझ्या मुली तुम्ही तुमचं बघून घ्या... मी काही तुम्हाला सांभाळणार नाही." त्या दिवशीतर अनामिका आतून पार तुटली! पण दोन्ही मुलींकडे बघून तिने धीराने घेण्याचं ठरवलं.  युक्ती आणि मुग्धा लहान असल्या तरी काहीतरी चुकीचं घडतंय आपला बाबा आता आपल्याशी आधी सारखा वागत नाहीये एवढं नक्कीच कळत होतं त्यांना... रोज रोज तेच वाद घरात होत होते.... युक्ती आणि मुग्धा ला आपल्यामुळे त्रास नको त्यांना आई बाबा दोघांचं प्रेम मिळावं म्हणून अनुपशी खूप वेळा बोलून तिने समजावण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग होत नव्हता; सासू - सासरे तर आधीच देवाघरी गेले होते, माहेरच्यांना त्रास नको म्हणून अनामिकाने त्यांना काही सांगितलं नाही! मित्र मंडळी समजवायला आली तर अनुप ने आमच्या खाजगी विषयात तुम्ही बोलू नका म्हणून त्यांना उडवून लावलं. 
          नोकरी सोडून इतकी वर्ष झाली होती म्हणून तिथे परत नोकरी मिळणं शक्य नव्हतं! अनामिकाने आता एका इन्शुरन्स कंपनीची एजन्सी घेतली होती आणि त्यावर ती सगळं घर सांभाळत होती. शिलाई काम तिला आधी पासूनच येत होतं! नेट वरून नविन नविन designs शिकून ती शिवणकाम सुद्धा करू लागली. डिजिटल मार्केटिंग शिकून अनामिकाने तिच्या कामाचा विस्तार सुद्धा वाढवला. दोन गरजू महिलांना हाताशी कामाला ठेवलं! या मुळे त्या महिलांना पण थोडे फार उत्पन्न मिळत होते आणि अनामिकापण मुलींना सावरत त्यांना वेळ देत होती. या सगळ्यात आपल्या मुलींना कोणतीही झळ बसू नये हाच एक ध्यास होता! या सगळ्या लढाईत अनुप मुळे सगळी नाती तुटली होती, कोणीही आपल्या मदतीला येणार नाही हे अनामिकाने ओळखलं होत! अनुपशी घटस्फोट घ्यायचा तर त्याचा सगळ्यात जास्त वाईट परिणाम युक्ती आणि मुग्धाच्या बालमनावर होणार म्हणून अनामिकाने हा विचार सोडून दिला होता. अनुप तर अनामिकाच्या मनातून पार उतरून गेला होता; एक बेशिस्त वागणारा, स्वतःच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून स्वतःच्या मुलींची पण जबाबदारी नाकारणाऱ्या अनुप चा तर खूप राग येत होता अनामिकाला.... 
        प्रसंगी तिला फार अस्वस्थ आणि असहाय्य वाटायचं पण युक्ती आणि मुग्धाचा चेहरा डोळ्यासमोर आल्यावर ती स्वतःला सावरत होती.आता पुन्हा कधी हार न मानता, न रडता प्रसंगाला तोंड द्यायचंच हे तिने मनाशी ठरवून टाकलं होतं! स्वतःच स्वतःला प्रोत्साहन देत तिने आज समाजात तिचं नाव उभं केलं होतं आणि आज इतक्या महिन्यांच्या परिश्रमाने तिने एक नविन घर घेतलं होतं...... ज्यात फक्त ती, तिच्या मुली आणि सुखच राहणार होतं!  स्वतःला स्वतःची साथ देत, पाठबळ देत ती आज मोठी झाली होती कायम भक्कमपणे उभं राहण्यासाठी! कधीही हार न मानण्यासाठी..... 
          
तुमचा अभिप्राय नक्की सांगा.... suggestions always welcome....

(टीप:- वरील कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाशी याचा काहीही संबंध नाही... यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा अपमान करण्याचा हेतू नाही...)

🎭 Series Post

View all