Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

साथ प्रेमाची

Read Later
साथ प्रेमाचीकथेचे नाव : साथ प्रेमाची
विषय: ...आणि ती हसली
फेरी: राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा


शांत अशी संध्याकाळ नेहमीच मनाला भुरळ घालते, त्यातल्या त्यात,जर का मनाला या सुंदर अशा सोनेरी सायंकाळच्या वेळी छानसा आकाशाचे ते तपकिरी प्रतिबिंब उमटविणारा समुद्र किनारा लाभला की, मग तर जणू सोन्याहून पिवळचं. मनातील लाखो विचारांची चलबिचल अगदीच त्या फेसाळलेल्या लाटेप्रमाणेच उफाळून येते.

अगदी अशीच प्रिया ही त्या उसळणाऱ्या लाटांकडे एकटक पाहत कसलासा विचार करत त्या कातरवेळी समुद्र किनारी पाण्यात पाय बुडवून बसली होती.

मनात कोणता एकच विचार असेल तर धड त्यावर पर्याय, मार्ग निघेल, पण इथे नुसतेच प्रश्नांचे थैमान होते.जणू प्रश्नांनी, शंकानी प्रियाला ग्रासले होते आणि त्या प्रश्नांच्या गर्दीत ती इतकी गुंतली होती की, तिला वेळेचे ही भान उरले नव्हते.
झाडाच्या पाना फांद्यांच्या खिडकीतून डोकावणारी ती सोनेरी किरणे ही आता हलकेच त्या सुंदर अशा समुद्र किनाऱ्याचा निरोप घेत मावळतीकडे मार्गस्थ झाली होती. इवले इवले पक्षी ही आता किलबिलाट करत आपापल्या घरट्यांकडे सरसावले होते,पण या सगळ्यातुन भिन्न अशी आपल्याच विचारांची एक वेगळीच दुनिया थाटून प्रिया तेथेच खिन्न होऊन बसली होती.

अशातच अगदीच चोरपावलांनी पाठीमागून येवून कोणी तरी तिचे डोळे बंद करतो आणि विचारांच्या गर्दीत कळत नकळत ओलावलेली तिच्या डोळ्यांची कोर सहज त्याच्या हाताला भासते. त्या ओलावलेल्या कोरांनी प्रियाच्या मनाची अस्वस्थता जाणवत त्याचा मस्ती मजा करायचा मूडचं निघून जातो. त्याचं ही मन नकळतपणेच काळजीत वाहू लागतं. काय झाले असेल? या विचारात तो ही क्षणभर बुडून गेला होता.

काही बोलावं, हात काढून घ्यावे तोवर प्रियाचे मऊ मखमली हात त्याच्या हातांवर येतात आणि तिच्या गोड गुलाबी ओठांतून हळूवारपणे "देवांश" नाव येतं.

क्षणभराच्या विचारांच्या तंद्रीतून लगेच सावरत तसाच तिच्या पाठीमागून थोडासा तिच्या तोंडापुढे झुकत देवांश म्हणाला,
"तू कसं ग नेहमीच ओळखतेस?"

" हे ओळखणं तितकं कठीण नाहीच रे. मी तुझी अर्धांगिनी आहे. निदान तुझी चाहूल, तुझा स्पर्श तरी सहजच जाणवतो, मनाला भासतो."
त्याचे उबदार हात अलगदपणे आपल्या डोळ्यांवरुन खाली घेत प्रिया स्मित हास्य करत बोलली.

"तुला भारी जमतं बाबा, ए पण खूप छान वाटतं हा, जेव्हा कधी तू असं बोलतेस ना, तेव्हा जसा कानात मध ओतावा अश्या तुझ्या या मधाळ आवाजाने सगळं जग विसरुन गेल्यासारखं वाटतं आणि मग फक्त तुलाच ऐकत राहवसं वाटतं." म्हणत अगदी प्रेमाने प्रियाचा हात हातात घेत देवांश ही तिच्या बाजूला बसतो.

प्रिया त्याच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवत पुन्हा त्या उसळणाऱ्या लाटांकडे पाहत शांत बसून राहते.

"काय झालंय प्रिया?" हळूच प्रियाच्या हनुवटीला आपल्या हाताच्या दोन बोटांनी पकडून त्याच्याकडे फिरवत देवांश तिला विचारतो.


"काही नाही रे बस असंच." प्रिया देवांशच्या खांद्यावर डोकं टेकवून शांतपणेच म्हणाली

"काही तरी तर नक्की झालंय प्रिया, सांग ना काय झालंय?" तिच्या खांद्यावरुन हात टाकत देवांश प्रियाला त्याच्या उराशी कवटाळत म्हणाला.

कधी कधी अशा भावूक वेळी थोडासा भावनात्मक आधार भेटला की, दाबलेल्या हुंदक्याचा निश्चितच बांध फुटतो आणि अगदी अशाच देवांशच्या त्या प्रेमळ आधाराने प्रियाला तिचा हुंदका अनावर झाला, त्याच्या कुशीत शिरुन प्रिया मुसमुसायला लागली.

"अरे , काय झालंय सांगशील तर? माझं काही चुकलंय का?" देवांश पुन्हा प्रियाचा चेहरा हाताने वरती करत विचारतो.

"नाही काही रे,जाऊदे" स्वतःला सावरत, उलटा हात करुन मनगटाने डोळे पुसत प्रिया विषय टाळण्याचा प्रयत्न करत होती. पण मनावर झालेले वार तरी कसे इतक्या सहज मिटतील ना?खरं तर सांगायला बरंच काही होतं, पण काय आणि कसे सांगावे हेच तिला कळत नव्हते अशात प्रिया काय सांगणार होती? लग्नाला चार वर्ष झाले, कुठे नाही झाले तेच तिच्याच घरातील लोक तिच्या स्त्रीत्वाचा रिझल्ट देऊन रिकामे झालेले, कशी सांगेल त्यांच्या विषयी? म्हणून मग प्रिया तो विषय टाळत तशीच विचारांच्या गर्दीत गुंतत शांत बसून होती.

"मग?" देवांशने तिच्याकडे पाहून पुन्हा विचारले.

"आई काही बोलली का? काय झालंय? बाळा काही सांगशील तर कळेल ना. सांग तर काय झालंय?" देवांशने अबोल प्रियाला हलवत पुन्हा विचारतो.

देवांशच्या पुन्हा त्याच प्रश्नाने प्रियाच्या मनाला पुन्हा त्याच शब्दांचे चटके जणू नव्याने बसत होते, तिचे मन छिन्न विछिन्न होऊन तिला पुन्हा तेच शब्द आठवले जे सकाळी तिने घरात काम आवरत असताना सासूच्या तोंडून ऐकले होते.

शेजारच्या काकू मोठ्या मायेने प्रियाला ओठीभरणाचे(डोहाळ्याचे) आमंत्रण द्यायला आलेल्या, पण प्रियाच्या सासूबाईंनी त्या काकूंना मध्येच आडवले,
"अगं डोहाळ्याच्या ओटीभरणाला तू हिला बोलवायला आलीये का? अगं अजून तिचीच ओठी रिकामी आहे आणि तू? बघ बाई तुझं तू."
म्हणत सासूबाई मोठ्या तोऱ्याने हात झटकत किचनमध्ये निघून गेल्या आणि त्यांच्या मागेच त्या शेजारच्या काकू ही उलट्या पावली मागे निघून गेल्या.
देवांशच्या प्रश्नाने पुन्हा प्रियाला ते खोचक शब्द आणि तो सकाळचा सगळा प्रसंग आठवला आणि तिचा बांध फुटला,तशी हुंदक्या सरशी प्रिया बोलती झाली,

"एक स्त्री म्हणून माझी चूक आहे का? की एक सून म्हणून माझी चूक आहे?"
दोन्ही हातांची ओंजळ करून त्यात आपला चेहरा पुसत प्रिया बोलली.

"अगं, असं का बोलतेय? आई काही बोललीय का?" देवांशने प्रियाला आपल्या उराशी धरुन तिच्या गालावर हात ठेवत विचारले.

"लग्नाला चार वर्ष झाले अजून आपल्याला काहीच नाही.हा विषय सोडून दुसरा विषय असतो का रे त्यांच्याकडे कधी ? नेहमी आपलं तेच, घालून पाडून बोलायचं. शेजारणीशी बसल्या, बोलल्या की तोच विषय.अरे चार वर्ष म्हणजे फार काळ झाला का रे हा लग्नानंतर? आणि झाला ही असेल तरी, असं बंधनकारक आहे का? की चार वर्षांच्या आत मूल बाळ व्हायलाच हवं, सांग ना."
रागाने लालबुंद होऊन प्रिया बोलत होती.

यावर देवांश ही काय बोलणार होता? तो ही तसाच त्या मंद अंधारात फेसाळलेल्या लाटांत मग्न होऊन शांतच बसून होता.


त्याला असा शांत बसलेला पाहून प्रिया म्हणाली,
"तुमचं बरं आहे रे, लग्न झालं तरी फार काही बदल होत नाही. होतात ही, पण त्यांना सामोरे जायला किंवा तात्पुरते का होईना, पण तुम्हाला कुठे तरी बाहेर पडून निदान टाळता तरी येतात आणि महत्वाचं म्हणजे, किती ही वर्ष लग्नाला झाले असले तरी \"ह्याला अजून काहीच नाही का?\" हा प्रश्न तरी नसतोच भेडसवायला."
देवांश मात्र निरुत्तर होऊन गप्प बसला होता.

अशा परिस्थितीत त्याने बोलायला तरी काय हवं होतं? त्याच्याकडे बोलायला काही नव्हतंच, पण कधी कधी शब्दांपेक्षा ही जास्त आधार देऊन जातो तो प्रेमळ स्पर्श. कधी कधी आधार द्यायला पुरेशी असते, ती प्रेमाला व्यक्त करणारी साधीशी एक अबोल नजरेची झलक.

तो तसाच प्रेमाने प्रियाकडेच पाहत बसून राहतो. मध्येच शांत झालेली प्रिया पुन्हा बोलायला लागली,
"अरे चार वर्षात मूलं बाळं हवी असतात. एकदा लग्न झालं की हा वर्ष, दोन वर्षांचा टप्पा पार होतो न होतो तेच टोमणेबाजी सुरु होते की, हे काय पडलं आमच्या पदरी? हिला अजून काहीच नाही, अरे पण चार दोन वर्ष म्हणजे फार जास्त काळ नाहीये रे. जिथे जन्म झाला, जिथे वाढलो, पडलो-धडपडलो ते घर, तो परिवार त्यांचं प्रेम, वीस बावीस वर्षांच्या सर्व आठवणींचं गाठोडं बांधून आम्ही मुली सगळं काही जिथल्या तिथेच सोडून निघून येतो. हे टोमणे ऐकायलाच का? अरे एवढं सगळं सोडून येणं सोप्प नसतं रे,तरी ही आम्ही सोडतो. तिकडचं सोडून इकडे सर्वांना अगदी मनापासून आपलसं ही करतो, पण आम्हाला तितकं आपलेपण मिळतं का?
सगळं काही नविन असतं रे, जणू काही हे लग्न म्हणजे आमचा दुसरा जन्मचं होत असतो. मग अशा एखाद्या अनोळखी ठिकाणी आम्हाला पूर्णपणे एडजस्ट होता होताच एखादं दीड वर्ष निघून जातं. अशात सर्वांना समजून घ्यायचं असतं,स्वतःतल्या किती तरी सवयी बदलाव्या लागतात, त्या बदलवायच्याच असतात. हे सगळं करत असताना सोबतच एक सून, बायको अशा इतरही सर्वच जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतातच ना? आणि आम्ही यात कमी पडतचं नाही. त्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतोच, पण मग तरी चार वर्ष झाले अजून काहीच नाही. असं कसं म्हणू शकतात? आणि हे आमच्या पुरतचं का? जर नसेलच होतं,तर एक स्त्री म्हणून फक्त आमच्यातच दोष का पाहिला जातो?
जर का सृष्टी निर्मितीला स्त्री पुरुष दोघे ही पूरक असतात, तरी मग झालाच थोडाफार उशीर तर दोष फक्त स्त्रीवरचं का?"
आज जणू मनातील सगळीच भडास प्रिया त्या समुद्र किनारी बसून ओकत होती.देवांश मात्र गप्प ऐकत होता.तिचे सगळे प्रश्न ही विचार करायला भाग पाडणारेच होते. पण शेवटी तो फक्त या समाजातला एक घटक होता. तो स्वतः मध्ये बदल करेल, स्वतःच्या घरात बदल करु शकेल पण समाजाचं काय?

"अगं वेडाबाई, तू हे मनाला लावून बसली आहेस का? जाऊदेत ग, तसाही फॅमिली प्लॅनिंगचा निर्णय आपल्या दोघांचा होता. तू तसे आईला सांगून टाकायचे की, आत्ताच लगेच मुला बाळाचा विचार नाही करायचा हा निर्णय आमच्या दोघांचा आहे. तू का सांगितले नाही? "देवांशने प्रियाला विचारले.


"काय सांगणार? आणि केव्हा सांगणार? जर त्या मला बोलतील तर सांगेल ना,पण त्यांना घरातले विषय घरात न बोलता बाहेर समाजातच बोलायचे असतात. मग समाजात सांगत बसू का? आणि मुद्दा फक्त माझ्या एकटीचाच नाही रे. समाजात अशाच माझ्यासारख्या किती तरी प्रिया असतील की त्यांना या गोष्टी सहन कराव्या लागत असतील."

"प्रिया, अगं इथे आपलंच आपल्याला बोलून सांगता येईना, तर आपण समाजाचा प्रश्न कसा सोडवणार? ही एक वैचारिक पातळी असते ग,शेवटी ज्याचे त्याचे विचार. आपण आपले, आपल्या घरातल्यांचे विचार बदलवू शकतो पण समाजातले नाही ना. शेवटी या सृष्टीत बऱ्याचशा अशाच गोष्टी निरुत्तर आहेत गं. त्यासोबत फक्त चालत रहायचं आणि दुर्लक्ष करत रहायचं. " प्रियाचं बोलणं अर्ध्यावरच तोडत देवांश तिला समजावत होता.

पुढे प्रिया काही तरी बोलणारच होती की, तेवढ्यात तिला जरासं मळमळल्या सारखं झालं.डोकं गरगर फिरल्या सारखं वाटलं आणि थोडसं उलटी झाल्यासारखं झालं आणि क्षणभरात सगळं काही चित्रचं बदलून गेलं.

रागाने लालबुंद झालेली प्रिया जराशी लाजत, गालातच गोड हसत देवांशच्या मिठीत शिरत ती म्हणाते,
"घ्या आपल्याला पहिली चाहूल लागली."

तिला असे आनंदी झालेलं बघून देवांशच्या ही ओठांवर हास्याची कळी खुलली आणि तिला आपल्या मिठीत घट्ट कैद करत तो पुटपुटतो.

" प्रिया कोणी काही ही बोलूदेत, मी सदैव तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक सुख दु:खात माझा अर्धा वाटा राहिलं."
प्रियाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत देवांशने तिच्या माथ्यावर आपले ओठ टेकवले. प्रियाने लाजून डोळे घट्ट मिटून घेतले आणि ती गालातच गोड हसली.


समाप्त. 

©® गणेश फापाळे
टिम: अहमदनगर.. 
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//